गोंदण ते टॅटू : शक्ती-सौंदर्याची परंपरा कालांतराने कशी बनली तरुणाईचं 'फॅशन स्टेटमेंट'?

फोटो स्रोत, Humans of Gondwana
- Author, शताली शेडमाके
- Role, बीबीसी मराठी
'गोंदण' हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे आजीच्या हातावर असलेला विंचू अन् बाजूला सात ठिपके आठवतात. आधीच्या परंपरागत गोंदणाची जागा आता मॉडर्न टॅटू आर्टनं घेतलीय.
तरुण पिढीमध्ये "टॅटू कल्चर' झपाट्यानं लोकप्रिय झाल्याचं दिसून येतं, हे मॉडर्न टॅटू कल्चर पारंपरागत गोंदणातूनच आलं आहे, हे ही तितकच खरंय.
पूर्वी गोंदण काढताना काटे, कारळीचं तेल आणि हळदीचा वापर केला जायचा. त्याची जागा आता आधुनिक मशीननं घेतलीय. आधीच्या तुलनेत आता गोंदणाची प्रक्रिया ही अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झालीय.
देशभरात ईशान्य भारतापासून तर दक्षिणेपर्यंत विविध समुहांनी परंपरागत गोंदणाची कला जपून ठेवल्याचे दिसेल.
गोंदण म्हणजे फक्त शरीरावर चित्र काढणं इतकंच नव्हे तर त्यामागे त्यांची प्रथा, परंपरा, संस्कृती आणि ओळखीचाही इतिहास राहिलाय.
गोंदणाची प्रथा केव्हापासून सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र गोंदण हा काही समुहांमध्ये सौंदर्यसृष्टीचा एक भाग मानला जातो.
शरीरावर एखादी जखम होऊन तो भाग काळानिळा झाला असावा आणि त्यानंतर तो व्रण कायम राहिला असावा तेथून गोंदणाची ही कला सुरू झाली असावी, असं काही अभ्यासक सांगतात. गोंदणाबाबतचा इतिहास, प्रथा, संस्कृतीची माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतली.


गोंदण कलेची परंपरा आणि महत्त्व
गोंदणाची कला नेमकी कधी सुरू झाली याबाबत अधिक स्पष्टता नाही. मात्र, या कलेनं अनेक समाज, समूहवर्गाला एकत्र बांधून ठेवलं.
गोंदण कलेतून त्यांचं वेगळेपण, धार्मिक जीवन, संस्कृती, कुळ, रुढी, परंपरा, सामाजिक मूल्य आदिंच दर्शन होतं. यातील काही समुहांबाबत जाणून घेऊयात.
मध्य भारतातील बैगा आदिवासी समूह हा PVTG (Particularly Vulnerable Tribal Groups) म्हणजेच अति असुरक्षित आदिवासी समूहात येतो.
या समाजातील महिला संपूर्ण शरीरावर गोंदून घेतात. त्यांच्या माथ्यावरील विशिष्ट गोंदण ही त्यांच्या समाजाची ओळख आहे.
माथ्यावरील गोंदणाला 'कपारगोदा' म्हणतात. कपारगोदा काढल्याच्या काही काळानंतर हातावर-पायवर गोंदवून घेतात. उर्वरित गोंदण लग्नानंतर पूर्ण केलं जातं.

फोटो स्रोत, Humans of Gondwana
गोंडी आर्टिस्ट माधवी मेरावी सांगतात, "इतर समाजात गोंदणात विंचू, पानं, फुलांची विविध आकृती काढल्या जातात, मात्र, बैगा गोंदणात रेखा आणि ठिपक्यांचा समावेश असतो. तर गोंड समाजातील गोंदणात हरिण, विंचू सह टोटेमदेखील काढले जातात.
बैगा समुहातील महिलांच्या शरीरावर दोन त्रिकोण एकमेकांपुढे असलेलं गोंदण काढलं जातं त्याला चकमक झेला असं म्हणतात. दोन दगड एकमेकांवर घासून त्यातून आग उत्पन्न करणारा समुदाय, असा या चिन्हाचा अर्थ होतो," असं माधवी सांगतात.

फोटो स्रोत, Madhavi Uike Meravi
टोटेम म्हणजे काय?
आदिम समुहात टोटेमचं फार महत्व आहे, त्याला शुभचिन्ह किंवा पवित्र चिन्ह असं म्हणता येईल. प्रत्येक आडनावासह टोटेमस्वरुपात एक प्राणी/पक्षी, एक झाड यांचा समावेश असतो, ते त्यांच्या कुळाचं प्रतिक असतं.
प्रत्येकाला आपल्या टोटेमचं संरक्षण करायचं असतं, टोटेमला कुळचिन्हाच्या रुपात पुजतात. गोंड समाजात 750 गोत्र आणि त्यानुसार टोटेम वाटून देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Humans of Gondwana
मंगला या बादी समुहातून येतात, गोंदण काढणे हा त्यांच्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्या गेल्या 25 वर्षांपासून परंपरागत गोंदण काढताहेत.
त्या म्हणाल्या, "बैगा समुहाच्या महिला आपल्या माथ्यावर चुलीच्या आकाराचं चिन्ह गोंदवतात. चूल ही घरातील शक्ती आहे, तिच्यामुळे अन्न शिजतं, त्यातील आग आपल्याला थंडीपासून वाचवते त्यामुळे तिला शक्ती मानतात. त्याचं प्रतीक म्हणून माथ्यावर चुलीचं चिन्ह काढतात."
कला-संस्कृती आणि चालता-फिरता इतिहास
झारखंडच्या आकृती लकडा या कुडूख समाजातून येतात. त्या सेंटर फॉर द सस्टेनेबल युज ऑफ नॅचरल अँड सोशल रिसोर्सेस, झारखंड (CSNR) च्या स्टेट कोऑर्डीनेटर आहेत.
आकृती गेली अनेक वर्ष पारंपारिक गोंदणावर रिसर्च करताहेत. इतर समाजापेक्षा आदिवासी समाजात गोंदणाच्या कलेचं विशेष महत्व आहे, असं त्यांनी सांगितलं.
आकृती म्हणाल्या, "आदिवासी लोकांचा इतिहास नसल्याचं म्हटलं जातं. परंतु, आमचा इतिहास लोकगीत, लोककथेसोबतच शरीरावरील गोंदणातूनही दिसून येतो. गोंदणातील प्रत्येक चिन्हाचं एक विशेष महत्त्व होतं.
"कुडूख समाजात महिलांनी शत्रूंशी सामना करत कसं युद्ध कसं जिंकलं त्याचं प्रतिक म्हणून माथ्यावर विशिष्ट गोंदण काढतात. कुडूख लोकगितांमध्ये महिलांचा उल्लेख जंगलातील रुबाबदार आणि बलवान प्राण्यांसारखी सशक्त महिला असा केला जातो. माथ्यावरील गोंदण हे त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे," आकृती सांगतात.

फोटो स्रोत, Humans of Gondwana
आकृती पुढे सांगतात, "पूर्वी कुडूख महिलेच्या अंगावरील गोंदणानं ती कोणत्या समुहातून येते, तिचं गाव, घर यांचीही ओळख पटायची. लग्नाआधी आणि लग्नानंतर काढलेल्या गोंदणातून तिचं माहेर आणि सासर याचीही माहिती मिळत असे. गोंदण एकप्रकारे महिला सशक्तीकरणाचा भाग होता."
एकंदरीत शरीरावरील गोंदणानं त्या व्यक्तीची ओळख आणि माहिती कळायची. संपूर्ण शरीर गोंदवलेली व्यक्ती ही त्या-त्या समुहाचं चालतं-फिरतं पुस्तकच होती.

फोटो स्रोत, Humans of Gondwana
"माझ्या आजीच्या अंगावर बरीच गोंदणं होती. प्रत्येक गोंदणाचं वेगळ महत्त्व आणि विशेषता होती. आजी गेली आणि गोंदणाचा इतिहासही तिच्याबरोबरच गेला. त्या असताना मी आपल्या शरीरावर काही गोंदण काढलं होतं, तो इतिहास मी संरक्षित केलाय," असं आकृती सांगतात.
स्त्रीला बाळ झाल्यानंतर पाठीत आणि पोटरीत दुखत असेल तर विशिष्ट ठिकाणी गोंदण काढलं जायचं, हे गोंदण एकप्रकारे 'अॅक्यूपंक्चर'सारखं काम करायचं, असंही आकृती लाकडा यांनी सांगितलं.
विविध मान्यता आणि समज
गोंदण हे समाजसमुहाला एकात्म बांधून ठेवण्याचेही काम करत होते. गोंदणात धार्मिक जीवन, संस्कृती, कुळ, रुढी, परंपरा, सामाजिक मूल्य पाहण्यास मिळते.
डॉ. रामकुमार प्रधान एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. ते म्हणाले, "गोंदण गोंदत असताना 'प्राण्यांचे चिन्ह' हे प्राणी हल्ल्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठीचे प्रतीक होते. मृत्यूनंतर आत्म्यापासून संरक्षण करण्यासाठी चित्रे रेखाटण्याची पद्धत होती. त्यातून देवतांच्या नावाने गोंदवून घेणे हा उद्देश घडत गेला.
आदिम मानव टोळी टोळीने राहत असे. टोळीच्या सरदाराचा मृत्यू झाल्यास त्यामुळे (टोळीचा सरदार) टोळीवर वाईट दिवस ओढवले अशी त्यांची भावना होई. त्यापासून सुटका होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चिन्हे गोंदवून घेण्याची प्रथा पडली."
"मुलांनी पौगंडावस्थेत गोंदवून घेण्याची प्रथा होती. मुलगा गोंदून घेत असताना वेदना सहन करत नसेल तर तो युद्धासाठी निरुपयोगी आहे असे समजले जाई. तसेच, मुलगी वेदना सहन करत असेल तर बाळंतपणात तिला त्रास होणार नाही अशी समजूत असे. ज्यांना गोंदून घेताना वेदना सहन होत नाहीत त्यांना कमकुवत समजले जाई", असं डॉ. प्रधान यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Humans of Gondwana
डॉ. प्रधान पुढे म्हणाले, "हलबी/हलबा जमातीत सुद्धा गोंदण्याची प्रथा प्रचलित आहे. लग्न व इतर समारंभ यांच्या वेळी गोंदवून घेण्यास विशेष महत्त्व आहे. ते हलबी जमातीचे वैशिष्ट्य आहे. लग्नानंतर मुलगी आईवडिलांकडून सासरी जाण्यापूर्वी तिचे अंग मुद्दाम गोंदवून घेतले जाते. मुलगी आईवडिलांना विसरू नये हा त्यामागील उद्देश असतो. हलबी/हलबा जमातीतील स्त्रियांच्या हातावर, गालावर, चेहऱ्यावर व कपाळावर गोंदलेले असते."
"ठाकूर स्त्रियांबरोबर पुरुषही गोंदवून घेतात. मुलगी आठ ते बारा वर्षांची असताना गोंदवून घेतात, तर काही ठिकाणी उशिरा गोंदवून घेण्याची प्रथा आहे. कंवर जमातीतील स्त्रिया छातीवर व पायांवर गोंदवून घेतात. एखादी स्त्री कंवर आहे की गोंड हे तिच्या गोंदणावरून ओळखता येते.
छत्तीसगढमधील रामनामी समाज सबंध शरीरावर रामनाम गोंदवून घेतो. त्या समाजात ती परंपरा शंभर वर्षांपासून चालत आली आहे. तो समाज मंदिरात जात नाही. अंगभर गोंदवलेले रामनाम हीच त्यांची पूजा आहे.
या समाजात बालक जन्माला येताच त्याच्या छातीवर रामनाम गोंदवले जाते. त्या समाजात ज्या व्यक्तीच्या शरीराच्या कुठल्याही भागावर रामनाम गोंदवले असेल तर त्याला रामनामी असं संबोधले जाते. कपाळावर गोंदवले असेल तर त्याला शिरोमणी, संपूर्ण कपाळभर गोंदवलेल्या व्यक्तीला सर्वांग रामनामी तर शरीरभर गोंदवलेल्यांना नखशिख रामनामी म्हटले जाते," डॉ. प्रधान सांगतात.
गोंदण कला ते मॉडर्न टॅटू आर्ट
गोंदण कला ही पुरातन असली तरी बदलत्या काळात या कलेतही बदल घडून आलाय. आता बाजारात मॉडर्न टॅटू आर्ट पाहायला मिळतात. याकडे नुसतं फॅशन म्हणूनही बघता येईल पण काहींसाठी तो एक भावनिक भागही असतो.
गोंदणाचं महत्त्व त्या त्या समाजानुसार आहे. याबाबत बोलताना मंगला सांगतात, "आधी कारळीपासून काजळ तयार करून नंतर बांबूच्या बारीक काडीनं हातावर कच्ची आकृती काढून घ्यायचे. नंतर काट्यांनी हळूहळू टोचत गोंदण काढायचे."
"नंतर काट्याऐवजी सुईचा वापर करणं सुरू केलं. गोंदण किती ठोकळ हवंय त्यानुसार सुया एकत्र करून गोंदण काढलं जातं.
एकदा ते पूर्ण झालं की गोंदणाचा भाग शेणानं धुवून घेतला जायचा त्यानंतर त्यावर कारळीचं तेल आणि हळद यांचा लेप लावून देत होते. त्या बदल्यात मान स्वरूपात एक दिवा, तांदूळ, दाळ, तिखट, मीठ, तेल आणि पैसे दिले जायचे.
मीठ तर हमखास असायचं, मीठाचं विशेष महत्त्व होतं. मात्र, आता लोकं आधीसारखं गोंदवून घेत नाहीत, आता गोंदणाचं प्रमाण खूपच कमी झालंय," असं मंगला म्हणाल्या.

वाशिम येथील आदित्य खडसे हे प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहेत, गेल्या 7 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.
आदित्य सांगतात, "टॅटू काढणाऱ्यांमध्ये 18-40 या वयोगटातील लोकांचं प्रमाण जास्त आहे. बरेचजण टॅटूची संकल्पना घेऊनच येतात. त्यात काहींना अगदीच हटके आणि नवीन टॅटू हवे असतात, तर काहींना आपल्या प्रियजनांच्या आठवणी स्वरूपात टॅटू काढायचं असतं."
"पूर्वी गोंदण काढलं जायचं तेव्हा ती एक ओळख, संस्कृतीचा भाग किंवा विशेष महत्वाच्या रुपानं त्याकडे बघितलं जायंचं, मात्र आज त्यात बराच बदल पाहायला मिळतो. आज काहींना आपला गोल सेट करायचा असतो, काहीजण राशीनुसार टॅटू काढतात, कोणी आपली कामगिरी, प्रेरणा पुढे ठेवतात तर काहीजण आपल्या फॅन्टसीनुसार टॅटू काढून घेतात," आदित्य सांगतात.

फोटो स्रोत, Humans of Gondwana
प्रत्येकाचे टॅटूबद्दलचे मोटिव्ह वेगवेगळे आहेत, त्यानुसार कलही बदलतो. मात्र, आधीच्या तुलनेत आता टॅटूचं फॅड बरंच वाढलंय. एकदा टॅटू काढल्यानंतर आपल्याला दुसरं टॅटू काढण्याची इच्छा असल्याचं बरीच लोकं सांगतात, ही एकप्रकारची वेगळीच क्रेझ तरुणाईत दिसून येते."
टॅटू कितीही मॉडर्न झाले तरी ती काढण्याची प्रेरणा ही पारंपरिक गोंदणातूनच येते, असं आदित्य यांनी नमूद केलं.
एकीकडे टॅटूची वाढती लोकप्रियता दुसरीकडे ट्रोलिंग
जय रामटेके हा तरुण बैगा आदिवासींच्या गोंदणावर संशोधन करत आहे. सध्या तो अमेरिकेतील ब्रँडिस यूनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करतोय.
जय सांगतो, "एकीकडे तरुणांमध्ये टॅटूचा क्रेझ वाढत चाललाय तर दुसरीकडे ज्या आदिम समुहांनी गोंदण कलेला आपल्या संस्कृतीचा भाग म्हणत जपलं त्यातील तरुण वर्ग हा गोंदण करवून घेण्यात इच्छूक नाही. यामागचं कारण म्हणजे त्यांच्या दिसण्यावरून आणि शरीरावरील गोंदणावरून त्यांना नाव ठेवण्यात आली. त्यामुळे तरुणवर्गातही आपल्याला नावं ठेवली जाईल, वेगळं केलं जाईल या भीतीपोटी हळूहळू गोंदण कमी करतात."
"काहींचं असंही म्हणणं आहे की, आधी आपल्या वेगळ्या ओळखीसाठी शरीरावर ठराविक गोंदण काढलं जायचं मात्र, आता वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यामुळेही गोंदण करत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे," जय सांगतो.
आकृती यांनाही त्यांच्या शरीरावरील गोंदणामुळे अनेकदा ट्रोल केलं गेल्याचं त्या सांगतात.
सुरुवातीला खूप वाईट वाटायंच पण आता आपण मनाची तयारी केलीय, आणि त्याला उत्तरही द्यायला लागलेय, असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Akriti K Lakra
छत्तीसगढमधील बैगा समाजाचे प्रमुख इतवारी बैगा म्हणतात, "आमची मुलं आज बाहेर शिकायला जायला लागली आहेत. गोंदणातून आमचं वेगळेपण दिसून येतं, त्यामुळे आम्हाला बाजुला केलं जाईल अशी भीती पोरांच्या मनात असते.
शाळा, कॉलेज, इतर शहरात गेल्यानंतर सगळ्यांत मिसळणं त्यांच्यातील एक भाग होणं कोणाला आवडणार नाही. पण गोंदणामुळं गंमतीचा भाग ठरत असू तर ते योग्य नाही ना.
याचा अर्थ गोंदण काढणं बंद करावं असंही नाही. ज्याला आवड आहे त्याने नक्की काढावं. ज्याला नाही त्याने काढू नये. मात्र, शहराकडे आधुनिक गोंदण काढतात, त्याला टॅटू म्हणून मिरवतात. मग त्याची लोकप्रियता वाढत असेल, तर पारंपरिक गोंदणालाही तितकंच प्रेम देण्यास काय हरकत आहे."
समाज आणि बदलतं चित्र
देशभरातील विविध आदिम जमातींमध्ये वेगवेगळी गोंदणकला पाहायला मिळते. ओडिशातील कोंध समाजातही महिला चेहऱ्यावर विशिष्ट रेखांचं गोंदण काढून घेतात.
तेलांगणातील थोटी समुहातही गोंदणांचं मोठं महत्व आहे. गोंदण काढल्याशिवाय त्या समुहात लग्न होत नाही, हे विशेष.
गोंदण (टॅटू) जगभरात चांगलंच लोकप्रिय आहे. फक्त गोंदवून घेण्यासाठीच नव्हे तर टॅटू कलाकार होण्याकडेही युवकांचा वाढता कल आहे.
आदिवासी जमातींमधील विविध गोंदणाच्या डिझाईन्सची युवावर्गात चलती आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गुगलवर 'Indian Tattoos' या सदराखाली आदिवासी गोंदणातील प्रतीकात्मक चिन्हे व काळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो.
अनेक लोक भारतीय गोंदण मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना आदिवासी जमातीतील सुंदर व शक्तिशाली 'गोंदण डिझाईन्स' हवी असतात.
अशा या सुंदर कलेचं चित्र काळानुसार बदलतं आलं असलं तरी महत्व कायम आहे. ही कला जुन्या काळात जितकी लोकप्रिय होती तितकीच आजही आहे, एव्हाना तिच्या लोकप्रियतेचा ग्राफ वाढतोच आहे.
मात्र, आधुनिक टॅटू कितीही लोकप्रिय असले तरी पारंपारिक गोंदण कला आणि तिचं महत्त्व जपून संरक्षण करणंही तितकचं महत्त्वाचं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











