'टाटा' आणि 'तामिळनाडू'तून साकारलेल्या 'टायटन'ची रंजक कहाणी

टायटन घड्याळ

फोटो स्रोत, GETTY IMAGES

    • Author, मुरलीधरन काशी विश्वनाथन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

टाटा समूह आणि तामिळनाडू सरकारच्या टिडको (TIDCO)नं संयुक्तपणे एक घड्याळ कंपनी सुरू केली होती.

ही कंपनी आज मनगटी घड्याळांच्या क्षेत्रातील प्रख्यात कंपनी बनली आहे. तसंच दागिने, साड्या आणि गॉगल्सच्या क्षेत्रातील देखील नामवंत कंपनी बनली आहे.

ही कंपनी कोणती आणि तिची सुरूवात सुरुवात कशी झाली, हे तुम्हाला माहिती आहे का?

या कंपनीचं नाव आहे टायटन (TITAN). टाटा समूहातील नावारुपाला आलेल्या असंख्य कंपन्यांपैकी ही एक.

टायटनच्या (TITAN)जन्माच्या अद्भूत कहाणीबद्दल आणि टाटांच्या असंख्य योगदानांपैकी आणखी एका योगदानाबद्दल या लेखात जाणून घेऊया.

भारतातील ज्या व्यक्तीला घड्याळं आवडतात, डिझायनर दागिने आवडतात, अशा व्यक्तीनं टायटन, तनिष्क ही नावं ऐकली नसतील असं होतच नाही.

किंबहुना दर्जेदार, कलात्मक घड्याळं, दागिने यांचं दुसरं नाव म्हणजे टायटन.

टायटन आणि तनिष्क हे अत्यंत लोकप्रिय ब्रँड्स आहेत. टाटा समूह आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ (Tamil Nadu Industrial Development Corporation) (TIDCO)यांचा हा संयुक्त उपक्रम आज एखाद्या विशाल वटवृक्षासारखा बहरला आहे.

फक्त बहरला आणि विस्तारलाच नाही, तर एक जागतिक स्तरावरील ब्रँड झाला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

टायटन आणि तनिष्कची कहाणी अतिशय रंजक आहे.

पत्रकार विनय कामत यांचं 'टायटन: इनसाईड इंडियाज मोस्ट सक्सेसफूल कन्झ्युमर ब्रँड' आणि टायटनचे व्यवस्थापकीय संचालक सी के वेंकटरामन यांच्या 'द तनिष्क स्टोरी: इनसाईड इंडियाज नंबर वन ज्वेलरी ब्रॅंड' या दोन पुस्तकांमध्ये याबद्दल विस्तारानं लिहिण्यात आलं आहे.

अशी झाली कंपनीची सुरुवात

70 च्या दशकात भारतात 'लायसन्स राज' शिखरावर होतं. त्याकाळी प्रत्येक वस्तूच्या व्यवसायासाठी, उत्पादनासाठी लायसन्स किंवा परवाना घ्यावा लागत असे.

त्यावेळी हिंदुस्तान मशिन टूल्स (HMT) या केंद्र सरकारच्या कंपनीकडेच फक्त मनगटी घड्याळांचं उत्पादन करण्याचा परवाना होता. एचएमटी ची घड्याळं तुम्हाला आठवत असतील.

स्थानिक पातळीवर छोट्या कंपन्या घड्यांळांचं उत्पादन करू शकतं. मात्र कोणत्याही बड्या कंपनीला मनगटी घड्याळांचं उत्पादन करण्याची परवानगी नव्हती.

भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS)असणारे तामिळ अधिकारी एरावथम महादेवन यांना सिंधू संस्कृतीमध्ये प्रचंड रस होता. 1977 साली दिल्लीत कार्यरत असताना ते सिंधू खोरे आणि संस्कृतीबद्दल माहिती घेण्यासाठी टाटा प्रेसमध्ये गेले होते.

त्यावेळेस अनिल मनचंदा हे टाटा प्रेसमधील सर्वात वरिष्ठ अधिकारी होते. कालांतरानं महादेवन आणि अनिल मनचंदा यांचे जवळचे संबंध तयार झाले.

जॉर्ज देसाई

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, जॉर्ज देसाई

एके दिवशी अनिल मनचंदा दिल्लीतील उद्योग भवनमध्ये असणाऱ्या महादेवन यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळेस खासगी क्षेत्राच्या भागीदारीनं नवीन उत्पादनांच्या निर्मिती करता येण्यासंदर्भातील चर्चा सुरू होती.

मनचंदा आणि महादेवन या दोघांनी विविध उत्पादनांच्या निर्मितीच्या शक्यतांवर चर्चा केली. त्यांच्या चर्चेनंतर अनिल मनचंदा टाटा प्रेसचे आणखी एक अधिकारी झेर्झेस देसाई (Xerxes Desai) यांच्याशी बोलले.

(झेर्झेस देसाई हे टायटन चे संस्थापक आणि पहिले व्यवस्थापकीय संचालक होते.)

चर्चेच्या शेवटी दोघेही या निष्कर्षावर आले की मनगटी घड्याळांचं उत्पादन करणं योग्य ठरेल. भारतातील एका मोठ्या कंपनीची सुरूवात होण्याचा तो क्षण होता.

त्यावेळेस टाटांनी मनगटी घड्याळाच्या उत्पादनात पाय ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी आवश्यक असणारा केंद्र सरकारचा परवाना त्यांच्याकडे नव्हता.

टाटांसमोरील आव्हानं

टाटांच्या या नव्या उपक्रमासमोर दोन आव्हानं होती.

पहिलं आव्हान म्हणजे, केंद्र सरकारकडून परवाना मिळवणं. तर दुसरं आव्हान म्हणजे मनगटी घड्याळांचं उत्पादन करण्यासाठीचं तंत्रज्ञान मिळवणं.

त्यावेळी जगात फक्त पाच प्रमुख कंपन्या होत्या ज्यांच्याकडे मनगटी घड्याळांची निर्मिती करण्यासाठीचं तंत्रज्ञान उपलब्ध होतं.

त्या कंपन्या म्हणजे 1. स्वॅच (SWATCH), 2. सिटिझन (Citizen), 3. सिको (Seiko), 4. टायमेक्स (Timex) आणि 5. कॅसिओ (Casio).

यापैकी सिटिझन कंपनीचा भारत सरकारच्या एचएमटी कंपनीशी करार झाला होता. तर सिको या कंपनीची देखील आलविन कंपनी शी बोलणी सुरू होती. टायमेक्स आर्थिक अडचणीत होती.

कॅसिओ या कंपनीनं मात्र मनगटी घड्याळांच्या उत्पादनास सुरूवात केली होती. त्यांनी डिजिटल घड्याळांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली होती. स्वॅच या कंपनीला त्यांचं तंत्रज्ञान दुसऱ्या कोणालाही द्यायचं नव्हतं.

घड्याळ

फोटो स्रोत, X/TITANWATCHES

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्याचवेळेस तामिळनाडू सरकार, तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाच्या (TIDCO)माध्यमातून राज्यात नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील होतं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एमआयडीसी उद्योग क्षेत्रात काम करतं तसंच काम तामिळनाडूत टिडको करतं.

एरावथम महादेवन हे त्यावेळेस केंद्र सरकारच्या सेवेत होते. त्यांची तामिळनाडूमध्ये बदली झाली. त्यांनी तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

त्याचवेळेस तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाचं फ्रान्स एबॉचेस एसए (France Ebauches SA)या कंपनीशी घड्याळांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या स्थापनेसाठी तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी बोलणी सुरू होती. फ्रान्स एबॉचेस एसए ही कंपनी घड्याळांच्या उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी होती.

महादेवन यांना या गोष्टीची कल्पना होती की टाटांना देखील मनगटी घड्याळांचं उत्पादन करण्यात रस आहे. ते झेर्झेस देसाई यांच्याशी याबाबतीत एक दिवस बोलले.

त्यांनी विचारलं की, "आमची फ्रान्स एबॉचेस या फ्रेंच घड्याळ कंपनीबरोबर बोलणी सुरू आहेत. आम्हाला तामिळनाडूत उत्पादन सुरू करण्यासाठी एका भागीदाराची गरज आहे. टाटांना यात रस आहे का?"

टाटा याच क्षणाची वाट पाहत होते आणि त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर आधी फ्रान्स एबॉचेस आणि मग टाटा समूहानं यासंदर्भातील करार केला.

नंतर तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळानं घड्याळांच्या उत्पादनासाठी परवाना मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला. त्यात त्यांनी या उपक्रमात टाटा भागीदार असल्याचं म्हटलं होतं.

मात्र या अर्जाबाबत केंद्र सरकारनं सांगितलं की फक्त तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाच परवाना मिळू शकेल आणि या उपक्रमात टाटांची भागीदारी असता कामा नये.

त्यानंतर टाटांच्या नावाचा उल्लेख न करता क्वेस्टर इन्व्हेस्टमेंट्सच्या नावानं पुन्हा एकदा अर्ज करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारनं फक्त एकेरी परवाना दिला.

लाल रेष

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

टायटन नावाचा जन्म आणि कंपनीचा विस्तार

मग या नव्या ब्रँडला किंवा कंपनीला काय नाव द्यायचं यावर विचार करण्यात आला. कंपनीला नाव देण्यात आलं 'टायटन' (TITAN).

'टायटन' हे नाव हे दोन गोष्टींच्या एकत्रीकरणातून तयार झालेलं नाव आहे. म्हणजे असं की टाटा इंडस्ट्रीजच्या नावातील टी आणि आय ही दोन आद्याक्षरं आणि तामिळनाडूमधील टी,ए,एन ही अक्षरं यांना एकत्र करून कंपनीचं नाव 'टायटन' असं ठेवण्यात आलं.

1986 साली होसूर इथं कारखान्याची पायाभरणी करण्यात आली. तर फेब्रुवारी 1987 मध्ये घड्याळ्यांच्या उत्पादनास सुरुवात झाली. पुढच्याच महिन्यात घड्याळांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं.

एप्रिल 1989 पर्यंत टायटनच्या तब्बल दहा लाख घड्याळांची विक्री झाली होती.

जेआरडी टाटा यांच्यानंतर 90 च्या दशकाच्या सुरूवातीला टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा झाले. 1992 मध्ये रतन टाटांनी होसूर येथील टायटन इस्टिट्यूटला पहिल्यांदा भेट दिली.

ज्वेलरी

फोटो स्रोत, X/TANISHQJEWELRY

टायटनची स्थापना झाल्यापासून कंपनीनं भारतातील घड्याळांच्या बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडवून दिली होती. टायटनची घड्याळं लोकांच्या फक्त पसंतीस उतरत नव्हती तर प्रथम पसंतीची बनली होती.

साहजिकच कमी कालावधीत टायटन हा घड्याळ्यांच्या बाजारपेठेतील नंबर वन ब्रँड बनला.

टायटन हा यशस्वी ब्रँड होत असतानाच, तनिष्क (Tanishq) या ब्रँड ची बीजं देखील रोवली जात होती.

तनिष्क ची सुरुवात

1990 मध्ये झेर्झेस देसाई यांनी मुंबईतील एका दागिन्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळेस त्यांच्या मनात कल्पना आली की युरोपच्या बाजारपेठेत महागडी घड्याळं आणि खास डिझाईन केलेले दागिने एकत्रितरित्या विकता येतील.

हाच तनिष्कची (Tanishq) सुरूवात होण्याचा क्षण होता.

त्यानंतर याबाबत वेगानं घडामोडी घडू लागल्या. टायटनच्या सुरूवातीपासून अनिल मनचंदा हे झेर्झेस देसाई यांच्याबरोबर काम करत होते. त्यांनाच तनिष्क ची जबाबदारी देण्यात आली.

सुरुवातीला असं वाटलं होतं की, तनिष्कच्या दागिन्यांची चांगली विक्री होईल. मात्र जेव्हा विक्री अपेक्षेनुसार झाली नाही, तेव्हा अनिल मनचंदा त्या जबाबदारीतून बाहेर पडले.

मात्र झेर्झेस देसाई या उपक्रमाबाबत ठाम होते. हा ब्रँड पुढे नेण्यासाठी ते कटिबद्ध होते. अखेर होसूरमध्येच 65 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून दागिन्यांसाठीचा एक स्वतंत्र कारखाना सुरू करण्यात आला.

ज्वेलरी

फोटो स्रोत, GETTY IMAGES

तनिष्कच्या दागिन्यांचं उत्पादन करताना सुरुवातीला युरोप आणि अमेरिकेत दागिन्यांची निर्यात करण्याची योजना होती. त्याचबरोबर भारतात छोट्या प्रमाणात दागिन्यांची विक्री करण्याचं ठरवण्यात आलं होतं.

1994 मध्ये तनिष्कचं उत्पादन सुरू झालं. मात्र झेर्झेस देसाई यांच्या लक्षात आलं की युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची निर्यात करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचं लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळवलं.

तनिष्कचं वेगळेपण आणि ग्राहकांचा विश्वास

मात्र भारतातील दागिन्यांच्या स्थानिक बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा होती. प्रत्येक प्रदेशातील दागिन्यांची स्टाईल, शैली वेगवेगळी होती. प्रत्येक राज्यातील ग्राहकांची दागिन्यांसंदर्भातील आवड आणि प्राधान्य देखील वेगवेगळं होतं.

सुरूवातीला या ब्रँडचं नाव सेलेस्टे (Celeste)असं ठेवण्यात आलं होतं. मात्र 1996 बदलून ते तनिष्क (Tanishq) करण्यात आलं.

तनिष्कच्या दागिन्यांसाठीचे शोरुमचं डिझाईन उत्कृष्टपणे आणि वैशिष्ट्यपूर्णरित्या केलेलं असावं असा झेर्झेस यांचा आग्रह होता. त्यांनी याबाबत अतिशय बारकाईनं लक्ष घातलं.

त्यानुसार डिझाईन करण्यात आलेलं तनिष्कचं पहिलं शोरुम चेन्नईतील कॅथेड्रल रोडवर 1996 मध्ये सुरू करण्यात आलं.

सुरूवातीला तनिष्कच्या शोरुमध्ये 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात होती.

मात्र लवकरच त्यांच्या लक्षात आलं की भारतीय ग्राहकांना फक्त 22 कॅरेट दागिन्यांमध्येच रस आहे. त्यामुळे नंतरच्या काळात तनिष्कनं 22 कॅरेट दागिन्यांचं उत्पादन करण्यास सुरूवात केली.

मात्र दागिन्यांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली नाही. तनिष्कचे शोरुममध्ये शांतता असायची आणि ग्राहक शोरुम मध्ये जाण्यास कचरत असत. कारण त्यांना वाटायचं तनिष्कचे दागिने खूपच महागडे असतील.

त्याच काळात अनेक सराफ स्वस्त किंवा कमी महागडे दागिने विकत होते. ही एक सर्रास केली जाणारी बाब होती. याचाच अर्थ 16 कॅरेट -17 कॅरेट दागिने 22 कॅरेट सोन्याचे असल्याचे सांगून विकले जात होते.

तनिष्कनं या गोष्टीची दखल घेतली आणि त्याचा वापर शोरुममध्ये केला. तो असा की शोरुममध्ये कॅरेट मीटर ठेवण्यात आलं, ज्यावर सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता दिसत होती.

ग्राहकांना त्यांचे दागिने आणण्यास आणि त्यांची शुद्धता तपासण्यास सांगण्यात आलं. त्याचबरोबर असंही जाहीर करण्यात आलं की ग्राहक त्यांचं 17 कॅरेट सोनं देऊन त्याबदल्यात 22 कॅरेट सोनं मिळवू शकतात.

त्याचा परिणाम असा झाला की तनिष्कच्या नफ्यात घसरण झाली. मात्र ग्राहकांची संख्या वाढली, त्याचबरोबर दागिन्यांची विक्रीदेखील वाढली.

यानंतर अनेक चढउतारांना तोंड देत तनिष्कनं त्यांचा विस्तार सुरू ठेवला. तनिष्क ची भरभराट सुरूच राहिली. 2022 पर्यंत तनिष्कनं या टायटनच्या दागिन्यांच्या विभागाच्या विक्रीनं 34,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.

टायटनची सातत्यपूर्ण कामगिरी आणि टाटांचं धोरण याची परिणती 'टायटन'च्या यशोगाथेत झाली आहे.

आज टायटन हा भारतातील घड्याळं, सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने, चष्मे, गॉगल, पोषाख, हँडबॅग आणि परफ्यूमचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.