'मी कधीच सिगरेट ओढली नसताना मला कॅन्सर कसा झाला?', जाणून घ्या फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल सर्वकाही

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
“मी माझ्या आयुष्यात कधीही सिगरेट ओढली नाही. माझा मित्र गेल्या 40 वर्षांपासून सिगरेट ओढतोय, मग मलाच कसा कॅन्सर झाला?”
एक गृहिणी, जिने आयुष्यात कधी तंबाखू, किंवा सिगरेट अशी नावं सुद्धा घेतली नाहीत, तिला फुफ्फुसांचा कॅन्सर कसा होऊ शकतो?
अपोलो हॉस्पिटलमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सरतज्ज्ञ) असणाऱ्या डॉ. अंबरिश चॅटर्जी यांना अनेकदा अशा प्रश्नांचा सामना करावा लागतो.
“धुम्रपान हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं सर्वात मोठं कारण असलं, आणि या कॅन्सरचे 80 टक्के पेशंट हे धुम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करणारे असले तरी 20 टक्के पेशंट असे आहेत ज्यांनी कधीही धुम्रपान केलेलं नाही, हे सत्य आहे.”
त्यामुळे एखादी अशी व्यक्ती जिने कधीही धुम्रपान केलेलं नाही, तंखाबूजन्य पदार्थांचं सेवन केलेलं नाही, अतिप्रदुषित वातावरणात राहिली नाही, अॅस्बेस्टॉसशी कधी संबंध आलेला नाही किंवा खाणीत काम केलेलं नाही, तिलाही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.
कसा? त्याकडे येऊच.
नोव्हेंबर महिन्यात फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जगभरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. त्या निमित्ताने फुफ्फुसाच्या कॅन्सरविषयी सर्वकाही जाणून घ्या.
फुफ्फुसं कशी काम करतात? कॅन्सरचा त्यांच्यावर काय परिणाम होतो?
फुफ्फुसं आपल्या श्वसनसंस्थेचा भाग आहेत. ते शरीरात फिल्टर म्हणून काम करतात. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेत असलेला नायट्रोजन, कार्बनडाय ऑक्साईडही आपल्या शरीरात जातात. आपल्या शरीराला फक्त ऑक्सिजनची गरज असते.
फुफ्फुसं हा ऑक्सिजन फिल्टर करतात, शरीरात पुढे पाठवतात आणि इतर वायू बाहेर काढतात.
याचाच अर्थ फुफ्फुसांतल्या पेशी सतत चोवीस तास काम करत असतात. त्यांना इजा जरी झाली तरी स्वतःच बऱ्या होतात.
“पण जेव्हा बाहेरचे काही फॅक्टर, जसं की धुम्रपानामुळे शरीरात जाणारे केमिकल्स, फुफ्फुसांच्या पेशींना इजा करतात, आणि हे सतत होत रहातं, तेव्हा शरीराची फुफ्फुसाच्या पेशी आपोआप बरी करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. मग त्या पेशी म्युटेट होतात, म्हणजे त्यांचं स्वरूप बदलतं आणि त्या मॅलिग्नंट (कॅन्सर असलेल्या) बनतात. या पेशी आपल्या श्वासोच्छावासावर परिणाम करतात. आणि हळूहळू कॅन्सर पसरत जातो,” डॉ. चॅटर्जी माहिती देतात.
फुफ्फुसाच्या कॅन्सरची कारणं
दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या वेबसाईटवर फुफ्फुसाच्या कॅन्सरची खालील कारणं दिली आहेत.
तंबाखूचे धुम्रपान
भारतात तंबाखूचे धुम्रपान (सिगरेट, बिडी, हुक्का) हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे सर्वात मोठे कारण आहे.
धुम्रपानामुळे शरीरात अशी केमिकल्स जातात ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होतात.
तंबाखूचे धुम्रपान केलं नाही, आणि नुसतंच सेवन केलं (जसं की तंबाखू चघळणे) तरी कॅन्सरचा धोका आहे.
फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका फक्त धुम्रपान करणाऱ्या लोकांना नाही, तर त्या धुरात श्वास घेणाऱ्यांनाही आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यूकेच्या कॅन्सर रिसर्च सेंटरचे प्रमुख चार्ल्स स्वँटन बीबीसीशी बोलताना म्हणतात, "बीबीसीशी बोलताना म्हणतात, “धुम्रपान न करणाऱ्यांना होणारा फुफ्फुसाचा कॅन्सर ही साधी गोष्ट नाहीये. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी 5-10 टक्के पेशंट असे पाहिलेत ज्यांनी कधीही धुम्रपान केलेलं नाही.”
वायू प्रदूषण
भारतात वायू प्रदूषण ही मोठी समस्या आहे. राजधानी दिल्लीसह अनेक मोठी शहरं वायू प्रदूषणाशी झुंजताना दिसतात.
कोळशाचा किंवा लाकडाचा धूर, कारखान्यांमधून निघणारा धूर, वाहनांमधून उत्सर्जित होणारे वायू आणि PM2.5 कणांमुळे फुफ्फुसाच्या पेशींना इजा पोचते आणि कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
डॉ एसव्हीएस देव दिल्लीच्या ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते म्हणतात, “जरी तंबाखू आणि धुम्रपान फुफ्फुसांच्या कॅन्सरचं सर्वात मोठं कारण असलं तरी वायू प्रदूषणामुळे धुम्रपान न करणाऱ्यांही धोका वाढला आहे.”
रॅडॉन वायूमुळेही फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यता वाढते. हा वायू एका विशिष्ट प्रकारच्या मातीवर बांधलेल्या घरांमध्ये साठून राहातो.
कामामुळे होणारा त्रास
कामाच्या ठिकाणी हानिकारक गोष्टी श्वासाव्दारे शरीरात जाणं हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. अॅस्बेस्टॉस खाणीत काम करणं, किंवा काही विशिष्ट रासायनिक कारखान्यांमध्ये काम केल्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
जनुकीय बदल
जनुकीय बदल हेही कॅन्सरचं एक कारण आहे. कधी कधी कुटुंबात कोणाला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्यास ती जनुक जन्मतः काही व्यक्तींमध्ये येतात. अशात कॅन्सरचा धोका वाढतो.
दुसरं म्हणजे कधी कधी इतर कारणांमुळे जनुकीय बदल होतात. ही कारणं नक्की कोणती यावर अजून तज्ज्ञांचं संशोधन सुरू आहे.
डॉ.चॅटर्जी म्हणतात, “धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये जो फुफ्फुसाचा कॅन्सर आढळून आलाय, तो बहुतांश वेळा जनुकीय बदलांमुळे झालेला आढळून येतो.”
फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात कॅन्सरमुळे जेवढे मृत्यू होतात, त्यात सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतात.
जागतिक आरोग्य संघटनेने फुफ्फुसाच्या कॅन्सरची खालील लक्षणं सांगितली आहेत.
- सततचा खोकला
- छातीत दुखणं
- धाप लागणं
- खोकल्यातून रक्त पडणं
- थकवा
- कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं
- छातीत सतत कफ होणं
‘साधा सर्दी खोकलाच तर आहे!’ असं म्हणून या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होऊ शकतं.
फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे मृत्यूच का?
डॉ अंबरिश चॅटर्जी म्हणतात, “फुफ्फुसं शरीरातल्या महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. किडनी, हृदय, फुफ्फुसं असे महत्वाचे अवयव जोवर 60-70 टक्के खराब होत नाहीत तोवर शरीर लक्षणं दाखवत नाही. शरीराची रचनाच तशी आहे. त्यामुळे दुर्दैवाने बऱ्याच केसेसमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरच निदान फार उशिरा होतं. तोवर कॅन्सरची अॅडव्हान्स स्टेज आलेली असते.”

फोटो स्रोत, SPL
ते पुढे म्हणतात, “लक्षणं दिसून जे पेशंट तपासणीसाठी येतात त्यापैकी फक्त 15-20 टक्के केसेसमध्ये ऑपरेशन करून ट्युमर काढता येऊ शकतो. इतर केसेसमध्ये नाही. ऑपरेशन फक्त प्राथमिक स्टेजमध्ये कॅन्सर असला तरच करता येतं.”
लॅन्सेट या वैद्यकीय विषयाला समर्पित असलेल्या नियतकालिका प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटलंय की 2020 मध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर हा जगातल्या सगळ्या कॅन्सर निदानांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता पण सर्वाधिक कॅन्सरशी संबंधित मृत्यू या प्रकारच्या कॅन्सरमुळे झाले.
या संशोधनानुसार 2020 मध्ये दरवर्षी जगभरात 22 लाखांहून अधिक लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होत असल्याचं समोर आलं होतं, म्हणजे एकूण कॅन्सर निदानांपैकी 11.6 टक्के लोकांना हा कॅन्सर होता.
पण या कॅन्सरमुळे जवळपास 18 लाख मृत्यू होत होते, म्हणजे एकूण कॅन्सर संबंधित मृत्यूंपैकी 18 टक्के फक्त फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होत होते.
भारतात दरवर्षी जवळपास 72 हजारांहून अधिक लोकांना या प्रकारचा कॅन्सर होतो तर 66 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

फोटो स्रोत, Getty Images
पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात फुफ्फुसाचा कॅन्सर जवळपास 10 वर्षं आधी होत असल्याचं अभ्यासाअंती दिसून आलेलं आहे.
भारतात धुम्रपान न करणाऱ्यांमध्येही या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे.
अभ्यासातून असंही समोर आलंय की भारतासह दक्षिणपूर्व आशियायी देशांत जितक्या महिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय त्यापैकी 83 टक्के महिलांनी कधीही धुम्रपान केलेलं नव्हतं पण तरीही त्यांना हा कॅन्सर झाला.
या कॅन्सरपासून कसं वाचता येईल?
जागतिक आरोग्य संघटना, जगभरातले डॉक्टर्स यांचं एकमत आहे की जर फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर कोणत्याही प्रकारचं धुम्रपान किंवा तंबाखूचं सेवन पूर्णपणे थांबवायला हवं.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या साईटवर म्हटलंय की सेकंडहॅण्ड स्मोक (इतरांच्या धुम्रपानाच्या धुरात श्वास घेणं) पूर्णपणे थांबवयला हवं.
तसंच प्रदूषण, अॅस्बेस्टॉस, गाड्यांमधून निघणारा धूर यापासून लांब रहायला हवं.
आर्सेनिक, विशिष्ट प्रकारची सिलिका आणि क्रोमियमपासून स्वतःचा बचाव करायला हवा.
तसंच आपल्या घरातली रॅडॉन वायूची पातळी तपासायला हवी.
जनुकीय बदलांमुळे किंवा फॅमिली हिस्ट्रीमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी वेगळं काही करता आलं नाही तरी जर घरात आधी कोणाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाला असेल तर डॉक्टरांशी बोलून पुढे काय करता येईल, कशी काळजी घेता येईल ते ठरवावं.
ज्यांनी कधीही धुम्रपान केलं नाही अशांनाही जनुकीय बदलांमुळे कॅन्सर होऊ शकतो अशात त्या जनुकीय बदलांना रोखणारे काही उपचार काही प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेता येऊ शकतो.
त्याचप्रमाणे रोजच्या आयुष्यातही बदल गरजेचे आहेत.
डॉ चॅटर्जी म्हणतात, “संतुलित आहात, वजन नियंत्रणात ठेवणं, व्यायाम आणि स्ट्रेस फ्री आयुष्य जगल्याने कॅन्सरचा धोका कमी होतं. हे ऐकायला जरी सरधोपट वाटलं तरी आरोग्यदायी जीवनशैलीमुळे अँटीऑक्सिडन्टस तयार होतात जे शरीरातल्या फ्री रॅडिकल्सवर नियंत्रण ठेवतात. हे फ्री रॅडिकल्सच कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत ठरतात.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











