धडक 2: तथाकथित उच्चवर्णियांना 'बेधडक' प्रश्न विचारून अंतर्मुख करणाऱ्या चित्रपटाची का होतेय चर्चा?

सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नम्रता जोशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

'धडक 2' हा दिग्दर्शिका, लेखिका आणि प्रॉडक्शन डिझायनर शाजिया इक्बाल यांचा पहिलाच सिनेमा. कमाईच्या हिशोबात या सिनेमाने मोहित सुरीच्या 'सैयारा'प्रमाणे भलेही शंभर कोटी कमावले नसतील. पण भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा सिनेमा बदल घडवणारी कलाकृती म्हणून ओळखला जाईल.

हा मेनस्ट्रीम हिंदी सिनेमामधल्या मोजक्या चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये जातीच्या आधारे होणारा भेदभाव, अन्याय आणि शोषणासारखे मुद्दे गांभीर्याने आणि संवेदनशीलतेनं दाखवले आहेत.

या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदीला 'सावळं' दाखवण्यावरून बरीच चर्चा आणि टीका झाली. या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी एका दलित मुलाची भूमिका साकारत आहे. नीलेश अहिरवार असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. स्वतःची जातीय ओळख स्वीकारण्याची त्याची धडपड आहे.

हा वाद बाजूला ठेवून पाहिलं तर सिनेमातून मांडलेला दृष्टिकोन हा कीव करणारा नाही किंवा वरवरचाही. तो वंचित समुदायाची परिस्थिती अतिशय प्रामाणिकपणे दाखवतो.

सिनेमामध्ये बॉलिवूडला लागणारी भावनिकता आहे, सिनेमॅटिक भव्यता आहे; पण त्याचबरोबर विरोधाभासाचं वास्तवही आहे. समाजातल्या कथित उच्चवर्णीयांना प्रश्न विचारायलाही काचरत नाही.

हा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. वंचितांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची सुरूवात करणारा हा सिनेमा आहे. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण शंभर वर्षांहूनही अधिक इतिहास असलेल्या मेनस्ट्रीम हिंदी सिनेमामध्ये जातीवादावर अतिशय कमी चित्रपट बनले आहेत. वंचित समुदायातील व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले सिनेमे तर त्याहूनही कमी.

परिणामकारक व्यक्तिरेखा

जून 2015 मध्ये 'द हिंदू' या इंग्रजी वर्तमानपत्राने केलेल्या एका अभ्यासातून समोर आलं की, 2013-2014 च्या दरम्यान ब़ॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या जवळपास 300 सिनेमांपैकी केवळ सहा सिनेमांमध्ये मुख्य व्यक्तिरेखा वंचित समुदायांतील होत्या.

याउलट 'धड़क 2' मध्ये मुख्य व्यक्तिरेखेव्यतिरिक्त सिनेमातील इतरही महत्त्वाचे कॅरेक्टर्स वंचित समुदायातील दाखवले आहेत.

यामध्ये महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे प्रियांक तिवारी. त्याने युवा नेता शेखरची व्यक्तिरेखा साकारली आहे. (ही व्यक्तिरेखा रोहित वेमुलावरून प्रेरित आहे. तो हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी होता आणि कँपसमधील जातीय अन्यायाविरोधात भूमिका घेत होता. विद्यापीठातून निलंबन झाल्यावर त्याने आत्महत्या केली होती.)

तृप्ती डिमरी- सिद्धांत चतुर्वेदी

फोटो स्रोत, x.com/DharmaMovies

सिनेमात एका प्रसंगात शेखर म्हणतो की, "अन्याय क़ानून बन जाए तो उसके ख़िलाफ़ आवाज़ उठाना लोगों का कर्तव्य है."

याशिवाय अनुभा फतेहपुरा यांनी नीलेशच्या (सिद्धांत चतुर्वेदीच्या व्यक्तिरेखेचं नाव) आईची भूमिका केली आहे. ती भलेही वंचित असेल किंवा विशेषाधिकार असलेल्या लोकांकडून अपमानित झालेली असेल. पण ती गोष्टी निमूटपणे सहन करणारी नाहीये. तिला तिच्या अधिकारांची जाणीव आहे आणि त्या लढाईमध्ये आरक्षण आणि समान संधीसारख्या गोष्टींवर तिचा विश्वास आहे.

जातीचा मुद्दा आणि तमीळ सिनेमा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'धड़क 2' सारखे सिनेमे बॉलिवूडमधे अपवादानेच बनत असतील. पण प्रादेशिक सिनेमांमध्ये विशेषतः तमीळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. इथे वंचित समुदायाच्या मुद्द्यावर सातत्याने चित्रपट बनले आहेत आणि त्यांपैकी अनेक चित्रपटांतील मुख्य व्यक्तिरेखा यासुद्धा वंचित समुदायातल्याच दाखवल्या आहेत.

के. रविंद्रन यांचा 'हरिजन' हा तेलुगू सिनेमा आणि बी.व्ही. कारंथ यांचा कन्नड भाषेतील 'चोमना डुडी' हा सिनेमा जातिवादाविरोधातील क्लासिक सिनेमे म्हणून गणले जातात.

समकालिन तमीळ सिनेमामध्ये मारी सेल्वाराज याने 'कर्णन' चित्रपटात सुपरस्टार धनुषला घेऊन वंचित समुदायाच्या मनातील विद्रोह समोर आणला.

लीना मणिमेकलई यांच्या 'मादथी' या सिनेमात लैंगिक हिंसेवर भाष्य आहे. पा. रंजीतच्या 'सारपट्टा परंबराई' आणि टी.के. ज्ञानवेल यांच्या 'जय भीम'नेही वंचितांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आणि हे सिनेमे बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरले.

तामिळनाडूमध्ये वास्तव आयुष्य आणि सिनेमा दोन्हीमध्ये जात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथले समाज सुधारक आणि नेते पेरियार तसंच द्रविडी राजकारणाचा वारसा या सिनेमातून दिसून येतो.

शाजिया इक्बाल यांनी इंग्रजी वृत्तपत्र 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "तिथे (दक्षिणेत) तुम्हाला जातीवर आधारलेल्या अनेक गोष्टी दिसतील, ज्या बॉलिवूडमध्ये दिसणार नाहीत. कारण तामिळनाडूमध्ये असे अनेक दिग्दर्शक आले आहेत, ज्यांनी 'आमच्या गोष्टी सांगण्यापासून कोणी आम्हाला अडवू शकत नाही,' ही संस्कृती रूजवली. बॉलिवूडमध्ये पण असं व्हायला हवं."

शाजिया इक्बाल

फोटो स्रोत, Getty Images

शाजिया इक्बाल यांचा 'धड़क 2' मारी सेल्वाराज यांच्या 'परीयेरून पेरूमाल' या तमिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. त्यांनी ही कथा उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर रचली आहे आणि लिंगभावाच्या दृष्टिकोनातून तिला एका प्रेम कथेच्या रुपात मांडलं आहे.

शाजिया इक्बाल यांच्या मते प्रेम कथेच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळे पूर्वग्रह आणि भेदभावांबद्दल परिणामकारक पद्धतीने सांगितलं जाऊ शकतं.

दक्षिणेतला सिनेमा जमिनीवरचं वास्तव अधिक खोलवर जाऊन समजून घेतो. बॉलिवूड मात्र वरवरचा प्रयत्न करत असल्यासारखं दिसतं. विशेषतः 90च्या दशकात हिंदी सिनेमात शहरी, ग्लोबल आणि चकचकीत अशा कथा आल्या, ज्या अनिवासी भारतीयांना डोळ्यांसमोर ठेवून बनवल्या गेल्या. यामध्ये वंचित समुदायाला कुठेही स्थान नव्हतं. अनेक व्यक्तिरेखा या आपल्या ओळखीपासून लांबच होत्या...मग ती ओळख जात, वर्ग, धर्म किंवा लिंगभावाशी जोडलेली असो.

शाजिया इक्बाल यांनी 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "खरंतर सगळं काही आपल्या ओळखीभोवतीच फिरत असतं...मग ती आपली जातीय ओळख असो किंवा धार्मिक. पण आपण आपल्या सिनेमामधून या गोष्टींना हातही घालत नाही."

त्यांनी पुढे म्हटलं की, "मी जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा लक्षात आलं की, जात हा मुद्दा केवळ गावात असतो असं लोकांना वाटतं. पण नंतर लक्षात आलं की हे सगळीकडेच आहे. जर तुम्ही छोट्या शहराकून मोठ्या शहरात आला तरी तुमची जातीय ओळख तुमची ओळख सोडत नाही."

नागराज मंजुळेंचीही या मुद्द्यावर आहे पकड

'धड़क 2' च्या आधी हिंदी सिनेमामध्ये जातीयवादाची परिणामकारक मांडणी करणारा एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळेचा झुंड हा सिनेमा.

नागराज त्याच्या फँड्री आणि सैराट या सिनेमांसाठीही ओळखले जातात. मे 2017 मध्ये 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, जात आपल्या समाजाचा पाया आहे. हे एक असं वास्तव आहे, ज्यापासून दूर पळण्यासाठी तुमच्याकडे खास कौशल्य हवं. बॉलिवूडकडे ती कला आहे. माझ्याकडे नाही."

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, Instagram

नागराज त्यांची दलित ओळख मोकळेपणाने स्वीकारतात आणि 'झुंड' सिनेमातून त्यांनी आपल्या गरीब आणि वंचित पात्रांनाही तोच आत्मविश्वास दिला.

'झुंड'मधल्या अनेक व्यक्तिरेखांना सहानुभूती नको आहे, उलट कठीण परिस्थिती असतानाही त्यांच्यामध्ये धाडस आणि जिद्द आहे. त्यांचे प्रोफेसर (अमिताभ बच्चन) त्यांचे तारणहार नाहीयेत, तर त्यांचे सोबती आहेत. हा दृष्टिकोन आधी बनलेल्या सिनेमांपेक्षा वेगळा होता.

प्रतिनिधीत्वाचा इतिहास

सिनेमात दलितांचं प्रतिनिधित्व करण्याचा इतिहास फ्रांझ ओस्टेन यांच्या 'अछूत कन्या' पासून सुरू झाला, असं म्हणतात. हा सिनेमा 1936 साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा एका खालच्या मानल्या जाणाऱ्या जातीतली मुलगा आणि ब्राह्मण मुलाच्या प्रेमकथेवर आधारित होती. सामाजिक बहिष्कार आणि अस्पृश्यता यावर केलेल्या पहिल्या प्रयत्नांपैकी तो एक मानला जातो.

बिमल रॉय यांच्या 'सुजाता' (1959) या सिनेमाचीही बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटात नूतन यांनी एका अस्पृश्य मुलीची भूमिका साकारली होती. ती एका ब्राह्मण कुटुंबात वाढली होती. पण तथाकथित प्रगतिशील जगात ही व्यक्तिरेखा पूर्वग्रहांची बळी ठरते.

गांधींच्या अस्पृश्यता-विरोधी तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेल्या उच्च मानल्या गेलेल्या जातीतील दिग्दर्शकाचा 'सुजाता' हा सिनेमा होता. यात समाजातील विशेषाधिकार असलेली पात्रं एका असहाय्य मुलीचा उद्धार करण्यासाठी पुढे येताना दाखवली आहेत. कदाचित त्या काळात हा मुद्दा योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी

सवर्णांकडून अशा प्रकारचा हस्तक्षेप आवश्यक होता.

अनेक वर्षांनतर आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' (2001) सिनेमातही कचरा नावाचं एक पात्र होतं. तो स्वतःची शैली असलेला एक स्पिन गोलंदाज होता आणि चित्रपटातल्या क्रिकेट संघाचा भाग होता. ब्रिटीशांविरुद्धचा सामना जिंकून देण्यात या पात्राची भूमिका महत्त्वाची होती.

चित्रपटात त्याच्या वेदना किंवा असमान जगातल्या संघर्षाला वाव देण्यात आलेला नव्हता. कथा जास्त करून यावर होती की सर्वांना (वंचितांसह) एकत्र घेऊन समुदाय आणि देशाच्या भल्यासाठी परकीय आक्रमकांविरुद्ध, एकत्रित कसं व्हायचं.

लगान सिनेमाचं पोस्टर

फोटो स्रोत, Getty Images

प्रकाश झा यांच्या 'आरक्षण' (2011) मध्ये सैफ अली खान यांनी एका शिकलेल्या दलित व्यक्तीची भूमिका साकारली. मात्र, हे पात्र फारसं परिणामकारकरित्या वठलं नाही. झा यांनी चित्रपटाची सुरुवात आरक्षणाच्या मुद्द्याने केली, पण नंतर कथा शिक्षणाच्या व्यापारीकरणाकडे वळली.

अनुभव सिन्हा यांच्या 'आर्टिकल 15' (2019) चित्रपटानेही जातीय असमानतेवर प्रकाश टाकला, पण ती कथा शहरी, शिकलेला आणि विशेषाधिकार असलेल्या नायकाच्या (आयुष्मान खुराना) नजरेतून सांगितली गेली. त्यामुळे ती भेदभाव भोगणाऱ्यांच्या कथेऐवजी उद्धार करणाऱ्या एका ब्राह्मण आणि स्वतःला बदलाचा मसीहा मानणाऱ्या पात्राची कथा बनून राहिली.

जातिसंबंधी मुद्द्यांवर सर्वात प्रभावी आणि ताकदवान काम समांतर हिंदी सिनेमात झालंय.

या काळातील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये श्याम बेनेगल यांचा 'अंकुर' (1974), सत्यजित रे यांचा 'सद्गति' (1981), गौतम घोष यांचा 'पार' (1984), प्रकाश झा यांचा 'दामुल' (1985), अरुण कौल यांचा 'दीक्षा' (1991), शेखर कपूर यांचा 'बँडिट क्वीन' (1994), बेनेगल यांचा 'समर' (1999) आणि जब्बार पटेल यांचा हिंदी-इंग्रजी चित्रपट 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (2000) यांचा समावेश होतो.

नीरज घेवान: हिंदी सिनेमातील नवा आवाज

काही तरुण दिग्दर्शकांनी 'अँटी-कास्ट' कथांमध्ये नवे आणि ताजे दृष्टिकोन दिले. उदाहरणार्थ- बिकास मिश्रा यांचा 'चौरंगा' (2014) आणि चैतन्य ताम्हाणे यांचा मराठी-गुजराती-हिंदी-इंग्रजी चित्रपट 'कोर्ट' (2014).

यामधील सर्वांत महत्त्वाचा समकालीन आवाज म्हणजे नीरज घेवान. ते हिंदी सिनेमातील मोजक्या परिचित दलित दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि कदाचित एकमेव असे चित्रपटकार आहेत, जे सातत्याने इंडस्ट्रीच्या ब्राह्मणवादी रचनेला आव्हान देत आहेत.

नीरज घेवान यांचा पहिला चित्रपट 'मसान' (2015) हा वाराणसीतल्या जातीय राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रेम, विरह आणि आकांक्षेची कथा सांगतो. या चित्रपटाचा प्रीमियर कान चित्रपट महोत्सवातील 'अन सर्टेन रिगार्ड' विभागात झाला होता. याला एफ़आईपीआरईएससीआई क्रिटिक्स अवॉर्ड आणि प्री अवेनिर प्रोमेतुर सन्मान मिळाला.

नीरज घेवान

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या 'होमबाउंड' (2025) सिनेमाचा प्रीमियरही यावर्षी मे महिन्यात कानच्या 'अन सर्टेन रिगार्ड' विभागात झाला. हा 2020 साली 'द न्यूयॉर्क टाइम्स ' मध्ये छापलेल्या बशरत पीर यांच्या 'टेकिंग अमृत होम' या लेखावर आधारित आहे.

यात मोहम्मद सैयूब आणि त्यांचा लहानपणचा मित्र अमृत कुमार यांची गोष्ट होती. हे त्या हजारो स्थलांतरितांपैकी होते, ज्यांना 2020 साली कोविड-19च्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाउन लागल्यानंतर पायीच घरी परतावं लागलं होतं.

फिल्ममध्ये नीरज घेवान यांनी वंचित आणि अल्पसंख्याकांच्या अडचणींना केंद्रस्थानी ठेवले आहे, जिथे मोहम्मद सैयूबचे नाव बदलून मोहम्मद शोएब अली (ईशान खट्टर) आणि अमृत कुमारचे नाव चंदन कुमार (विशाल जेठवा) करण्यात आले आहे.

माझी घेवानची आवडती फिल्म 'गीली पुच्ची' आहे, जी नेटफ्लिक्सच्या अँथॉलॉजी फिल्म 'अजीब दास्तान्स'चा एक भाग आहे.

त्यांचा ओढा जात, वर्ग, धर्म, जेंडर आणि लैंगिकता यांसारख्या विषयांकडे असल्याचं घेवान मान्य करतात आणि यात 'गीली पुच्ची'ची रचना अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे.

ही फिल्म जात, लिंगभाव आणि लैंगिकता यांच्या संगमावर अत्यंत सुंदरपणे उभी आहे.