कोरोना वॉरिअर्स: पोलीस अधिकारी मधुकर कड यांनी अशी केली कोरोनावर मात

मधुकर कड

फोटो स्रोत, Madhukar Kad

फोटो कॅप्शन, मधुकर कड
    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी

जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांवर कमालीचा ताण येतोय. हे एक प्रकारचं युद्ध आहे आणि एका व्यक्तीतून दुसऱ्यात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला अदृश्य शत्रू म्हटलं जातंय.

या युद्धभूमीवर गाफील राहून चालणार नाही, असं म्हणत काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सनाही कोरोनाची लागण होतेय.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड कोव्हिड-19 आजारातून गेल्या आठवड्यात बरे झाले. त्यांनी आजाराचा सामना कसा केला? मानसिक ताण-तणावातून त्यांना कसं जावं लागलं? त्याची त्यांनीच सांगितलेली गोष्ट.

लाईन

वर्षभरापूर्वी नाशिकहून मुंब्रा पोलीस ठाण्याला माझी बदली झाली होती. ते वर्ष निवडणुका, धरणे-आंदोलनं, अशा घडामोडींनी व्यापलेलं राहिलं. हे संपतं ना संपतं तोवर कोव्हिड-19 विषयीच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. मार्चपर्यंत जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे, हे ऐकत होतो. त्यात मी सायन्सचा विद्यार्थी असल्याने उत्सुकतेने सतत वाचत होतो.

आपल्याकडे काय होणार आहे, याची पुसटशी कल्पना मला आली होती. तोपर्यंत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा माहिती पोहोचली नव्हती. देशभरात 22 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला आणि आमची जबाबदारी वाढली.

कोरोना
लाईन

मुंब्रामध्ये एरव्हीपेक्षा अधिक गस्ती सुरू झाल्या. भाजी मार्केट, किराणा, मेडिकल दुकानं अशा अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी नियमांचं पालन नीट होतंय का, याची पाहणी आम्ही करत होतो. हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यावर माझ्यासह इतर सहकाऱ्यांचाही कटाक्ष होता.

पोलीस गस्त

फोटो स्रोत, ANI

30 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान आमच्या कामाचे तासही खूप वाढले. इतर गुन्ह्यांचा तपासही सुरू होता. सकाळी सुरू झालेलं काम रात्री 11 वाजता संपायचं. सगळेच जण जीव ओतून काम करत होते.

लॉकडाऊनपूर्वी मुंब्रामध्ये बाहेरून आलेल्या आणि गेलेल्या लोकांची यादी आम्हाला मिळत होती. त्यानुसार त्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. नाकाबंदी, क्वारंटाईन करणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्या दरम्यान मुंब्र्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. लोकांनी नियमांचं पालन करावं म्हणून कडेकोट बंदोबस्त सुरू होता.

माझं घर आणि कुटुंब नाशिकला असतं. ठाण्यात बदली झाल्याने मुक्काम कळव्याला असायचा. सुट्टीच्या दिवशी घरी जाणं व्हायचं.

जवळपास पंधरा दिवस कामाचे तास वाढल्याने झोपही चार-पाच तास मिळत होती. 5 एप्रिलच्या सकाळी अचानक घसा दुखायला लागला. ते दुखणं एरव्हीसारखं नव्हतं. मनात वाटूनही गेलं आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नसेल?

पण मी स्वतःची खूप काळजी घेत होतो. घशाला सूज होती, ताप नव्हता, पण थोडं ब्लड प्रेशरही वाढल्यासारखं वाटू लागलं. खासगी डॉक्टरनी येऊन तपासलं तेव्हा खरंच माझं ब्लड प्रेशर वाढलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्या दिवशी रात्रीच मी नाशिकला घरी परतलो.

पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

नाशिकमध्ये पुन्हा खासगी दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण कोव्हिडची लक्षणं दिसत नसल्याने सीव्हिल हॉस्पिटलला तपासणी करण्यासाठी जावं की नाही, असा विचार करत होतो. अधूनमधून 101 पर्यंत ताप यायचा पण बरंही वाटायचं.

नाशिकच्या घरी आल्यापासून आयसोलेशनचे नियम पाळत मी स्वतंत्र खोलीत स्वतःला वेगळं ठेवलं होतं. पण तीन दिवसांनी मला कळलं की माझ्या संपर्कात आलेल्या काहीजण कोव्हिड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मलाही टेस्ट करणं भाग होतं.

कोरोना
लाईन

नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी मी स्वतःहून दाखल झालो. घशातून द्रवाचे नमुने घेऊन स्वॅब टेस्ट केली.

दुसऱ्या दिवशी दुपारी टेस्टचा निकाल 'निगेटिव्ह' म्हणून हातात आला. मी निश्चिंत झालो. साहजिकच घरातल्या सगळ्यांना आनंद झाला होता. पण माझ्यात टायफाईड आणि न्युमोनियाची लक्षणं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मला अशक्तपणा जाणवत होता आणि आराम करायची गरजही जाणवत होती. घरी राहून सक्तीचा आराम करणं माझ्याच्यानं शक्य झालं नसतं म्हणून मी नाशिकच्याच एका नामांकित हॉस्पिटलला दाखल होऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

पण त्याच दिवशी संध्याकाळी मला निरोप मिळाला की मी पॉझिटिव्ह आहे. काही वेळापूर्वीच मी सुस्कारा टाकला होता की एका संकटातून आपण पुढे सरकलोय. टेस्टिंग सेंटरवर ताण असल्याने आधीचा रिपोर्ट चुकीचा आलेला असू शकतो. पण खात्री केल्यानंतर मला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं!

त्या क्षणी मला वाईट वाटलं. आपल्याच बाबतीत असं का, असंही वाटू लागलं. चार दिवस माझ्यावर नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण माझ्या तब्येतीत फारसा फरक पडला नाही. माझी अस्वस्थता एकीकडे वाढत होती.

आधी निगेटिव्ह मग पॉझिटिव्ह, असं कसं?

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आधी निगेटिव्ह मग पॉझिटिव्ह, असं कसं?

पाचव्या दिवशी छातीचा एक्स-रे काढला आणि सिटी स्कॅनही केलं. माझी तब्येत खालावल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर मला ऑक्सिजन लावण्यात आला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता.

मी पूर्णपणे शुद्धीवर होतो. स्वतः उठू शकत होतो. पण ऑक्सिजन सॅच्युरेशन 95च्या खाली आलं होतं. छातीत जड वाटत होतं. त्या दिवशी संध्याकाळी माझी पत्नी मला पाहायला आली आणि तिने वरिष्ठांच्या मदतीने मला उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पीटलमध्ये दाखल झालो.

मुंबईला हलवल्यावर मला वाटू लागलं की आता आपलं आयुष्य संपलय. आपण यातून बरे होऊ का नाही याची शाश्वती नाही. ICUमध्ये माझ्यावर डॉक्टर सतत देखरेख ठेवत होते. संपूणपणे मी ऑक्सिजन सिलेंडवर अवलंबून होतो. तिथले डॉक्टर मानसिक आधार द्यायचे. बरं वाटावं म्हणून ते मला चालण्यासाठी मदत करायचे, प्रोत्साहन द्यायचे.

माझी तब्येत टप्प्याटप्प्याने सुधारतेय, असं डॉक्टर सांगायचे. चार दिवसांनी ICUतून बाहेर आलो. पण ऑक्सिजनवर होतोच.

तोपर्यंत मला नैराश्याने गाठलं होतं. सात दिवस माझ्या मनात निगेटिव्ह विचारांनी घर केलं होतं. कुणालाच भेटता येत नाही, कुणाशी बोलता येत नाही. एकांतवासातल्या जगण्या-मरण्याच्या विचारांनी मन विषण्ण होत होतं. फुप्फुस कमकुवत झालं होतं.

कोरोना ICU

फोटो स्रोत, ANI

घरातले फोनवरून बोलायचे, तेव्हा आधार वाटायचा. माझे हालहवाल विचारण्यासाठी राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संपर्कात असायचे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर दिवसातून तीनवेळा चौकशी करायचे. 'रिपोर्टमध्ये सुधारणा आहे, संयम ठेवा' या शब्दांनी बळ यायचं.

माझ्या कुटुंबाला कॉरंटाईन करण्यात आलं होतं. तर माझ्या संपर्कातील 31 जणांना क्वारंटाईन केलं गेलं. त्यातील माझ्या पोलीस स्टेशनच्या 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं तपासणी केल्यावर लक्षात आलं.

वीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये प्रचंड मानसिक तणावाखाली जगत होतो.

माझी दुसऱ्यांदा टेस्ट करण्यात आली तेव्हा ती निगेटिव्ह आली. मी खरं सांगतो, मी कधी देव पाहिला नाही. पण हॉस्पिटमधल्या त्या दोन आठवड्यांमध्ये मी डॉक्टर, नर्स आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रूपात देव पाहिला.

माझ्या आयुष्यात हे देव नसते तर काय झालं असतं? मी तिथून निघालो तेव्हा तिथे 48 रुग्ण होते. माझ्यानंतर अनेक रुग्ण तिथे दाखल झाले असतील.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर मधुकर कड

फोटो स्रोत, Madhukar Kad

फोटो कॅप्शन, डिस्चार्ज मिळाल्यानंतर मधुकर कड

मला सेव्हन हिल्समधून 27 एप्रिलला डिस्चार्ज मिळाला. तेव्हा अंधाऱ्या खोलीतून बाहेर आल्याचा भास झाला. अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी माझं स्वागत करायला हॉस्पिटलच्या आवारात हजर होते. माझ्यासाठी हे अनपेक्षित स्वागत होतं.

कोव्हिडच्या रुग्णांकडे ज्या नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्या पार्श्वभूमीवर या स्वागताने माझ्या मनाला उभारी दिली.

लोक कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबांसोबत भेदभावही करतात. कोव्हिडच्या पेशंटना नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात, माझ्या कुटुंबालाही काहीसा हा अनुभव आला. क्वारंटाईन केलेल्या कुटुंबापासून लोक नजर चुकवतात.

नाशिककडे जाताना वाटेत ठाण्याच्या टोलनाक्याजवळही माझं फुलांच्या वर्षावाने स्वागत झालं. नाशिकमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळत मला ओवाळण्याचे छोटेखानी कार्यक्रम पार पडले.

मी गेल्या वर्षी वयाची पन्नाशी पार केली. मला डायबिटीस, हृदयाचे आजार वा ब्लड प्रेशरचा त्रास, असे अतिजोखमीचे कोणतेच आजार नाही. कोव्हिडमधून बरं झाल्यावर माझं वजन 7-8 किलो कमी झालंय.

मी कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क आणि हॅंड ग्लोव्ज वापरत होतो. पण आमच्या कामाचंच स्वरूप असं आहे की आम्ही मोठी जोखीम पत्करतोय. कोण व्यक्ती पॉझिटिव्ह आहे आणि ती आपल्या कधी संपर्कात येईल हे सांगता येत नाही. फील्डवर काम करताना लोकांसोबतच्या संपर्काशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत.

मधुकर कड यांचे अनेक छोटेखानी सत्कारही झाले

फोटो स्रोत, Madhukar Kad

फोटो कॅप्शन, मधुकर कड यांचे अनेक छोटेखानी सत्कारही झाले

मी आधी म्हटलं त्याप्रमाणे जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी हे खरंतर देव आहेत. काही लोकांना याची जाणीव नसते. अज्ञानातून हल्ले होण्याचे प्रकार त्यामुळेच घडतात.

ज्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी दिवशी मुंबई पोलीस दलातले दोन काँस्टेबल कोव्हिडच्या आजाराने मृत्यूमुखी पडले ही बातमी ऐकून हळहळलो.

फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस दोन प्रकारची लढाई लढतायत. एक लोकांना वाचवण्याची आणि दुसरी स्वतःचं संरक्षण करण्याची. या लढाईला बळ मिळो, हीच सदिच्छा.

(वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मुलाखतीवर आधारित या लेखाचं शब्दांकन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केलं आहे)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)