नखं आरोग्याबाबत काय काय सांगतात? रंग, आकारातील बदलांसाठी घ्यायला हवा डॉक्टरांचा सल्ला

हाताची बोटं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जास्मिन फॉक्स-स्केली

हाताच्या किंवा पायाच्या बोटांना असलेल्या नखांमुळे त्याखाली असलेल्या त्वचेचा जखमेपासून बचाव होतो. तुम्हाला अंग खाजवायचं असेल किंवा एखादं फळ सोलायचं असेल तर तेव्हासुद्धा नखं उपयुक्त ठरतात.

मात्र नखं फक्त काम करतानाच उपयोगाची नसतात, तर याच नखांमध्ये तुमच्या आरोग्याचं प्रतिबिंब देखील उमटत असतं.

नखं तुमच्या आरोग्याबद्दल नेमकं काय सांगतात?

तुमच्या नखांवरून तुमच्या आरोग्याबद्दल काय जाणून घ्यायचं याबद्दल लोकज्ञानाची कमतरता नाही. उदाहरणार्थ नखांवर दिसणारे पांढरे ठिपके किंवा ल्युकोनिचिया (leukonychia).

टीप: या लेखात असलेली माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. ही माहिती म्हणजे डॉक्टर किंवा वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला पर्याय नाही. हा वैद्यकीय सल्ला नाही. या लेखातील माहितीच्या आधारे एखाद्या वाचकानं कोणतंही निदान केल्यास बीबीसी त्यासाठी जबाबदार असणार नाही. त्याचबरोबर या लेखात दिसत असलेल्या इतर वेबसाईट्सवरील माहितीसाठीदेखील बीबीसी जबाबदार असणार नाही. या प्रकारच्या वेबसाईट्सवर दिसणारी कोणतीही जाहिरात किंवा उल्लेख करण्यात आलेली सेवा किंवा सल्ला याचं समर्थन बीबीसी करत नाही. तुमच्या आरोग्यासंदर्भात नेहमीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.

ल्युकोनिचियाचे ठिपके नखांवर दिसले म्हणजे शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. मात्र यामध्ये खरोखरंच काही तथ्य आहे का?

सुरुवातीला शरीररचनेबद्दल काही मूलभूत मुद्दे लक्षात घेऊया. नखं ही त्वचेचाच विस्तार असतात. ती केराटिनपासून बनलेली असतात. हे एक प्रकारचं कठीण असं प्रथिन किंवा प्रोटीन असतं.

ते बोटांना आणि बोटाच्या वरच्या भागाचं दुखापतीपासून बचाव करतं. नखाच्या तळाशी जो अर्धचंद्राकृती आकार दिसतो त्याला लुनुला (lunula) म्हणतात. तो भाग नखाच्या "वाढीचं केंद्र" म्हणून काम करतो.

त्यातून पेशींची निर्मिती होते आणि त्या पेशी कडक होत त्याचं रुपांतर नखात होतं. हे केंद्र क्युटिकलच्या वर असतं. क्युटिकल म्हणजे नखाच्या तळाचा भाग त्वचेला जोडणारा मृतपेशींचा थर असतो.

प्रतिकात्मक छायाचित्र

क्युटिकल नखांना अधिक संरक्षण पुरवतं. ते नखांमध्ये किंवा नखांच्या अवतीभोवती जिवाणू, बुरशी आणि इतर जंतूंचा प्रादूर्भाव होण्यापासून रोखतं.

नखं ही डॉक्टरांसाठी तुमच्या आरोग्याच्या माहिती देणाऱ्या खिडक्या असू शकतात. डॉक्टर्स नखांचं निरीक्षण करून विविध गोष्टींचं निदान करू शकतात.

त्वचारोगापासून ते मूत्रपिंडाचा आजार आणि अगदी ऑटोइम्युन आजारांपर्यत आरोग्याच्या सर्व प्रकारच्या समस्यांचं निदान डॉक्टर नखांच्या निरीक्षणातून करू शकतात.

गंभीर बाबींची लक्षणं समजू शकतात

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"मी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेल्या सुरुवातीच्या गोष्टींपैकी एक म्हणजे क्लबिंग नावाची जागा शोधणं. तिथे नख आणि नखाच्या तळाशी असलेला कोन कमी होत जातो," असं डॅन बॉमगार्ट म्हणतात. ते एक डॉक्टर आहेत. तसंच ब्रिस्टॉल विद्यापीठात न्युरो सायन्स आणि शरीरविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

क्लबिंग म्हणजे नखं गोलाकार होणं, फुगणं हे शरीरात ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी झाली असल्याचं लक्षण आहे. अनेकदा याचा संबंध फुफ्फुसाच्या कर्करोगाशी असतो. तसंच क्लबिंगमुळे आरोग्याच्या इतर समस्यांबरोबरच ह्रदयाच्या झडपा आणि कप्प्यांच्या अस्तरांना झालेल्या संसर्गदेखील लक्षात येतो.

इतर आजारांमध्ये सेलिअॅक रोग, यकृताचा आजार किंवा सायरोसिस आणि फुफ्फुसांना झालेल्या संसर्गाचा समावेश आहे.

"जर रुग्णांमध्ये क्लबिंग आढळलं तर त्या रुग्णाचा तातडीनं एक्स-रे काढला पाहिजे. कारण त्या रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असल्याची शक्यता असते. त्याबद्दल एक्स-रे मधून स्पष्ट होऊ शकतं," असं बॉमगार्ट म्हणतात.

"आपण वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरुवातीलाच शिकलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट असली, तरी ते तसं का आहे हे मला माहिती नाही. कारण, मी गेल्या 14 वर्षांपासून डॉक्टर आहे आणि इतक्या वर्षांमध्ये मी तसं फक्त एकदाच पाहिलं आहे," असं बॉमगार्ट पुढे म्हणतात.

नखांवर पांढरे ठिपके होण्यास ल्युकोनिशिया (leukonychia) म्हणतात. अनेकदा शरीरात व्हिटामिन किंवा खनिजांची कमतरता असल्याचं ते लक्षण असल्याचं म्हटलं जातं.

मात्र, या गोष्टीला योग्य ठरवणारे किंवा त्याचं समर्थन करणारे पुरावे मिश्र स्वरुपाचे आहेत. पदवीधरांच्या एका छोट्या अभ्यासात, या लक्षणाचं आणि एखाद्या व्यक्तीच्या झिंक किंवा कॅल्शियमच्या सेवनामध्ये कोणताही परस्परसंबंध दिसून आला नाही.

क्रॉहन्स आजार झालेल्या एका रुग्णाच्या नखांवर अनेक पांढरे ठिपके तयार झालेले होते. मात्र, त्याच्या शरीरात सेलेनियमची कमतरता होती. या खनिजासंदर्भात उपचार केल्यानंतर ते ठिपके नाहीसे झाल्याचं दिसून आलं.

सर्वसाधारणपणे, ल्युकोनिशिया किंवा नखांवर पांढरे ठिपके येणं हा प्रकार नखांना दुखापत झाल्यामुळे होण्याची शक्यता अधिक असते.

पायाच्या बोटाला ठेच लागणं, हाताची नखं दरवाजाच्या फटीत अडकणं, खूप जास्त प्रमाणात मॅनिक्युअर करणं किंवा पायावर वजनदार किंवा जड वस्तू पडणं यामुळे याप्रकारच्या खुणा किंवा डाग पडू शकतात.

मात्र, असं असलं तरी नखांवर पांढरे डाग पडण्यामागे आरोग्याच्या समस्या असू शकतात. उदाहरणार्थ, शरीरात शिसं किंवा आर्सिनेकसारख्या जड धातूंची विषबाधा झाल्याचं ते लक्षण असू शकतं. सोरायसिसमुळे देखील नखांवर पांढरे डाग पडू शकतात.

हाताची बोटं

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, गोलाकार झालेली नखं उलट्या चमच्यासारखी असतात आणि ती फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात

सोरायसिस म्हणजे एक गंभीर स्वरुपाचा त्वचेचा रोग असतो त्यामुळे त्वचेवर सुजलेले किंवा खवले आल्यासारख्या डाग पडतात.

संपूर्ण नखच पांढरं झालं तर त्यामागे रक्तात प्रथिनांची कमतरता असणं हे कारण असू शकतं. तसंच मूत्रपिंडाचा आजार, यकृताचा आजार किंवा मधुमेह हे त्यामागचं कारण असू शकतं.

"रक्तात प्रथिनांचं प्रमाण कमी झालेलं असेल तर त्यामुळे अनेकदा संपूर्ण नखं पांढरी होतात. आपण त्याचा संबंध यकृताच्या आजाराशी जोडतो. त्यामुळे यकृताचं सिऱ्होसिस यासारखे आजार कदाचित मद्यपानामुळे होतात."

हे झालं पांढऱ्या नखांविषयी. दुसऱ्या बाजूला निळी नखं हे शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं लक्षण असू शकतं. अतिशय गंभीर ह्रदयरोग किंवा एम्फीसीमाचं ते लक्षण असू शकतं. त्यामुळे लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यासंदर्भातील तपासणी करून घेतली पाहिजे.

नखांच्या खाली काळ्या रंगाच्या रेषा दिसल्या तरीदेखील याच प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असू शकतात. अर्थात ते नखांना झालेल्या दुखापतीमुळंही असू शकतं.

त्याचबरोबर हे सब्युंगल मेलानोमाचं (subungual melanoma) देखील लक्षण असू शकतं. हा एक दुर्मिळ प्रकारचा गंभीर स्वरुपाचा त्वचेचा कर्करोग असतो.

नखाखाली रक्तस्त्राव होणं (जर ते बरं होत नसेल) हे आरोग्याची काहीतरी गंभीर समस्या असल्याचं लक्षण असू शकतं.

"तुम्हाला स्प्लिंटर हिमोर्हेजेसची (splinter haemorrhages)म्हणजे रक्ताखाली रक्तस्त्रावाची समस्या असू शकते. हे रक्ताच्या लहान रेषांसारखं दिसतं. नखाखाली काहीतरी घाण किंवा धातू किंवा लाकडाचा बारीक तुकडा अडकल्यावर दिसतं तसंच हे दिसतं," असं बॉमगार्ट म्हणतात.

"स्प्लिंटर हिमोर्हेजेसची समस्या हे काहीवेळा व्हॅस्क्युलायटिसचं लक्षण असू शकतं. व्हॅस्क्युलायटिस म्हणजे रक्तवाहिन्यांचं इन्फ्लेमेशन. यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे ह्रदयाच्या झडपेला संसर्ग होणं. त्यामुळे त्यात लाल रंगाची विचित्र प्रकारची सूज येते," असं ते पुढे म्हणतात.

बुरशीचा संसर्ग

नखांचं निरीक्षण करून इतर काही सामान्यपणे आढळणाऱ्या आजारांचं देखील निदान केलं जाऊ शकतं. रुग्णांची तपासणी करत असताना डॉक्टर्स नखांचा रंग, नखांची जाडी आणि त्यांचा आकार या गोष्टींमध्ये झालेले बदल पाहत असतात.

उदाहरणार्थ, निरोगी नखांमध्ये नखाखालचा थर गुलाबी असला पाहिजे, त्यात पांढरे ठिपके नसावेत. नखांना इतर रंग असल्यास त्यातून संसर्ग झाल्याचा किंवा आरोग्याच्या अंतर्गत समस्या असल्याचे संकेत मिळतात.

"नखं ही त्वचेचाच विस्तार असतात. तुमच्या शरीरात काय घडतं आहे, तुमचं आरोग्य कसं आहे, याबद्दल तुमची त्वचा बरंच काही सांगू शकते", असं बॉमगार्ट सांगतात.

ल्युकोनिचिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ल्युकोनिशिया होण्यामागे नखं जोरात आपटल्यामुळे किंवा दणका बसल्यामुळे होणाऱ्या वरवरच्या दुखापतीसह अनेक कारणं असू शकतात - अर्थात ते काहीतरी अधिक गंभीर गोष्टींचं देखील लक्षण असू शकतं

"जर तुम्हाला पायाच्या बोटांवर, विशेषकरून तुमच्या पायाच्या बोटाच्या नखांवर पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा ठिपका दिसला तर ते बुरशीचा संसर्गाचं ते लक्षण आहे," असं होली विल्किन्सन म्हणतात. त्या हल विद्यापीठात जखमा बरे करण्याच्या विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

अमेरिका आणि युकेसारख्या अनेक देशांमध्ये जरी नखांवर झालेल्या माफक किंवा सौम्य बुरशीजन्य संसर्गासाठी मेडिकल दुकानांमधून ओव्हर द काउंटर औषधं खरेदी करू शकत असला तरी जर तुम्ही त्यावर उपचार करण्यास खूप उशीर केला तर मग त्यावर उपचार करणं खूप कठीण होऊ बसतं. (नखांवर कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असता डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं खूपच महत्त्वाचं असतं.)

"अनेकवेळा लोकांच्या नखांचा रंग जेव्हा बदलतो तेव्हा तो संसर्ग असल्याचं त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच ती स्थिती खूपच वाईट होऊ शकते.

त्यांचं गांभीर्य वाटत जातं आणि मग त्यांना पॉडीअॅट्रीस्टकडे म्हणजे पाय, पायाचा घोटा आणि तळव्याच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जावं लागतं," असं विल्किन्सन म्हणतात.

नखांचा नाजूकपणा

नखांच्या आकारावरून देखील शरीरातील अनेक समस्या लक्षात येऊ शकतात. पायाची निरोगी बोटं आणि नखं बहिर्वक्र असावीत. म्हणजेच ती नखं किंचित बाहेरच्या दिशेनं वक्र असावीत.

त्यामध्ये कोणतेही खड्डे किंवा खोलगटपणा नसावा. जर नखांमध्ये तसं असेल तर ते कॉईलॉनीशिया असल्याचं लक्षण असू शकतं. यात नख पातळ होतात, ठिसूळ होतात आणि नख आतल्या बाजूनं वक्र होतात.

काहीवेळा ज्या लोकांना कॉईलॉनीशियाची समस्या असते त्यांच्या नखाच्या मध्यभागी एखाद्या द्रवाचा थेंब साठवला जाईल इतका खोलगटपणा असतो. त्यामुळे अनेकदा या आजाराला "स्पून नेल्स" म्हणजे "चमच्यासारखी नखं" असं म्हटलं जातं.

जर तुमचं कोणतंही नख चमच्यासारखं दिसत असेल तर ते अॅनेमिया म्हणजे अशक्तपणा किंवा शरीरात लाल रक्त पेशींचं प्रमाण कमी असणं याचं लक्षण असू शकतं. यामध्ये शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी पुरेशी निरोगी रक्तपेशी नसतात. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनेमिया होऊ शकतो.

अर्थात इतर आजारांबरोबर हे कोलिअॅक आजाराचं (coeliac disease) देखील लक्षण असू शकतं. या आजारात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती शरीरातीलच पेशींवर हल्ला चढवते.

दुसऱ्या बाजूला, नखांमधील काही बदल पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे देखील दिसू शकतात. काहीजणांना नखांवर आडव्या कडा असतात. त्याला बीउज लाईन्स (Beau's lines) म्हणतात.

या रेषा नखांवर आडव्या स्वरुपात असतात. शरीरात प्रथिनांची कमतरता असल्याचं ते लक्षण असू शकतं. अर्थात हे मधुमेह आणि पेरिफेरल व्हॅस्कुलर आजाराचं देखील लक्षण असू शकतं.

पेरिफेरल व्हॅस्कुलर आजारात शरीराच्या काही अवयवांमध्ये रक्ताभिसरण कमी होतं किंवा रक्ताचा पुरवठा कमी होतो. सहसा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल साचल्यामुळं ही स्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

"बीउज लाईन्स म्हणजे शरीरात झिंकची कमतरता असण्याचं लक्षण असू शकतं. तर ठिसूळ नखं ही हायपोथायरॉईडिझम (hypothyroidism) किंवा व्हिटामिन बी7 कमतरतेचं लक्षण असतात," असं मेरी पिअर्सन म्हणतात. त्या वेल्सच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ आहेत.

"काही जणांच्या बाबतीत आम्हाला यासाठी अधिक परिश्रम करावे लागू शकतात. उदाहरणार्थ, ज्यावेळेस आपल्या मुलाच्या पोषणाबद्दल चिंता असते किंवा आपल्याला दीर्घकालीन गंभीर आजार असतो तेव्हा त्यासंदर्भात ही काळजी घ्यावी लागते," असं त्या पुढे म्हणतात.

इतर प्रकरणांमध्ये, आरोग्याच्या समस्यांऐवजी जीवनशैलीत बदल झाल्यामुळे नखांमधील बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ, नखं सोलणं. यालाच ऑन्कोसिझिया असं म्हणतात. नखांच्या मोकळ्या कडांपासून नखांचा पातळ थर अक्षरश: वेगळा होतो आणि सोलल्यासारखा मागे होतो.

"ऑन्कोसिझियाची समस्या खूप जास्त प्रमाणात हात धुतल्यामुळे, कोरड्या नखांमुळे आणि अॅक्रिलिक्सच्या वापरामुले आणि इतर नेल पॉलिश वापरल्यामुळे उद्भवू शकते," असं जोशुआ झीकनर म्हणतात. ते न्यूयॉर्कमधील द माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये त्वचारोगशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

बुरशीजन्य नख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नखाला झालेल्या बुरशीच्या संसर्गावर यशस्वीरित्या उपचार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो

नखांमध्ये असं काय आहे की, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत इतक्या गोष्टी समोर येतात, असा प्रश्न तुम्हाला पडेल किंवा या गोष्टीचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीराचे फार थोडे अवयव आपल्याला बाहेरून पाहता येतात. नखं अशा मोजक्या अवयव किंवा भागांपैकी एक आहेत.

"नखं ही त्वचेचाच विस्तार असतात. तुमच्या शरीरात काय घडतं आहे, तुमचं आरोग्य कसं आहे, याबद्दल तुमची त्वचा बरंच काही सांगू शकते. रुग्णाची पहिली लक्षणं अनेकदा पलंगाजवळून लक्षात येतात. म्हणून तुम्ही रुग्णाचं निरीक्षण करता, त्याला सर्व बाजूंनी पाहता, त्याच्या नखांचं, डोळ्यांचं आणि तोंडाचं निरीक्षण करता," असं बॉमगार्ट म्हणतात.

"त्यानंतर रुग्णाला पूर्ण पाहिल्यानंतर शेवटी तुम्ही मूल्यांकन करण्यास सुरुवात करता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही केलेल्या निरीक्षणातून रुग्णांचं निदान करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळेच नखं ही आपल्याला सुरुवातीलाच दिसणाऱ्या गोष्टींपैकी एक असतात," असं ते पुढे म्हणतात.

"अनेकदा नखांमध्ये झालेले बदल निरुपद्रवी असतात. अनेकदा ते फक्त नखांना दुखापत झाल्यामुळे होतात. मात्र जर तुम्हाला तुमच्या नखांच्या आकारात, रंगात किंवा पोतमध्ये कायमस्वरुपी बदल झालेले दिसले तर तुम्ही लगेच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.