‘आमचा मुलगा गेला, पण त्याचे स्पर्म वापरून आता आम्हाला नातू मिळेल’

प्रतिकात्मक फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिल्ली हायकोर्टाने एक अनोखा निर्णय दिला आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका जोडप्याच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाचे गोठवलेले वीर्य आई वडिलांना देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे, या जोडप्याला सरोगसीच्या माध्यमातून नातवंडं होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चार वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय देण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया.

दिल्लीत राहणाऱ्या हरबीर कौर आणि त्यांचे पती गुरविंदर कौर यांना एक मुलगा होता. त्याचं नाव प्रीत इंदर सिंह होतं. 2020 मध्ये त्याला रक्ताचा कर्करोग झाला होता आणि त्याला दिल्लीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

“केमोथेरपी सुरू होण्याच्या आधी रुग्णालयाने त्याला त्याचं वीर्य साठवण्याचा सल्ला दिला होता, कारण केमोथेरपीमुळे स्पर्मच्या दर्जावर परिणाम झाला असता,” असं गुरविंदर कौर यांनी बीबीसीला सांगितलं.

प्रीत इंदर अविवाहित होता. त्यामुळं तोही यासाठी राजी झाला आणि त्याचे वीर्य 27 जून 2020 रोजी गोठवण्यात आलं. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला.

काही महिन्यांनी शोकमग्न पालकांनी त्याचं गोठवलेलं वीर्य मिळावं अशी रुग्णालयाकडे मागणी केली. मात्र, रुग्णालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. नंतर या जोडप्याने कोर्टात धाव घेतली.

“आम्ही दुर्दैवी पालक आहोत, आम्ही आमचा मुलगा गमावला, मात्र कोर्टाने आम्हाला अनमोल भेट दिली आहे. आता आम्हाला आमचा मुलगा परत मिळेल,” असं हरबीर कौर बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

हे जोडपं आता साठीत आहे. मुलाचं वीर्य वापरून जे मूल जन्माला येईल त्याला आम्ही वाढवू, असं या जोडप्याने कोर्टाला सांगितलं. त्या दोघांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या दोन मुलींनी या मुलाची जबाबदारी घेणार असल्याचं कोर्टाला लिहून दिलं आहे.

सरोगसीद्वारे देणार नातवाला जन्म

गेल्या आठवड्यात दिलेल्या या निर्णयात न्या. प्रतिभा सिंह म्हणतात, “स्पर्मवर ज्या व्यक्तीची मालकी आहे त्यानं संमती दिली असेल तर, भारतीय कायद्यात मरणोत्तर प्रजनानाच्या प्रक्रियेला कोणत्याही प्रकाराची आडकाठी नाही.”

जर एखाद्या व्यक्तीला जोडीदार, मूलबाळ नसेल तर त्या वीर्यावर हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार पालकांचा हक्क आहे.

प्रतिकात्मक फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

या मुलाचा वारसा पुढे चालवायचा असल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो असं या जोडप्याने सांगितलं. आता या निर्णयामुळे आता मुलाशी असलेले बंध कायम राहतील आणि कुटुंबाचा वारसाही पुढे सुरू राहील. असं ते पुढे म्हणाले.

“त्याचे त्याच्या बहि‍णींवर खूप प्रेम होते, मित्र मैत्रिणींचेही त्याच्यावर खूप प्रेम होते. त्याचा फोटो मी माझ्या फोनवर स्क्रीनसेव्हर म्हणून ठेवला आहे. रोज सकाळी त्याचा चेहरा पाहिल्यावरच माझा दिवस सुरू होतो,” असं कौर म्हणाल्या.

प्रायव्हसीच्या मुद्द्यामुळे त्यांनी मुलाचा फोटो बीबीसीबरोबर शेअर करण्यास नकार दिला.

मुलाचे स्पर्म सरोगसीसाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याच्या बहि‍णींपैकी एकीने सरोगेट होण्यास संमती दिली आहे. आम्ही हे सगळं कुटुंबातच करू,” त्या म्हणाल्या.

ही केस दुर्मिळ होती पण असा पायंडा पूर्वी पडलेला नाही अशातला भाग नाही, असं या जोडप्याच्या वकील सुरुची अग्रवाल यांनी बीबीसीला सांगितलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोर्टात त्यांनी पुण्यातील 2018 साली झालेल्या एका केसचा उल्लेख केला. पुण्यातील एका 48 वर्षीय महिलेला तिच्या 27 वर्षीय मुलाच्या गोठवलेल्या वीर्याद्वारे सरोगसीच्या माध्यमातून जुळे नातू जन्माला घातले होते. या महिलेच्या मुलाचा जर्मनीमध्ये मेंदूच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता.

त्यांचा मुलगा अविवाहित होता. त्याने त्याच्या आईला आणि बहिणीला मृत्यूनंतर त्याचे वीर्य वापरण्यास संमती दिली होती. त्यानंतर जर्मनीच्या रुग्णालयाने तो वीर्याचा नमुना कुटुंबाला सुपुर्द केला होता.

सुरुची अग्रवाल यांनी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका केसचा दाखला कोर्टात दिला. एका 21 वर्षीय सैनिकाचा स्कीइंग करताना मृत्यू झाला होता. तेव्हा त्यानेही नातू होण्यासाठी गोठवलेलं वीर्य वापरण्यासाठी संमती दिली होती.

न्या. सिंह यांनी मरणोत्तर प्रजनानाचे अनेक दाखले या निर्णयावेळी दिले. 2002 मधील इस्रायलच्या एका केसचा त्यांनी उल्लेख केला.

तिथे 19 वर्षांचा सैनिक गाझामध्ये मारला गेला होता. तेव्हा त्याच्या पालकांनी त्याचे स्पर्म वापरून सरोगेट मदरच्या माध्यमातून मूल होऊ देण्यासाठी वीर्य वापरण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाने ती मान्य केली होती.

सर गंगाराम रुग्णालयाने परवानगी का नाकारली?

या मुद्दयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारचं एकमत नसल्याचं न्या. सिंह यांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

अमेरिका, यूके, जपान, चेक प्रजासत्ताक, आणि इतर देशात लेखी संमती असेल तर मरणोत्तर प्रजननाला परवानगी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यासाठी एक वर्ष थांबावं लागतं. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर भावनांवर ताबा मिळवण्यासाठी ही एक वर्षाची वाट पाहण्याचं बंधन घालून देण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे इटली, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, मलेशिया, पाकिस्तान, हंगेरी, स्लोव्हेनिया या देशात या प्रथेवर बंदी आहे. आणि भारताच्या शेजारी असलेल्या बहुतांश देशात म्हणजे श्रीलंका, नेपाळ. भूतान आणि बांगलादेशमध्ये याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत.

ज्या देशात मरणोत्तर प्रजननाबद्दल नियम आहेत त्या देशांमध्ये बहुतांश प्रकरणांमध्ये जोडीदार असतो. त्याला प्रजननासाठी गोठवलेले स्त्रीबीज किंवा स्पर्म हवे असतात.

आपल्या मुलाच्या गोठवलेल्या वीर्याची मागणी करणाऱ्या पालकांची संख्या इस्रायलमध्ये विपुल प्रमाणात वाढली आहे. तसंच रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनच्या सैनिकांनी मोफत वीर्य साठवण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, भारतात ही प्रकरणं अजूनही कमी आहेत.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

सर गंगाराम हॉस्पिटलने कोर्टात सांगितलं की, ते फक्त जोडीदारालाच वीर्याचा नमुना देऊ शकतात. एखाद्या अविवाहित पुरुषाचं वीर्य त्याच्या पालकांना किंवा इतर वारसदारांना देण्याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं किवा कायदा अस्तित्वात नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं होतं.

भारत सरकारनेसुद्धा या जोडप्याची याचिका फेटाळली होती. भारतातील सरोगसी कायदा हा वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना किंवा बायकांसाठी तयार केला होता, ज्यांना नातू हवेत त्यांच्यासाठी नाही असं सरकारने सांगितलं.

प्रीत इंदर अविवाहित होते याकडं सरकारनं लक्ष वेधलं. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ॲक्ट 2021 नुसार अविवाहित लोकांना सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती करण्यास बंदी आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे प्रीतइंदर यांनी मृत्यूपूर्वी कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी संमती दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या पालकांना त्याचे स्पर्म वापरण्याचा हक्क मिळत नाही असंही सरकारने सांगितलं.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, वीर्य गोठवण्यासाठीचा फॉर्म भरताना आयव्हीएफसाठी करत असल्याचं प्रीत इंदरने स्पष्टपणे सांगितलं होतं, असा युक्तिवाद या जोडप्याच्या वकिलांनी केला.

सुरुची अग्रवाल यांनी बीबीसीला सांगितलं की, त्या फॉर्ममध्ये वडील आणि मुलगा दोघांचेही मोबाइल नंबर होते. याचाच अर्थ संमती होती. तसंच हा वीर्याचा नमुना प्रयोगशाळेत व्यवस्थित ठेवण्यासाठी वडील पैसे भरत होते.

एआरटी कायदा हा सरोगसीचा व्यापार होऊ नये, तसंच क्लिनिक्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचे नियमन करण्यासाठी आणला होता. एखाद्या शोकमग्न पालकांच्या स्वातंत्र्यावर गदा यावी यासाठी आणला नव्हता असंही अग्रवाल म्हणाल्या.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या वीर्याचा वापर मुलं जन्माला घालण्यासाठी करण्याची संमती प्रीत इंदरने दिल्याचा अग्रवाल यांचा युक्तिवाद न्या. सिंह यांनी मान्य केला.

“त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याचा कोणीही जोडीदार नव्हता. मूल व्हावं यासाठी हा नमुना वापरला जावा असा त्याचा उद्देश होता. जेव्हा त्याचा मृत्यू झाला आणि पालक त्याचे वारसदार आहेत. वीर्य एक जनुकीय मटेरियल आहे आणि एकप्रकारची मालमत्ताच आहे. त्यामुळे त्यावर पालकांचा हक्क आहे,” असं त्या म्हणाल्या.

अशा परिस्थितीत वीर्याचा ताबा मिळवण्यापासून या जोडप्याला थांबवता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं.

कोर्टाच्या या निर्णयामुळे आम्हाला आशेचा किरण मिळाला आहे की आम्ही आमच्या मुलाला परत आणू शकतो असं कौर म्हणाल्या.

“मी माझ्या मुलाच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज प्रार्थना करतेय, त्याला चार वर्षं लागली पण शेवटी माझी प्रार्थना कोणीतरी ऐकली,” त्या पुढे म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)