'करवत काठी' साडीच्या व्यवसायातली पुरुषांची मक्तेदारी महिलांनी अशी मोडली

गोपीचंद निनावे आणि त्यांची पत्नी साधना निनावे
फोटो कॅप्शन, गोपीचंद निनावे आणि त्यांची पत्नी साधना निनावे
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठी

“करवत काठी साडी आमच्या गावची संस्कृती आहे. आमचं गावाची ओळख ही करवत काठी आणि हातमागावरील कपड्यांमुळे आहे. पण आता विणकर कमी झाले आहेत.

“व्यवसाय धोक्यात येतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. आमच्या गावची संस्कृती टिकवणं आमचं काम आहे. त्यामुळे पत्नीच्या मदतीनं बचत गट तयार केला आणि त्या माध्यमातून करवत काठी साडी विणण्याचा व्यवसाय सुरू केला.”

नागपूरवरून 90 किलोमीटवर असलेल्या आंधळगावात गोपीचंद निनावे आणि त्यांची पत्नी साधना निनावे या आपल्या गावची संस्कृती टिकावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायात 25 महिला आणि पुरुष काम करतात.

यात महिला कोशा शिजवणं, त्यातून धागा काढणं, ताणा-बाणा तयार करण्याचं काम करतात आणि 10 पुरुष करवत काठी साडीचं विणकाम करतात. पण सगळे विणकर साठीतल्या घरातले आहेत.

आता निनावे महिलांनाही साडी विणण्याचं प्रशिक्षण देत आहेत.

या साडीला करवत काठी का म्हणतात आणि ती कुठून आली?

विदेशातूनही साडीला मागणी असल्याचं गोपीचंद निनावे सांगतात. विदर्भाची शान असलेली ही साडी कधी तयार झाली? ही साडी कोणी तयार केली? तर निनावे यांच्याकडे काम करणारे 55 वर्षीय जगदीश निपाणे सांगतात, "1985 मध्ये आंधळगावात हातमाग महामंडळ सुरू झालं. सुरुवातीला सुती नववारी पातळ विणले. मग हातमाग महामंडळ वाल्यांनी एक डिजाईन आणून विचारलं की आपण हे डिझाईन काढू शकतो का? तर माझे वडील म्हणाले आपण विणकर आहोत आपण कुठलंही डिझाईन काढू शकतो.

"त्यानंतर माझ्या वडिलांनी हे डिझाईन काढून दाखवलं आणि हातमाग महामंडळात करवत काठी साडी विणायाला सुरुवात झाली. 1990 पासून ही साडी विणण्याचं काम आंधळगावात सुरू आहे."

करवत काठी साडी
फोटो कॅप्शन, करवत काठी साडी

या साडीला करवत काठी का म्हणतात याबद्दल जगदीश निपाणे समजावून सांगतात. ते म्हणतात, "आम्ही साडीच्या काठावर मंदिरासारखी हातानं डिझाईन काढतो. त्यामुळे तिला करवती सिल्क टसर साडी म्हणतात. ही साडी फक्त आमच्या आंधळगाव आणि मोहाडीत बनते."

'नवीन पिढी व्यवसायात उतरायला तयार नाही'

आंधळगाव आणि मोहाडीत अर्ध्यापेक्षा अधिक कोष्टी समाज आहे. हातमागावरील कापड विणणं हा कोष्टी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. याआधी नागपूर, भंडारा जिल्ह्यातला कोष्टी समाज हातमागावर कापड, नववारी पातळ, धोती विणण्याचं काम करत होता.

1995 मध्ये आंधळगावात हातमाग महामंडळाची स्थापना झाली आणि घरी काम करणाऱ्या विणकरांनी महामंडळात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी या गावात 2 हजारांपेक्षा अधिक विणकर होते.

पण, हातमाग महामंडळ बंद झालं आणि 50 टक्के विणकर गुजरातमधील सुरतला सुरू झालेल्या पॉवरलूममध्ये काम करायला गेले.

साडी विणकाम हा पुरुषी मक्तेदारी असलेला व्यवसाय आहे.
फोटो कॅप्शन, साडी विणकाम हा पुरुषी मक्तेदारी असलेला व्यवसाय आहे.

आता आंधळगावात फक्त 90 विणकर उरले. ते सुद्धा सगळे वयाच्या साठीतल्या घरातले आहेत. नवीन पिढी या व्यवसायात उतरायला तयार नाही. कारण, एक साडी विणायला 8 दिवस लागतात आणि जास्त डिझाईन असेल तर 15 दिवस लागतात.

या एका साडीच्या विणकामाचे फक्त 3500 रुपये मजुरी या विणकरांना मिळते. मेहनत अधिक आणि मजुरी कमी यामुळे नवीन पिढी या व्यवसायात उतरली नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पुरुषी मक्तेदारी असलेल्या व्यवसायात महिला कशा उतरल्या?

कोशापासून धागा काढणे, त्याचे कांडे भरून देणे असं साडी विणायाला लागणारं सर्व पूर्व काम महिला करत असल्या तरी हातमागावर साडी विणण्याचं काम पुरुषच करत होते. साडी विणकाम हा पुरुषी मक्तेदारी असलेला व्यवसाय आहे.

आता विणकर साठीतल्या घरात पोहोचल्यानं हा व्यवसाय धोक्यात येतोय की काय अशी भीती गोपीचंद निनावे यांना वाटते. म्हणूनच आपल्या घरात सुरू केलेल्या व्यवसायात महिलांनी विणकाम करावं यासाठी ते प्रयत्न करतात. आम्ही महिला प्रशिक्षण देणं सुरू केल्याचं ते सांगतात.

निनावे यांच्याकडे प्रशिक्षण सुरू असलं तरी या गावात आधीच साडी विणकाम व्यवसायात उतरलेल्या सात महिला आहेत. पण, त्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात कशा उतरल्या? तर याच गावातल्या प्रतिभा गुरडे सांगतात, “माझं लग्न झालं तर सासरी साडी विणकाम चालत होतं. तर धाग्यानं कांडे भरायचं काम शिकली.

एक साडी विणायला 8 दिवस लागतात आणि जास्त डिझाईन असेल तर 15 दिवस लागतात.
फोटो कॅप्शन, एक साडी विणायला 8 दिवस लागतात आणि जास्त डिझाईन असेल तर 15 दिवस लागतात.

माझ्या नवऱ्याला साडीसाठी पूर्वतयारी करून देत होते. मध्यंतरी यांची तब्येत खराब झाली तर मी मांगठा (कोष्टी भाषेतला हातमागाला शब्द) चालवायला शिकले. त्यावर कापड विणायला शिकली. पण, हातमागावरचा कापडही बंद झाला तर मग कंपनीत काम करायला गेलो.

तिथल्या कामात मन रमलं नाही. पुन्हा गावात आलो आणि करवत काठी साडीचं विणकाम शिकले. आता मी आठ दिवसात एक करवत काठी साडी पूर्ण करते.”

घरची गरज म्हणून प्रतिभा गुरडे करवत काठी साडी विणकामाच्या व्यवसायात उतरून त्यांनी घरचा व्यवसाय जीवंत ठेवला. त्यांच्यासारख्या आणखी सात महिला विणकाम करून हा व्यवसाय जीवंत ठेवण्यास हातभार लावतात.

कोशा व्यवसायात महिला आघाडीवर

करवत काठी साडी विणणाऱ्या महिलांची संख्या नगण्य असली तरी या साडीसाठी लागणाऱ्या कोशाचं उत्पन्न घेण्यात महिला आघाडीवर आहेत.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात जंगलाला लागून असलेल्या निष्टी गावातला ढीवर समाज कोशाचं उत्पन्न घेतो. या समाजाचे 150 कुटुंब जंगलात कोशा काढण्याचं काम करतात. पण, यातही महिला आघाडीवर आहेत.

2015 पासून बचत गटाच्या माध्यमातून अधिक प्रमाणात महिला कोशाच्या व्यवसायात उतरल्या.
फोटो कॅप्शन, 2015 पासून बचत गटाच्या माध्यमातून अधिक प्रमाणात महिला कोशाच्या व्यवसायात उतरल्या.

अगदी म्हाताऱ्या महिला सुद्धा जंगलात जाऊन कोशा काढण्याचं काम करतात. आधीचा व्यवसाय आणि आताच्या व्यवसायात काय फरक आहे? याबद्दल याच गावात कोशाचं उत्पन्न घेणाऱ्या निर्मला डाहारे सांगतात, आमच्या सासू सासऱ्यांच्या काळात हा व्यवसाय इतका जास्त नव्हता. जुने लोक व्यवसायापेक्षा शेतीकडे जास्त लक्ष देत होते.

आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या शोधात होतो. त्यामुळे आपला पारंपरिक व्यवसाय सुरू करावा असं ठरवलं. रेशीम कार्यालयातून अंडी घेतली आणि त्याची लागवड करायला सुरुवात केली. आता आम्ही 150 महिला कोशा उत्पन्न घेतो.

करवत काठी साडीसाठी लागणारा कोशा कसा तयार होतो?

2015 पासून बचत गटाच्या माध्यमातून अधिक प्रमाणात महिला कोशाच्या व्यवसायात उतरल्या. पण, हे कोशाचं उत्पन्न कसं घेतलं जातं? याबद्दल निर्मला डाहारे समजावून सांगतात. त्या म्हणतात, रेशीम कार्यालयातून आम्हाला अंडी मिळतात.

ते फुटल्यानंतर त्यातून रेशीमच्या अळ्या बाहेर पडतात. त्यानंतर त्या अळ्यांची जंगलात येनाच्या झाडावर लागवड करतो. एका झाडाची पानं खाऊन झाली की दुसऱ्या झाडावर अळ्या लावतो. ही अळी मोठी व्हायला एक ते दीड महिना लागतो. त्यानंतर अळी कोसा बांधायला सुरुवात करते.

प्रतिभा गुरडे
फोटो कॅप्शन, प्रतिभा गुरडे

एका दिवसात देठ तयार करते आणि त्यानंतर आठ दिवसात स्वतःभोवती पूर्ण कोसा तयार करते. त्या अळीचं फुलपाखरू तयार होतं. पुढे याच फुलपाखारापासून आणखी अंडी तयार होतात आणि कोसा व्यापाऱ्यांना विकला जातो.

पण, व्यापारी फुलपाखरू असलेला पूर्ण कोसा घेतात. कारण करवत काठी साडी विणायला हाच कोसा लागतो. फुटलेल्या कोशापासून निघणाऱ्या धाग्याला घिचा रेशीम म्हणतात. निष्टीमध्ये आंध्र प्रदेश, झारखंडवरून व्यापारी कोशा खरेदीसाठी येतात.

फुटलेल्या कोशापासून निघणाऱ्या धाग्याला घिचा रेशीम म्हणतात.
फोटो कॅप्शन, फुटलेल्या कोशापासून निघणाऱ्या धाग्याला घिचा रेशीम म्हणतात.

फुलपाखरासहित पूर्ण कोशाला 4 हजार नगाला 12 हजार रुपये याप्रमाणे दर मिळतो, तर फुलपाखरू निघालेल्या कोशाला कमी दर मिळतो.

याच कोशापासून आंधळगावात धागा काढतात आणि करवत काठी साडी विणतात. विणकर कमी झाल्यानं या साडीचं भविष्य धोक्यात येईल असं वाटलं. पण, आता या व्यवसायात महिला उतरल्यानं करवत काठी साडीची संस्कृती जपली जाईल अशी आशा आंधळगाववासियांना आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)