R0 म्हणजे काय? कोरोना लॉकडाऊन उठवण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा का?

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी एक आकडा अतिशय महत्त्वाचा आहे.

जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.

हा आकडा आहे - बेसिक रिप्रॉडक्शन नंबर. म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा. याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट (0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

R0 म्हणजे काय?

रोगाच्या प्रसाराची क्षमता किती आहे, याचा अंदाज या पुनरुत्पादन संख्येवरून लावता येतो. संसर्गाने बाधित एक व्यक्ती हा विषाणू पुढे सरासरी किती लोकांपर्यंत विषाणूचा प्रसार करू शकतो, हे हा आकडा सांगतो.

कुणाचंही शरीर रोगासाठी पूर्णपणे 'इम्यून' म्हणजे रोगाचा संसर्ग होऊ न शकणारं नाही, आणि आजारी पडू नये म्हणून लोक त्यांच्या वागण्यात बदल करणार नाहीत, या दोन गोष्टी यासाठी गृहीत धरण्यात आल्या आहेत.

रोग प्रसारासाठीचा असा सर्वात मोठा आकडा आहे, तो गोवर (Measles) या रोगाचा. या रोगाची पुनरुत्पादन संख्या आहे 15. म्हणजेच या रोगाचा प्रचंड मोठा उद्रेक होऊ शकतो.

कोरोना
लाईन

नवीन कोरोना व्हायरस ज्याचं अधिकृत नाव आहे Sars- CoV - 2, याची पुनरुत्पादन संख्या आहे 3 च्या जवळपास. पण हे अंदाज वेगवेगळे आहेत.

एकपेक्षा मोठी संख्या धोकादायक का?

पुनरुत्पादन संख्या म्हणजेच रिप्रॉडक्शन नंबर 1 पेक्षा जास्त असला तर संसर्गाच्या केसेस घातांकात वाढतात. म्हणजे समजा क्रेडिट कार्डचं बिल भरलं नाही तर जसा आकडा झपाट्याने मोठा होतो, अगदी तसंच.

पण हाच आकडा जर समजा लहान असेल तर मग या रोगाचा प्रसार मग काही काळाने मंदावतो आणि थांबतो, कारण नवीन लोकांना लागण होत नसल्याने साथ आटोक्यात येते.

म्हणूनच जगभरातल्या देशांच्या सरकारांना Sars-CoV 2च्या पुनरुत्पादनाचा दर तीनवरून एकच्याही खाली आणायचाय.

आणि याच कारणासाठी आपण आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नाही, ऑफिसला न जाता घरून काम करतोय आणि मुलांच्या शाळा बंद आहेत.

लोकं एकमेकांच्या संपर्कात आली नाहीत, तरच हा व्हायरसच पसरू शकणार नाही.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

R नंबर स्थिर असतो का?

लोकांचं वागणं जसं बदलतं, रोगप्रतिकारकशक्ती लोकांमध्ये जसजशी निर्माण होते, तसा हा R नंबर बदलतो.

पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर, विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे या R नंबरमध्ये कसा आणि किती बदल झालाय, याविषयीचा अभ्यास करायचा प्रयत्न लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमध्ये केला जातोय. तिथे याचं गणिती मॉडेल आखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोणत्याही उपाययोजना लागू करण्यात येण्यापूर्वी हा आकडा एकच्या बऱ्यापैकी वर होता, आणि म्हणूनच या रोगाच्या भीषण साथीच्या उद्रेकाची परिस्थिती होती.

युकेमध्ये सगळे निर्बंध घालण्यात आल्यानंतर हा R नंबर किंवा पुनरुत्पादन संख्या कमी झाली, पण पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतरच हा आकडा 1च्या खाली आला.

हे सगळं काहीसं क्लिष्ट आहे. पण आता या टप्प्यावर आल्यानंतर आकडा सारखा बदलत असल्याने या संख्येला R0 म्हणण्याऐवजी शास्त्रज्ञ Rt म्हणत आहेत.

युकेमधला हा आकडा सध्या 0.7च्या जवळपास आहे. अशा प्रकारच्या गोष्टींबाबत काहीशी अनिश्चितता ही नेहमीच असते. पण आता हा आकडा 1च्या खाली आल्याची खात्री युके सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांना आहे.

पण तरीही व्हायरस पसरत असणारी काही हॉस्पिटल्स आणि केअर होम्स इथली परिस्थिती अजूनही वेगळी आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

भारतातला दर

चेन्नईमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसने भारतासाठीच्या या पुनरुत्पादन दराचा अंदाज व्यक्त केलाय. त्यानुसार 23 मार्चला भारताचा रिप्रॉडक्शन नंबर 4 च्या जवळपास होता. पण नंतर 6 एप्रिलला हा दर 1.83 वर आला आणि पुढे त्यात आणखीन घसरण होत 11 एप्रिलला हा दर 1.55वर आला.

द प्रिंटने याविषयीची माहिती छापलेली आहे.

लॉकडाऊन उठवण्याशी याचा काय संबंध?

लॉकडाऊन कसा उठवायचा, याचा विचार सध्या जगातले सगळे देश करत आहेत. आणि यासाठी ध्येय असेल हा रीप्रॉडक्शन नंबर 1 पेक्षा कमी ठेवणं.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. अॅडम कुचारस्की यांनी बीबीसीला सांगितलं, "निर्बंध अगदी पूर्णपणे शिथील न करता आणि संक्रमण वाढू न देता हे करणं मोठं आव्हान आहे."

पण हा आकडा 3 वरून 0.7वर आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले आहेत, आणि याचा काही परिणाम लोकांच्या आयुष्यावरही झालाय.

एप्रिलच्या सुरुवातीला जर्मनीचा पुनरुत्पादन दर 0.7च्या जवळपास आला. सध्या युके या टप्प्यावर आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

कोणते निर्बंध उठवले जाऊ शकतात?

कोणतं पाऊल उचलल्याने त्याचा व्हायरसच्या फैलावावर किती परिणाम झाला हे नेमकं सांगणं कठीण आहे. पण याविषयीचे काही अंदाज बांधण्यात आले आहेत.

"शाळा सुरू करणं, ऑफिसेस सुरू करणं किंवा लोक एकत्र येतील अशा कार्यक्रमांना परवानगी देणं या प्रत्येक गोष्टीमुळे रिप्रॉडक्शन नंबर किती वाढतोय, हे ठरवणं आव्हान असणार आहे," डॉ. कुचारस्की सांगतात.

आणखी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. काळाप्रमाणे लोकांच्या वागण्यात बदल होतो. म्हणूनच लॉकडाऊनचे नियम बदलले नाही तरीही हा पुनरुत्पादन दर वाढण्याची शक्यता असते.

म्हणूनच आता या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या नवीन मार्गांची गरज आहे. म्हणजे जास्त टेस्टिंग करणं, लोकांना ट्रेस करणं किंवा मग लोकेशन ट्रॅकिंग अॅप्सचा वापर.

यामुळे या विषाणूच्या पुनरुत्पादनाचा दर कमी होईल आणि कदाचित इतर काही निर्बंध उठवता येतील.

हा सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे का?

रिप्रॉडक्शन नंबर हा तीन महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे - आजाराची गंभीरता. जर तुम्हाला एखादा सौम्य स्वरूपाचा आजार झाला, तुम्हाला फार त्रास होत नसेल, तर चिंता करायची गरज नाही. पण कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणारा कोव्हिड 19 आजार हा गंभीर आहे आणि तो जीवघेणा ठरू शकतो.

तिसरी महत्त्वाची गोष्ट - केसेसचं प्रमाण. जर संसर्ग होणाऱ्यांची संख्या जास्त असूनही निर्बंध शिथील करण्यात आले आणि पुनरुत्पादन दर 1 च्या जवळपास असेल, तर त्यापुढेही संसर्गाच्या प्रकरणांची संख्या जास्त राहील.

लशीचं काय?

रिप्रॉडक्शन नंबर किंवा पुनरुत्पादन दर कमी करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे लस अथवा व्हॅक्सिन.

कोरोना व्हायरसच्या एका रुग्णामुळे सध्या आणखी सरासरी तिघांना लागण होण्याची शक्यता आहे. पण जर लस उपलब्ध झाली तर यातल्या दोघांना संसर्गापासून संरक्षण मिळेल आणि मग त्यामुळे पुनरुत्पादनाचा दर 3 वरून घसरून 1 वर येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)