अंडी उकडण्याचा कोणता आहे अचूक 'फंडा', वैज्ञानिकांनी सांगितली ही पद्धत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जास्मिन फॉक्स-स्केली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!' लहानपणापासून आपण हे वाक्य ऐकत आलो आहोत. बऱ्याच जणांच्या आहारात अंड्यांचं प्रमाण अधिक असतं.
अनेकांना ते मनापासून आवडतंही! अंडी उकडणं, वा त्याची भुर्जी करणं वा ऑम्लेट करणं या माध्यमातून अंड्यांचं सेवन केलं जातं.
अंडी उकडणं ही स्वयंपाक घरातील नित्यनेमानं केली जाणारी कृती आहे. मात्र, बरेचदा ती फसतेही.
आता विज्ञानानुसार, शास्त्रशुद्ध पद्धतीने अंडं उकडण्याचा परिपूर्ण आणि अचूक मार्ग कोणता याची उकल शास्त्रज्ञांनी केली आहे.
विशेष म्हणजे या 'परिपूर्ण' मार्गाने अंडं उकडायचं असेल तर त्यासाठी अर्धा तास लागतो.
एखादं अंडं अत्यंत परिपूर्ण पद्धतीने उकडणं ही निर्विवादपणे एक अवघड गोष्ट असते, यात काहीच शंका नाही.
कोणताही गोंधळ न होता सुयोग्य पद्धतीने अंडी शिजावित, यासाठी अनेकांना बरीच मेहनत अथवा ज्याला आपण काळजी म्हणू, ती नक्कीच घ्यावी लागते.
जर अंडी योग्य पद्धतीने शिजली नाहीत तर नाश्त्याच्या वेळीच आपला मूड खराब होऊ शकतो.
अंडी आतून व्यवस्थितपणे शिजली असतील, अशी अपेक्षा ठेवून आपण सोलतो आणि जर ती अर्धी-कच्ची राहिलेली असतील तर आपला नक्कीच हिरमोड होतो.
कधीकधी, अंड्यातील पिवळं बलक कोरडं आणि अति शिजलेलं असतं तर कधीकधी अंड्याचा पांढरा भाग पातळ आणि कमी शिजलेला असतो.

फोटो स्रोत, Getty Images
बरेचदा अंड्याचं पांढरं कवच काढताना खूप त्रास होतो. कारण त्यासोबतच अंड्याचा आतील पांढरा भागही चिकटून निघू लागतो आणि अंडी खाण्याची मजाच निघून जाते.
थोडक्यात काय, वरकरणी फारच साधी-सोपी वाटणारी ही गोष्ट खरं तर तितकीच कठीण आहे.
त्यामुळे, अंडं उकडण्याचा परफेक्ट असा मार्ग कोणता असेल, असा अगदीच तकलादू वाटणारा प्रश्न अनेकांना पडणं साहजिक आहे आणि त्याचीच उकल आता शास्त्रज्ञांनी केली आहे.
अंडं उकडण्यासाठी किती तापमान आवश्यक असतं?
अंड्यातील पिवळं बलक (Yolk) आणि अल्बूमेन (Albumen) म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग हे दोन्हीही महत्त्वाचे भाग वेगवेगळ्या तापमानाला पूर्ण उकडतं.
अंड्यातील पिवळ्या बलकाला व्यवस्थितपणे उकडण्यासाठी 65 डिग्री सेल्सियस (149F) तापमान गरजेचं ठरतं तर अंड्याचा पांढरा भाग उकडण्यासाठी 85 डिग्री (185F) सेल्सिअसहून थोडेसे अधिक तापमान आवश्यक असते.
त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने अंडी उकडली तर अंड्यांच्या दोन्ही महत्त्वाच्या घटकांना उकडण्यासाठी लागणाऱ्या तापमानातील फरक साध्य करणं कठीण होऊन बसतं.
100 डिग्री सेल्सिअसला (212°F) अंडं उकडल्यामुळे अंड्याचा पांढरा भाग परिपूर्ण बनतं.


मात्र, पिवळा भाग एकदम घट्ट होऊन सेट होतो. काही जणांना अशा प्रकारे उकडलेला पिवळा भाग आवडतो. त्यांना त्याची अडचण नसते. मात्र, काहींना अंड्यातील हाच पिवळा भाग थोडा बिलबिलीत (Semi-Fluid) असलेला आवडतो.
अंडी उकडण्याची आणखी एका पद्धतीचं नाव आहे 'sous vide' पद्धत! यामध्ये अंडी 60 ते 70 डिग्री सेल्सिअस (140-158F) तापमान असलेल्या पाण्यात एका तासासाठी ठेवलं जातं. ही पद्धत वापरल्यामुळे अंड्यातील पिवळा भाग फार चांगल्या पद्धतीने बिलबिलीत राहतो तर अंड्याचा पांढरा भाग पातळ तरीही व्यवस्थितपणे शिजतो.
मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, संशोधकांनी आता अंडी उकडण्याचा परफेक्ट मार्ग शोधून काढला आहे.
शिवाय, हा मार्ग फक्त परफेक्टच नाहीये तर तो तुमच्यासाठी सर्वार्थाने हेल्दीदेखील आहे.

या बातम्याही वाचा:

काय आहे ही अनोखी पद्धत?
यासंदर्भातील एका शोधनिबंधामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पेलेग्रिनो मुस्टो यांच्या नेतृत्वाखाली हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
ते इटलीतील पोझुओलीमधील नॅशनल रिसर्च कौन्सिलमध्ये संशोधक आहेत. त्यांनी अंडी उकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीवर अधिक संशोधन केलं आहे. त्यांनी अंडी उकडण्यासाठी कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD) नावाची पद्धत वापरली.
कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD) ही वैज्ञानिक पद्धत असून त्यामध्ये द्रव आणि वायू रूपातील पदार्थ कशाप्रकारे वाहतात, याचा अंदाज कॉम्प्युटरच्या सहाय्याने वर्तवला जाऊ शकतो.
थोडक्यात, वस्तुमान, गती आणि उर्जा अशा भौतिक नियमांच्या आधारे द्रव आणि वायूचे प्रवाह कशाप्रकारे प्रवाहित होतात, हे सांगणारं ते एक शास्त्र आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यामुळे, अंडी उकडण्याची एक नवी पद्धत उजेडात आली आहे. अद्याप ही पद्धत सर्वसामान्य झालेली नसल्याने बरेचसे शेफ तसेच घरातील स्वयंपाकी त्याबद्दल अनभिज्ञ आहेत.
मात्र, अत्यंत परिपूर्ण असलेल्या या पद्धतीला संशोधक 'पिरिओडिक कुकिंग' असं म्हणतात. कारण, या पद्धतीमध्ये दोन वेगवेगळी तापमानं वापरली जातात. सर्वांत आधी, अंडं उकळत्या पाण्यात म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअसला (212°F) ठेवलं जातं.
त्यानंतर ते कोमट पाण्यामध्ये म्हणजेच 30 डिग्री सेल्सिअसला (86°F) ठेवलं जातं. मात्र, या पद्धतीमध्ये प्रत्येक दोन मिनिटाला अंडी या दोन्ही तापमानांमध्ये आलटून-पालटून ठेवणं आवश्यक ठरतं.
अंडी उकडण्याचा या पद्धतीचा एकूण कालावधी 32 मिनिटांचा आहे. तसेच, या पद्धतीमध्ये पूर्णवेळ लक्ष ठेवून रहावं लागतं.
त्यामुळे, ज्यांना बरीच कामं असतात अथवा अंडी उकडायला टाकून इतर कामांमध्ये गुतणाऱ्यांसाठी ही पद्धत फारशी उपयोगी ठरणार नाही.
काय आहेत या नव्या पद्धतीचे फायदे?
जर तुम्ही या पद्धतीचा वापर करुन अंडी उकडण्याची मेहनत मनापासून घेणार असाल तर त्यातून मिळणारे फायदेही बरेच आहेत.
जेव्हा संशोधकांनी या नव्या आणि अनोख्या अशा पद्धतीने अंडी उकडून पाहिली, तेव्हा त्यांना अत्यंत भन्नाट असे रिझल्ट्स मिळाले.
संशोधकांनी न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स आणि हाय-रिझोल्यूशन मास स्पेक्ट्रोमेट्री वापरून या पद्धतीने उकडलेल्या अंड्यांचा टेक्स्चर, सेन्सरी क्वालिटीज् तसेच केमिकल टेक्स्चर यांचं विश्लेषण केलं आणि त्यांना ते सर्वोत्कृष्ट असल्याचं आढळलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे, हे निष्कर्षच दाखवून देतात की, पिरिओडिक कुकिंगची ही पद्धत चांगल्या पद्धतीने काम करते. या पद्धतीने उकडलेल्या अंड्यातील पिवळे बलक हे अत्यंत मऊ होते, अगदी तसेच जसे 'sous vide' पद्धतीने उकडलेल्या अंड्यांमध्ये मिळते.
मात्र, पिरिओडिक कुकिंगने उकडलेल्या अंड्यांच्या पांढरा भाग हा 'sous vide' पद्धतीने शिजवलेल्या अंड्यांहून काहीसा वेगळा होता. तो बिलबिलीत अथवा न शिजलेला नव्हता. याउलट, तो पारंपारिकपणे शिजवलेल्या सॉफ्ट-बॉईल्ड अंड्यांप्रमाणेच होता.
असं का घडलं, यामागचं कारणही संशोधकांनी दिलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंड्याचा पांढरा भाग हा वारंवार 35 डिग्री सेल्सिअस (95°F) आणि 100 डिग्री सेल्सिअस (212°F) मध्ये आलटून-पालटून उकडण्यात आला. मात्र, अंड्यातील पिवळं बलक हे पूर्ण वेळ 67 डिग्री सेल्सिअस (153°F) मध्येच राहिले.
त्यामुळे मिळणारे रिझल्ट्स सर्वोत्कृष्ट होते.
आरोग्यासाठी अधिक फायदेशीर
या पद्धतीतून उकडलेल्या अंड्यांचं रासायनिक विश्लेषण केल्यावर अनेक गोष्टी उघड झाल्या.
पिरिओडिक कुकिंग पद्धतीने उकडलेल्या अंड्यातील पिवळं बलकामध्ये अधिक पॉलिफेनॉल (Polyphenols) असते. पॉलिफेनॉल हा मायक्रोन्यूट्रीएंटचाच एक प्रकार आहे.
हे बहुतांश वेळेला झाडांमध्येच प्राप्त होते. त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे असल्याचं सिद्ध झालं आहे. पॉलिफेनॉलमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज् असतात.

फोटो स्रोत, Getty Images
तणावपूर्ण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठीच झाडांकडून या मायक्रोन्यूट्रियंटची निर्मिती केली जाते. झाडांना येणारा हा तणाव अतिनील किरणं, दुष्काळ अथवा कीटकांनी केलेल्या हल्ल्यातून निर्माण होऊ शकतो.
हेच मायक्रोन्यूट्रियंट मानवी शरीरासाठीही फायद्याचं ठरू शकतं, असं महासाथी विज्ञानाबाबतचं (Epidemiological Studies ) संशोधन सांगतं.
या मायक्रोन्यूट्रियंटमुळे कॅन्सर, मेंदूविकार तसेच हृदयरोगाची जोखीम कमी होऊ शकते, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे ज्यांना अंडी खायला प्रचंड आवडतात, त्यांना आता त्यासाठी एक चांगलं असं कारण नक्कीच मिळालं आहे. या नव्या पद्धतीने अंडं उकडण्याचा प्रयत्न तुम्हीही करुन पाहू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











