नव्या संशोधनातून उलगडली नवजात अर्भकांच्या पचनसंस्थेबाबतची अनेक महत्त्वाची रहस्ये

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्मिता मुंदसाद
- Role, आरोग्य प्रतिनिधी
नवजात अर्भकांच्या पोटातील आतड्यांमध्ये कोणते बॅक्टेरिया (जीवाणू) असतात, हे शोधण्यासाठी यूकेमधील शास्त्रज्ञांनी जवळपास 2000 लहान बाळांच्या विष्ठेचे नमुन्यांचा अभ्यास केला आहे.
संशोधकांच्या मते, लहान मुलांच्या विष्ठेत तीन प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. त्यात अनेक नवीन जीवाणूसुद्धा असतात.
त्यात बी. ब्रेव्ह नावाचा एक जीवाणू आहे. त्यामुळं आईच्या दुधातील पोषकतत्त्वं तयार होतात. त्याचप्रमाणे हा जीवाणू कीटकांचा नाश करतो असं प्राथमिक संशोधनात लक्षात आलं आहे.
या जीवाणूचा एक प्रकार लहान मुलांसाठी घातक असतो. त्यामुळं चिमुकल्यांना आजारांच्या संसर्गाचा धोका असतो. नेचर मायक्रोबायोलॉजी या मासिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात याबाबतचा उल्लेख आहे.
आपल्या पचनसंस्थेत लाखो प्रकारचे जीवाणू असतात आणि त्यांचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो असं अनेक संशोधनातून समोर येत आहे.
मूल जन्माला आल्यावर त्याच्या शरीरात कोणते जीवाणू तयार होतात याबद्दल संशोधन करण्यात आलं आहे.
लंडन येतील वेलकोम सँगर इन्स्टिट्यूट आणि बर्मिंघम विद्यापीठातील वैज्ञानिकांनी 1288 नवजात अर्भकांच्या विष्ठेचा अभ्यास केला. यूकेच्याच विविध रुग्णालयात त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचं वय एक महिन्यापेक्षा कमी होतं.
बहुतांश नमुन्यांमध्ये तीन प्रकारचे जीवाणू आढळल्याचं त्यांना लक्षात आलं.
बी. ब्रेव्ह आणि बी. लोंगम या गटातील जीवाणू फायदेशीर होते. आईच्या दुधातल्या पोषकतत्त्वाचा ते वापर करतात, हे त्यांच्या प्रोफाइलवरून लक्षात आलं.
मात्र इ. फिकॅलीस नावाच्या जीवाणूमुळं बाळांना संसर्गाचा धोका असतो, असं सुरुवातीच्या चाचण्यांमधून लक्षात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या बाळांच्या विष्टेचा अभ्यास करण्यात आला त्यांना पूर्णपणे किंवा काही प्रमाणात स्तनपान सुरू होतं. जन्म झाल्यानंतर पहिल्या काही आठवड्यातच अभ्यास करण्यात आला.
मात्र, संशोधकांच्या मते आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क याचा कोणताही प्रभाव या बाळांच्या पचनसंस्थेतील जीवाणूंवर झाला नाही.
ज्या बाळांच्या मातांना प्रसूतीच्या वेळी अँटिबायोटिक्स दिले त्या बाळांच्या पचनसंस्थेत इ.फिकॅलिस हा जीवाणू असण्याची शक्यता होती.
त्याचा या मुलांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बाळांमधील सूक्ष्मजीव विकसित होण्यासाठी आईचं वय, त्या मातेनं जन्माला घातलेलं तसंच कितवं बाळ आहे आणि इतर बाबीही महत्त्वाच्या ठरतात.
डॉक्टर यान साहो हे वेलकोम सँगर इन्स्टिट्यूट मध्ये काम करतात.
त्यांच्या मते, "1200 बाळांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला काही जीनोमिक माहिती मिळाली आहे. त्यात तीन जीवाणूंचा समावेश आहे. हे जीवाणू पोटातील सूक्ष्मजीव यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळं या सूक्ष्मजीवांचं प्रोफाइल तयार करण्यास आम्हाला मदत झाली."
“बाळांमधील ही परिसंस्था पाहणं आणि ती कशी वेगळी आहे, या बाबी कळल्या तर या मुलांमध्ये चांगले सूक्ष्मजीव तयार होण्यासाठी कोणती परिणामकारक थेरपी देता येईल हे कळेल.”

फोटो स्रोत, Getty Images
लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रुआईरी रॉबर्टस्न हे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते या संशोधनाचा भाग नव्हते. ते म्हणाले, “या संशोधनामुळे जन्म झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यात सूक्ष्मजीव कसे एकत्र येतात याविषयीच्या ज्ञानात भर पडली आहे.
“गेल्या काही महिन्यांत आम्हाला बाळाचा जन्म कसा झाला आहे आणि स्तनपान यामुळं पोटातील सूक्ष्मजीव आणि त्यांचा लहानपणी होणाऱ्या अस्थमा आणि अलर्जीशी काय संबंध आहे याची बरीच माहिती मिळाली आहे.”
“मात्र, याचं रुपांतर सूक्ष्मजीवांना समोर ठेवून तयार करण्यात आलेल्या थेरपीत झालेलं नाही.”
लिव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक लुईस केन्नी म्हणाल्या की, बाळाचा जन्म आणि स्तनपानाचे निर्णय गुंतागुतीचे आणि वैयक्तिक असतात. त्यामुळं जेव्हा अनेक पर्याय निवडायचे असतात तेव्हा त्याचा कोणताही एक असा ठोस मार्ग नसतो.”
“बाळाचा जन्म कोणत्या पद्धतीने झाला आणि नवजात बाळाला कशाप्रकारे स्तनपान केलं याचा सूक्ष्मजीवांच्या विकासावर काय परिणाम होतो आणि या सगळ्याचा पुढच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची अद्यापही आम्हाला पूर्ण माहिती मिळालेली नाही. म्हणून हे संशोधन महत्त्वाचं आहे,” असंही त्या म्हणाल्या.
हे संशोधन वेलकोम आणि वेलकोम सँगर इन्स्टिट्यूटने अर्थसहाय्य केलेल्या ‘यूके बेबी बायोम स्टडी’ या संशोधनाचा भाग आहे.
यातील एक संशोधक डॉ. ट्रेव्हर लॉव्लेया कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. प्रौढांच्या प्रोबायोटिक्सवर काम करत आहेत आणि त्या वेलकोम संगर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक आहेत.











