हाफकिन यांनी मुंबईत प्लेगवरची लस कशी शोधून काढली?

फोटो स्रोत, WELLCOME TRUST
- Author, जोएल गुंथर आणि विकास पांडे
- Role, बीबीसी न्यूज
गतशतकाच्या सांध्यावर पॅरिसमध्ये व भारतामध्ये कार्यरत राहिलेल्या वाल्देमार मॉर्देकाय हाफकिन यांनी पटकी व प्लेग यांवरील जगातील पहिल्या लशींची निर्मिती केली. मग अपघाती विषबाधेमुळे त्यांचा जीवनप्रवास संपला.
वॉल्डमार हाफकिन 1894 सालच्या वसंतामध्ये पटकी आजाराचा शोध घेत कलकत्त्याला आले. वसंत ऋतूमध्ये या शहरात पटकीची साथ पसरत असे, त्यामुळे हाफकिन यांना आशा वाटत होती.
आदल्या वर्षी मार्च महिन्यात ते भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी या आजारावरची 'लस' सोबत आणली होती, परंतु वर्षभर खटपट करूनही त्यांना स्वतःच्या या शोधाची चाचणी घेता आली नाही.
भारतात आल्यापासून हाफकिन यांना ब्रिटिश वैद्यकीय व्यवस्थेतील व भारतीय जनतेमधील शंकासुरांना सामोरं जावं लागलं आणि त्यांच्या या प्रयोगाला बराच प्रतिकारही झाला. ते डॉक्टर नव्हते, तर प्राणिशास्त्रज्ञ होते. आणि ओडेसामध्ये प्रशिक्षण घेतलेले व पॅरिसमध्ये कौशल्यं विकसित केलेले ते रशियन ज्यू होते. त्या काळी आंतरराष्ट्रीय जीवाणूशास्त्राच्या जगात दुफळी माजलेली होती आणि त्याकडे साशंकतेने पाहिलं जात असे.
हाफकिन भारतात आले तेव्हा 33 वर्षांचे होते. त्यांना लशीची चाचणी घेण्याबाबत व्यावहारिक बाजूनेही बराच संघर्ष करावा लागला. त्यांच्या चाचणीसाठी दोन इंजेक्शनं एका आठवड्याच्या विरामाने घ्यावी लागत, आणि हाफकिन यांच्या सहकाऱ्यांना काही वेळा दुसऱ्या वेळी इंजेक्शन घेण्यासाठी माणसं शोधायला अडचणी येत असत.
भारतामध्ये पटकीचा आजार बराच पसरलेला असतानाही, मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी पटकीचे रुग्ण शोधणं सहज सोपं नव्हतं. त्या वर्षी हाफकिन यांनी उत्तर भारतातील सुमारे 23,000 लोकांना लस दिली, असं त्यांच्याच नोंदींवरून स्पष्ट होतं, "लस परिणामकारक होती अथवा नाही हे कळण्यासाठी या लोकांच्या आसपास मुळात पटकीचा प्रादुर्भावच झाला नाही."
त्यानंतर मार्च 1894 मध्ये हाफकिन यांना एक संधी मिळाली.
कलकत्त्यातील एका वस्तीमध्ये तळ्याच्या पाण्यामधले पटकीचे सूक्ष्म जंतू ओळखण्यासाठी मदत करायला तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने हाफकिन यांना बोलावणं पाठवलं. शहराच्या वेशीबाहेर असणाऱ्या या वस्त्यांमध्ये गरीब लोक मातीच्या खोपट्यांत राहत असत, आणि त्यांच्या आजूबाजूला पाण्याची डबकी व तळी तयार झालेली होती. या वस्त्यांमधील रहिवासी सामायिक पाणीसाठ्यातलंच पाणी पित असत, त्यामुळे पटकीच्या वेळोवेळी होणाऱ्या प्रादुर्भावाची लागण त्यांना होत असे.

फोटो स्रोत, WELLCOME TRUST
हाफकिन यांना बाल्यावस्थेत असलेल्या त्यांच्या लशीची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी या वस्त्या आदर्श होत्या.
प्रत्येक घरामध्ये सारख्या परिस्थितीत राहणाऱ्या लोकांचा गट त्यांच्या समोर होता आणि ते सगळेच पटकीच्या संपर्कक्षेत्रात होते. प्रत्येक कुटुंबातल्या काहींना लस देता आली आणि काहींना लस न देता ठेवले, आणि यात पुरेशा संख्येने लोक सहभागी झाले, तर त्यातून काही अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे हाफकिन यांना शक्य होणार होते.
मार्चअखेरीला कत्तल बागन वस्तीमधल्या दोन व्यक्तींचा पटकीने मृत्यू झाला, त्यातून नवीन प्रादुर्भावाचा संकेत मिळाला. हाफकिन तत्काळ त्या वस्तीकडे गेले आणि तिथल्या सुमारे दोनेकशे रहिवाशांपैकी 116 रहिवाशांना लस दिली. त्यानंतर त्यांच्या एका छोट्या चमूने आणखी 10 व्यक्तींचं पुढील काही दिवस निरीक्षण केलं, त्यातील सात व्यक्ती मरण पावल्या - या सर्व लस न दिलेल्यांपैकी होत्या.
हे निष्कर्ष उत्साहवर्धक होते, त्यामुळे कलकत्त्यातील आरोग्य अधिकाऱ्याने व्यापक चाचणीसाठी निधी देऊ केला, पण लोकांना लसीकरणासाठी तयार करणं प्रत्यक्षात अतिशय अवघड होतं. अनेक वर्षं ब्रिटिश सरकारने वरून खाली लादलेल्या वैद्यकीय कार्यक्रमांमुळे लोकांमध्ये या सर्व प्रकाराबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली होती, आणि अनेकांसाठी लसीकरणाची संकल्पनाच परकी होती.
यावर उपाय म्हणून हाफकिन यांनी ब्रिटिशांऐवजी भारतीय डॉक्टर व सहायकांच्या चमूसोबत काम करायला सुरुवात केली. चौधरी, घोष, चॅटर्जी व दत्त यांच्यासह अनेक डॉक्टरांचा या चमूमध्ये सहभाग होता. लसीकरणशास्त्राच्या जगतामध्ये त्यांनी एक नवीन क्लृप्तीही शोधून काढली होती. आपण सुरक्षित लस तयार केली आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सार्वजनिकरित्या आधी स्वतःला इंजेक्शन टोचून दाखवले.

फोटो स्रोत, Getty Images
"सुरुवातीला लोकांनी प्रतिकार केला असला, तरी नंतर हाफकिन यांच्या पटकीवरील लशीसाठी कलकत्त्यातील झोपडपट्ट्यांमध्ये रांगा लागल्या होत्या, अगदी दिवसभर रांगा लावून लोक लस घेत होते, ही लक्षणीय बाब मात्र अनेकदा नोंदवली जात नाही," असं मँचेस्टर विद्यापीठातील विज्ञान व वैद्यकशास्त्राचा इतिहास अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक प्रतीक चक्रवर्ती म्हणतात.
"हाफकिन अनेक तास, अख्खा दिवस त्या झोपडपट्ट्यांमध्ये भारतीय डॉक्टरांसोबत काम करत घालवत होते. लोक कामावर जाण्यापूर्वी सकाळी ते लसीकरण सुरू करायचे, आणि संध्याकाळी लोक परतल्यावर लसीकरण पुन्हा सुरू व्हायचं. झोपडपट्टीत तेलदिव्यापाशी बसून हे सगळं कार्य सुरू होतं."
या आजाराविषयीचं आकलन आणि त्यावर केले जाणारे उपचार यांबद्दल मूलगामी जागतिक बदल घडवणाऱ्या आद्य संशोधकांमध्ये हाफकिन यांची गणना होऊ लागली. कलकत्त्यांनी त्यांनी केलेल्या कामाचा हा परिणाम होता. परंतु, त्यांच्या आधी होऊन गेलेले एडवर्ड जेनर आणि त्यांच्या नंतर झालेले जोनास सॉल्क यांच्यासारखं हाफकिन यांचं नाव खऱ्या अर्थाने लोकपातळीवरील कल्पनाविश्वाचा भाग झालं नाही - भारतातही नाही आणि युरोपातही नाही.
"अशा प्रकारचं प्रयोगशाळेतील औषध भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आणणारे हाफकिन पहिलेच होते," प्राध्यापक चक्रवर्ती सांगतात.
"पॅरिसमधला हा वैज्ञानिक कलकत्त्यातील झोपडपट्ट्यांमध्ये आला. ही अतिशय नाट्यमय कहाणी आहे."
ओडेसा विद्यापीठातून 1884 साली प्राणिशास्त्रातील पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतरही ज्यू असल्यामुळे त्यांना प्राध्यापकी करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. त्याच्या पाच वर्षं आधी ते एका राजकीय संकटात अडकले होते. त्यावेळी झालेल्या एका ज्यूविरोधी दंगलीत स्थानिक बचाव दलाचा सदस्य म्हणून त्यांनी रशियन सैनिकांचा प्रतिकार केला होता. एका ज्यू माणसाचं घर उद्ध्वस्त करण्यापासून या सैनिकांना रोखण्यासाठी ते झगडले होते. यात हाफकिन यांना मारहाण झाली आणि अटकही करण्यात आलं, पण अखेरीस त्यांची सुटका झाली.

फोटो स्रोत, POPULAR SCIENCE MONTHLY
हाफकिन यांनी 1888 साली त्यांच्या मायदेशाचा निरोप घेतला. त्यानंतर अल्पकाळ त्यांनी जीनिव्हामध्ये शिक्षकाची नोकरी केली, मग पॅरिसमध्ये लुई पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये सहायक ग्रंथपाल म्हणून ते नोकरी करू लागले. त्या काळी जगातील सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधनाचं आघाडीचं केंद्र म्हणून या इन्स्टिट्यूटची ख्याती होती. ग्रंथालयातील कामामधून मोकळा वेळ मिळाल्यावर हाफकिन व्हायलिन वाजवायचे किंवा सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रयोगशाळेत प्रयोग करायचे.
पाश्चर व जेनर यांच्या कामाचा आधार घेत हाफकिन यांनी केलेल्या प्रयोगांमधून असं लक्षात आलं की, पटकीचे दंडाणु गिनी पिगच्या उदरकोशातून पुढे नेल्यानंतर- एकूण 39 वेळा त्यांनी ही प्रक्रिया पार पाडली- त्यांना सबळ किंवा 'उच्च' स्तरावरील पटकीचा संवर्ध सापडला. मग उष्णतेचा वापर करून हा संवर्ध त्यांना सौम्य करता आला. सौम्य झालेल्या सूक्ष्म जंतूचं इंजेक्शन दिल्यावर, त्यानंतर उच्चस्तरीय सूक्ष्म जंतूचं इंजेक्शन दिल्यावर गिनी पिग पटकीच्या प्राणघातक हल्ल्यापासून संरक्षित झालं.
या वेळेपर्यंत पटकीसारखे आजार दुर्गंधीयुक्त हवेतून वाहत जात असल्याचे मानले जात होते आणि त्यावर "विशाल प्रभावव्याप्तीचे उपचार" केले जात असत, असं प्राध्यापक चक्रवर्ती सांगतात ("संबंधित व्यक्तीला आंघोळ घातली जात असे किंवा वाफेमध्ये ठेवलं जात असे, यात ती व्यक्ती अर्धमेली होत असे, किंवा सगळीकडे कार्बोलिक अॅसिड फवारलं जात असे".) पण हाफकिन व इतरांच्या कामामुळे या आजाराच्या व्यवस्थापनाला एक विशिष्ट दिशा मिळाली- एक विषाणू किंवा सूक्ष्म जंतू जोपासून व सौम्य करून शरीराला लक्ष्य ठेवून त्याचा वापर करायचा, असे उपचार होऊ लागले.
पॅरिसमध्ये गिनी पिगवर यशस्वी प्रयोग केल्यानंतर हाफकिन यांनी तेच निष्कर्ष उंदरांमध्ये व नंतर कबुतरांमध्येही पडताळून पाहिले. आता ते मानवी चाचणीसाठी तयार होते.
18 जुलै 1892 रोजी हाफकिन यांनी सौम्यकरण झालेल्या पटकीचं इंजेक्शन स्वतःला टोचून जीवघेणी जोखीम उचलली. त्यांना काही दिवस ताप आला, पण त्यातून ते पूर्णतः बरे झाले, आणि मग तीन रशियन मित्रांना व त्यानंतर इतर अनेक स्वयंसेवकांना त्यांनी लस दिली. त्यातील कोणालाही त्यांच्याहून अधिक गंभीर परिणाम सहन करावे लागले नाहीत, त्यामुळे ही लस व्यापक स्तरावर चाचणीसाठी तयार असल्याची हाफकिन यांची खात्री पटली.
पण मोठ्या प्रमाणात मानवी चाचणी करण्यासाठी त्यांना पटकीचा जास्त प्रादुर्भाव असलेलं ठिकाण गरजेचं होतं. त्या वेळी पॅरिसमध्ये ब्रिटिश राजदूत असलेले व पूर्वी भारतात व्हाइसरॉय राहिलेले लॉर्ड फ्रेडरिख डफरीन यांनी 1893 साली हाफकिन यांच्या प्रयोगांबद्दल ऐकलं आणि त्यांना बंगालमध्ये जाण्याविषयी सुचवलं.

फोटो स्रोत, WELLCOME TRUST
त्यानंतरच्या वर्षी कलकत्त्यातील वस्त्यांमध्ये हाफकिन यांनी केलेल्या प्रयोगांचे आश्वासक निष्कर्ष निघाले, त्यामुळे आसाममधील चहाच्या मळ्यांवर कामगारांचं लसीकरण करण्यासाठी तिथल्या मळेमालकांनी हाफकिन यांना बोलावलं. तिथे त्यांनी हजारो कामगारांवर चाचण्या केल्या, पण 1895 च्या शरद ऋतूमध्ये त्यांनाच हिवतापाची लागण झाली आणि त्यावरील उपचारांसाठी त्यांना इंग्लंडला जाणं भाग पडलं. त्यांनी केलेल्या नोंदीनुसार, त्या वेळेपर्यंत त्यांनी पटकीप्रतिकारक लस जवळपास 42,000 लोकांना दिली होती.
आपल्या लसीमुळे रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी लागण झालेल्यांमधील मृत्युदर मात्र या लसीने खाली आलेला नाही, असं हाफकिन यांनी नंतर नमूद केलं होतं.
1896 साली भारतात परतल्यावर त्यांनी ही उणीव दूर करायचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नवीन दुहेरी सूत्र विकसित केलं. पण या वेळी मुंबईत आणखी गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे हाफकिन यांनी पटकीपासून कायमचं दूर जावं लागलं.
जगातील प्लेगची तिसरी साथ 1894 साली चीनमधील युनान प्रांतात सुरू झाली. तिथून ती ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँगमध्ये पसरली आणि हाँगकाँगहून निघालेल्या व्यापारी जहाजाद्वारे ही साथ तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई या किनारपट्टीवरील वर्दळलेल्या महानगरामध्ये येऊन पोहोचली. सप्टेंबर 1896 मध्ये मुंबईतील गोदीमध्ये एका धान्य व्यापाराच्या गोदामात प्लेगचा पहिला रुग्ण आढळला.
सुरुवातीला ब्रिटिश सरकारने ही साथ फारशी गांभीऱ्याने घेतली नाही. या महत्त्वाच्या बंदरामधलं कामकाज सुरू ठेवणं सरकारला गरजेचं वाटत होतं. पण लवकरच हा आजार मुंबईतील घनदाट झोपडपट्ट्यांमध्ये पसरला- या साथीचा मृत्युदर पटकीहून जवळपास दुप्पट होता, त्यामुळे प्लेगने मरण पावणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. या संदर्भात मदतीसाठी गव्हर्नरांनी हाफकिन यांना साद घातली.

फोटो स्रोत, WELLCOME TRUST
हाफकिन मुंबईला गेले आणि तिथे त्यांना एक छोटी खोली, एक कॉरिडॉर, एक कारकून व तीन अप्रशिक्षित सहायक देण्यात आले. या पूर्णतः विपरित परिस्थितून त्यांनी जगातील प्लेगवरील पहिली लस शोधून काढली.
"त्यांना फारशी जागा, मनुष्यबळ किंवा सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण पहिल्यांदाच त्यांना स्वतंत्रपणे काम करायला मिळालं होतं आणि त्यांची स्वतःची प्रयोगशाळा वापरायला मिळाली होती," असं दिल्लीस्थित साथरोगशास्त्रज्ञ चंद्रकांत लहरिया म्हणतात. "प्लेगवरील लस विक्रमी वेगात विकसित केल्यास आपण आघाडीचे वैज्ञानिक ठरू, हे त्यांना माहीत होतं."
त्या हिवाळ्याच्या मोसमात हाफकिन यांनी अथकपणे काम केलं. प्लेगचे दंडाणू सूक्ष्मजीवपोषक मांसरसामध्ये घातले, या मांसरसामध्ये त्यांनी स्वच्छ लोणी किंवा नारळाचं तेल अल्प प्रमाणात घातलेलं होतं, त्यानंतर दंडाणुचं रूपांतर अधोमुखी लवणस्तंभामध्ये झालं, आणि त्याच्या बाजूने सूक्ष्मजीव व विषारी घटक निर्माण झाले. पटकीवरील नवीन उपचारासाठी त्यांनी विकसित केलेलीच पद्धत ते इथे वापरत होते- सूक्ष्मजीव आणि त्यांनी निर्माण केलेले विषारी घटक यांच्यात संयोग साधून एकाच इंजेक्शनची लस तयार करण्याची ही पद्धत होती.
डिसेंबर महिन्यात हाफकिन यांनी प्लेगच्या हल्ल्यापासून प्रतिकार करणारी लस यशस्वीरित्या उंदरांना टोचली आणि जानेवारी 1897 पर्यंत या प्राणघातक आजाराविरोधातील लसीची मानवी चाचणी घेण्यासाठी ते पुन्हा तयार झाले होते.
पूर्वतयारी म्हणून त्यांनी 10 जानेवारी 1897 रोजी स्वतःला 10 सीसी प्रमाणात लस टोचून पाहिली. व्यापक चाचणीसाठी ते 3 सीसी इतकं प्रमाण वापरणार होते, त्या तुलनेत त्यांनी स्वतःवर प्रयोग करताना बरंच जास्त प्रमाण घेतलं होतं. यानंतर त्यांना गंभीर ताप आला, पण काही दिवसांमध्ये ते त्यातून बरे झाले.

त्या महिन्याअखेरीला मुंबईतील भायखळा तुरुंगात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. तिथे शेकडो कैदी होते. नियंत्रित चाचण्या करण्यासाठी हाफकिन तिथे गेले. त्यांनी 147 कैद्यांना लस दिली आणि 172 कैद्यांना लस दिली नाही. त्यानंतर तुरुंगात लसीकरण न झालेल्या कैद्यांमध्ये प्लेगचे 12 रुग्ण आढळले आणि त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर लस दिलेल्यांपैकी केवळ दोन जणांना प्लेगची लागण झाली, व एकाचाही मृत्यू झाला नाही.
भायखळा तुरुंगातील त्यांच्या लसीकरणाचं सकृत्दर्शनी यश लक्षात घेता हाफकिन यांना विस्तारीत प्रमाणात लसीचं उत्पादन व चाचणी करण्यासाठी एका खोलीच्या प्रयोगशाळेतून हलवून सरकारी मालकीच्या बंगल्यात जागा देण्यात आली. नंतरच्या काळात त्यांना अध्यात्मिक गुरू आगा खान यांच्या मालकीच्या एका मोठ्या निवासगृहामध्ये जागा दिली गेली. स्वतः आगा खान आणि त्यांच्या खोजा मुस्लीम समुदायातील हजारो सदस्य लसीकरणासाठी स्वयंसेवक म्हणून पुढे आले.
एका वर्षात हाफकिन यांची लस लाखो लोकांना टोचण्यात आली होती, त्यामुळे अगणित जीव वाचले.

फोटो स्रोत, WELLCOME TRUST
व्हिक्टोरिया राणीने त्यांना 'नाइटहूड' हा सन्मान दिला आणि डिसेंबर 1901 साली त्यांना मुंबईतील परळ इथे गव्हर्नर हाऊसमधल्या प्लेग संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं. इथे त्यांना नवीन सुविधा मिळाल्या आणि 53 जणांचा कर्मचारीवर्ग त्यांच्या दिमतीला होता.
मग नवीन आपत्ती कोसळली.
मार्च 1902 मध्ये पंजाबमधील मुल्कोवेल गावात हाफकिन यांची लस टोचलेल्यांपैकी 19 जण धनुर्वाताने मरण पावले. त्या दिवशी लसी टोचलेल्यांपैकी 88 जण धडधाकट होते. या संदर्भातील सर्व पुरावा विचारात घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की, परळमधील प्रयोगशाळेत 41 दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेल्या 53-एन बाटली प्राणघातकरित्या दूषित झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.

फोटो स्रोत, WELLCOME TRUST
या प्रकरणी तपास करण्यासाठी भारत सरकारने आयोग नेमला, आणि प्लेगच्या लसीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठीची प्रक्रिया हाफकिन यांनी बदलल्याचं उघडकीस आलं. उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी कार्बोलिक अॅसिडऐवजी उष्णतेचा वापर केला. जागतिक ख्यातीच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षांपासून उष्णतेची ही पद्धती सुरक्षितरित्या वापरली जात होती, पण ब्रिटिशांसाठी ती अपरिचित होती, त्यामुळे 1903 साली सदर आयोगाने असा निष्कर्ष काढला की, 53-एनची बाटली परळमधील हाफकिन यांच्या प्रयोगशाळेत दूषित झाली असणार. हाफकिन यांना प्लेग प्रयोगशाळेच्या संचालकपदावरून काढून टाकण्यात आलं आणि भारतीय नागरी सेवेतून त्यांना रजेवर पाठवण्यात आलं.
या निवाड्याने अपमानित झालेल्या हाफकिन यांनी भारताचा निरोप घेतला व ते लंडनला रवाना झाले. त्यांनी विलक्षण वेगाने प्लेगवरील लस विकसित केली होती, त्यांचा राणीच्या हस्ते 'नाइटहूड' देऊन सन्मान झाला होता, पण अचानक ते या सगळ्यापासून बाहेर पडले होते. हे स्थानही त्यांच्यासाठी पूर्णतः अनोळखी नव्हतं.
"त्या काळी बराच पूर्वग्रह असायचा," असं डॉ. बार्बरा हॉवगूड सांगतात. त्यांनी हाफकिन यांच्या कारकीर्दीवर एक अकादमिक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. "हाफकिन वैद्यकशास्त्रज्ञ नव्हते, त्यामुळे ते त्यांच्यातले नव्हते. या संदर्भात बराच गर्विष्ठपणा त्या क्षेत्रात दाखवला जात असे."

हाफकिन यांच्या पत्रव्यवहाराचा अभ्यास केलेले हार्वर्डमधील सार्वजनिक आरोग्याचे प्राध्यापक एली चेर्निन यांनी लिहिलं आहे की, "हाफकिन ज्यूद्वेषाला बळी पडल्याचं उघडपणे सुचवणारा काही पुरावा त्यांच्या दफ्तरात सापडत नाही," पण "हाफकिन ज्यू होते, याचा काहीच प्रभाव एडवर्डियन कालखंडातील नोकरशाहीवर नव्हता, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल."
चेर्निन यांच्या म्हणण्यानुसार, हाफकिन यांना छोट्या, अधिक खाजगी स्वरूपाच्या लढाया लढाव्या लागल्या. त्यांना इंग्रजीत व्यक्त होणं अवघड जात असे. या काळात त्यांनी लिहिलेल्या पत्रांच्या मसुद्यांमध्ये- अगदी मित्रमंडळींना लिहिलेल्या पत्रांच्या मसुद्यांतही "जवळपास अनाकलनीय गिचमिड अक्षरं काढलेली असत, दोन ओळींमध्ये शब्द घुसवलेले असत, आणि बरीच खाडाखोडही असायची, हे सगळं ते नंतर काळजीपूर्वक पुन्हा लिहीत."
हाफकिन निलंबित झाल्यानंतर दोन वर्षांनी, 1904 साली भारतातील प्लेगची साथ पराकोटीला पोहोचली. त्या वर्षी भारतात प्लेगने 11,43,993 लोकांचा मृत्यू झाला. हाफकिन यांची लसच या आजारावरील 'प्रमुख बचाव' होती, पण तिच्या निर्मात्याला स्वतःची पत सांभाळण्यासाठी लंडनमध्ये लढा द्यावा लागत होता, याकडे हॉवगूड लक्ष वेधतात.
मुल्कोवलमधील घटनेला चार वर्षं उलटून गेल्यावर, 1906 साली भारत सरकारने अखेरीस पूर्ण चौकशी अहवाल प्रकाशित केला, त्यात हाफकिन दोषी असल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणातील कित्येक कागदपत्रांचे गठ्ठे वाचून लंडनस्थित किंग्स कॉलेजमधील एक प्राध्यापक डब्ल्यू. जे. सिम्प्सन यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक पत्र लिहिलं. उपलब्ध पुराव्यानुसार 53-एन बाटली पंजाबमध्ये लसीकरणाच्या ठिकाणी अपघाताने दूषित झाल्याचं दिसतं, असा युक्तिवाद सिम्प्सन यांनी कळकळीने केला होता.
एक, ही विशिष्ट बाटली उघडण्यात आली तेव्हा त्यातून कोणताही वास आल्याची नोंद नव्हती; त्यात धनुर्वाताचा संवर्ध विकसित झालेला असता तर वैशिष्ट्यपूर्ण दुर्गंधी त्यातून आली असती, असं सिम्प्सन यांनी लिहिलं होतं.
दोन, 15 दिवसांनी या बाटलीची तपासणी करण्यात आली तेव्हा तिथे धनुर्वाताचं कमकुवत संवर्ध होतं. "ही बाटली मुंबईतच दूषित झालेली असती, तर चौकशी आयोगाला बाटलीतील उरलेल्या द्रवात कमकुवत नव्हे तर संपन्न संवर्ध सापडला असता," असं सिम्प्सन यांनी लिहिलं.
तीन, मरण पावलेल्या 19 लोकांमध्ये सात ते 10 दिवसांच्या कालावधीत संथ गतीने धनुर्वात वाढत गेला होता, म्हणजे लसीकरणाच्या दिवशी सुरुवातीला त्यांच्यातील संसर्ग कमकुवत असल्याचं सूचित होतं. बाटलीत आधीपासूनच विकसित संवर्ध अस्तित्वात असतं, तर "वेगाने वाढणाऱ्या धनुर्वाताचा हल्ला" या लोकांना सहन करावा लागला असता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, 53-एनची ती विशिष्ट बाटली उघडणाऱ्या सहायकाच्या हातातला चिमटा निसटून जमिनीवर पडला होता आणि बाटलीवरचं बूच काढण्यासाठी चिमटा वापरण्यापूर्वी त्याचं योग्य निर्जंतुकीकरण केलं गेलं नव्हतं, असं कागदपत्रांवरून उघड झालं.
यावरून, हाफकिन यांच्यावर "गंभीर अन्याय" झाल्याचा निर्वाळा सिम्प्सन यांनी काढला. हे पत्र प्रकाशित झाल्यानंतर इतरांनीही हाफकिन यांची बाजू लावून धरली.
'द टाइम्स'मध्ये चार घणाघाती पत्रं लिहून नोबेलविजेते रोनाल्ड रॉस यांनी (या पत्रांना त्यांनी "हॉट लेटर्स" असं संबोधलं होतं) ब्रिटिशांवर "विज्ञानाचा अनादर" केल्याचा आरोप लावला. हाफकिन यांच्या विरोधातील निर्णय मागे घेतला जात नाही, तोवर भारत सरकार "स्वतःच्या सर्वांत मोठ्या उपकारकर्त्याबाबत भयंकर कृतघ्न वागल्या"बद्दल दोषी मानले जाईल, असा इशारा रॉस यांनी दिला.
रॉस यांनी आणखीही एक इशारा दिला, तो आजही प्रस्तुत ठरणारा आहे: 53-एन बाटली प्रयोगशाळेत दूषित झाली होती, हा निष्कर्ष कायम ठेवला गेला, तर त्यातून लसीकरणावरील लोकांचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे. विशेषतः प्लेगमुळे दर आठवड्याला किमान 50 हजार लोक मरण पावत असताना हा धोका अधिक गंभीर ठरत होता.
अखेरीस सिम्प्सन व रॉस यांच्या पुढाकाराने हा प्रश्न ब्रिटिश संसदेत मांडण्यात आल्यावर, नोव्हेंबर 1907 मध्ये हाफिकन यांना दोषमुक्त करण्यात आलं. भारतात नोकरीवर परतण्यासाठी हाफकिन यांना रजा देण्यात आली.
त्यांनी कलकत्ता जीवशास्त्रीय प्रयोगशाळेचा प्रमुख संचालक म्हणून आनंदाने कार्यभार स्वीकारला. पण त्यांच्यावरचा ठपका पूर्णतः पुसण्यात आला नाही- त्यांना कोणतीही चाचणी करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं होतं; केवळ सैद्धान्तिक संशोधनापुरतंच त्यांचं कामकाज मर्यादित ठेवलं गेलं.
"मुल्कोवल घटनेबद्दल मला अन्याय शिक्षा दिली गेली आणि अजूनही ती बहुतांशाने कायम आहे," असं त्यांनी रॉस यांना लिहिलेल्या उदास पत्रामध्ये नमूद केलं होतं. "त्या प्रकरणासाठी मी जबाबदार होतो व आहे, असं प्रत्येक वेळी छापील स्वरूपात व बोलण्यातून अधोरेखित केलं जातं."
त्यानंतर हाफकिन यांची सात वर्षं निष्क्रियतेत गेली. त्यांनी संपूर्ण आयुष्यात लिहिलेल्या 30 शोधनिबंधांपैकी केवळ एक निबंध 1907 ते 1914 या कालावधीत लिहिला गेला होता. त्यानंतर थोडक्या काळासाठी ते पटकीचा अभ्यास करण्याकडे परत वळले आणि नवीन "जीवशक्तिहीन" लस विकसित करण्यामध्ये त्यांना रस वाटू लागला.
कालांतराने हीच पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. परंतु, हाफकिन यांनी चाचण्यांची परवानगी मागण्यासाठी वारंवार अर्ज करूनही भारत सरकारने त्यांना नकार दिला.
1914 साली वयाच्या 55 व्या वर्षी हाफकिन भारतीय नागरी सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी भारत सोडला. मुल्कोवाल दुर्घटनेचा चिरस्थायी ठसा त्यांच्यावर उमटला आणि त्यांची कायमची हानी झाली.
"मुल्कोवलच्या रूपात त्यांच्या कहाणीचा शेवट झाला," असं प्रतीक चक्रवर्ती म्हणाले. "त्यांच्या वारशाला या दुर्घटनेची झालर आहे. हताश होऊन त्यांनी भारताचा निरोप घेतला आणि आता ते सार्वजनिक व्यक्तिमत्व मानले जात नाहीत. इतिहासात त्यांचं नाव लुप्त झालं."
हाफकिन "यांचं नाव अधिक मोठ्या प्रमाणात माहीत व्हायला हवं," असं बार्बरा हॉवगूड म्हणतात. "ते खरोखरच अतिशय चांगले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते."
1897 ते 1925 या कालखंडामध्ये हाफकिन यांच्या प्लेगविरोधी लशीचे दोन कोटी 60 लाख डोस मुंबईहून पाठवले गेले. या लशीच्या चाचण्यांमध्ये मृत्यूदर 50 टक्के ते 85 टक्के खालावल्याचं दिसून आलं. पण त्यांनी किती जीव वाचवले याची "आकडेवारी सांगता येणार नाही." "ही संख्या खूपच प्रचंड असेल," असं हॉवगूड म्हणतात.
हाफकिन फ्रान्सला परतले आणि त्यांचं उर्वरित आयुष्य धर्माला वाहून घेतलं. ते अधिकाधिक सनातनी झाले आणि पूर्व युरोपात ज्यू शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी एका संस्थेची स्थापना केली. त्यांनी अखेरपर्यंत अविवाहित राहिले आणि आयुष्याची शेवटची वर्षं ते स्विझर्लंडमधील लौसॅन इथे एकटे राहत होते.
"हाफकिन अभ्यासू, एकलकोंडे, देखणे व मितभाषी होते; अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले," असं भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एच. आय. झाला यांनी लिहिलं आहे.
1930 साली वयाच्या 70 व्या वर्षी हाफकिन लौसॅन इथे मरण पावले.

ज्यूइश टेलिग्राफिक एजन्सीने त्यांना आदरांजली वाहणारं छोटंसं निवेदन प्रसिद्ध केलं. हाफकिन यांनी तयार केलेली प्लेगवरील लस "भारतभरात स्वीकारली गेली" आणि त्यांच्या प्रयोगशाळेने "विविध उष्णकटिबंधीय देशांना हजारो डोस पाठवले आहेत," असं या निवेदनात नमूद केलं होतं.
महान ब्रिटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व पूतिरोधक शल्यचिकित्सेचे आद्यप्रवर्तक लॉर्ड लिस्टर यांचं विधानही या निवेदनात दिलं होतं. त्यांनी हाफकिन यांना "मानतेचा त्राता" असं संबोधलं होतं.
हाफकिन यांनी प्लेगविरोधी लस पहिल्यांदा जिथे विकसित केली ती दोन खोल्यांची प्रयोगशाळा आता मुंबईतील केईएम रुग्णालयाचा भाग आहे. हाफकिन यांनी तिथे पथदर्शी शोध लावला त्याला शंभर वर्षं उलटून गेली आहेत, आणि आता दुसऱ्या एका- कोरोना विषाणूच्या- जागतिक साथीमध्ये भारताच्या लढ्याचं नेतृत्व हे रुग्णालय करतं आहे.
"कोव्हिड-19 विरोधातील लढाईमध्ये केईएम आघाडीवर आहे, ही एक प्रकारे हाफकिन यांना श्रद्धांजली आहे," असं चंद्रकांत लहरिया म्हणतात.
"हाफकिन यांनी विसाव्या शतकारंभी अनेक वैज्ञानिकांना लसविषयक संशोधनासाठी प्रेरणा दिली, पण काही कारणाने त्यांचं योगदान विस्मृतीत ढकललं गेलं. दोन खोल्यांच्या प्रयोगशाळेमध्ये अतिशय लहान चमूसोबत हाफकिन यांनी व्यवहारात आणता येईल अशी लस शोधली हे आपण कधीच विसरता कामा नये. त्यांची कामगिरी जवळपास अविश्वसनीय आहे."
हाफकिन यांचं नाव एका अर्थी ठळकपणे अजूनही जिवंत आहे. त्यांचं निधन होण्याच्या पाच वर्षं आधी, 1925 साली त्यांच्या काही समर्थकांनी भारत सरकारकडे पाठपुरावा केल्यावर परळमधील प्रयोगशाळेचं 'हाफकिन इन्स्टिट्यूट' असं नामकरण करण्यात आलं. हे नाव अजूनही कायम आहे.
या नामबदलाची माहिती देणारं पत्र हाफकिन यांना मिळालं, तेव्हा त्यांनी प्रयोगशाळेचे तत्कालीन संचालक लेफ्टनंट-कर्नल मॅकी व त्यांच्या चमूला पत्रोत्तर पाठवलं. मुल्कोवल दुर्घटनेच्या छायेत इतकी वर्षं घालवावी लागूनही हाफकिन यांच्या पत्रात कडवटपणाचा अंशही नव्हता.
"परळमधील प्रयोगशाळेला माझं नाव दिल्याबद्दल मी कर्नल मॅकी यांचा अत्यंत ऋणी आहे," असं हाफकिन यांनी लिहिलं होतं.
"मुंबईत काम करतानाची वर्षं हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता. तिथल्या सगळ्या गोष्टींशी माझी किती जवळीक आहे, हे स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. देशातील आरोग्य रचनेच्या वतीने ही इन्स्टिट्यूट एक सक्रिय केंद्र म्हणून भरभराटीला येवो, अशा शुभेच्छा मी देतो. इन्स्टिट्यूच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाला माझे अनेक आशीर्वाद."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








