हरियाणाच्या निकालातून महाविकास आघाडी आणि महायुतीला काय संदेश मिळतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यामध्ये यशस्वी ठरली आहे.
भाजपने 48 जागांवर तर काँग्रेसने 37 जागांवर विजय मिळवला आहे. हरियाणामध्ये सत्ता स्थापनेसाठी 46 जागा आवश्यक ठरतात.
हरियाणामध्ये सलग दोनवेळा सरकार स्थापन केलेल्या भाजपला सत्तेतून पायउतार करण्यामध्ये काँग्रेसला यश मिळेल, अशाच स्वरुपाचे कल एक्झिट पोल्समधून समोर येत होते.
मात्र, आता हे एक्झिट पोल्स फोल ठरले असून, विजयाची खात्री असलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
भाजप तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्येही विधानसभेची निवडणूक होणार असून हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो?
विरोधातील वातावरण असताना हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टी ऐनवेळी मुसंडी मारु शकते का?
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये काय साम्य आहे? तिथे भाजपाने हातातून निसटून जाणारा विजय कशाप्रकारे खेचून आणला?
हरियाणाच्या निकालातून महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी काय बोध घेऊ शकते, याबाबत राजकीय विश्लेषकांशी चर्चा करुन केलेलं हे विश्लेषण...

फोटो स्रोत, X/DEVENDRA FADNAVIS
"भाजपविरोधी भावनेचा 'मोमेंटम' तुटला..."
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यात यश आल्यामुळे, भाजपविरोधी पक्षांना तरतरी आली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्येही काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. अगदी एक्झिट पोल्समधूनही त्याच प्रकारची आकडेवारी समोर आलेली होती.
हरियाणा राज्य स्वत:च्या ताब्यात घेण्याची संधी काँग्रेसला होती पण त्यांना अतिआत्मविश्वास नडला असल्याचं विधान ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी केलं.
बीबीसी मराठीशी बोलताना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी क्रिकेटमधील उदाहरण दिलं. ते म्हणाले की, "ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाच्या कितीही छायेत असला तरीही तो विरोधी संघाला किमान टिच्चून लढत देतोच देतो. त्याच प्रमाणे, आपल्या बाजूने कितीही कल असला तरीही भाजपासारख्या केंद्रात बसलेल्या मोठ्या पक्षाला कोणत्याही प्रकारे कमी लेखून चालणार नाही, ही महत्त्वाची बाब काँग्रेसने दुर्लक्षित केली. त्यांना आपला अतिआत्मविश्वास नडला असून महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही हाच धडा घेण्याची गरज आहे."
हरियाणामध्ये गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात लाट आहे आणि निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकेल असा अनेक जाणकारांचा दावा होता.
काँग्रेसला आपला अतिआत्मविश्वास नडला असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार उर्मीलेश यांनाही पटतं.
बीबीसी मराठीबरोबर बोलताना ते म्हणाले की, "हरियाणामध्ये असलेल्या अँटी-इन्कम्बन्सीच्या आधारावर कोणत्याही युती आणि पाठिंब्याशिवाय आपण जिंकू शकतो, हा काँग्रेसला असलेला अतिआत्मविश्वास त्यांना नडला आहे."
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही म्हटलं आहे की, या निवडणुकीतून मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे अती आत्मविश्वास बाळगता कामा नये. अर्थातच त्यांचा इशारा काँग्रेसकडेच होता.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या बाजूला 'एनडीटीव्ही'चे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारती यांनी हरियाणाच्या निकालाचं विश्लेषण करताना 'मोमेंटम' या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर केला.
लोकसभा निवडणुकीपासून भाजपविरोधाचा जो एक 'मोमेंटम' तयार झाला होता, तो या निवडणुकीमुळे तुटला असल्याचं विधान ते करतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर जर अपेक्षेप्रमाणे हरियाणामध्येही विजय मिळवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असती तर एक 'मोमेंटम' तयार झाला असता जो आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम करणारा ठरला असता. मात्र, तो 'मोमेंटम' आता तुटला असल्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होऊ शकतो."
एका बाजूला राजेंद्र साठे यांनी आपल्या विश्लेषणामध्ये भाजपला 'पराभवाच्या छायेतही चांगली कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघा'ची उपमा दिली तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार महेश सरलष्कर यांनी भाजपच्या यशाचं श्रेय त्यांच्या 'मायक्रो-मॅनेजमेंट'ला दिलं.


हरियाणा राज्य भाजपच्या हातातून निसटतंय की काय? असंच चित्र सर्व बाजूंनी रंगवलेले असताना निव्वळ आपल्या 'मायक्रो-मॅनेजमेंट'च्या जोरावर हा निसटता विजय खेचून आणण्यात भाजप यशस्वी ठरला असल्याचं महेश सरलष्कर सांगतात.
"हरियाणामध्ये भाजपाला मतदारसंघनिहाय 'मायक्रो-मॅनेजमेंट'ची रणनिती फायद्याची ठरली. भाजपाने अत्यंत चाणाक्षपणे ठिकठिकाणी अपक्ष उमेदवारही उभे केले होते. विनेश फोगाट ज्या जुलाना मतदारसंघातून उभी राहिली तिथे जाट समाजाचेच काही अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते. अशाच प्रकारची 'मायक्रो-स्ट्रॅटेजी' महाराष्ट्रातही भाजपाकडून निश्चितपणे राबवली जाऊ शकते", सरलष्कर म्हणतात.
महाराष्ट्रातील जागावाटपावर परिणाम होऊ शकतो का?
लोकसभा निवडणुकीमध्ये, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार केल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फुटल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती, असं म्हटलं गेलं. मात्र, वास्तवात लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा विचार केल्यास, तिन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक फायदा काँग्रेसलाच झाल्याचं दिसून येतं.
एकीकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या तर दुसरीकडे काँग्रेसला एका जागेवरुन 13 जागांवर मुसंडी मारता आली.
दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन तिन्ही पक्षांमधील मतमतांतरे लपून राहिलेली नाहीत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, हे मत उघडपणे मान्य करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष राजी नसल्याचं दिसून आलंय.
या पार्श्वभूमीवर, हरियाणाचा निकाल महाविकास आघाडीतील आगामी जागावाटपाच्या घडामोडींवर प्रभाव टाकणारा निश्चितच असू शकतो, असे मनोरंजन भारती यांना वाटते.
ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी हरियाणाचा निकाल ही एकप्रकारे चांगली गोष्ट ठरली आहे. आता महाविकास आघाडीमधील जागावाटपामध्ये काँग्रेसला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल."

फोटो स्रोत, Getty Images
महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आम्हीच आहोत, त्यामुळे दीडशे जागांवर आम्ही लढणार, अशा प्रकारचे दावे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून केले जाऊ शकतात, असा कयासही ते बांधतात.
हरियाणातील जाट आणि दलित-मुस्लीम मतांवर असलेली भिस्त, शेतकरी आंदोलन, कुस्तीगिरांचे आंदोलन, लोकसभेतील कामगिरीचा परिणाम या मुद्द्यांचा आपल्याला फायदाच होईल, ही काँग्रेसची गृहितके होती.
हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही मराठा आंदोलनाचा परिणाम, ओबीसींची मते आणि लोकसभा निवडणुकीचा मोमेंटम याबाबत विविध प्रकारची गृहितके मांडली जात आहेत.
मात्र, हरियाणात ज्या प्रकारे या गृहितकांना सुरुंग लावण्यात भाजपला यश आलंय, अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्रातही ते येऊ शकतंच, हे विसरुन चालणार नाही, असं मत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी मांडलं.
भाजपविरोधी मतांचं विभाजन करण्याची रणनिती
हरियाणामध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. इंडियन नॅशनल लोक दल आणि बहुजन समाज पार्टी तसेच जननायक जनता पार्टी आणि आझाद समाज पार्टी अशाही आघाड्या मैदानात उतरल्या होत्या.
एकूणच भाजपविरोधी मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन झाल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलंय. काँग्रेस वगळता भाजपविरोधातील या पक्षांनी तसेच अपक्षांनी मिळून एकूण 20.29 टक्के मते मिळवली असल्याचं निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. त्यामुळे, हे मतविभाजन थेट भाजपाच्याच पथ्यावर पडल्याचं दिसून येतंय.
यासंदर्भात बोलताना मनोरंजन भारती म्हणाले की, "राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत असलेल्या आपने तर विनेश फोगाटविरोधातही उमेदवार दिला होता. यातून काय संदेश जातो? ही कसल्या प्रकारची इंडिया आघाडी आहे? अँटी-इन्कम्बन्सीची मते इतक्या ठिकाणी विभाजित झाली आहेत की त्याचा थेट फटका काँग्रेसला बसला आहे. याच प्रमाणे, महाराष्ट्रातही तिसरी आघाडी काम करु शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. छत्तीसगढ, मध्य प्रदेशनंतर आता हरियाणातही त्याच चुका झाल्याने पुढची वेळ महाराष्ट्राची असणार का, असाच प्रश्न यातून उपस्थित होतो."
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याव्यतिरिक्त 'परिवर्तन महाशक्ती' या तिसऱ्या आघाडीने आकार घेतला आहे.
यामध्ये कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व प्रहारचे बच्चू कडू यांचा समावेश आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होणार आहे का, याबाबत अद्याप संदिग्धता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, अशा प्रकारच्या तिसऱ्या आघाडीचं अस्तित्व हा महाविकास आघाडीला धोका ठरु शकतो, असं मत राजेंद्र साठे व्यक्त करतात.
ते म्हणतात की, "हरियाणामध्ये काँग्रेसला बसलेल्या फटक्यामध्ये आपची भूमिका किती महत्त्वाची ठरली आहे, याचा खोलात जाऊन विचार करावा लागेल. निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांची झालेली सुटका मला रहस्यमयी वाटते. चंद्रशेखर आझाद आणि मायावतींची भूमिका भाजपाविरोधातील मतांच्या विभागणीसाठी पुरक ठरली आहे, असंच दिसतंय. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे मतांच्या विभागणीसाठीचे प्रयत्न केले जाऊ शकतात."
दुसऱ्या बाजूला, हरियाणामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपक्षांना उभे करण्याची खेळी भाजपकडून करण्यात आली असून तीच खेळी महाराष्ट्रातही राबवली जाऊ शकते, असे मत महेश सरलष्कर यांनी मांडले.
ते म्हणाले की, "भाजपने हरियाणामध्ये अत्यंत चाणाक्षपणे वेगवेगळ्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले. हरियाणातील एकूण अपक्षांची संख्या सुमारे 450 च्या आसपास होती. यातील सगळेच अपक्ष त्यांनी उभे केलेले नसले तरीही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उभे केलेल्या अपक्षांचा फटका काँग्रेसला निश्चितच बसला आहे. भाजपाने जर हीच रणनीती महाराष्ट्रात, विशेषत: मराठवाड्यामध्ये राबवली, तर मराठा आंदोलनाचा बसणारा फटका सौम्य करण्यात त्यांना यश मिळू शकतं."

फोटो स्रोत, ANI
हरियाणात काँग्रेसच्या पराभवामागे पक्षातील अंतर्गत गटबाजी हे देखील एक प्रमुख कारण आहे.
जाणकारांचं म्हणणं आहे की राज्यात काँग्रेस उमेदवारांमध्ये भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या गटाचे उमेदवार आणि कुमारी शैलजा यांच्या गटाचे उमेदवार अशी थेट विभागणी झाली होती.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षांअंतर्गत गटबाजी नसली तरीही महाविकास आघाडी हे तीन पक्षांचं त्रांगडं असल्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाणार नाही याची आणि एकमेकांच्या सन्मानाची काळजी घ्यावी लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर हरियाणाबाबत बोलायचे झाल्यास कुणाबरोबरही युती करण्यास दिलेला नकार हेदेखील काँग्रेसच्या पराभवाचे कारण आहे, असे उर्मीलेश यांना वाटते.
ते म्हणाले की, "काँग्रेस आम आदमी पार्टीबरोबर दिल्लीत युती करु इच्छिते; मात्र हरियाणामध्ये त्यांना दोन जागाही देऊ इच्छित नव्हती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने फक्त जाट समाज आणि हुडा कुटुंबालाच महत्त्व दिल्याचं दिसून आलं. यातून काँग्रेसला हाच बोध मिळतो की, महाराष्ट्रातही त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना यथोचित सन्मान आणि महत्त्व द्यावं लागेल. तसेच पक्षांतर्गत एकीही टिकवून ठेवावी लागेल."
जातनिहाय विश्लेषण आणि जातसमूहांचं संतुलन
हरियाणा आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये सर्वार्थाने वेगळी असली तरीही काही बाबतीत त्यांच्यामध्ये असलेलं साम्य विचारात घेण्याजोगं आहे. हरियाणामध्ये जाट तर महाराष्ट्रामध्ये मराठा हा समाज सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका वठवतो.
जाणकारांच्या मते, लोकसभा निवडणुकीत दलित मतं मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मिळाली होती. मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकीत ही मतं काँग्रेसपासून दुरावल्याचं दिसतं आहे.
मात्र, हरियाणामध्ये प्रामुख्यानं जाट समाजाच्या मतांवर भिस्त ठेवून असलेल्या काँग्रेसने दलित मतांना गृहित धरलं तर जाटेतर ओबीसींकडे दुर्लक्ष केलं; त्यामुळे ती मते भाजपाच्या पाठी गेली, असं विश्लेषण राजेंद्र साठे करतात.
निवडणूक जिंकण्याकरिता जातसमूहांचं योग्य संतुलन साधणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन करताना ते म्हणाले की, "हरियाणातील जाट आणि दलितांची सरसकट मते काँग्रेसला मिळाली असं गृहित धरलं तरीही ओबीसींसह छोटे-मोठे जातसमूह भाजपाच्या मागे गेल्याचं दिसतंय. निवडणुकीतील विजयासाठी एकाच जातसमूहावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या जातसमूहांचे संतुलन राखावं लागतं. हरियाणामध्ये सगळ्या समाजघटकांना काँग्रेस आपलीशी वाटली पाहिजे, याची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्यात ते कमी पडले आहेत. सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून ठिक असलं तरीही एकारलेल्या पद्धतीने जाऊन चालणार नाही, हा बोध महाविकास आघाडीला घेता येऊ शकतो."

फोटो स्रोत, Facebook/Narendra Modi
हरियाणात जवळपास 22 टक्के जाट मतं आहेत तर दलितांची मते 21 टक्के आहेत. हरियाणामध्ये जाट समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिल्याचं चित्र होतं तर महाराष्ट्रात मराठा समाज भाजपविरोधात जाईल, असं चित्र उभं केलं जातंय.
या पार्श्वभूमीवर बोलताना ज्येष्ठ पत्रकार उर्मीलेश म्हणाले की, "हरियाणामध्ये काँग्रेसने ओबीसी आणि दलितांना एकतर दुर्लक्ष केलंय वा गृहित धरलं आहे, त्याचाही फटका त्यांना बसला आहे. एकीकडे राहुल गांधी सामाजिक न्यायाची भाषा करत होते, तर दुसरीकडे हरियाणामधील काँग्रेस या दोन घटकांना दुर्लक्ष करत होती. महाराष्ट्र तर सामाजिक न्यायची भूमीच आहे, त्यामुळे तिथे काँग्रेससहित महाविकास आघाडीला ओबीसी, दलित, मुस्लिम अशा सर्वांनाच महत्त्व द्यावं लागेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











