कोरोना लॉकडाऊन : दहावीचे पेपर अजून चेक न झाल्यामुळे निकाल आणि प्रवेश लांबणीवर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लॉकडाऊनचे आर्थिक-सामाजिक परिणाम तर आहेतच, पण शैक्षणिक पातळीवरही लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सुरूवातीला हा लॉकडाऊन 21 दिवसांसाठी असेल, असं सांगण्यात आलं. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊनची मुदत तीन मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे असं सरकारतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. पण यामुळे अनेक स्तरांवर अनिश्चितताही निर्माण झाली आहे.
दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांची भविष्यातली शैक्षणिक वाटचाल ठरविण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची वर्षं मानली जातात. पण दहावी-बारावीच्या निकालावर कोरोनामुळे अनिश्चिततेचं सावट आहे. निकाल लांबल्यामुळे प्रवेश प्रक्रिया कधी पार पडणार, बारावीनंतर वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या परीक्षांचं काय आणि त्या नाही झाल्या तर पुढचे अॅडमिशन कसे होणार असे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थी आणि पालकांसमोर आहेत.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

यावर्षी 3 मार्चला दहावीची परीक्षा सुरू झाली. दहावीचा शेवटचा पेपर हा भूगोलाचा होता. 23 मार्चला होणारा हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, तर नंतर तो रद्दच करण्यात आला. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली, तर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परीक्षा दिली.
परीक्षा संपल्यानंतर लगेचच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे त्याचा परिणाम पेपर तपासण्याच्या प्रक्रियेवर झाला, ज्यामुळे आता निकाल आणि सर्वच प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
निकालाबद्दल आताच काही सांगणं कठीण
लॉकडाऊनमुळे पेपर कधी तपासून होतील आणि निकाल कधीपर्यंत लागेल, हे सांगणं खरंच कठीण असल्याचं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
अनुचित प्रकार टाळण्यासाठी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरी तपासण्यासाठी दिल्या जाणार नसल्याचं सुरूवातीला स्पष्ट करण्यात आलं होतं. इतर पर्याय काय असू शकतात, याची चाचपणीही करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि लॉकडाऊनचा लांबणारा कालावधी लक्षात घेऊन शिक्षकांना घरून उत्तरपत्रिका तपासण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
शकुंतला काळे यांनी याबद्दल बोलताना सांगितलं, "काही पेपर तपासले गेले आहेत, तर काही पेपर तपासणं बाकी आहे. एरवी शिक्षकांना पेपर घरी तपासायला दिले जात नाहीत, पण सध्याच्या परिस्थितीत मात्र तशी परवानगी देण्यात आली आहे. पण लॉकडाऊनमुळे शिक्षकांना पेपर घेऊन जाणंही शक्य झालं नाहीये. विभागीय मंडळांकडून त्यांच्या स्तरावर किती पेपर तपासून झाले आहेत, किती तपासले गेले आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच रिझल्टबद्दल निश्चित काही सांगता येईल."
दरवर्षी साधारणपणे दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतो, तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो. पण आता एप्रिल महिना संपत आला तरी पेपर तपासण्याची प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने हे वेळापत्रक लांबू शकतं.
अनेक ठिकाणी पेपर शाळांमध्ये अडकून
सध्याच्या स्थितीत लॉकडाऊन कधी उघडणार, यावर दहावी आणि बारावीचे निकाल अवलंबून असल्याचं मत महाराष्ट्र मुख्यध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केलं.
दहावी-बारावीचे पेपर हे पहिल्यांदा परीक्षक तपासतात. त्यानंतर ते नियामकांकडे जातात आणि नंतर मुख्य नियामकांकडे. या तीन टप्प्यांनंतर निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते.

फोटो स्रोत, Getty Images
"बारावीचे पेपर परीक्षकांकडून तपासून झाले आहेत आणि अनेक ठिकाणी नियामकांकडे पोहोचले आहेत. दहावीचे काही पेपर परीक्षकांकडून तपासून झाले आहेत, पण लॉकडाऊनमुळे नियामकांकडे पोहोचले नाहीत. तर काही पेपर अजूनही शाळांमध्येच अडकून पडले आहेत. दहावीचे पेपर तपासणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना लॉकडाऊनच्या नियमांमधून वगळावं अशी आमची मागणी होती. मात्र तशी सवलत दिली गेली नाही," असं रेडीज यांनी सांगितलं.
लॉकडाऊन जर 3 मे नंतर संपलाच, तर परीक्षक आठ दिवसात पेपर तपासू शकतील आणि ते नियामकांकडे पाठवता येतील, असा विश्वास रेडीज यांनी व्यक्त केला. एक परीक्षक दिवसाला 25 ते 30 पेपर तपासतो. पण त्यावेळी त्यांच्याकडे शाळेतील अन्य इयत्तांच्या परीक्षा, पेपर तपासणे, निकाल तयार करणे अशाही जबाबदाऱ्या असतात. सध्याच्या परिस्थितीत अन्य इयत्तांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दहावीचे पेपर तपासण्याला प्राधान्य देता येईल आणि दिवसाला पेपर तपासण्याचा वेग वाढवता येईल, असंही रेडीज यांनी म्हटलं. या परिस्थितीमध्ये साधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत आम्ही पेपर तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकू, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात, मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव ही पेपर तपासण्याच्या प्रक्रियेतील अडचण ठरू शकते, असंही रेडीज यांना वाटतं. कारण दहावीच्या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागातून बसतात. जोपर्यंत मुंबईचा निकाल तयार होत नाही, तोपर्यंत राज्याचा निकालही तयार होऊ शकत नाही. त्यामुळेच मुंबईतील परिस्थितीवरही निकाल आणि प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक अवलंबून राहील, असं रेडीज यांनी म्हटलं.
पेपर तपासणीची प्रक्रिया पुढे सरकली नसल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रियाही लांबू शकते, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. "जूनच्या दुस-या आठवड्यापासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात होते. पण यात यंदा विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं मुंबईतील के. जे. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी सांगितलं.
पेपर तपासण्याच्या प्रक्रियेला होणारा विलंब आणि प्रवेश प्रक्रियेचं पुढील नियोजन कसं केलं जाईल हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वैद्यकीय-आभियांत्रिकीसाठीच्या प्रवेश परीक्षा कधी?
बारावीनंतर वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एन्ट्रन्स द्यावी लागते. मात्र या प्रवेश प्रक्रियांचं वेळापत्रकही कोलमडलं आहे. राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचसीईटी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 13 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची पुढची तारीखही अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
दरवर्षी या चारही शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या या परीक्षेचं आयोजन उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून केलं जातं. यावेळी एमएचसीईटीसाठी 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. या विद्यार्थ्यांसमोर पुढची प्रक्रिया कधी पार पडणार असा प्रश्न आहे.
यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "कोरोनामुळे CET च्या परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र आम्हाला आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) एक पत्र मिळालं आहे. यामध्ये परीक्षा कशा घ्यायच्या यासंबंधी आठ दिवसांमध्ये गाइडलाइन्स तयार केल्या जातील. UGC कडून गाइडलाइन्स मिळाल्यानंतर चार कुलगुरूंची समिती स्थापन करून परीक्षेसंबंधी पुढील निर्णय घेतला जाईल."

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसरीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेतली जाणारी NEET ही परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. मात्र परीक्षेची तारीख परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर करू, असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
दरम्यान, NEET बद्दल बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की केंद्र सरकार NEET ची परीक्षा घेईल की बारावीच्या मार्कांच्या आधारे प्रवेश होईल अशा चर्चा सुरू आहेत. आम्हीसुद्धा यासंदर्भात विचार करून केंद्र सरकारला काही अभ्यासपूर्ण शिफारसी करू, जेणेकरून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही.
विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असं सरकारकडून सांगण्यात येत असलं, तरी सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर निकाल आणि प्रवेशप्रक्रियेबाबत प्रश्नचिन्हच आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








