आत्महत्येचा प्रयत्न करताना ज्या ट्रेन ड्रायव्हरने वाचवलं त्याच्याशीच केलं तिने लग्न

फोटो स्रोत, Charlotte and Dave Lay
- Author, डेव्हिड स्पिरिऑल
- Role, बीबीसी न्यूज
आयुष्यातील ताणतणाव, विविध अडचणी आणि यातून निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.
एकीकडे माणूस हा समाजशील प्राणी मानला जात असताना अनेकदा एखाद्या माणसाला त्याच्या समस्यांविषयी मात्र कोणाशीही बोलता येत नाही, मन मोकळं करता येत नाही. काहीवेळा समोरून प्रतिसाद मिळेल की नाही या शंकेमुळे किंवा काहीवेळा विविध सामाजिक दबावामुळे अनेकजण व्यक्त होत नाहीत आणि त्यातून आयुष्य उद्ध्वस्त होतात.
डेव्ह आणि शार्लेट या जोडप्याची कहाणी मात्र अशा सर्वांसाठी एक प्रेरणादायी कथा आहे. आत्महत्येच्या प्रयत्नापासून ते आयुष्य आनंदानं जगण्यापर्यंतच्या त्यांच्या या अद्भूत प्रवासाविषयी...
(डिस्क्लेमर: या लेखात आत्महत्या आणि मानसिक आजारांचे संदर्भ देण्यात आले आहेत.)
इंग्लंडमध्ये एक नर्स असणाऱ्या शार्लेट ले 2019 च्या उन्हाळ्यात एके दिवशी त्यांच्या शिफ्टला जाण्यास तयार होत्या. मात्र त्यांना बरं वाटत नव्हतं. म्हणजेच सर्व काही ठीक नसल्यासारखं वाटत होतं. बहुधा त्या अस्वस्थ होत्या.
थोड्याच वेळात त्यांनी वेस्ट यॉर्कशायर रेल्वे स्टेशनजवळ आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
मात्र त्यांचं दैव बलवत्तर म्हणून त्या दिवशी त्यांची गाठ एका चांगल्या रेल्वे ड्रायव्हरशी पडली. त्या संकटात आहेत हे बहुधा त्या रेल्वे ड्रायव्हरच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे शार्लेट यांचा जीव वाचला होता.
महत्त्वाची बाब म्हणजे, तीन वर्षांनी शार्लेट आणि तो रेल्वे ड्रायव्हर या दोघांनीही लग्न केलं आणि त्यांना मुलं देखील झाली.


"किशोरवयापासून मी मानसिक आरोग्याच्या समस्येला तोंड देते आहे. तेव्हापासून माझ्या मानसिक आरोग्यात चढउतार होत असतात. मी कधी ठीक, बरी असते, तर कधी नसते," असं 33 वर्षांच्या शार्लेट म्हणतात.
पाच वर्षांपूर्वीचा तो दिवस शार्लेट यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. त्या दिवसाच्या त्यांच्या आठवणी 'अगदी अस्पष्ट' आहेत. मात्र त्यांना काही गोष्टी चांगल्याच आठवतात.
त्या जेव्हा रेल्वे रुळांवर होत्या तेव्हा त्यांच्या दिशेने येणाऱ्या ट्रेनची गती कमी होऊन ती थांबल्याचं त्यांना आठवतं. ब्रॅडफोर्डजवळच्या क्रॉसफ्लॅट्स स्टेशनजवळ ही घटना घडली होती.
"एक व्यक्ती ट्रेनमधून उतरताना पाहिल्याचं मला आठवतं. त्याला उतरताना पाहून मी घाबरले होते, मला वाटलं तो आता मला दरडावेल," असं शार्लेट सांगतात.
"तो माणूस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, हॅलो, माझं नाव डेव्ह आहे. तुमचा आजचा दिवस फारच वाईट होता का?" त्या म्हणाल्या.
"त्यावर मी म्हणाले, 'हो तसा वाईटच होता'. त्यावर तो म्हणाला काही हरकत नाही. तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत आपण बसून बोलूया." त्या पुढे सांगतात.
डेव्ह यांनी असा वाचवला होता जीव
डेव्ह इंग्लंडमधील नॉर्दर्न या रेल्वे कंपनीत नोकरी करतात. ही कंपनी मुख्यत: इंग्लंडच्या उत्तरेकडील भागात रेल्वे वाहतूक करते. डेव्ह यांना तो दिवस चांगलाच आठवतो. ते रेल्वेतून खाली उतरले होते.
ते शार्लेटसमोर समोर येऊन 'गुडघ्यांवर बसले' होते आणि त्यांनी शार्लेटला स्वत:ची ओळख करून दिली होती.
त्यानंतर डेव्ह शार्लेटला म्हणाले होते की "तुम्हाला पुरेसं बरं वाटेपर्यंत आपण थोडावेळ बोलूया." जेणेकरून शार्लेट ला ट्रेनमध्ये नेता येईल आणि तिथून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवता येईल.
त्यानंतर डेव्ह आणि शार्लेट हे दोघेही जवळपास अर्धा तास बोलत बसले. डेव्ह यांच्याशी बोलल्यानंतर तेवढ्या वेळात त्या थोड्या शांत देखील झाल्या. अर्थात अजूनही त्या तणावातच होत्या.
मात्र त्या ट्रेनमध्ये चढण्यास तयार झाल्या. मग तिथून त्यांना स्किप्टन स्टेशनवर नेण्यात आलं आणि तिथे पोलिसांच्या सुरक्षेत देण्यात आलं होतं.
घटनेनंतर शार्लेट कडून डेव्ह यांचा शोध
ही घटना घडून गेल्याच्या दुसऱ्या दिवशी शार्लेट त्या माणसाचा शोध घेत होत्या, ज्यानं त्यांचा जीव वाचवला होता, जो त्यांच्याशी इतक्या दयाळूपणे वागला होता. कुठूनतरी त्या व्यक्तीची माहिती मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
मग त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी स्थानिक फेसबूक ग्रुपवर एक आवाहन केलं. नॉर्दर्न रेल्वेमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती कदाचित आपल्याला त्या भल्या माणसाशी संपर्क करून देऊ शकेल असं त्यांना वाटत होतं.
"जर कदाचित त्याला माझ्याशी बोलायचं नसेल तर ते मी समजू शकले असते. मात्र मला वेळ दिल्याबद्दल, माझ्याशी इतक्या दयाळूपणानं वागल्याबद्दल आणि मला माणुसकी दाखवल्याबद्दल मला त्या भल्या माणसाचे फक्त 'आभार मानायचे' होते," असं शार्लेट म्हणतात.
त्यांच्या विनवणीला यश आलं. डेव्ह यांच्या एका सहकाऱ्यानं शार्लेट यांचं फेसबुकवरील ते आवाहन पाहिलं. त्यानं डेव्ह यांचा नंबर शार्लेट यांना दिला. त्यानंतर शार्लेट यांनी डेव्ह यांना मेसेज पाठवला.
डेव्ह आता 47 वर्षांचे आहेत. शार्लेटकडून मेसेज मिळाल्यानंतर त्यांना देखील तितकंच बरं वाटलं. त्या सुखरूप असल्याचं ऐकून त्यांना दिलासा वाटला.

डेव्ह म्हणतात की अशा प्रकारे ट्रेनमधून खाली उतरवून संकटात असलेल्या एखाद्या व्यक्तीशी "बोलण्याची संधी त्यांना त्याआधी कधीही मिळाली नव्हती."
"त्या सुरक्षित आहेत ना, हे मला जाणून घ्यायचं होतं. त्या कशा आहेत आणि पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी मी पोलिसांशी संपर्क केला होता. त्या सुरक्षित असाव्यात अशीच माझी इच्छा होती," असं डेव्ह सांगतात.
"त्या व्यवस्थित आहेत याची खातरजमा करून घेणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं. रेल्वे रुळाच्या शेजारी बसून बोलताना तो ऋणानुबंध तयार झाला होता. एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणणं, एखाद्याला संकटात मदत करता येणं, ही एक चांगली गोष्ट आहे," ते पुढे म्हणतात.
शार्लेट यांच्या मेसेजला डेव्ह यांनी उत्तर दिलं. त्यात त्यांनी शार्लेट ना सांगितलं की त्यांना कधीही बोलावसं वाटलं तर ते त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत.
प्रेम आणि विवाह
त्यानंतर ते दोघेही एकमेकांना दररोज मेसेज करू लागले.
दोन महिन्यांनी ते कॉफी पिण्यासाठी म्हणून भेटले आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहासच आहे.
2022 मध्ये या दोघांनी लग्न केलं. तेव्हा शार्लेट 22 आठवड्यांच्या गर्भवती होत्या. हे जोडपं विल्सडेन जवळ राहतं.
मात्र त्याआधी त्यांच्या कहाणीत आणखी एक वळण आलं होतं. जुलै 2020 मध्ये डेव्ह यांना टेस्टीक्युलर कर्करोग ( testicular cancer) झाल्याचं निदान झालं होतं. (टेस्टिक्युलर कर्करोगात अंडाकोषाला सूज येते. पुरुषांमध्ये हा कर्करोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.)
खरंतर डेव्ह यांना कर्करोगाचं निदान योगायोगानंच झालं होतं. ते डॉक्टरकडे पाठदुखीसाठी गेले होते.
डेव्ह डॉक्टरकडे गेले तेही शार्लेट मुळेच गेले. म्हणजेच जर शार्लेट यांनी आग्रह धरला नसता तर आपण डॉक्टरकडे कधीच गेलो नसतो, असं डेव्ह ठामपणे सांगतात.
"कारण मी पुरुष आहे", असं ते म्हणतात.

"मी 12-13 वर्षे थंडगार फरशांवर आणि बाहेर देखील इंजिनच्या दुरुस्तीचं, सर्व्हिसिंगचं काम केलं आहे. मी वेगवेगळं सामान वाहून नेण्यापासून असंख्य प्रकारची कामं केली आहे. या सर्वांचा ताण माझ्या पाठीवर पडून त्यातून पाठदुखीची सुरूवात झाली आहे.
"त्यामुळे शार्लेट नं माझ्यामागे 'डॉक्टर कडे जाण्याचा आग्रह' धरला. त्यावर माझं म्हणणं होतं की "हे माझं वय वाढत असल्यामुळे होतं आहे," असं डेव्ह सांगतात.
डेव्ह यांच्या कर्करोगाच्या निदानानंतर काही आठवड्यांनी डॉक्टरांनी त्यांना मोकळं केलं.
लीड्समधील सेंट जेम्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरनं गेल्या वर्षी त्यांना सांगितलं होतं की जर त्यांच्या या आजाराचं निदान झालं नसतं तर ते जिवंत राहिले नसते.
"शार्लेट कदाचित म्हणू शकते की मी तिचा जीव वाचवला. खरंतर ते मला माहित नाही. मात्र तिनं देखील माझा जीव वाचवला," असं डेव्ह म्हणतात.
'आयुष्य अधिक चांगलं होतं आहे'
या जोडप्याला त्यांची ही कहाणी इतरांना सांगायची आहे. त्यामागचं कारण देखील तितकंच उदात्त आहे.
जे लोक आपल्या आयुष्यात संघर्ष करत असतील, संकटात आहेत, त्यांना चांगलं आयुष्य अवतीभोवतीच आहे, पुढच्या वळणावरच आहे, ही गोष्ट आपल्या कहाणीद्वारे कळेल अशी आशा त्यांना वाटते.
"आयुष्य खरोखरंच चांगलं होत जातं. फक्त त्यासाठी तुम्ही इथं तग धरलं पाहिजे," असं शार्लेट म्हणाल्या. त्यांना आता तीन अपत्यं आहेत.
शार्लेट म्हणाल्या की जे लोक आयुष्यात संघर्ष करत असतात, संकटात असतात अशांना इतरांशी त्याबाबत बोलताना, इतरांकडे मदत मागताना अडचणी येतात. अनेकदा ते तसं बोलू पावत नाहीत किंवा मदत मागत नाहीत. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या सभोवतालच्या लोकांनी त्यांची विचारपूस करावी, त्यांना मदत करावी असं मी सुचवते.
त्यांनादेखील त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येसंदर्भात मदत मिळते आहे.
त्यांना असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा तुम्ही 'ठीक' आहात ना, असं विचारल्यास ते मोकळे होत त्यांच्या समस्या सांगण्याची शक्यता असते.
"आमच्या अवतीभोवतीच्या लोकांना मदत करण्याचं श्रेय आम्ही एकमेकांना देतो," असं त्या म्हणतात.
"आपण एखाद्याला आयुष्य बदलून टाकणारा सल्ला देण्याची किंवा काहीतरी खूपच गहन, गंभीर असं सांगण्याची आवश्यकता नसते. आपण फक्त त्यांच्याबरोबर बसून शांतपणे त्यांना समजून घेत एक कप चहा प्यायलो तर त्यामुळे देखील खूप मोठा बदल घडू शकतो. त्यांना धीर मिळू शकतो," त्या सांगतात.
"मी स्वत: या समस्येतून गेली असल्यामुळे त्याबद्दल बोलणं हे माझं कर्तव्य आहे. मला आशा आहे की यातून संवादाची सुरूवात होईल." असं शार्लेट म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980












