रतन टाटा आणि शंतनू नायडू : मैत्रीला वयाचं बंधन नसतं हे सिद्ध करणारं अनोखं नातं

शंतनू नायडू आणि रतन टाटा सोबत चित्रपट बघण्याचा आनंद घेत असत.

फोटो स्रोत, Shantanu Naidu

फोटो कॅप्शन, शंतनू नायडू आणि रतन टाटा सोबत चित्रपट बघण्याचा आनंद घेत असत.
    • Author, आकृती थापर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तरूणांचं व्यासपीठ समजलं जाणाऱ्या इन्स्टाग्रामवर वयाची नव्वदी गाठत आलेला माणूस व्हायरल होणं हे तसं नवलंच. त्यातही तो माणूस जर झगमगाट आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारा बडा उद्योगपती असेल तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

पण ही गोष्ट इथेच संपत नाही. याही पेक्षा नवलाईची बाब म्हणजे नव्वदीच्या जवळ आलेल्या या वयोवृद्ध उद्योगपतीची विशीतल्या तरूण मुलाशी झालेली मैत्री.

हीच मैत्री वयाच्या नव्वदीत आल्यावर रतन टाटांना भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपती बरोबरच सोशल मीडियावरचा स्टार बनवण्याचं कारण बनली.

रतन टाटा यांचा मित्र शंतनू नायडू यानेच त्यांना सोशल मीडियाच्या जगाशी ओळख करून दिली. सोशल मीडियावरील ट्रेंड आणि हॅशटॅग्स कसे वापरावेत हे शिकवलं.

आपल्या या तरूण मित्राच्या आग्रहामुळेच रतन टाटा आपल्या अखेरच्या काही वर्षांत पहिल्यांदा सोशल मीडियावर आले आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनले.

रतन टाटा यांचा सोशल मीडियावरील वावर हा इंटरनेट वापरकर्त्यांचा आवडीचा विषय बनला होता.

रतन टाटा सोशल मीडियावरील खात्यांवरून कधी स्वत:चा जुना फोटो, कधी त्यांच्या कुत्र्यांचे फोटो तर कधी आपल्या कुटुंबाचे फोटो पोस्ट करायचे.

या फोटोंना तितकेच रंजक आणि विनोदी कॅप्शन देखील असायचे. रतन टाटांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात शंतनूचाच हातभार होता.

“मागच्या 5 दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात नाव कमावलेल्या या उद्योगपतीचं खासगी आयुष्य कसं आहे, याची झलक त्यांच्या चाहत्यांना मिळावी, यासाठी मी त्यांना सोशल मीडियाचा वापरायला सल्ला दिला होता,” असं शंतनू सांगतो.

कशी झाली मैत्री?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रत्येक भारतीय माणूस टाटा कंपनीचं कोणतं ना कोणतं उत्पादन रोजच्या आयुष्यात वापरतो. प्रत्येक भारतीय हा टाटांचा ग्राहक आहे.

अगदी मीठापासून सॉफ्टवेअर विकसित करण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात रतन टाटांनी स्वतःचं नाव‌ प्रस्थापित केलं होतं. काही वर्षांपासून ते तरूणाईचे मित्र बनून तितक्याच सहजतेनं सोशल मीडियावरून त्यांच्याशी समरस होऊ लागले होते. शंतनूनं उद्योगपती असलेल्या रतन टाटांना एका अर्थानं नवीन ओळख मिळवून दिली.

घनिष्ठ मित्र बनलेले शंतनू आणि रतन टाटा हेअरकट घेण्यापासून चित्रपट बघण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सोबत करत असत. शंतनू सांगतो की त्यांची ही मैत्री लोकांसाठी जितकी आश्चर्यकारक होती तितकीच त्यांच्यासाठी मौल्यवान देखील होती.

रतन टाटांसोबत त्यांचा सहाय्यक म्हणूनही शंतनूने काम केलं आहे. ते कडक शिस्तीचे बॉस, दूरदृष्टीचे मार्गदर्शक आणि तितकेच समजूतदार मित्रदेखील होते, असं शंतनू सांगतो.

पण मोठे डोळे आणि कुरळ्या केसांचा हा अवघ्या 25 वर्षांचा मुलगा जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांमध्ये गणल्या जाणाऱ्या रतन टाटा यांचा इतका जवळचा सहकारी आणि मित्र कसा बनला?

रतन टाटा आणि शंतनू

फोटो स्रोत, Getty Images

ग्राफिक्स
ग्राफिक्स

शंतनू नायडू हा टाटा कंपनीमध्येच कामाला होता. इतकंच नव्हे तर टाटा कंपनीसोबत असलेलं त्याचं नातं फार जुनं आहे.

त्याच्या मागच्या चार पिढ्या टाटा कंपनीत कामाला होत्या. त्या अर्थानं शंतनू नायडूचं कुटुंब टाटा समूहाशी घट्ट जोडलं गेलेलं आहे. पण आपण साक्षात टाटा समूहाच्या प्रमुखांसोबत अशा पद्धतीने जोडले जाऊ याची शांतनूलाही कल्पना नव्हती.

रतन टाटा आणि शंतनू नायडूची भेट योगायोगानेच झाली. दोघांमध्ये असलेला श्वान प्रेमाचा समान धागा या भेटीला कारणीभूत ठरला.

श्वानप्रेमाचा समान धागा

शंतनू टाटा समूहाच्याच पुण्यातील एक कंपनीत कामाला असताना रतन टाटांशी त्याचा पहिल्यांदा परिचय झाला.

टाटा कंपनीत काम करत असतानाच शंतनू मोटोपॉज (Motopaw) या नावाने एक सामाजिक उपक्रमही चालवत होता.

या उपक्रमांतर्गत भटक्या कुत्र्यांना शोधून त्यांच्या गळ्याभोवती चमकणारा पट्टा बांधला जात असे. जेणेकरून हे कुत्रे गाडीचालकांना रात्रीसुद्धा दिसू शकतील. अंधारात गाड्यांसमोर कुत्रे आल्याने अनेकदा अपघात होता. यात अनेक कुत्रे गंभीर जखमी होतात किंवा मरणही पावतात. असे अपघात रोखण्यासाठी मोटोपॉज हा उपक्रम शंतनूने चालवायला सुरुवात केली होती.

कंपनीच्या न्यूजलेटरमध्ये देखील शंतनू चालवत असलेल्या या उपक्रमाचा उल्लेख केला गेला होता. स्वतः श्वानप्रेमी असलेल्या रतन टाटा यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी पत्र लिहून शंतनूला खास मुंबईत भेटायला बोलावलं.

शंतनूने सुरू केलेला मोटोपॉज हा उपक्रम पुढे जाऊन एक मोठी सेवाभावी संघटना बनला. भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम शंतनूने सुरू केला होता.

फोटो स्रोत, Shantanu Naidu

फोटो कॅप्शन, शंतनूने सुरू केलेला मोटोपॉज हा उपक्रम पुढे जाऊन एक मोठी सेवाभावी संघटना बनला. भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम शंतनूने सुरू केला होता.

“भटक्या कुत्र्यांची काळजी व श्वानप्रेम हा आम्हाला जोडणारा समान धागा होता. भटक्या कुत्र्यांनाही पाळणारा कोणी पालक मिळावा. जेणेकरून त्यांना अन्न, निवारा आणि प्रेम मिळेल या उद्देशानं कॉलेजच्या मुलांना सोबत घेऊन त्यानं एक उपक्रम राबवला होता. त्यामुळे मी खूप प्रभावित झालो. त्यानिमित्ताने आमची पहिल्यांदा भेट झाली,” असं रतन टाटा बीबीसीशी बोलताना म्हणाले होते.

या पहिल्या भेटीतून गाढ मैत्रीचा पाया रचला गेला.

‘’रतन टाटांची साथ मिळाल्यावर मोटोपॉज हा उपक्रम वेगाने वाढला. कामानिमित्त सुरू झालेला आमचा संपर्क हळूहळू वाढत गेला. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर कामाव्यतिरिक्तही आम्ही एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टींबाबत गप्पा मारू लागलो,’’ असं शंतनूनं रतन टाटांसोबत मैत्री कशी फुलत गेली हे सांगताना म्हटलं.

शंतनूच्या पदवीदान सोहळ्यासाठी अमेरिकेला गेले

रतन टाटा आणि शंतनू नायडूची मैत्री फुलत असतानाच शांतनूला भारत सोडावा लागला. शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत जावं लागलं. पण याने त्यांच्यात दुरावा येण्याऐवजी त्यांच्यामधील जवळीक आणखी वाढली.

योगायोग म्हणजे रतन टाटा यांनी जिथे शिक्षण घेतलं त्याच अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात शंतनू देखील शिकायला गेला होता.

या दरम्यानही शंतनू आणि रतन टाटा फोन आणि ईमेलच्या माध्यमातून एकमेकांसोबत कायम संपर्कात होते. शंतनूचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या पदवीदान समारंभाला‌ देखील रतन टाटांनी हजेरी लावली होती.

रतन टाटा ज्या कॉर्नेल विद्यापीठात शिकायला होते शंतनूनेदेखील त्याची पदवी याच विद्यापीठातून मिळवली.

फोटो स्रोत, Shantanu Naidu

फोटो कॅप्शन, रतन टाटा ज्या कॉर्नेल विद्यापीठात शिकायला होते शंतनूनेदेखील त्याची पदवी याच विद्यापीठातून मिळवली.

“एकदा फोनवर बोलत असताना मी सहज त्यांना पदवीदान समारंभाला या असं बोलून गेलो. ते हो म्हणाले. पण मला वाटलं की, ते इकडे खास पदवीदान समारंभासाठी येणं शक्यच नाही. पण ते खरंच आले. माझा तर सुरुवातीला विश्वासच बसला नाही,” असं शंतनू सांगत होता.

शिक्षण पूर्ण झाल्यावर शंतनू भारतात परत आला आणि रतन टाटांचा सहाय्यक म्हणून त्याने काम सुरू केलं. सोबतच मुंबईत एक प्राण्यांसाठी खास हॉस्पिटल बांधावं हे रतन टाटांच फार जुनं स्वप्न होतं.

शंतनूने या प्रकल्पावर देखील काम करायला लगेच सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीच हे हॉस्पिटल तयार होऊन त्याचं अनावरण देखील करण्यात आलं आहे.

या दोघांनाही एकमेकांचा सहवास रूचत असे. रतन टाटांसोबत काम करायला मिळणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती, असं शंतनू मानतो. तर शंतनूसारख्या तरूण तडफदार मुलांसोबत काम केल्यानं आपल्यालाही नवी उर्जा मिळते. उत्साही असण्याबरोबरच तितकाच संवेदनशील असलेल्या शंतनूसोबत काम केल्यानं मनाला समाधान मिळतं, असं रतन टाटा म्हणायचे.

मेहनती असण्याबरोबरच संवेदनशीलताही जपणाऱ्या अशा तरूणांची आज गरज आहे, असं रतन टाटांनी बीबीसीशी बोलताना अधोरेखित केलं होतं.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

कार्यालयात रतन टाटांचा सहाय्यक म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता हे आम्ही शंतनूला विचारलं.

यावर शंतनू म्हणाला की, “रतन टाटा हे कामाच्या बाबतीत अतिशय कठोर शिस्त पाळणारे होते. त्यांच्या कार्यालयात चालणाऱ्या बैठकीमधील मुद्दे मी वहीमध्ये नोंदवत असे आणि त्यांच्या आगामी नियोजनाची आखणी करत असे.

दिवस सुरू झाल्यानंतर त्या दिवशी कोणकोणती कामं करायची आहेत, याची यादी मी त्यांच्याशी बोलून बनवायचो आणि मग आम्ही दोघं मिळून एकेका कामाचा फडशा पाडायचो.

कामाच्या बाबतीत त्यांना हलगर्जीपणा अजिबात आवडत नव्हता. काम कितीही असलं तरी ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी ते मध्येच सोडून दिलं किंवा विश्रांती घेतली, असं मी कधी पाहिलं नाही.”

टाटा उद्योग समूहाव्यतिरिक्त रतन टाटा यांनी 73 भारतीय स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक केली होती. आज प्रचंड यशस्वी ठरलेल्या ओला कंपनीवर सुरूवातीला विश्वास दाखवलेल्या मोजक्या गुंतवणूकदारांपैकी रतन टाटा एक होते.

उद्योजक किंवा उद्योगाची क्षमता ओळखून तिला चालना देण्याची दूरदृष्टी रतन टाटा यांच्याकडे होती.

रतन टाटा आणि शंतनू

फोटो स्रोत, Getty Images

शंतनूच्या मदतीने रतन टाटा यांनी स्वतःचं इंस्टाग्राम खातं उघडलं होतं. आपल्या खाजगी आणि वैयक्तिक जीवनातील पैलू चाहत्यांसमोर ठेवण्याबरोबरच उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शनही ते इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट मधून द्यायचे.

आजची पिढी इंस्टाग्रामचा वापर नेमका कसा करते हे शंतनूनं रतन टाटांना शिकवलं. त्यामुळे तरूणपणीचे जुने फोटो ते गुरूवारी #ThrowbackThursday अशा हॅशटॅग वापरून टाकत असत.

त्यामुळं जवळजवळ 90 वर्षांचे होत आले, तरी तरुणांना देखील रतन टाटा हे आपल्यापैकीच एक वाटायचे. त्यांनी टाकलेल्या इंस्टाग्राम पोस्ट व ते वापरत असलेले कॅप्शन आणि हॅशटॅग प्रचंड गाजले.

चित्रपटांची आवडही होती सारखी

कार्यालयातील सहाय्यक असण्याबरोबरच हे दोघे अगदी घनिष्ट मित्र बनले होते.

शंतनू सांगतो की, दोघांनाही ॲक्शन कॉमेडी चित्रपट फार आवडायचे. द अदर गाईज आणि द लोन रेंजर सारख्या चित्रपटांचा ते सोबतीने अस्वद घेत असत.

नेटफ्लिक्स वरील फौदा ही इस्त्रायली लष्करावर आधारलेली सिरीज त्यांना फार आवडायची, असंही शंतनूने सांगितलं.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

ज्या मोटोपॉज प्रकल्पामुळे या दोघांची पहिल्यांदा भेट झाली त्या प्रकल्पाचा आता रोपट्यापासून वटवृक्ष झालेला आहे.

मुंबईत त्यांनी सुसज्ज असं खास प्राण्यांसाठी हॉस्पिटल तर उभारलंच आहे. शिवाय भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि बाहेरील देशांमध्ये या संघटनेचा त्यांनी विस्तार केलाय. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवली जाणारी ही सेवाभावी संस्था असली तरी तिची विस्तार अचंबित करणारा आहे.

“आमच्या दोघांमध्ये नातं इतकं घट्ट बनलं होतं की, कुठलीही गोष्ट मला खटकली अथवा मी नाराज असलो की मी पहिल्यांदा त्यांना फोन करत असे. ते सुद्धा त्यांना येणारी अडचण किंवा आनंदाचे क्षण मला आवर्जून सांगायचे.

रतन टाटा कायम माझ्या सोबतीने उभे राहिले आणि मला आशा आहे की, त्यांनाही माझा तितकाच आधार वाटला असेल,” असं शंतनू म्हणाला.

बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईमधील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.

रतन टाटांच्या जाण्याने मला अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणारा मार्गदशक गमावल्याची भावना शंतनू नायडूने व्यक्त केली.

“रतन टाटा यांच्या निधनाने मी एक अत्यंत जवळचा मित्र गमावला असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी भरून काढणं मला शक्य सहजासहजी होणार नाही,” अशा शब्दात शंतनूने आपलं दुःख व्यक्त केलं.

शंतनू आणि रतन टाटा यांच्यामधील या अनोख्या नात्यानं मैत्रीला कुठलंच बंधन नसतं, अगदी वयाचंही, हे जगाला दाखवून दिलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)