'नवऱ्याशी वाद घालून अर्धा एकर जमीन ताब्यात घेतली'; चंदा, पद्मा, अनिता यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी कशी केली फायद्याची शेती?

शेतातून काढलेलं धान्य दाखवताना आनंद झालेली महिला शेतकरी

फोटो स्रोत, Swati Satpute

फोटो कॅप्शन, शेतकरी आत्महत्येचं चक्र भेदणाऱ्या महिला
    • Author, हिनाकौसर खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी

“इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो”

दिवाळी आणि शेतीचं नातं हे अगदी पुरातन काळापासूनचं आहे. कारण हा सण खरीप हंगाम संपल्यानंतर येतो. पिकांची कापणी होऊन निसर्गातून संपन्नतेचा अनुभव घेण्याच्या दिवसांत दिवाळी येते. परंतु आजच्या घडीला शेतीतली ही संपन्नता गायब झाली आहे.

एकसुरी पद्धतीची शेती, वातावरणातील बदल, उत्पादन खर्चातील वाढ, शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे. शेतकऱ्यांसमोरचे आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे.

कृषी संकटाला आणि सामाजिक विषमतेला छेद देण्याचा प्रयत्न या शेतकरी महिला करत आहेत. खरं तर अन्न उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान असूनही, महिलांना शेतकरी म्हणून ओळख नाही. तरीही या संकटात, दिवाळीप्रमाणेच त्यांनी शेतीमध्ये शाश्वततेचा दीप प्रज्वलित केला आहे. त्यांनी आत्महत्येचं चक्र यशस्वीपणे भेदलं, त्याचीच ही नव्या भविष्याचा मार्ग दाखवणारी कहाणी!

शेतकरी चंदा घोडाम यांनी12 एकर जमिनीला सुपीक केलं आहे.

फोटो स्रोत, Madhuri Khadse

फोटो कॅप्शन, शेतकरी चंदा घोडाम

“कापसाची शेती परवडत नसल्यानं स्वत:ची जमीन दुसऱ्याला कसायला द्यावी लागायची. आपल्या शेतात कापसाशिवाय काय पिकणार असंच वाटायचं. पण कमी खर्चातली वांगी, तूर, उडद, मटकी, इतर रानभाज्या तरतरतून उगवताना दिसल्या. मग काय घेतली आपली 12 एकर जमीन ताब्यात.

दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर जाण्यापेक्षा आपल्याच शेतात राबण्याचं सुख अधिक. आधी भाज्या विकत आणायाचे तरी पुरायच्या नाही. आता आमच्या शेतात पिकलेलं पुरेल इतकं खातोय.”

पुढ्यातल्या रानभाज्या वेगवेगळ्या करत 44 वर्षीय चंदा घोडाम आपल्याशी बोलत असतात. पर्यावरणस्नेही स्वावलंबी मिश्र शेती त्या करू लागल्या, त्याचा अनुभव सांगतात.

“नवऱ्याची दीड एकर शेती. त्यांच्याशी वाद घालून अर्धा एकर जमीन स्वत:च्या ताब्यात घेतली. शेतीची काहीच माहिती नव्हती पण प्रयोग करुन पहायचा होता. काळ्या मातीच्या जमिनीत मूग, मटकी पिकणार नाही म्हणून कुटुंबातून, बाहेरुन विरोध करण्यात आला. पण माझ्या जमिनीवर चांगलं पीक आलं.”

मऊसूत जमिनीचं रहस्यं…

वेगवेगळी पिके तर मिळू लागलीच पण जमिनीचा कसही बदलू लागल्याचे ब्रह्मपुरीच्या पद्मा यांचा अनुभव होता.

त्या सांगतात, ''माझी मुलगी शेताकडे कधी येत नाही. पण एकदा ती काही कामाने आली. आमच्या शेताच्या शेजारी दिराचे शेत आहे. म्हटलं तर शेताचा एकच पट्टा. ती त्या शेतातल्या तुकड्यातून चालत आमच्या तुकड्यात आली आणि मग तिने मला विचारलं, पलिकडच्या चुलत्याच्या शेतातली जमीन कडक वाटत होती. चालताना पाय मातीत फसत होता.

आपल्या शेतात माती काहून नाही डीकत (लागत) आहे पायाले, मस्त मुलायम मुलायम वाटत आहे. आपल्या शेतातली माती वेगळी कशी? माझी लेक शेतात कधीच येत नाही, तिला हा फरक जाणवला तेव्हा मी हरखून गेले.

मग मी तिला सांगितलं, आपण आपल्या शेताच्या तुकड्यात शेणखत,पालापाचोळा टाकला. त्या पाल्याचे खत झाले. रसायने नाहीत. सगळं नैसर्गिक ठेवलं.

पलिकडच्या तुकड्यात मात्र एकच एक पीक. रसायने, कीटकनाशकाची फवारणी. त्यामुळं त्या मातीचं पोषण वाढवणारे जीवजंतू कमीच राहिले. म्हणून आपली आणि चुलत्याची शेतजमीन एकच असूनही ती जमीन कडक आन आपली मऊसूत.’’

शेतकरी पद्मा या बहुपीक पद्धतीने दर्जेदार पीक घेत आहेत.

फोटो स्रोत, Prashant Kunte

फोटो कॅप्शन, शेतकरी पद्मा भुसारी

अल्पावधीतच पद्माताईंनी निरीक्षणातून मातीतल्या फरकाची समजही वाढवली होती.

शेतजमिनीत, त्याच्या उत्पन्नात, पिकांच्या वैविध्यतेत चंदा आणि पद्मा या दोघींना फरक जाणवत होता. त्याचा कुटुंबाला होणारा फायदा दिसत होता. शेतीतल्या अवाजवी खर्चाला फाटा देऊन कर्ज आटोक्यात ठेवणं शक्य झालं होतं आणि मुख्य म्हणजे घरातली अन्नसुरक्षा वाढली होती.

या सकारात्मक बदलातून त्यांनी स्वतःसाठी ‘शेतकरी’ ही ओळख तर मिळवलीच मात्र त्यातून त्यांनी स्वत:ची ‘स्पेस' देखील मिळवली.

हे घडलं, सोपेकॉमच्या प्रयोगामुळे. महिला किसान अधिकार मंच म्हणजेच मकामशी संलग्न असणाऱ्या संस्थांच्या मदतीने सोपेकॉम हा प्रयोग राबवत आहे. यासाठी चेतना विकास संस्थेने तांत्रिक मदत केली.

या प्रयोगातून बीड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यातील एकूण 250 महिला पर्यावरणस्नेही स्वावलंबी शेतीच्या प्रयोगात सहभागी आहेत.

या शेतकरी महिला आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, काही अल्पभूधारक शेतकरी तर काहीजणी ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या आहेत.

या प्रयोगाची सुरुवात झाली ती कोव्हिड काळात. मकामशी संलग्न विदर्भ, मराठवाड्यातील महिलांना अन्नसुरक्षेच्या प्रश्नाला सतत तोंड द्यावं लागायचं. टाळेबंदीच्या काळात हा प्रश्न बिकट होऊन पुढे आला.

निव्वळ कापूस, तूर, सोयाबीन अशी पिकं कुठल्याही नफ्याशिवाय घेणं एकट्या शेतकरी महिलांना अवघड जात होतं. त्यातून पर्यावरणस्नेही शेती मॉडेलवर प्रत्यक्ष काम सुरू झाले.

किटकनाशकांची फवारणी करणारे शेतकरी. प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकसुरी पिके जगवणं अवघड, असं शेतकरी सांगत आहेत. (प्रातिनिधीक फोटो)

आपल्याकडे शेती हा बहुतांश करुन पुरुषप्रधान व्यवसाय.

त्यातही एकसुरी आणि नगदीच पिकांचा अट्टाहास. सलग या प्रकारची शेती केल्यामुळं जमिनीचा पोत घटतो. उत्पन्न कमी होते. मात्र, खते, रसायने, कीटकनाशके, फवारणी यांच्यासाठी कर्ज मात्र वाढते. जगण्याचा स्तर खालावतो. हे अभेद्य चक्र. याबाबत महिलांना काही बोलण्याची मुभा नाही.

शेतीत महिलांनी मुबलक राबावं. त्यासाठी कुणाची ना नसते. मात्र तिनं त्याविषयीचे निर्णय घेऊ नयेत हा अलिखित नियम. शेतात कुठलं पीक घ्यायचं इथपासून ते त्यासाठीचं कर्ज किती घ्यायचं असं सगळं बहुतेककरुन पुरुष ठरवतात. पण त्याचे परिणाम मात्र स्त्रिया अधिक भोगतात. एकट्या शेतकरी महिलेचं आव्हान दुप्पट होतं. त्यावर उपाय म्हणून प्रयोगाला सुरुवात झाली.

या प्रयोगात काय घडणार होतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रयोगात, स्वावलंबी आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी रासायनिक खते, तणनाशके आणि कीटकनाशके यांना सर्वात आधी दूर लोटले. त्या सगळ्याशिवाय शेती कशी करायची याचं महिलांना प्रशिक्षण दिलं.

प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घडवून त्यांच्या शंकांचं निरसन केलं. सहभागी महिलांना शेणखत आणि परस्परावलंबी मिश्र पिकांचे बियाणं देण्यात आलं. यात 25 ते 30 प्रकारचे बियाणे होते.

नॉन बीटी कापूस, सोयाबीन, कडधान्ये, तृणधान्ये आणि भाज्यांचा समावेश होता. महिलांनी परस्परावलंबी मिश्र पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने पेरणी केली. ट्रॅक्टरऐवजी बैलांचा वापर केला. यामुळे सेंद्रिय पद्धतीने मातीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्याची शक्यता निर्माण झाली.

हा प्रयोग करताना महिलांना अडचणी देखील आल्या. काहीजणींना अवजारांची अडचण आली. गावात सर्रास एकसुरी पीक पद्धत आणि ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने तिफन किंवा डावरा नव्हता.

काही ठिकाणी पुरुषांनी प्रयोग न पटल्याने प्रयोगाला कमी जागा दिली. महिलांनी सूचना दिल्यावरही पुरुष मजुरांनी पारंपरिकच पद्धत स्वीकारली.

एकल विधवांना कुटुंबातील पुरुषी मानसिकतेमुळे अनेक बाबतीत अडचणी आल्या. असं असतानाही महिला तग धरून राहिल्या. या प्रयोगातल्या स्वावलंबनाचा वसा स्वीकारत त्या शेती करू लागल्या आणि बदललेल्या शेतीपद्धतीची निरीक्षणंही नोंदवू लागल्या.

वर्षभरात त्यांना त्यांच्या शेतजमीन आणि उत्पादनात काही प्रमाणात का होईना फरक दिसू लागला. त्यातून त्यांना दुसऱ्याला मक्त्याने दिलेली जमीन परत मिळवून स्वतः कसण्याचा आत्मविश्वास आला. स्वतःच्या कुटुंबाची अन्नसुरक्षा वाढली.

महिलांना चार पैसे मिळू लागले. शेतात पिकलेलं माहेरी, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना अभिमानानं त्या द्यायला लागल्या. उत्पन्नातला फरक पाहून कुटुंबातल्या पुरुषांचे मत बदलले, महिला अशा प्रकारचे बरेचसे अनुभव सांगतात.

कर्जमुक्त शेतीतला आत्मविश्वास

चंदाताईंची बारा एकर जमीन असूनही त्यांचं कुटुंब दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूरी करत होते. त्यांनी सुरुवात म्हणून फक्त अर्ध्या एकरमध्ये पर्यावरणपूरक मिश्रशेतीचा प्रयोग केला. तिथं त्यांनी वेगवेगळ्या डाळी, भाज्या अशी खाण्याची पिकं लावली.

उत्पादन वाढल्यामुळे त्यांनी हाच प्रयोग एक एकरमध्ये सुरू केला. आता त्यांच्या उरलेल्या शेतातही त्या रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न करता, कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा आणि भाजीपाला अशी विविध पीकं घेत आहेत.

प्रयोगाच्या सुरुवातीच्या दिवसात चंदाताईंची मुलगी बाळंतपणाला आली होती. तिला ताज्या भाज्या खाऊ घालता आल्या, हे सांगताना त्यांचा चेहरा आनंदला होता.

वरूड गावातल्या अनिता कुबडे यांनी भुईमुगाचे बियाणे स्वत:हून मागितले आणि खरीपमध्ये लागवड केली. त्यांच्या गावात शेतकरी भुईमुगाचे पीक रब्बीमध्ये घेतात.

शेतकरी अनिता कुबडे मुगाच्या शेंगा दाखवताना

फोटो स्रोत, Swati Satpute, Getty Images

फोटो कॅप्शन, शेतकरी अनिता कुबडे मुगाच्या शेंगा दाखवताना

पावसाळ्यात भुईमूग चांगला आणि लवकर होतो, पावसाळ्यात भुईमुगाची उगवणक्षमता जास्त असते. हे त्यांचं निरीक्षण होतं. त्यानुसार एका वर्षी त्यांनी 200 ग्राम भुईमुग लावले आणि सहा किलो शेंगा मिळाल्या. अनिताताईंनी भाजी, मूग विक्री करून घराला हातभार लावला.

अनिता ताई म्हणतात, “कापसाची शेती असेल तर कुणाला कापूस थोडी देणार आहे? आणि तो सरळ मार्केटला जातो. पण या प्रयोगामुळे नवाळी देता येतेय.”

शेतीमध्ये उत्पन्न नाही, उलट दोन-अडीच लाखाचं कर्ज यामुळे कलावतीताई यांच्या पतीने आत्महत्या केली. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत कलावतीताई शेती कसू लागल्या.

या प्रयोगाच्या माध्यमातून एक एकर जमिनीवर कापूस, हळद, मुग, उडीद, तूर, सोयाबीन, भाजीपाला अशी अनेक पिके त्या घेत आहेत. एक एकर मधून 2023 मध्ये त्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांचा नफा मिळवला. उरलेल्या दोन एकरमध्ये सोयाबीन, बी टी कापूस, गहू, ज्वारी अशी पीके सेंद्रिय पद्धतीने त्या घेतात.

त्यामधून 2023 मध्ये त्यांना 50 हजार रूपये नफा मिळाला. गेल्या तीन वर्षात कलावतीताई कोणत्याही सावकाराकडे कर्ज मागायला गेल्या नाहीत. त्या आता पूर्णपणे कर्जमुक्त-स्वावलंबी शेती करत आहेत.

महिलांनी मेहनत घेऊन कमी जागेत मिश्रशेती केली आणि उत्पन्न मात्र वर्षभर पुरेल, असं मिळवलं.

काही महिलांच्या शेतातले पीक जनावरांनी खाल्ल्यामुळे नुकसान झाले, तरी पर्यावरणस्नेही शेतीपद्धत असल्यामुळे आर्थिक नुकसान झाले नाही. कारण उत्पादनाचा खर्च कमी होता. महागडी औषधे नव्हती, बाजारू बियाणे नव्हते.

मुख्य म्हणजे बाजारातून भाजीपाला, धान्य विकत घ्यावे लागले नाही, कारण घरच्यापुरतं विविध प्रकारचं धान्य, कडधान्य, भाज्या उपलब्ध होत्या.

शेती करणाऱ्या महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

प्रयोगाच्या भूमिकेविषयी सोपेकोमच्या सीमा कुलकर्णी सांगतात, “मागील आठ दहा वर्षांपासून महिलांसोबत आमचे काम सुरु होते. शेतात अपार कष्ट करूनही त्यांना शेतकरी म्हणून स्थान नाही. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत नाही. जमिनी त्यांच्या नावावर नाहीत या स्थितीवर महिलांशी नेहमी संवाद होतच होता. कोविडमुळे शेतीचे बाजारीकरण उघडे पडले.

शेतीतली पुरुषी व्यवस्था, एकसुरी पिके, खते, कीटकनाशके यांचा भडीमार- या सगळ्यांना छेद देण्याची संधी कोव्हिड काळात निर्माण झाली.

जमिनीवर राबणाऱ्या महिलेची काही ओळखच नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी देखील हा प्रयोग महत्त्वाचा वाटला. या प्रयोगाचे यश शेतीतली उत्पादकता वाढली किंवा उत्पन्न वाढलं एवढ्या पुरतं मर्यादित राहून पाहता येणार नाही.

महिलांना स्वतःच्या जमिनीवर हक्क सांगता आला, काहींनी तर प्रयोग करण्यासाठी कुटुंबात झगडा करून शेती नावावर केली, कुटुंबातील महिलांचे स्थान बदलले, आदर वाढला त्या स्वावलंबी झाल्या. सत्ता संघर्षात बदल झाले हे सगळंही खूप महत्त्वाचं आहे.”

अंधश्रद्धांना फाटा

यवतमाळ जिल्ह्यातील महिला हळद लावण्यास उत्सुक नव्हत्या. 'मासिक पाळीच्या काळात बाईनं झाडाला हात लावला तर झाड सडेल, पाप लागेल', असं त्यांना वाटत होतं. ही अंधश्रद्धा दूर करायला हवी म्हणून यवतमाळ येथील समन्वयक माधुरी खंडसे यांनी महिलांना हळदीचे पीक लावायला सांगितले.

महिलांच्या मनात झाड करपण्याची भीती होती. पण तसे काही झाले नाही. पाहता पाहता हळदीच्या झाडाची पाने सुकली व त्यांनी हळद काढली. घरी खाण्यापुरती हळद निघाली. हे बघून महिलांना आनंद झाला, या प्रयोगामुळे महिलांनी अनेक वर्षापासून चालत आलेली अंधश्रद्धा दूर केली.

अंधश्रद्धाना झुगारुन हळदीचं पीक काढणाऱ्या शेतकरी

फोटो स्रोत, Swati Satpute, Getty Images

फोटो कॅप्शन, हळदीचं पीक काढणाऱ्या कलावती सवंडकर

या प्रयोगात महिलांनी लागवडीपासून ते काढणी आणि पुढं विक्रीपर्यंतच्या गोष्टी महिलांनीच केल्या. कुटुंब, गावकऱ्यांची चेष्टेवारी, विरोध बाजूला सारुन त्या राबत राहिल्या. त्यांचा वैयक्तिक आत्मविश्वासही वाढला. स्वावलंबी शेतकरी म्हणून उभ्या राहिल्या.

सहा जिल्ह्यातील महिला एकत्र आल्या. त्या केवळ स्वत:च्या शेतीपुरतं या प्रयोगाकडं पाहत नाहीत. उलट एकमेकींच्या निरीक्षणांची, ज्ञानाची देवाणघेवाण करत आहेत.

तसेच गावात वारंवार बैठका घेत आहेत. त्यातून बचत गट आणि शेतकरी गट उभे राहत आहेत. यातून पर्यावरणस्नेही कृषी पद्धतीचा प्रयत्न करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा समूह तयार होत आहे.

विशेष म्हणजे, असे समूह शेतीपायी कर्ज आणि आत्महत्येचं चक्र भेदण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

(लेखिका या मुक्तपत्रकार असून या लेखात मांडलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. या लेखासाठी स्वाती सातपुते, स्नेहा भट, सीमा कुलकर्णी यांनी सहाय्य केले आहे.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.