जगातल्या सहापैकी एका व्यक्तीला वंध्यत्व : जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगातली दर सहापैकी एक व्यक्तीला वंध्यत्वाचा त्रास आहे.
उच्च, मध्यम आणि कमी उत्पन्न गटातल्या देशांनुसार हे गुणोत्तर थोडं कमी जास्त होतं.
उच्च उत्पन्न गटातल्या देशांमधले 17.8 टक्के प्रौढ वंध्यत्वाने ग्रासलेले आहेत तर हेच प्रमाण कमी उत्पन्न गटात 16.5 टक्के इतकं आहे.
आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये वंध्यत्वावर उपचार सहजपणे मिळायला हवेत.
यूकेच्या नॅशनल हेल्श सर्व्हिसने वंध्यत्वाची व्याख्या करताना म्हटलंय की, ‘जेव्हा एखादं जोडपं संततीनियमनाची साधनं न वापरता नियमितपणे लैंगिक संबंध ठेवत असेल आणि तरीही त्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्यांना वंध्यत्वाचा त्रास आहे.’
तर जागतिक आरोग्य संघटनेच्यामते सलग 12 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ संततीनियमनाची साधनं न वापरता लैंगिक संबंध ठेवले तरीही गरोदर राहण्यास अपयश येत असेल तर ते जोडपं वंध्यत्वाने ग्रासलेलं आहे.
अशा जोडप्यांना मूल होण्यासाठी इंट्राटेरिन इन्सिमिनेशन (IUI) किंवा इनव्हिर्टो फर्टीलायझेशन (IVF) यांचा आधार घेता येतो.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की बहुतांश देशात वंध्यत्वावर उपचार किंवा मूल होण्यासाठीच्या ट्रीटमेंटचा खर्च त्या व्यक्तींकडून केला जातो. सरकारी दवाखान्यांमध्ये यावर मोफत उपचार केले जात नाहीत.

या अहवालात असंही म्हटलंय की श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशातले लोक आपल्या वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी उत्पन्नाचा जास्त वाटा खर्च करतात.
पण हे उपचार महागडे असल्याने सर्वसामान्याच्या आवाक्यातले नाहीत त्यामुळे ते मूल होण्यापासून वंचित राहातात.
जागतिक आरोग्य संघटनेचे सरसंचालक डॉ टेड्रोस अधोनॉम यांनी म्हटलं की, “या अहवालावरून सिद्ध होतं की वंधत्व गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत नाही.”

“जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या समस्येने ग्रस्त आहेत, त्यावरून लक्षात येतं की त्यावर सगळ्यांना सहज उपलब्ध होतील असे कमी खर्चातले उपचार किती गरजेचे आहेत. आरोग्य धोरणांमध्ये आता या प्रश्नाला बाजूला टाकून चालणार नाही.”

डॉ. सारा मार्टिन्स डा सिल्व्हा या स्कॉटलंडमधील आघाडीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्या वंध्यत्त्वावरील उपचारांमध्ये तज्ज्ञ आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ डंडीमध्ये त्या 'रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन' (Reproductive Medicine)च्या प्राध्यापक आहेत.
त्या म्हणतात, “सध्या जगभरात असणारी असमानता आणि प्रजननासाठी महिलांवर असणारं दडपण कमी करण्यासाठी आपण विज्ञान, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नाविन्य याच्या आधारे आपण पुरुषांच्या प्रजननविषयक आरोग्याबाबत संशोधन करू शकतो अशी मला आशा आहे."
वंध्यत्व ही काही फक्त महिलांची अडचण नाही, असं सारा मार्टिन्स डा सिल्व्हा यांचं म्हणणं आहे.

पुरुषांमधला 'स्पर्म काऊंट' म्हणजेच शुक्राणुंचं प्रमाण कमी होत असून मूल जन्माला घालणं त्यांच्यासाठी कठीण होत जातंय. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं सारा म्हणतात.
गेल्या काही वर्षांमध्ये या विषयीचे पुरावे अत्यंत सढळपणे आढळत असल्याचं त्या म्हणतात. पुरुषांमधली शुक्राणूंची संख्या का कमी होत आहे आणि हे कसं रोखता येईल यावर संशोधन करण्याचं आवाहन त्यांनी जगभरातल्या संशोधकांना केलंय.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) च्या आकडेवारीनुसार भारतात 10-15 टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या असते. त्यापैकी 50 टक्के जोडप्यांमध्ये समस्य ही पुरुषामुळे उद्भवते.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








