You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीसीटीव्हीत चेहरा चोरासारखा दिसला म्हणून 54 दिवसांचा तुरुंगवास
- Author, अश्रफ पदन्ना
- Role, बीबीसीसाठी
2018 मध्ये केरळ मध्ये एका व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी 54 दिवस तुरुंगात काढावे लागले. कोर्टाने त्याला नंतर सोडून दिलं. पण त्याला या प्रकाराची प्रचंड किंमत मोजावी लागली. अजुनही तो न्यायाची वाट पाहत आहे.
व्ही.के.थाजुद्दीन केरळमध्ये राहतात. एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर नेकलेस चोरल्याचा ठपका ठेवला. जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा ते अन्य ठिकाणी होते. त्यांच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबrयांनी पुरावे गोळा केले आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधलं तेव्हा थाजुद्दीन यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं.
थाजुद्दीन यांना आलेला अनुभव तसा नेहमीचाच. याच वर्षाच्या सुरुवातीला हैदराबाद मध्ये एका मजुराचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
एका अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला.
यामुळे सीसीटीव्हीचा गैरवापर होत असल्याची प्रकरणं वाढीला लागल्याची भारतात चर्चा आहे. सीसीटीव्हीच्या बेसुमार वापरामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
थाजुद्दीन त्यांची बाजू मांडताना सांगतात की ते या संपूर्ण घटनेमुळे उद्धवस्त झाले. ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना अटक केली त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याची पगारवाढ थांबवण्यात आली. ही शिक्षा फारच सौम्य असल्याचं थाजुद्दीन यांचं मत आहे.
या प्रकाराची पोलिसांनी नुकसानभरपाई द्यावी यासाठी ते लढा देत आहेत. त्यांनी त्यांची कहाणी सांगण्यासाठी एक पुस्तक लिहिलं. पत्रकार शेल्विन सबॅस्टियन या पुस्तकाचे सहलेखक आहेत.
थाजुद्दीन यांची कहाणी ऐकल्यावर हे पुस्तक लिहायचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. “मला असं वाटलं की हे त्यांच्याबरोबर होऊ शकतं तर ते माझ्याबरोबरही होऊ शकतं.”
थाजुद्दीन यांचे भोग 10 जुलै 2018 रोजी सुरू झाले. त्यांच्या मुलीचं लग्न काही दिवसांपूर्वी झालं होतं. ते आणि त्यांचं कुटुंब बाहेर जेवायला गेले होते. तिथून ते परतत होते. त्यांचा दोहामध्ये कार भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांना लग्नासाठी 15 दिवसांची रजा मिळाली होती.
“सगळं ठरल्याप्रमाणे झालं होतं त्यामुळे मी अतिशय आनंदात होतो. पण अचानक आयुष्य बदललं.” ते सांगतात.
ते त्यांच्या घराजवळ पोहोचले तेव्हा पोलीस त्यांची वाट पहात होते.
त्यांना कारमधून बाहेर येण्यास सांगितलं तर त्यांच्या बायकोला एका सीसीटीव्ही फोटोमधला माणूस ओळखायला सांगितला.
“त्या दिवशी बाहेर अंधार होता आणि ती गोंधळले.. ती म्हणाली की तो माणूस माझ्यासारखा दिसतोय.” ते सांगतात.
पोलिसांनी थाजुद्दीन यांना ताबडतोब गाडीत बसायला सांगितलं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
“जे काही होत होतं त्यावर माझ्या बायकोचा आणि पोरांचा विश्वास बसत नव्हता.” ते सांगतात.
कुटुंबीयांना लक्षात आलं की नसीराचा जबाब तिच्याच नवऱ्याविरुद्ध वापरला जाणार आहे. तिच्या नवऱ्यावर एका बाईचा नेकलेस चोरण्याचा आरोप लागला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस पांढऱ्या रंगाच्या स्कुटरवर जात असल्याचं दिसत होतं. ती व्यक्ती आणि थाजुद्दीन अगदी सारखे दिसत होते. थाजुद्दीन यांनाही त्या फोटोमध्ये आपणच असल्याचा भास झाल्याचं ते सांगतात.
पोलिसांचा दावा होता की मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते म्हणून त्यांचा नेकलेस चोरला (थाजुद्दीन यांचा दावा होता की या कामासाठी त्यांनी त्यांचे सेव्हिंग्स वापरले). ज्या बाईचा नेकलेस चोरला त्या बाईने थाजुद्दीन यांची चोर म्हणून ओळख पटवली.
थाजुद्दीन त्या दिवशी वेगळ्याच ठिकाणी होते. एका बाईने सांगितलं की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी थाजुद्दीन आणि त्यांचं कुटुंब एका ब्युटी पार्लरमध्ये होते. साक्षीदाराने सांगितलं की ही ती व्यक्ती नाही. मात्र पोलिसांना ही केसचा लवकरात लवकर निपटारा करायचा होता असं थाजुद्दीन म्हणतात.
“माझ्याबरोबर काय होतंय हे मला कळत नव्हतं.जेव्हा माझी बायको आणि मुलं पोलीस स्टेशनला आले तेव्हा त्यांना माझ्याशी बोलूही दिलं नाही.” ते म्हणाले.
यादरम्यान पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोपही पोलिसांवर केला. हा आरोप कोर्टात खंडित करण्यात आला.
तब्बल 54 दिवसांनी त्यांना जामीन मिळाला.
थाजुद्दीन घरी आले तेव्हा त्याचं 23 किलो वजन कमी झालं होतं. शेजारचे शेरेबाजी करतील म्हणून त्यांनी घरातून बाहेर पडणंसुद्धा बंद केलं होतं. त्यांचा मुलगा सात वर्षांचा होता. त्याने शाळेत जाणं बंद केलं.
पोलिसांनी कोर्टात सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज मधला माणूस थाजुद्दीन यांच्यासारखाच दिसत होता. त्यांच्या कुटुंबीयांन सुद्धा ओळखल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
थाजुद्दीन यांच्या आशा दिवसेंदिवस मावळत चालल्या होत्या. तेव्हा दोहा येथील मित्र मैत्रिणींनी त्यांच्यासाठी एक ऑनलाईन अभियान चालवलं. त्यांच्या मोठ्या मुलाने सीसीटीव्ही फोटोच्या आधारे मित्रांबरोबर आणि एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर खऱ्या गुन्हेगाराला शोधायला सुरुवात केली.
त्यामुळे खरा आरोपी शोधण्यास मदत झाली. तो एका अन्य गुन्ह्यासाठी आधीच तुरुंगात होता.
थाजुद्दीन यांचं कुटुंब मग केरळच्या मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकाकडे गेलं. या सगळ्या प्रकरणाचा एका वेगळ्या पोलीस अधिकाऱ्याने तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली स्कुटर आणि नेकलेसही जप्त केला.
आता थाजुद्दीन यांचं नाव गुन्हेगार म्हणून काढून टाकण्यात आलं होतं. मात्र तरीही हे भोग संपले नव्हते.
सात महिन्यानंतर ते कतारला परत गेले आमि पुन्हा त्यांना तुरुंगात टाकलं. त्याच्या मालकाने थाजुद्दीनवर केस केली आणि पळून गेल्याचा आरोप केला. थाजुद्दीन यांचं प्रत्यार्पण करण्यात आलं आणि कतारमध्ये येण्यास आजीवन बंदी घालण्यात आली.
इकडे भारतात थाजुद्दीन यांच्या कुटुंबीयांनी अपमान आणि अवहेलना टाळण्यासाठी केरळच सोडलं. ते आता कर्नाटकात राहतात. तिथे थाजुद्दीन आता कपड्याचा व्यवसाय करतात.
त्यांनी पोलिसांवर केस केली आहे आणि 1.4 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.
त्यांच्या नवीन पुस्तकामुळे ज्या लोकांना विनाकारण अन्याय सहन करावा लागला आहे त्यांची व्यथा समोर येईल अशी त्यांना आशा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)