फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका सर्वांनाच, सिगारेट ओढत नसलात तरी हे वाचाच

फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका सर्वांनाच, सिगारेट ओढत नसलात तरी हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

थांबा... फुप्फुसाचा कॅन्सर आणि त्याचा त्रास हे सगळं वाचण्याआधी याच महिन्यात घडलेली एक गोष्ट वाचू. ही घटना घडलीय आपल्याच देशात. दिल्लीत. एरव्ही आपण प्रदूषणाच्या भरपूर बातम्या वाचत असतो. कधीकधी बोलून जातो की आता याचं काही फारसं वाटत नाही, सवय झालीय... पण हीच सवय आपल्यासाठी घातक ठरत आहे. आपल्याबरोबर पुढच्या पिढ्यांसाठीही हे प्रदूषण कायमचं आघात करणारं ठरत आहे.

त्याचं झालं असं ब्रायन जॉन्सन हा तरुण उद्योजक अमेरिकेत असतो. तो एक प्रसिद्ध लेखक आणि त्याच्या आरोग्यविषयक कल्पनांसाठी प्रसिद्ध आहे.

साक्षात मृत्यूलाच आपल्यापासून दूर ठेवायचं, म्हातारपणच कसं येऊ द्यायचं नाही, स्ट्रोक्स-अल्झायमरसारख्या आजारांना कसं टाळायचं यावर तो काम करतो. त्याच्या कंपनीत यावर सतत अभ्यास, संशोधन सुरू असतं आणि थोड्याफार गोष्टी त्याच्या कंपनीने जगासमोर आणलेल्याही आहेत. इतकंच काय 'डोंट डाय' म्हणजे (असे तसे उगाच, फुकटात) 'मरू नका' हे त्यांचं ध्येयच आहे. डोंट डाय हे दोन शब्द घेऊनच तो जगतो. Don't Die: The Man Who Wants to Live Forever नावाने त्यांच्यावर नेटफ्लिक्सवर एक माहितीपटही आहे.

भरपूर व्यायाम करा, योग्य आहार आणि चांगली झोप ही त्रिसूत्री तो सगळीकडे म्हणून दाखवत असतोच पण भारतात आल्यावर मात्र त्याची ही गाडी अडखळली.

नक्की काय घडलं?

दिल्लीत एका मुलाखतीसाठी म्हणजे पॉडकास्टसाठीच्या गप्पा त्याला थांबवाव्या लागल्या. दिल्लीतलं प्रदूषण त्याला सहन होईना आणि बंद दरवाजाआड एअर प्युरिफायर लावलेले असताना आणि मास्क लावूनही त्याला बोलणं थांबवावं लागलं.

निखिल कामत यांच्या कार्यक्रमासाठी ब्रायन आले होते. पण वाईट हवेमुळे आपण पॉडकास्ट थांबवत आहोत असं त्यांना जाहीर करावं लागलं. इतकंच नाही तर ट्वीट करुन सगळी माहितीही त्यांनी प्रसिद्ध केली.

ब्रायन लिहितात, "आम्ही बोलत होतो त्या खोलीत एअर प्युरिफायर होता तरीही मला तो पुरेसा वाटत नव्हता. तिथंली प्रदूषणाची पातळी 130 होती हे म्हणजे 24 तासांमध्ये 3.4 सिगारेट ओढल्यासारखं आहे. हा माझा भारतातला तिसरा दिवस होता आणि प्रदुषणामुळे माझी त्वचा तडतडायला लागली आणि मग पुरळच आलं, डोळे आणि घशात जळजळू लागलं."

ब्रायन जॉन्सन Bryan Johnson Dont Die

फोटो स्रोत, X/@bryan_johnson

फोटो कॅप्शन, ब्रायन जॉन्सन

ते पुढे म्हणतात, "हवेचं प्रदूषण भारतात इतकं सहज होऊन गेलंय की त्याचे दुष्परिणाम माहिती असूनही लोक त्याला गांभीर्यानं घेत नाहीयेत. लोक याच प्रदूषित हवेत हिंडत आहेत. लहान मुलं, बाळंही प्रदूषणातच आहेत. मास्कमुळे याचा धोका कमी होऊ शकतो हे माहिती असूनही ते कोणी वापरत नाही. हे सगळं गोंधळात टाकणारं आहे. सर्व प्रकारच्या कॅन्सरवर मात करण्यापेक्षा भारतानं हवेची गुणवत्ता सुधारली तर लोकांचं आरोग्य जास्त सुधारेल याचे पुरावे आहेत. पण तरीही भारतातल्या नेत्यांना ही गंभीर स्थिती वाटत नाही."

आता हे आपल्यासाठी तिऱ्हाईत असलेल्या माणसानं लिहिलेलं आपण कसं पचवायचं आपल्यावर आहे. काही लोकांना वाटेल की या परदेशातल्या लोकांना स्वच्छ हवेचीच सवय असते, जरा गैरसोय चालत नाही. (यामध्ये आपण प्रदूषित हवेत जगत आहोत याची कबुलीच दिली जाते). काही लोकांना वाटतं हे लोक नाजूक असतात, या जगात कणखर राहायचं असेल तर वाईटात वाईट स्थितीच स्वय पाहिजे. (यावेळेसही आपण दररोज प्रदूषित हवेत राहात असतो याकडे दुर्लक्ष करतो.)

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता ब्रायन यांच्या अनुभवाला थोडं बाजूला ठेवू आणि आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे पाहू. काही वर्षांपूर्वीपर्यंत दिल्लीच्या प्रदूषणाच्या बातम्या आपल्याकडे येत होत्या. दिल्लीत हवेची गुणवत्ता घसरली वगैरे.... पण आता हे प्रदूषण भारतातल्या सगळ्या मोठ्या, लहान शहरांमध्ये आणि अगदी ग्रामिण भागाच्या वेशीपर्यंत पोहोचलं आहे.

भरपूर वाहनं, बांधकामं, सततचे उकरलेले रस्ते, मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी करताना उडणारी धूळ, कबुतरांसारखे भीतीदायक गतीने वाढलेले पक्षी अशा अनेक कारणांमुळे सर्वच शहरांतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. याला मुंबईसारखं बेटावरचं शहरही अपवाद नाही.

आपल्या आजूबाजूला किती धूळ आणि प्रदूषण वाढलंय हे पाहाण्यासाठी खरंतर कोणत्याच संशोधनाच्या अहवालाची गरज नाही.

रस्त्यावर लावलेली वाहनं, घरातल्या वस्तू यांच्यावर बसलेली धूळ, घरातून बाहेर पडल्यावर धुरक्यासारखी स्थिती, कबुतरांचे वाढते थवे आणि त्यांच्या विष्ठेची-पिसांची पडलेली घाण, आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये सर्दी-खोकल्याचे वाढलेले रुग्ण आपल्याला बरंच काही सांगून जातात. इतकंच नाही घसा खवखवणे, सर्दी, डोळे लाल होणे, सतत आजारी पडणं याचं प्रमाणही वाढलेलं आहे.

सिगारेट ओढत नसलात तरीही...

आता आपण येऊ मुख्य विषयाकडे. तो म्हणजे कॅन्सर. फुप्फुसाचा कॅन्सर हा फक्त सिगारेट किंवा तंबाखू ओढणाऱ्या, खाणाऱ्या लोकांनाच होतो अशी भ्रामक कल्पना बाळगली जाते.

पण त्याची अनेक कारणं आहेत. याच फेब्रुवारी महिन्यात ब्रायन जॉन्सन यांच्या धक्कादायक अनुभवाबरोबर एक मोठी माहिती प्रसिद्ध झाली आहे.

फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका सर्वांनाच, सिगारेट ओढत नसलात तरी हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images

4 फेब्रुवारी हा दिवस कर्करोगाप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. या दिवशी लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल या ख्यातनाम आरोग्यपत्रिकेनं एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे.

फुप्फुसाचा कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या अडेनोकर्किनोमा या घटकाचं प्रमाण हवेच्या प्रदुषणामुळे वाढत आहे. सिगारेट न ओढणाऱ्या 53 ते 70 % रुग्णांमध्ये याचा संबंध असल्याचं 2022 साली जगभरात फुप्फुसाच्या कॅन्सर रुग्णांच्या तपासणीत आढळलं आहे.

या घटकाचा फुप्फुसाच्या इतर कॅन्सर प्रकारांप्रमाणे सिगारेटशी फार कमी संबंध असून त्याच्या वाढीला हवेचं प्रदूषण कारणीभूत आहे असं लॅन्सेटनं म्हटलं आहे.

भारतीय लोकांसाठी ब्रायन जॉन्सन आणि लॅन्सेटचा अहवाल एकाच आठवड्यात प्रसिद्ध होणं ही चिंतेची गोष्ट आहेच त्याहून खडबडून जागं व्हायला लावणारी आहे.

lung cancer फुप्फुस कर्करोग

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात कॅन्सरमुळे जेवढे मृत्यू होतात, त्यात सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतात.

जागतिक आरोग्य संघटनेने फुफ्फुसाच्या कॅन्सरची खालील लक्षणं सांगितली आहेत.

  • सततचा खोकला
  • छातीत दुखणं
  • धाप लागणं
  • खोकल्यातून रक्त पडणं
  • थकवा
  • कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं
  • छातीत सतत कफ होणं

डॉक्टर काय सांगतात?

आता आपण डॉक्टरांचं याबद्दल काय म्हणणं आहे ते पाहू. आपल्या फुप्फुसांवर हवेच्या प्रदुषणाचा कसा परिणाम होतो असा प्रश्न आम्ही मिरा रोड इथल्या वोकहार्ट हॉस्पिटलच्या डॉ. तिरथराम कौशिक यांना विचारला. डॉ. कौशिक हे कर्करोगतज्ज्ञ आहेत.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

ते म्हणाले, "प्रदुषणाचा आपल्या फुप्फुसावर फार मोठा परिणाम होतो. जर हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर हवेतली विषद्रव्यं आणि प्रदूषकांचे बारीक घटक आपल्या फुप्फुसात जातात. यामुळे फुप्फुसात इन्फ्लमेशन म्हणजे दाह होतो. त्याच्या रोजच्या कामावर परिणाम होतो. मग दमा, ब्राँकायटिस आणि कॅन्सरसारखे त्रास होतात. दीर्घकाळ प्रदुषित हवेत राहिल्यावर फुप्फुसंही दुर्बल होण्याचा धोका वाढतो आणि पर्यायानं कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणं गरजेचं आहे, बाहेर जावं लागलं तर मास्क वापरणं गरजेचं आहे."

डॉ. कौशिक सांगतात, "धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुप्फुसाच्या कॅन्सरचं नक्की किती प्रमाण आहे याचा निश्चित आकडा सांगणं कठीण आहे. पण सिगारेट न ओढणाऱ्यांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण वाढतंय हे दिसतंय. आता हे प्रमाण 20 ते 30 टक्के इतकं आहे. भविष्यात ते आणखी वाढण्याची भीती आहे."

वायू प्रदूषण टाळा असा संदेश देणारं चित्र

फोटो स्रोत, Getty Images

हेच प्रश्न आम्ही कोलकाताजवळ धाकुरिया इथं असलेल्या मणिपाल रुग्णालयातल्या डॉ. सुरंजन मुखर्जी यांना विचारला.

डॉ. सुरंजन मुखर्जी हे श्वसनाचे आजार आणि फुप्फुसासंबंधी आजारांवर उपचार करतात.

ते म्हणतात, "भारत आणि आग्नेय आशियातल्या देशांमध्ये सिगारेट न ओढणाऱ्या लोकांमध्ये फुप्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. याला अनेक कारणं असू शकतात. जसं की जनुकीय कारणं, जीवाश्म इंधनाचं ज्वलन तसेच प्रदूषण हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कोळसा, लाकूड किंवा इतर इंधनाच्या ज्वलनामुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे धूम्रपानाइतकाच त्रास होऊ शकतो."

धुळीत खेळणारी मुलं

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. मुखर्जी सांगतात, "प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न होण्याची गरज असले तरी काही उपाय आपण करू शकतो. प्रदूषित हवेत जाताना मास्क वापरणे किंवा ज्या लोकांना आधीपासूनच फुप्फुसाचे आजार आहेत त्यांनी एन्फ्लुएन्झा आणि न्यूमोनिया होऊ नये यासाठी लसीकरण करुन घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून घरात खेळती हवा राहाणं आणि घरातील स्वयंपाक करताना होणारा धूर व इतर प्रदूषित घटक कमी करायला हवेत. मुलांसाठी एअर प्युरिफायरचीही मोठी मदत होऊ शकते."

याशिवाय चांगली जीवनशैली बाळगणं गरजेचं आहे. अर्थात त्यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर पूर्णपणे रोखता येईल असे नाही. पण नियमित व्यायामामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते. त्यातला दाह कमी होतो.

ताजी फळे, चांगला चौरस आहार घेतल्यामुळे अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ती प्रदूषकांशी लढायला मदत करतात. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात झोपही आवश्यक आहे. असे जीवनशैलीतले बदल आणि आरोग्याबाबतीत काही शंका आल्यास तपासणी करुन घेणंही गरजेचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)