गावाला अचूक वेळ दाखवणारं 500 वर्षांपासूनचं घड्याळ, ज्याला डायल नाही आणि काटेही नाहीत

घड्याळ
फोटो कॅप्शन, BBCईस्ट हेंड्रेडमधील सेंट ऑगस्टीनचे घड्याळ आठवा हेन्री सिंहासनावर असल्यापासून वेळ दाखवत आहे.
    • Author, जो कॅम्पबेल
    • Role, बीबीसी न्यूज

ब्रिटनमधील ऑक्सफर्डशायरच्या ग्रामीण भागातील वॉन्टेजजवळ असणाऱ्या ईस्ट हेंड्रेड गावाची ही गोष्ट आहे.

या गावात ब्रिटनमधील सर्वात जुन्या घड्याळांपैकी एक असल्याचं मानलं जातं. जुनं म्हणजे किती तर तब्बल 500 वर्षे जुनं. हे घड्याळ अजूनही त्याच्या मूळ ठिकाणीच आहे.

या गावातील गावकरी त्यांच्या पॅरिश चर्चमधील (एखाद्या भागातील धार्मिक केंद्र असणारं चर्च) घड्याळाचा 500 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

या घड्याळाला डायल किंवा काटे नसल्यामुळे ते सेंट ऑगस्टीनच्या टॉवरमध्ये असणाऱ्या चर्चच्या घंटेवर अवलंबून असतं. हे घड्याळ दर पंधरा तासांनी या चर्चच्या घंटेच्या आधारे वेळ दाखवतं.

हे घड्याळ चर्चमध्ये बसवण्यात आलेलं आहे. तिथे ते बसवण्याचा निर्णय हेन्री आठवा यांच्या काळात घेण्यात आला होता, असं टॉवर कॅप्टन नायगेल फिंडले यांनी सांगितलं. सेंट ऑगस्टीनची घंटा वाजण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

"त्यावेळेस लोकांमध्ये किती उत्साह निर्माण झाला असेल याची जरा कल्पना करा," असं ते म्हणाले.

घड्याळ्याची काम करण्याची पद्धत आणि लोकांच्या आयुष्यातील स्थान

चर्चमधील कॅरिलॉन (घंटेचा समूह किंवा सेट जो कीबोर्ड किंवा स्वयंचलित यंत्रणेद्वारे वाजतो), संगीताच्या एखाद्या महाकाय पेटीसारखा दिसतो. तो दर पंधरा मिनिटांनी चर्चमधील घंटा वाजवतो. तिथे 9:00 वाजल्यापासून दिवसातून दर तीन तासांनी, चार वेळा एंजल्स गाण्याची धून वाजते.

या कॅरिलॉनमधील सहा घंटा वाजवण्यासाठी काही हातोडे वापरले जायचे. 2015 मध्ये या कॅरिलॉनमधील एक हातोडा बाहेर निघून आला आणि त्या स्वयंचलित यंत्रावर पडला. त्यामुळे ती व्यवस्था बंद पडली आणि ते घड्याळ बंद झालं.

"ते एखाद्या मित्राची आठवण आल्यासारखं होतं. ते घड्याळ म्हणजे गावच्या जीवनाचा एक भाग झालं आहे." असं चर्चच्या कौन्सिलच्या सचिव ॲन पॅपेनहाईम म्हणाल्या.

"जेव्हा तुम्ही बागेत काम करत असता, तेव्हा ते तुम्हाला वेळेची जाणीव करून देतं. त्यामुळे मला त्या घड्याळाची आठवण यायची. आता ते घड्याळ पुन्हा सुरू झालं आहे. ही खूपच छान गोष्ट आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

घड्याळ
फोटो कॅप्शन, हे घड्याळ एका कॅरिलॉनशी जोडलेले आहे जे दर पंधरा तासांनी घंटा वाजवणाऱ्या हातोड्यांवर विंचेस आणि पुली वापरून उंचावर चालवते.

हे घड्याळ मूलत: या गावापासून काही मैल अंतरावर असलेल्या वॉन्टेजमध्ये तयार करण्यात आलं होतं. या घड्याळाला पुन्हा वापरात आणण्यासाठी त्याचं बरंच नूतनीकरण करावं लागलं.

घड्याळात सुधारणा करताना, त्याच्यामध्ये यांत्रिक वाईंडिंग व्यवस्थादेखील बसवण्यात आली. त्याआधी या घड्याळ्याच्या खोलीतील अरुंद, वळणदार जिना दररोज कोणाला तरी चढावा लागायचा आणि मग त्याच्याशी संबंधित काम हातानं करावं लागायचं.

मात्र, नवी यंत्रणा बसवल्यामुळे आता तसं करण्याची आवश्यकता राहणार नाही.

घड्याळ्याचं नूतनीकरण आणि लोकांमधील आनंद

या आठवड्यात, या घड्याळ्याच्या वाढदिवसानिमित्त, लोकांना त्या टॉवरला भेट देऊन या घड्याळाचं काम कसं चालतं, ती यंत्रणा कशी काम करतं, ते पाहण्याची संधी मिळाली.

लोकांना घड्याळाबद्दल माहिती देण्याचं काम सिमॉन गिलख्रिस्ट करत होते. या घड्याळ्याचं नूतनीकरण, नवीन सुधारणा करण्याच्या कामाचं नेतृत्व त्यांच्याकडेच होतं.

घड्याळ्याच्या या कामात वेळ घालवणं ही "अत्यंत आनंदाची" बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॉवर
फोटो कॅप्शन, टॉवरवर घड्याळ दिसत नसल्यामुळे, वेळ दाखवण्यासाठी हे घड्याळ चर्चच्या घंटांवर अवलंबून असते.

"घड्याळ दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ म्हणून आम्हाला अशा जुन्या घड्याळावर काम करण्याची संधी नेहमीच मिळत नाही. हे घड्याळ फक्त खूप जुनं आहे इतकंच नाही तर त्याला मोठं ऐतिहासिक महत्त्वंदेखील आहे," असं गिलख्रिस्ट म्हणाले.

पूर्वी घड्याळ सेट करण्यासाठी किंवा त्यावर वेळ निश्चित करण्यासाठी टॉवरबाहेर असलेलं सनडायल वापरलं जात असे.

सनडायल म्हणजे उन्हावर किंवा सूर्याच्या किरणांवर चालणारं जुन्या काळातील घड्याळ. यात एक चकती असायची आणि त्यावर एक सूचक असायचा. तो सूचक प्रकाशाच्या दिशेनं फिरायचा. त्याच्या सावलीवरून वेळ समजायची.

500 वर्षांपूर्वीच्या दिनचर्येनुसार चालणारं घड्याळ

आता त्या जुन्या व्यवस्थेऐवजी ट्युडर काळातील यंत्रणेच्या शेजारी भिंतीवर लावण्यात आलेलं एक आधुनिक डिजिटल घड्याळ वापरलं जातं. साधारण पंधरा शतकातील शेवटची वर्षे ते सतराव्या शतकाची सुरुवात या कालखंडाला ट्युडर काळ म्हणतात.

"जेव्हा 500 वर्षांपूर्वी हे घड्याळ बनवण्यात आलं, तेव्हा त्यामध्ये आजच्या घड्याळांमध्ये असते तशी वेळेच्या बाबतीतील अचूकता नव्हती," असं गिलख्रिस्ट म्हणतात.

या यंत्रणेतील पेंडुलम किंवा दोलकासारखे काही भाग उन्हाळ्यात उष्णतेमुळे विस्तारतात. तर हिवाळ्यात थंडीमुळे आकुंचन पावतात. त्याचा वेळ दाखवण्यावर परिणाम होतो.

हे उपकरण जुन्या काळात बनवलं गेलं होतं. त्याकाळी लोकांची दिनचर्या पहाटे किंवा सूर्योदय झाल्यावर सुरू होत असे. तर सूर्यास्त झाल्यानंतर त्यांचा दिवस संपत असे.

"ही बाब लक्षात घेता, अचूकतेचा विचार केल्यास, हे जुनं घड्याळ खूपच अचूक आहे," असं गिलख्रिस्ट पुढे म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)