तोंडातील बॅक्टेरिया आपल्याला अल्झायमरपासून वाचवू शकतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अन्ना वार्ले
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एखाद्या व्यक्तीचं मौखिक आरोग्य कसं आहे, यावरुन त्याच्या मेंदूचं आरोग्य कसं आहे, हेदेखील समजू शकतं.
तज्ज्ञांनी तोंडातील अशा काही बॅक्टेरियांचा शोध लावला आहे, जे वाढत्या वयासहित मेंदूमध्ये होत असलेल्या बदलांसाठी कारणीभूत ठरु शकतात.
एक्सेटर विद्यापीठाने यासंदर्भातील संशोधन केलं आहे. त्यांनी अशा बॅक्टेरियांचा शोध घेतला आहे, ज्यांचा संबंध हा थेट आपल्या चांगल्या स्मरणशक्तीशी आणि चेतनेशी जोडलेला आहे.
तर इतर काहींचा संबंध हा कमकुवत मेंदू आणि अल्झायमर रोगाशीही आहे.
या शोधनिबंधाच्या मुख्य लेखिका डॉ. जोआना एल ह्युरेक्स सांगतात, "तुम्हाला अल्झायमर होण्याआधी वा या रोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याआधीच आम्ही तुम्हाला अल्झायमर जीनबाबत सांगू शकतो."
सध्या तरी हे संशोधन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. मात्र, संशोधक यादृष्टीने अधिक सखोल अभ्यास करत आहेत. नायट्रेटने समृद्ध असलेल्या काही हिरव्या पालेभाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून बॅक्टेरियांची संख्या वाढवून मेंदूच्या आरोग्यावर परिणाम केला जाऊ शकतो का, यासंदर्भाने हे संशोधक अभ्यास करत आहेत.


मेंदूच्या आरोग्यासाठी नायट्रेट का महत्त्वाचं आहे?
या अभ्यासाच्या सहलेखिका प्राध्यापक एन. कार्बेट सांगतात, "आमच्या या संशोधनाचा अर्थ फारच सखोल आहे."
"काही बॅक्टेरिया मेंदूच्या आरोग्यासाठी सहाय्यक आहेत, तर काही नाहीत. या पार्श्वभूमीवर, उपचारांसाठी बॅक्टेरियामध्ये बदल करुन तोंडाच्या माध्यमातूनच डिमेन्शियादेखील रोखण्यात येऊ शकतो."
पुढे त्या सांगतात, "हे आहारामधील बदल, प्रोबायोटिक्स, तोंडाची स्वच्छता आणि टार्गेटेड उपचारांच्या माध्यमातूनच शक्य आहे"
या शोधामध्ये 50 वर्षांहून अधिक वयाच्या 115 लोकांना सामील करण्यात आलं आहे. या सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मेंदूच्या आरोग्याचं परीक्षण आधीच अन्य एका प्रकल्पासाठी करण्यात आलेलं होतं.

संशोधकांनी या सहभागींना दोन गटांमध्ये विभागलं होतं. एका गटामध्ये अशा लोकांना ठेवण्यात आलं होतं ज्यांना मेंदूशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती, तर दुसऱ्या गटात असेच लोक होते ज्यांना मेंदूशी निगडीत सौम्य समस्या होत्या.
दोन्हीही गटातील लोकांना गुळण्या करण्यासाठी सांगण्यात आलं आणि त्याचे नमुने गोळा करण्यात आले. त्यानंतर, यातून प्राप्त झालेल्या बॅक्टेरियांवर अभ्यास करण्यात आला.
विद्यापीठाने सांगितलं की, ज्या लोकांच्या तोंडामध्ये नायसीरिया आणि हेमोपिलस समूहातील बॅक्टेरिया मोठ्या संख्येनं सापडले त्यांची स्मरणशक्ती, सतर्कता आणि जटील कामं करण्याची क्षमता अधिक चांगली आढळून आली.
प्राध्यापक एन. कार्बेट सांगतात की, ज्यांना स्मरणशक्तीसंदर्भातील समस्या होत्या. त्यांच्यामध्ये पोर्फिरोमोनस बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक आढळून आलं.
बॅक्टेरियल समूह प्रीव्होटेला हा कमी नायट्रेटशी संबंधित आहे. हा बॅक्टेरिया अल्झायमरने पीडित असलेल्या लोकांमध्ये सामान्यत: आढळून येतो.
'हे' खाद्यपदार्थ कमी करु शकतात अल्झायमरचा धोका
डॉ. एल ह्युरेक्स सांगतात, "त्यामुळे, आम्ही लोकांना बीटरुट, पालक, हिरव्या पालेभाज्या, भरपूर सॅलड खाण्याचा आणि अल्कोहोल व अधिक साखर असलेले खाद्यपदार्थ कमी खाण्याचा सल्ला देऊ."
हिरव्या पालेभाज्या नायट्रेटच्या सर्वांत मोठ्या स्त्रोत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
विद्यापीठामध्ये रिसर्च आणि इम्पॅक्टच्या प्रो व्हाईस चान्सलर असलेल्या प्राध्यापक ऍनी वानहातालो सांगतात, "भविष्यात जेव्हा एखादा रुग्ण जनरल प्रॅक्टिसनरकडे येईल, तेव्हा त्याच्या तोंडातून सॅम्पल घेतलं जाऊ शकतं. जेणेकरुन, मिळणारे बॅक्टेरिया संभाव्य डिमेन्शिया अथवा अल्झायमरकडे निर्देश करतात का, हे आपण अभ्यास करुन ठरवू शकू."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











