नैसर्गिक, अनुवांशिकता की आणखी काही, सध्या कमी वयात केस पांढरे का होत आहेत?

- Author, सुमिरन प्रीत कौर
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
तुम्ही डोक्यावरच्या 'त्या' पांढऱ्या केसांकडे आरशात किती वेळा बघता? सध्या अनेकांचे केस कमी वयात पांढरे होत आहेत. पण असं का घडतंय?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुलांमध्ये म्हणजे 14-15 वर्षांच्या मुलांमध्येही केस पांढरे होण्याची समस्या दिसतेय. यावर संशोधनही केलं जात आहे.
वेगवेगळ्या देशांनुसार, केस पांढरे होण्याचं वयही वेगवेगळं आहे. म्हणजे जगभरात केस पांढरे होण्याचं सरासरी वय त्या ठिकाणावर अवलंबून आहे.
डॉक्टरांच्या मते, केस पांढरे होणं याला कॅनिटी असं म्हणतात. जर केस कमी वयात पांढरे झाले तर त्याला प्रिमॅच्युअर कॅनिटी किंवा केस लवकर पांढरे होणं असं म्हणता येऊ शकतं.
ज्यांचे केस काळे किंवा तपकिरी आहेत त्यांच्यात हा बदल लवकर दिसून येतो. याचं कारण शोधण्यासाठी भारतात आणि इतर देशांमध्ये संशोधन केलं जातंय.


केसांना रंग येतो कसा आणि तो जातो कसा?
मेलेनिन हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो मानव आणि प्राण्यांमध्ये त्वचा, केस आणि डोळ्यांचे रंग ठरवतो. मेलॅनिन मेलेनोसाइट पेशींद्वारे तयार होतं.
मेलेनोसाइट स्टेम पेशींपासून नवीन मेलेनोसाइट्स तयार होतात. या पेशी डोक्याच्या त्वचेत, टाळूच्या खाली, केसांच्या टोकाला, हेअर फॉलीकलमध्ये आढळतात.
जसजसं आपलं वय वाढतं, मेलेनोसाइट्स कमी सक्रिय होतात, केसांचं चक्र मंदावतं आणि कमी मेलेनिन तयार होतं. मग केस कोणत्याही रंगाशिवाय वाढायला सुरुवात होते आणि ते पारदर्शक होतात. म्हणजेच ते पांढरे किंवा राखाडी होतात. आणि ठराविक वयानंतर रंगद्रव्य परत येणं थांबतं.
केसांचा रंग बदलण्याची प्रमुख कारणं
- पहिलं आणि नैसर्गिक कारण म्हणजे वृद्धत्वं.
- दुसरं कारण अनुवंशिकता. म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणाचे केस लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस लवकर पांढरे होऊ शकतात.
- हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या शोधनिबंधांनुसार, थायरॉईड, त्वचारोग आणि अलोपेशिया एरिटा अशा आजारांमुळेही केस पांढरे होतात.
- इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि लेप्रोलॉजिस्ट यांच्या मते, केस पांढरे होण्याची इतरही अनेक कारणं आहेत. तुम्ही कॅन्सरच्या उपचारासाठी किमोथेरपी घेत असाल, एचआयव्ही बाधित असाल, सिस्टिक फायब्रोसिस सारखे तुम्हाला आजार असतील तरी केस लवकर पांढरे होतात.
हार्मोन्सचं संतुलन बिघडलं असेल, तर त्यामुळेही केस पांढरे होतात. किंवा जर तुम्ही काही औषधं घेत असाल हेही एक कारण ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
जीवनशैली आणि तणावाचा किती परिणाम?
दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे त्वचा तज्ज्ञ डॉ. डी.एम. महाजन यांच्या मते, प्रदूषण, अल्ट्राव्हायलेट किरण आणि रेडिएशन हे देखील केस पांढरे होण्याचं कारण आहे.
याशिवाय धुम्रपान आणि अल्कोहोलच्या सेवनामुळेही तुमचे केस पांढरे होऊ शकतात. सोबतच प्रथिने, लोह आणि तांबं, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि झिंकच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होतात.

फोटो स्रोत, Getty Images
हार्वर्डमधील एका अभ्यासानुसार - तणावामुळे केसांचा रंग बदलत नसला तरी त्यामुळे केस पांढरे होण्यासाठी वातावरण निर्मिती होते.
डॉ. महाजन यांच्या मते, काही प्रकरणांमध्ये, केस पांढरे होण्याची ही प्रक्रिया तुम्ही थांबवू शकत नसाल, तर तुम्ही ती कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.
संतुलित आहार घेऊन तुम्ही हे कमी करू शकता, धूम्रपान करू नका आणि केसांवर रसायनांचा कमी वापर करा. आणि हो टेन्शन घेऊ नका. कारण सध्या सॉल्ट अँड पेपरम्हणजे पांढरे केस राखण्याची सुद्धा एक फॅशन आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











