You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल: जेसीबीच्या दहशतीत चोपडा परिसर, पीडितेचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांवरच आक्षेप
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, चोपडा (उत्तर दिनाजपूरहून) बीबीसी हिंदीसाठी
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात इस्लामपूर भागातील चोपडा भागात एका गावात रविवारी दुपारनंतर एक व्हीडिओ व्हायरल झाला.
या व्हायरल व्हीडिओत ताजिमूल उर्फ जेसीबी नावाची एक व्यक्ती एका महिलेला आणि एका पुरुषाला एका काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. दोघंही जिवाच्या आकांताने किंचाळत असताना आजूबाजूचे लोक तमाशा पाहत आहेत आणि कोणीही त्यांचा बचाव करायला समोर येत नाही.
खरंतर, हे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये प्रचलित असलेल्या ‘सालिसी सभा’ (प्रति न्यायालय) आणि त्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचं प्रकरण आहे.
पश्चिम बंगालच्या अनेक भागात स्थानिक पातळीवर अशी न्यायालयं आहेत आणि त्यांच्या निर्णयांना कोणीही आव्हान देत नाही. ही न्यायालयं स्वत: निर्णय घेतात आणि जागेवरच शिक्षा सुनावतात.
या व्हायरल व्हीडिओमध्ये अशाच एका न्यायालयाची शक्ती दिसून येते. व्हीडिओत तृणमूल काँग्रेसचे स्थानिक दबंग नेते ताजिमूल इस्लाम हे शिक्षा सुनावताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
ताजिमूल इस्लाम यांचे टोपणनाव 'जेसीबी'
ताजिमूल इस्लाम यांना स्थानिक परिसरात जेसीबी या टोपणनावानं ओळखलं जातं.
दबंग नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांशी जवळीक असतानाही त्यांच्यावर डझनभर गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक पोलिसांनी त्यांना इस्लामपूर विभागीय न्यायलयात हजर केलं, त्यावेळी कागदपत्रांत या गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला.
“ताजिमूल उर्फ जेसीबी यांच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत,” असं या सरकारी वकील संजय भवाल म्हणाले.
दरम्यान, चोपडा पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षकांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं पोलिसांनी ट्विट करत म्हटलं आहे.
रविवारी ज्या दोन युवकांनी घटनेचा व्हीडिओ व्हायरल केला त्यांच्यावरही सालिसी सभेने 50 हजारांचा दंड ठोठावल्याची चर्चा स्थानिक लोकांमध्ये होती. मात्र, त्याला दुजोरा मिळालेला नाही. व्हीडिओ व्हायरल झाल्यापासून दोन्ही युवक बेपत्ता आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना 28 जूनला घडल्याचं पोलीस आणि स्थानिक लोकांशी संवाद साधल्यानंतर समजलं. पोलीस अधीक्षक जॉबी थॉमस के यांनीही बीबीसी हिंदीशी बोलताना याला दुजोरा दिला.
इस्लामपूरमधील लोकांच्या मते, मारहाण झालेली महिला विवाहित आहे. पण ती दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर घर सोडून निघून गेली होती. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि दोघं आपापल्या जोडीदाराला घटस्फोट देऊन एकत्र राहणार होते. पण काही दिवसांनी ते गावात परतल्यानंतर 28 जूनला सालिसी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सभेत त्यांच्यावर दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम दिली नाही तर त्यांना गावात राहता येणार नाही, असंही सांगण्यात आलं. त्यानंतर दंडाची रक्कम दिली नाही म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली.
घटना घडल्यानंतर दोन दिवसांनंतरही कोणालाही घटनेबाबत काहीही माहिती नव्हतं.
व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आणि पाच कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसंच जेसीबी यांना अटक करण्यात आली. यापैकी दोन कलमं अजामीनपात्र आहेत.
सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. स्थानिकांच्या माहितीनुसार जेसीबी हे चोपडा येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल यांचे निकटवर्तीय आहेत.
व्हीडिओ व्हायरल झाल्यावर तृणमूलने या प्रकरणापासून हात झटकले आहेत. हे गावातलं भांडण असून त्याचा तृणमूलशी संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तरीही, पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार इस्लामपूर जिल्हा तृणमूल काँग्रेस अध्यक्ष कन्हैया लाल अग्रवाल यांनी चोपडा येथील आमदार हमीदूल यांना कथित वादग्रस्त वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच त्यांना सात दिवसांच्या आत उत्तर द्यायला सांगितलं आहे.
दुसरीकडं, हमिदूल यांच्या मते, त्यांना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. मिळाल्यासं उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले.
परिसरात दहशत
चोपडाच्या लक्ष्मीपूर ग्रामपंचायत ऑफिससमोर प्रेमी युगुलाला मारहाण झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. या परिसरात जेसीबी यांचा एवढा दबदबा आहे की, तिथे जाणंही कठिण आहे.
इथं मुख्य रस्त्यावरून थोडं आत गेलं की काही युवक रस्ता अडवतात. कुठे जायचंय? कुठून आले आहात? कोणाला भेटायचं आहे? काय काम आहे? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती होते. जितकी तोंडं तितके प्रश्न यायला सुरुवात होते.
बीबीसीच्या टीमबरोबरही हेच झालं. दोनदा प्रयत्न केल्यावर त्यांना कसंबसं लक्ष्मीपूर ग्रामपंचायतीत जायला मिळालं.
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत असली, तरी प्रत्यक्षात तिथं पोहोचल्यावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही.
पेन, कॅमेरा पाहून लोक आसपासही फिरकत नाही. बऱ्याच प्रयत्नांनंतर काही लोकांशी संवाद साधला, तर त्यांनी घटनेच्या दिवशी बाहेर असल्याचं सांगितलं. काहींनी त्यादिवशी शेतात काम करायला गेलो होतो, असं सांगितलं, नेमकं काय झालं माहीत नसल्याचंच बहुतेक सगळे सांगत होते.
परिसरात जेसीबी यांची जी दहशत आहे, त्याचा हा परिणाम आहे. गावातील एका व्यक्तीनं नाव न घेण्याच्या अटीवर म्हटलं की, “आम्हाला इथंच रहायचं आहे. त्यांच्याशी वैर कसं घेणार?”
अशा परिस्थितीत घटनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मारहाण झालेल्या जोडप्याच्या किंवा जेसीबी यांच्या गावात जाण्याचा पर्याय योग्य वाटला. मारहाण झालेलं जोडपं दीघलगावचं आहे. तर जेसीबी यांचं गाव डांगापाडा आहे. ही दोन्ही गावं पंचायत कार्यालयापासून 16-17 किलोमीटर अंतरावर आहेत.
‘पुढं जाऊ नका, काही फायदा होणार नाही’
ज्या पद्धतीने पंचायत कार्यालयाबाहेर लोक बोलत होते, त्यामुळं या गावांमध्ये पोहोचणं शक्य झालं नाही. त्यानंतर एक धमकीवजा विनंतीही करण्यात आली, "पुढं जाऊ नका, काही फायदा होणार नाही. गावातलं कोणीही तोंड उघडणार नाही."
जिल्ह्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्यानंही अनौपचारिकरित्या गावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. जेसीबी यांच्या दहशतीचा तो एकप्रकारे पुरावाच होता.
या दहशतीमुळंच माकपचे स्थानिक नेते कॅमेऱ्यासमोर तर सोडाच, पण फोनवरही बोलायला तयार नाहीत.
पण पक्षाच्या एका नेत्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलायची तयारी दाखवली. “दोन तीनदा अटक करूनही पोलीस त्याला काही दिवसांनंतर सोडून देत असतात. 2017 पासून या भागात जेसीबीचा दबदबा वाढू लागला आहे. तो या भागात सालिसी सभा घेतो आणि स्वत:च शिक्षा सुनावतो. हा व्हीडिओ व्हायरल झाला नसता, तर त्याच्या कारवाया आधीसारख्याच सुरू राहिल्या असत्या.”
या दहशतीमुळंच एवढ्या वाईट पद्धतीनं मार खाऊनही पीडितांनी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. वारंवार विचारणा करूनही त्यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. पण, सोमवारी सकाळी पोलीस त्यांना घरून घेऊन गेले.
सोमवारी दुपारी इस्लामपूर विभागीय रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी झाली.
इस्लामपूरचे पोलीस अधीक्षक जॉबी थॉमस के. यांनी “कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात येत आहे,” असं म्हटलं.
पण घटनेच्या तीन दिवसानंतर वैद्यकीय तपासणी का करण्यात आली? त्यांच्यावर उपचार का करण्यात आले नाही? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.
कोण आहे जेसीबी?
ताजिमूल यांचा जन्म चोपडा येथील लक्ष्मीपूर ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या डांगपाडा गावात झाला होता. ताजिमूल उर्फ जेसीबी यांचं नाव लक्ष्मीपूर ग्रामपंचायतीच्या लोकांसाठी नवीन नाही.
स्थानिक लोक सांगतात की तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक आमदारांचे निकटवर्तीय समजले जाणारे ताजिमूल यांचा मुख्य व्यवसाय प्रति न्यायालयाच्या माध्यमातून गावातले वाद मिटवणं हा होता.
आधी ते डाव्या आघाडीमध्ये होते. पण 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यावर त्यांनी पक्ष बदलला. 2017 मध्ये त्यांचं राजकीय वर्चस्व आणि गुंडगिरी आणखी वाढली.
जेसीबी मशीन ज्या पद्धतीनं अवैध बांधकाम पाडते त्याचप्रमाणे ताजिमूल या भागातील विरोधकांची तोंड बंद करून न्यायनिवाडा करण्यासाठी कुख्यात होते. त्यामुळं त्यांना जेसीबी म्हणतात.
स्थानिक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मते जेसीबी प्रति न्यायालयाच्या माध्यमातून अनैतिक संबंधांपासून ते संपत्तीच्या वादापर्यंत सर्व प्रकारचे वाद मिटवतात. दोषी लोकांना मारहाण आणि दंड आकारण्याचं कामही करायचे. हाच त्यांचा मुख्य धंदा होता. वाद झाला त्याठिकाणी ते हजर असतात. सालिसी सभेचं आयोजन करून ते जागेवर न्यायनिवाडा करायचे.
माकपच्या एका नेत्यांच्या मते, “जेसीबी दर महिन्याला अशा प्रकारे तीन चार न्यायनिवाडे करायचे. आता व्हीडिओ व्हायरला झाला म्हणून एवढा गदारोळ झाला, नसता त्यांच्यासमोर बोलायची हिम्मत कुणामध्येही नाही. ”
लक्ष्मीपूर भागात अजूनही लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. प्रत्येक गल्लीत लोक याच मुद्द्यावर चर्चा करत आहेत. मात्र बाहेरची कोणीही व्यक्ती आली तर ते शांत होतात. जेसीबी जामीनावर बाहेर आल्यावर काय करेल? आपल्या अटकेचा सूड तर उगवणार नाही ना अशी भीती लोकांना वाटत आहे.
माकपचे जिल्हा सचिव अनवारुल हक यांच्या मते, “लक्ष्मीपूर पंचायतच्या संपूर्ण भागावर जेसीबी आणि त्यांच्या टीमचं नियंत्रण होतं. राजकीय संरक्षणामुळं या भागात त्याचं समांतर प्रशासन चालवतो.”
तेव्हापासून जेसीबीच्या विरोधात सामान्य लोकांवर अत्याचार, मारहाण, हत्या आणि अपहरणाचा आरोप होत आहे.
चोपडामध्ये राहणारे रुस्तम अली यांनी 4 नोव्हेंबर 2018ला जेसीबी विरोधात पहिल्यांदा चोपडा ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यात त्यांच्यावर गुलाम मुस्तफा आणि अब्दुल नावाच्या या इसमांवर सशस्त्र हल्ल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यानंतर 11 मार्च 2019 ला अजिना खातून नावाच्या महिलेने चोपडा ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत ताजिमूल आणि त्यांच्या माणसांवर मारहाणीचा आरोप केला होता.
इस्लामपूरचे पोलीस अधीक्षक जॉबी थॉमस के. यांच्या मते, “जेसीबी कायमच टीएमसी आमदार हमिदूल यांच्याबरोबर असायचे. म्हणूनच पोलिसांत त्यांना हात लावण्याची हिम्मत नाही. अनेकदा अटक करूनही काही दिवसातच त्यांना सोडलं जातं.”
काँग्रेसचे स्थानिक प्रमुख मसीरुद्दीनसुद्धा हेच सांगतात. ते म्हणतात, “आमदारांच्या संरक्षणामुळे पोलीस त्यांना हात लावत नाही. लक्ष्मीपूर भागात त्यांच्या दहशतीमुळं त्यांच्याविरोधात कोणीही आवाज उठवू शकायचे नाही.”
चोपडाच्या आमदारांचे घुमजाव
चोपडाचे आमदार हमिदूल रहमान यांनी सोमवारी त्यांच्या आधीच्या वक्तव्याच्या विरोधी वक्तव्य करत झालेल्या प्रकाराबाबत दुःख व्यक्त केलं आहे. रविवारी ते म्हणाले होते की, त्यांना या घटनेची माहिती आहे. त्यावेळी त्यांनी पीडितेला कलंकिनीही म्हटलं होतं तसंच तीचीही चूक असल्याचं म्हटलं होतं.
‘ग्रामीण भागात सालिसी सभेच्या माध्यमातून वाद सोडवले जातात. यावेळी शिक्षा मात्र थोडी जास्तच झाली,' असं ते म्हणाले.
पण, टीमएसीचे आमदार सोमवारी म्हणाले, “जे झालं ते योग्य झालं नाही हे मला मान्य आहे. या भागात जातीपातीच्या समस्या असल्यामुळं सलिसी सभेच्या माध्यमातून निवाडा केला जातो. मी किंवा माझा पक्ष याचं समर्थन करत नाही. मी रविवारी केलेल्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ काढले जात आहे.”
दरम्यान अशाच एका अन्य घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे. हा कधीचा व्हीडिओ आहे याची पडताळणी बीबीसीने केलेली नाही. मात्र हे प्रकरण लक्ष्मीपूर ग्रामपंचायतीच्या मोहनगंज गावाचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
माकपच्या स्थानिक नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, दुसरी घटना 16 जूनची आहे. त्यातही ताजिमूल एका प्रेमी युगुलाला अशाच पद्धतीने मारहाण करताना दिसत आहे. चोपडा पोलिसांनी मात्र दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
तृणमूल काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही या मुद्द्यावर मौन बाळगलं आहे.
इस्लामपूरचे टीमएसीचे आमदार कन्हैयालाल अग्रवाल यांनी फोनवर बीबीसीला सांगितलं की, “मी या बाबतीत तुमची काहीही मदत करू शकत नाही. तुम्ही चोपडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.”
हीच परिस्थिती ताजिमूल आणि पीडित युवक अन्सार आणि पीडित मेहरुन्निसाची आहे. त्यांनी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं.
पीडित जोडप्यावर दबाव
यादरम्यान व्हायरल व्हीडिओमध्ये बेदम मारहाण झालेल्या युवकानं अचानक भूमिका बदलली आहे. महिलेने व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.
बीबीसीबरोबर बोलताना ते म्हणाले की, “माझ्या परवानगीशिवाय व्हीडिओ व्हायरल केल्यामुळं माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. दोषी लोकांना कडक शिक्षा मिळायला हवी. माझा पोलिसांवर विश्वास आहे. मला जे सांगायचं होतं ते मी व्हीडिओत सांगितलं आहे. याशिवाय मला काहीही सांगायचं नाही.”
वारंवार विचारूनही हे प्रकरण आणि आपल्या खासगी आयुष्याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
दुसऱ्या बाजूला युवकानं म्हटलं की, “मी एक चूक केली. मात्र, गावकऱ्यांनी मिळून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला. मला जास्त मारहाण झाली नाही. ती महिला माझ्या घरी आली होती, ही चूक होती. मात्र सालिसी सभेच्या माध्यमातून चूक सुधारली गेली. मला कोणाविरुद्ध काहीही तक्रार करायची नाही, मी दहशतीत नाही. मी घरी आहे. माझी कोणाविरुद्ध काहीही तक्रार नाही.
दोघांनी सुरुवातीपासूनच ताजिमूलचं नाव घेतलं नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच त्यांनी पोलिसांत तक्रारही दिलेली नाही. महिलेनं तर, व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांनाच या सगळ्यासाठी जबाबदार धरलं आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मते जेसीबीच्या गुंडाची धमकी आणि त्यांच्या दहशतीमुळं या दोघांनी भूमिका बदलली आहे.
माकपचे एक नेते नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, “दोघांनीही जबाबात जेसीबीचं नाव घेतलेलं नाही. जेसीबीविरुद्ध खटल्याची तीव्रता कमी करण्यासाठी दोघांवर दबाव टाकण्यात आला.”
दोघंही सोमवारी रात्रीपासून घरी आहेत. त्या परिसरात पोलीस तैनात आहेत. महिलेच्या घरी तैनात असलेले पोलीस कोणालाही आसपास फिरकूही देत नाहीच.
माकपच्या नेत्यांनी दहशतीचं दुसरं नाव म्हणजे जेसीबी असल्याचं म्हटलं आहे. जेसीबी लक्ष्मीपूर ग्रामपंचायत भागात अघोषित न्यायाधीशाची भूमिका निभावत आहेत, असंही ते म्हणाले.
काँग्रेस नेते मसीरुद्दीन म्हणाले की, “जेसीबीच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आलमगीर घरोघरी जाऊन लोकांना तोंड बंद ठेवण्याची धमकी देत आहेत. या प्रकरणातील तरुण तरुणीलाही धमकी देण्यात आली आहे. त्या दोघांनीही धमकीमुळंच साक्ष बदलली आहे.”
ममता सरकारची विरोधी पक्षांवर टीका
सरकारी वकील संजय भवाल म्हणाले की, “रविवारी नवीन फौजदारी कायदा लागू झाला नव्हता म्हणून ताजिमूल यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 307,323,325, आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
माकप नेते मोहम्मद सलीम म्हणाले की, “ही घटना ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळात टीमएसीच्या नेत्यांकडून जागेवर न्यायनिवाडा करण्याच्या परंपरेचं द्योतक आहे. याचा करावा तेवढा निषेध कमी आहे,” असंही ते म्हणाले.
भाजपा आमदारांनी सोमवारी या प्रकरणी विधानसभेसमोर आंदोलन केलं.
दुसरीकडं, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष म्हणाले की, “चोपडा येथील घटनेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींना काही तासाच्या आतच अटक केली आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल.” माकपच्या काळातही अशा घटना झाल्या होत्या मात्र तेव्हा कोणालाही अटक केली नाही असंही त्यांचं म्हणणं होतं.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस मंगळवारी दिल्लीतून सरळ चोपडा येथे येणार होते. मात्र, ते सिलीगुडीहूनच परतले. पीडितांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र भेटण्यास नकार दिला. राज्यपालांनीच ही माहिती दिली. या प्रकरणी ते केंद्रींय गृहमंत्रालयाला त्यांचा अहवाल सादर करतील.