कोरोना लॉकडाऊन : आयुष्य 'नॉर्मल' करण्यासाठी वेगवेगळे देश काय करत आहेत?

कोरोना व्हायरस लॉकडाऊन

फोटो स्रोत, AFP

कोरोना व्हायरसमुळे सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. काही देशांमध्ये हा लॉकडाऊन उठवण्याची तयारी करत आहेत, तर अनेक देशांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीय.

लॉकडाऊन उठवताना नेमकं नॉमर्ल आय़ुष्याकडे कसं जायचं यासाठीचा एक ठराविक फॉर्म्युला कोणत्याही देशाकडे नाही.

पण यासाठी अनेक देशांमध्ये लढवण्यात काही भन्नाट कल्पना लढवण्यात आल्या आहेत.

कोरोना
लाईन

टप्याटप्याने लॉकडाऊन उठवणं

लॉक़डाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा मार्ग जगभरातल्या अनेक देशांनी स्वीकारलेला आहे. ज्या इटलीला कोरोनाचा सगळ्यात मोठा तडाखा बसला होता, तिथे सध्या काय सुरू आहे, याकडे अनेकजण लक्ष ठेवून आहेत. रोममध्ये दुकानांपासून ते म्युझियम्सपर्यंतच्या सगळ्या गोष्टी टप्प्या टप्याने खुल्या केल्या जाणार आहेत.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन

फोटो स्रोत, CATHERINE LAI

पण इटलीच्या ज्या भागांमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग होता, तिथली परिस्थिती सप्टेंबरच्या आधी 'नॉर्मल' होणार नाही, हे इटालियन्सनाही पक्कं माहितेय.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं प्रमाण नेमकं कसं असेल, याविषयी जगात कोणालाच नेमकं काही माहित नसल्याचं वॉरविक युनिर्व्हसिटीमधले इन्फेक्शस डिसीजेसचे तज्ज्ञ डॉ. मिखाईल टिल्डस्ले सांगतात.

ते म्हणतात, "लॉकडाऊन दरम्यानच्या कोणत्या निर्बंधाचा किती परिणाम झाला याचा गुंता सोडवणं कठीण आहे. आपण हे निर्बंध शिथील करायला लागू तेव्हाच आपल्याला हे समजेल. हा एकच मार्ग आहे. निर्बंध उठवून त्याचा संसर्गावर का परिणाम होतोय हे पहावं लागेल."

टेक्नॉलॉजीची मदत

ट्रॅक, ट्रेस आणि टेस्ट ही सध्याची अत्यंत महत्त्वाची त्रिसूत्रं आहेत. म्हणूनच इन्फेक्शनचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टफोन अॅप्सचा वापर ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या देशांना हे करणं शक्य आहे, ते आपल्या नागरिकांसाठी अशी अॅप्स तयार करत आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि भारतात असं अॅप वापरण्यास सुरुवात झालेली आहे. इटली, फ्रान्स आणि युकेमध्ये हा वापर प्रस्तावित आहेत. यामुळे संसर्ग झालेली व्यक्ती इतर कोणाच्या संपर्कात होती, याविषयीचा प्रचंड डेटा मिळू शकेल. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसू लागताच त्या फोनच्या परिघातल्या लोकांना त्याचा अलर्ट मिळू शकेल. इस्रायलमध्ये तर सरकारने यासाठी थेट त्यांच्या गुप्तचर यंत्रणांची मदत घेतली आणि कोरोना पॉझिटिव्ह लोकांचे फोन ट्रॅक केले.

दक्षिण कोरियामध्ये या रोगाचा प्रसार सुरू झाल्यापासूनच फोन्सचा वापर करण्यात येतोय. तिथल्या सरकारने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देत पूर्ण लॉकडाऊन करण्याची परिस्थिती टाळली.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन

शरीराच्या तापमानावर लक्ष

यापुढच्या काळामध्ये थर्मल कॅमेऱ्यांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यातही गजबजलेल्या वाहतूक केंद्रांच्या ठिकाणी असे कॅमेरे महत्त्वाचे ठरतील. 2003 च्या सार्सच्या साथीदरम्यान हाँगकाँग विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला एका रांगेत उभं रहावं लागे. मग एक अधिकारी एक 'हीट गन' म्हणजे एक प्रकारचा तापमापक त्याच्या कपाळाच्या दिशेने रोखून या माणसाला ताप आहे का, हे तपासण्यात येईल.

युकेमधल्या बोर्नमाऊथ विमानतळावर आता एका स्मार्ट थर्मल कॅमेऱ्याची चाचणी घेतली जातेय. म्हणजे हा कॅमेरा गर्दीमध्येही एखाद्या माणसाच्या शरीराचं तापमानन जास्त असल्यास ते शोधू शकतो. यामुळे संभाव्य कोरोना रुग्णांना शोधायला मदत होईल.

रिस्टबँड्स

लॉकडाऊन जाहीर करताना काही देशांनी रिस्ट बँड्स वापरण्याच्या पर्यायाचा विचार केला होता. ही टेक्नॉलॉजी वापरून लोकांना त्यांचं आयुष्य नॉर्मलपणे जगता येईल का याची चाचणी सध्या अँटवर्प या बेल्जियममधल्या शहरात सुरू आहे.

इथले कामगार अपघातांचा धोका कमी करण्यासाठी असे रिस्टबँड्स वापरत होते. एखादं वाहन अगदी जवळ आलं किंवा कोणी नदीत पडलं ते हा रिस्टबँड धोक्याची सूचना देतो. 'रॉमवेअर' या कंपनीने हा बँड तयार केलाय. आता या स्पोर्ट्सवॉचसारख्या दिसणाऱ्या बँडमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. काम करण्याच्या नादात जर दोन जण एकमेकांच्या जवळ आले, तर हा बँड धोक्याची सूचना देईल.

सोशल बबल्स

जगात सर्वात प्रभावीपणे लॉकडाऊन लावला तो न्यूझीलंडने. ते आता या लॉकडाऊनमधून बाहेर पडत आहेत आणि यासाठी वापरला जातोय 'सोशल बबल प्लान'.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यासाठी प्रत्येक घर एक बबल वा बुडबुडा धरण्यात आलंय. आता प्रत्येक नागरिक आपल्या या परीघामध्ये 2 विशिष्ट अधिकच्या व्यक्तींचा समावेश करू शकतो. पण या व्यक्ती जवळच राहणाऱ्या हव्या. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन वर्तुळं जोडून एक होईल. अशाप्रकारे 'कन्ट्रोल्ड' पद्धतीने लोकांना आपला सामाजिक वावर वाढवता येईल. म्हणजे कुटुंबांना आजीआजोबा भेटतील, एकटे असणाऱ्यांना इतर कोणलाा तरी भेटता येईल.

व्हेंडिग मशीन्स

लॉकडाऊन उठवल्यानंतर लोकांच्या दुकानांसमोर रांगा लागणं धोक्याचं आहे. अनेक देशांमध्ये औषधांच्या दुकांनांसमोर मास्क विकत घेण्यासाठी रांगा लागला. यातूनच व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका होता. म्हणूनच आता जर्मनी, तैवान आणि पोलंडमध्ये फेस मास्कसाठीची व्हेंडिग मशीन्स शहरांमध्ये उभारण्यात येतायत.

हॉटेल्समधली बसण्यासाठीची रचना

लिथुआनियामध्ये कॅफे आणि बार खुले झाले आहेत. पण ते फक्त अशाच ग्राहकांना सेवा देतात जे बाहेर अथवा खुल्या भागात बसलेले आहेत आणि सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत. पण अनेक ठिकाणी चिंचोळे रस्ते वा अपुऱ्या जागेमुळे हे शक्य नाही.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन

फोटो स्रोत, Sean Gallup

लिथुआनियाची राजधानी विल्निअसमध्ये आता म्हणूनच तिथल्या महापौरांनी ऐतिहासिक खुल्या जागांवर अशा उद्योगांना वापर करण्याची मुभा दिली आहे. त्या जागेच्या सौंदर्याला धक्का न लावता, सोशल डिस्टंसिंग पाळून आता इथे कॅफे आणि बार व्यवसाय करू शकतील.

शाळांचं वेगळं वेळापत्रक

शाळांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळता येणार नाही, असं अनेक शिक्षकांचं म्हणणं आहे. पण नॉर्वेमध्ये काही नवीन कल्पना राबवल्या जात आहेत. इथे विद्यार्थी वेगवेगळ्या वेळांमध्ये शाळेत येतात. म्हणजे एकाचवेळी सगळी मुलं आल्याने शाळेच्या गेटवर गर्दी होत नाही. पालकांना शाळेच्या आत यायला वा बाहेर उभं राहून गप्पा मारायला मनाई आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन

फोटो स्रोत, HEIKO JUNGE

यानंतर शिक्षक या विद्यार्थ्यांची विभागणी लहान गटांमध्ये करतात. अभ्यास करताना वा खेळतानाही मुलांनी गट न बदलता वा एकमेकांत मिसळता आपल्या गटातच राहणं सक्तीचं आहे.

कलर कोडिंग

इराणने यापेक्षा वेगळा पर्याय अवलंबलेला आहे. इथे ज्या भागांमध्ये रोगाचा फारसा प्रादुर्भाव नाही, त्यांना जास्त मोकळीक आहे. इथल्या शहर आणि गावांची विभागणी पांढरा, पिवळा आणि लाल अशा तीन रंगांमध्ये करण्यात आलेली आहे. प्रत्येक रंग त्या भागातला प्रादुर्भाव आणि मृत्यूंचं प्रमाण दाखवतं.

भारतातही सध्या असेच तीन झोन्स - रेड, ऑरेंज आणि ग्रीन करण्यात आले आहेत.

या पद्धतीचा थेट संबंध अतिशय महत्त्वाच्या R नंबरशी आहे.

चीनमध्ये मात्र विभाग वा जागेच्या ऐवजी थेट लोकांचंच 'कलर कोडिंग' करण्यात आलंय. हा पहिला देश आहे जिथे लोकांना आता मोकळीक देण्यात आलेली आहे.

महिन्याभरापूर्वी चीनने एक अॅप वापरायला सुरुवात केली. कोरोना व्हायरसची सुरुवात जिथून झाली त्या वुहानमधल्या लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी या अॅपवरून त्यांचा 'स्टेटस' दाखवणं गरजेचं आहे. त्यांचा स्टेटस ग्रीन म्हणजे हिरवा असेल, तर याचा अर्थ ते तंदुरुस्त आहेत आणि प्रवास करू शकतात. पण लाल असेल तर त्यांनी विलगीकरणात जाणं गरजेचं आहे.

पण अशा अॅप्समध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे प्रायव्हसीचा. शिवाय अधिकाऱी तपासतील तेव्हा हा 'हेल्थ स्टेटस' योग्य असेलच असं नाही, असा आरोपही होतोय. म्हणूनच असे 'इम्युनिटी पासपोर्ट' वापरू नयेत असं WHO ने म्हटलंय.

पण तरीही आपण 'सर्टिफिकेट सिस्टीम' वापरायला सुरुवात करणार असल्याचं चिलीने म्हटलंय. एखादयाला संसर्ग झाला वा नाही आणि तो त्यातून बरा झाला का हे सांगणारं सर्टिफिकेट खात्याकडून देण्यात येईल.

पुढे काय

या आणि अशा पर्यायांमुळे आयुष्य काहीसं रूळावर यायला मदत होईल, पण लॉकडाऊन एकीकडे शिथील होत असतानाच आपण आपल्या आय़ुष्याचा पुन्हा नव्याने विचार करायची गरज असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक नगैर वुड्स म्हणतात.

ते म्हणतात, "आपण टेस्टिंग, ट्रेसिंग आणि विलगीकरण करत रहायला हवं. सार्वजनिक जागा आणि शाळांसाठीच्या खबरदारीच्या उपायांचा विचार करायला हवा. बाहेरून नवीन केसेस दाखव होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, म्हणून प्रवासावरच्या निर्बंधांचाही विचार व्हायला हवा. लॉकडाऊन उठवताना या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत."

पुढे ते सांगतात, "आता फक्त बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करायचा विचार करून चालणार नाही. आपल्याला कदाचित कर्मचाऱ्यांची वयानुसार विभागणी करावी लागेल. म्हणजे उदाहरणार्थ कदाचित वयाने जेष्ठ प्राध्यापकांना व्हिडिओ लिंकवरून वर्ग घ्यावे लागतील. अडचणी आहेत, पण त्या न सोडवता येण्याजोग्या नाहीत. कारण नाहीतर याला दुसरा पर्याय म्हणजे पूर्ण लॉकडाऊनमध्येच राहणं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)