रंगांधळेपणा म्हणजे काय? लहान मुलांना रंगांबाबत या अडचणी येत असतील तर काय काळजी घ्यावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बहुतांशवेळा सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या गोष्टी आपण गृहीत धरून चालतो. म्हणजे आपल्याला जे जग दिसतंय, ज्या संवेदना आहेत त्या सर्वत्र सर्वांना असतील असं वाटत असतं. मात्र जगातल्या कित्येक लोकांना हे सामान्य म्हणून गृहीत धरलेले नियम लागू होत नाहीत.
आरोग्याच्या ज्या गोष्टी बहुसंख्याक लोकांना सामान्य वाटत असतात त्या प्राप्त करणं अनेक लोकांना कठीणही असू शकतं. उदाहरणार्थ रंगाधळेपणा (colour blindness).
अनेक लोकांना बहुसंख्य लोकांना दिसत असलेलं जग हे वेगळ्या रंगात दिसू शकत असतं. कलर ब्लाइंटनेस अवेअरनेस ऑर्गनायजेशनुसार, प्रत्येक 12 मुलांपैकी एकास आणि प्रत्येक 200 मुलींपैकी एका मुलीस रंगांधळेपणाचा त्रास असू शकतो असं आकडेवारी सांगते.
या लोकांना इतरांप्रमाणे रंगातील भेद ओळखणं कठीण जात असतं.
रंगांधळेपणा (कलर ब्लाइंडनेस) होण्याचं प्रमुख कारण अनुवंशिक किंवा जनुकीय असते. म्हणजेच पालकांकडून पुढच्या पिढीमध्ये हा दोष येण्याची शक्यता जास्त असते.
मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये रंगांधळेपण येण्यात ही शक्यता जास्त कारणीभूत असते. काही लोकांना काही विशिष्ट आजार किंवा औषधांमुळे रंगांधळेपण येण्याची शक्यता असते.
वाढत्या वयामुळेही या समस्येचा सामना करावा लागू शकतो. डोळ्यांच्या इतर समस्या म्हणजे, ग्लूकोमा, डायबिटिक, रेटीनोपॅथी यांसारख्या आजारांमुळेही रंग ओळखण्याची समस्या होऊ शकते.
रंगांधळेपणा का होतो?
आपल्या डोळ्यांमध्ये रंग ओळखणाऱ्या शंकू पेशी असतात त्यांना कोन सेल्स असं म्हटलं जातं. त्या लाल, हिरवा किंवा निळ्या रंगातला भेद ओळखण्यासाठी उपयोगी असतात.
रंगांधळेपण असणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांतील शंकू पेशी योग्यप्रकारे काम करत नसतात. काही रुग्णांमध्ये त्यांची संख्या कमी असते तर काही रुग्णांमध्ये त्या आजिबात नसतात.
बऱ्याच रंगांधळ्या रुग्णांना लाल, हिरवा, तपकिरी आणि भगव्या रंगातील भेद करता येत नाही.
काही लोकांना पिवळा आणि निळा, लाल, जांभळा यातला फरक करता येत नाही. त्यांची संख्या कमी आहे. अनेक रुग्णांना रंग फिकट दिसतात.
तसेच अक्रोमॅटोप्सिया नावाची एक स्थिती असते. ही स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. या रुग्णांना रंग आजिबातच दिसत नाहीत. यांना सर्व गोष्टी करड्या रंगात दिसत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
रंगांधळेपणाचा लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?
रंगांमधील फरक डोळ्यांना न ओळखता आल्यामुळे लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसतं. लहान मुलांना याचा सर्वांत जास्त त्रास होतो. कारण शाळेत शिकताना त्यांना अनेक अडथळे येतात.
मुलांना एखादी गोष्ट सांगण्यासाठी, आठवण्यासाठी तसेच समोर असलेली गोष्ट करण्यात फार त्रास होतो. रंग आठवण्यासाठी केलेली ही धडपड आयुष्यभर सुरू राहाते. खेळांमध्ये सहभाग घेतानाही याचा मोठा अडथळा येतो.
उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेटसारख्या सांघिक खेळात समोरच्या संघातल्या खेळाडूंनी कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आपल्या संघाने कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. अगदी खेळाचे सामने पाहतानाही हा त्रास होऊ शकतो.
गाडी चालवताना, घरातील कामं करताना, घरासाठी किराणा आणताना, खेळणी, कपडे निवडताना, स्वयंपाक करताना हा त्रास जास्त वाटू शकतो.
लहान मुलांमध्ये रंगांधळेपण असल्याचं कसं ओळखायचं?
लहान मुलं चित्र काढताना, रंगवताना चुकीचे रंग निवडत असतील, रंगांचा समावेश असलेल्या कामात त्यांना फारच त्रास होत असेल, चित्र रंगवणे किंवा चित्रासंबंधी गोष्टी करायला टाळाटाळ करत असतील तर पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जेवताना पदार्थ खाण्याआधी मुलं प्रत्येक वेळेस त्याचा वास घेऊन ते ओळखत असतील तरीही त्यामागचं कारण शोधलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
रंगांधळेपण असणाऱ्या व्यक्तीचा त्रास कमी होण्यासाठी त्याचं निदान लहानपणीच होणं आवश्यक असतं.
लहान मुलांमधील प्रारंभिक अवस्थेतील लक्षणं ओळखण्यासाठी मुंबईतील वडाळा येथील डॉ. अग्रवालस् रुग्णालयातील नेत्र शल्यविशारद डॉ. स्मित एम. बावरिया यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
ते सांगतात, “सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अनेकदा रंगांचा फरक करण्यात अडचण येते. विशेषतः लाल आणि हिरवा किंवा निळा आणि पिवळा. पुस्तकातील रंग ओळखणे किंवा रंगसंगतीला मिळत्याजुळत्या कपड्यांची निवड करणे यासारखी रंग-आधारित कामे करताना मुलांना त्रास होऊ शकतो. त्यांना रंगांचा संदर्भ लावण्याची समस्या असू शकते.”
ते पुढे सांगतात, “मुलांची रंग ओळखण्यात आणि रंगाला नाव देण्यात अडचण, रंगांमधील गोंधळ किंवा रंग-आधारित माहितीविषयक समस्या यासारखी लक्षणे तपासावी. काही सामान्य चाचण्यांमध्ये, इशिहारा चाचणीतही रंगपट्ट्यांचा वापर केला जातो. ज्यामध्ये संख्या अंतर्भूत असतात आणि फार्न्सवर्थ-मुनसेल 100 ह्यू (Farnsworth-Munsell 100 Hue Test) चाचणी, जी एका क्रमाने रंग व्यवस्था करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करते.”
रंगांधळेपणावर उपचार काय ?
रंगांधळेपणा सामान्यतः बरा होऊ शकत नाही. अनेकदा ही एक अनुवांशिक स्थिती असते आणि कलर-करेक्टीव्ह लेन्स किंवा अॅप यासारखी साधने आहेत, जी लोकांना अशा स्थितीचा सामना करण्यास मदत करू शकतात. परंतु या स्थितीला जबाबदार असणाऱ्या आनुवंशिकतेत बदल करणारा कोणताही उपचार नाही.
रंगांधळेपणावरील उपचारांबद्दल डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मुऱ्हे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, "ज्या रुग्णांना काही खास रंग ओळखताना त्रास होत असेल तर डॉक्टर्स त्यांना रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचा सल्ला देतात. परंतु लेन्स हा त्यावरील उपचार नसून अनेकदा त्यामुळे डोळ्यांना इतर समस्या होतात."
"वैमानिक, सैन्यदल, पोलीसदल, वायरमन, अग्निशमन दल इ. महत्त्वाच्या क्षेत्रात नवीन भरती करताना उमेदवाराची कलर व्हिजन काळजीपूर्वक तपासली जाते. काही देशात तर वाहन चालवण्याचा परवाना देतानासुद्धा रंगआंधळेपणा आहे की नाही हे काटेकोरपणे पाहिलं जातं. या व्याधीमध्ये बऱ्याचदा त्या व्यक्तीची दृष्टी ही सामान्य असते. फक्त त्याला रंग ओळखता येत नाही. यामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होत नाही," डॉ. मुऱ्हे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. स्मित बावरिया सांगतात, "रंगांधळेपण असलेल्या व्यक्तींना समाज आणि कुटुंबातील सदस्य हे रंगांचा संदर्भ नमूद केलेली लेबल किंवा नमुने समाविष्ट असलेल्या कलर-कोडिंग प्रणालीचा वापर करून, रंग-संबंधित कामांचे स्पष्ट शाब्दिक वर्णन उपलब्ध करून, माहिती पोहोचवण्याचे एकमेव साधन रंग नसतात याची खात्री करून मदत करू शकतात. सर्वसमावेशक वातावरण निर्माण करून रंगांधळ्या व्यक्तींना भेडसावणारी आव्हाने समजून घेणे देखील उपयोगी ठरतं.”


आहार आणि जीवनशैलीमुळे रंगांधळेपणा बरा होत नसला तरी, डोळ्यांचे संपूर्ण आरोग्य राखणे फायदेशीर ठरते.
अँटीऑक्सिडंट्ससह अ, क आणि ई जीवनसत्त्वे समृद्ध असलेला संतुलित आहार डोळ्यांच्या सामान्य आरोग्यास मदत करतो.
डोळ्यांची नियमित तपासणी आणि संरक्षक चष्मा लावल्याने दृष्टीची गुणवत्ता राखण्यास मदत होऊ शकते. कलर-करेक्टीव्ह चष्मे किंवा अॅप यासारखी अनुकूल साधने दैनंदिन कामांमध्ये उपयुक्त ठरू शकतात.
लहान मुलांना कशी मदत करायची?
रंगांधळेपण असलेल्या मुलांना लहानपणापासून मदत करता येऊ शकते. रंगकाम करताना रंगाच्या पेन्सिली, रंगाच्या डब्या यांच्यावर त्या रंगाची नावं ठळक अक्षरात लिहिता येऊ शकतात. त्यांच्याशी सतत संवाद ठेवून त्यांना धीर दिला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
खेळ, शिक्षण यात रंगाबरोबरच तक्ते, आलेख, विविध आकारांचा वापर केला पाहिजे. त्यांच्या वर्गात असणाऱ्या मुलांना तसेच शिक्षकांना या स्थितीची माहिती दिली पाहिजे.
शिक्षकांनी या स्थितीची माहिती वर्गातल्या इतर मुलांना करुन दिली पाहिजे. मुलांशी सतत बोलत राहाणं, त्यांना वेगवेगळी माहिती देणं, प्रश्नांना उत्तरं देणं, त्यांचे अडथळे समजून घेणं, धीर देणं यामुळे आत्मविश्वास वाढतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












