You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महुआ मोईत्रा यांच्या घरावर CBI चा छापा, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचं हे नेमकं प्रकरण काय आहे?
संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूलच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला आहे.
कोलकात्यातील अलिपूर भागातील रत्नावली नावाच्या इमारतीत नवव्या मजल्यावर महुआ मोईत्रा यांचा फ्लॅट आहे. इथे सीबीआयने छापा टाकला असून, मोईत्रांशी संबंधित कोलकात्यातील इतर ठिकाणीही तपासणी सुरू आहे.
लोकपालांच्या आदेशानुसार सीबीआयनं काल (22 मार्च) महुआ मोईत्रा यांच्यावर एफआयआर दाखल केली होती. लोकपालांनी या प्रकरणात सीबीआयला सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करायला सांगितलं आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारावर लोकपालांनी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते.
8 डिसेंबर 2023 रोजी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचे आरोप होते.
या आरोपांबाबत संसदेच्या समितीने महुआ मोईत्रा यांची चौकशी केली होती. त्या समितीचा अहवाल 8 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर लोकसभा सभागृहात अहवालावर चर्चा झाली. अखेरीस मतदान झालं आणि महुआ मोईत्रा यांचं सदस्यत्व बहुमतानं रद्द करण्यात आलं.
महुआ मोईत्रा यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.
त्यांच्यावर आरोप करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि या आरोपांना प्रसारित करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.
बीबीसीशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी आरोप केला होता की, "भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळे त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे."
मोईत्रा यांच्यावर काय आरोप आहेत?
15 ऑक्टोबर 2023 रोजी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केला की, हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांच्याकडून 'रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेऊन' त्या संसदेत प्रश्न विचारतात, आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्या निलंबनाची मागणी केली.
बीबीसीशी बोलताना महुआ मोईत्रा म्हणतात, “या आरोपात काहीही दम नाही. मी जर भेटवस्तू घेतल्या तर त्याची यादी कुठे आहे? भाजप एका प्रवक्त्याच्या दाव्याचा आधार घेऊन माझ्यावर आरोप लावत आहेत हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.”
निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सांगितलं की, त्यांच्याकडे यासंबंधी ठोस पुरावे आहेत. संसदेत महुआ मोईत्रा यांनी 61 प्रश्न विचारले त्यापैकी 50 प्रश्न अदानी समुहाशी संबंधित होते असं दुबे म्हणतात.
सध्या हे प्रकरण आचार समितीकडे आहे.
दुबे यांनी हे आरोप जय देहाद्राई यांनी सुप्रीम कोर्टात तक्रार दिल्यावर लावले आहेत. जय अनंत देहाद्राई यांनी सीबीआयकडे शपथपत्र दाखल केलं आहे,
महुआ मोईत्रा म्हणतात, “अनंत एक दुखावलेले प्रियकर आहेत. त्यामुळे ही दुखावलेली लोक महिलांच्या चेहऱ्यावर असिड फेकतात. हाही प्रकार असाच आहे. जळफळाटातून त्याने हा प्रकार केला आहे.”
शिष्टाचार समितीला हिरानंदानी यांनी दिलं शपथपत्र
हिरानंदानी समुहाचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी संसदेच्या शिष्टाचार समितीसमोर एक शपथपत्र दिलं आहे. त्यात महुआ मोईत्रा यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत.
मोईत्रा यांनी हे आरोप खारिज केले आहेत. ते एक अप्रुव्हर एफिडेव्हिट आहे. ते विना लेटर हेड साध्या कागदावर लिहिलं आहे.
अप्रुव्हर असा व्यक्ती असतो जो एखाद्या प्रकरणात आरोपी असतो आणि नंतर तो माफीचा साक्षीदार होतो.
बीबीसीशी बोलताना महुआ म्हणाल्या, “हिरानंदानी माझे जुने मित्र आहेत. त्यांना हे शपथपत्र लिहायला लावलं आहे. भाषेवरून असं वाटतं की बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून सही करवून घेतली आहे.”
अदानी समुहाने काय म्हटलं?
अदानी समुहाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
अधिवक्ता जय अनंत देहाद्राई यांच्या आरोपाचा उल्लेख करत ते म्हणाले, “महुआ मोईत्रा आणि हिरानंदानी यांनी अदानी यांना लक्ष्य करण्यासाठी कट रचला.”
काही लोक अदानी समुहाला टार्गेट करण्यासाठी ओव्हटाईम करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
पाळीव कुत्रा हेन्रीवरून आरोप
देहाद्राई यांनी आरोप लावला की त्यांनी त्यांचा कुत्र्याला, हेन्रीला यासाठी ठेवलं आहे जेणेकरून सीबीआयला प्रवेश करण्यापासून रोखलं जावं. हा कुत्रा महुआ मोईत्राने किडनॅप केला आहे. त्यांनी या कुत्र्याचा फोटोही शेअर केला आहे.
देहाद्राई यांनी लिहिलं हेन्रीलाला परत करण्याच्या बदल्यात सीबीआयकडे केलेली तक्रार परत घेण्याचा प्रयत्न केला गेला होता.
ते म्हणाले, “मी त्याला स्पष्ट नकार दिला. मी सीबीआयला सगळी माहिती देणार.”
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार महुआ मोईत्राआणि देहाद्राई यांच्यात जवळचे संबंध होते.
सध्या हा कुत्रा महुआ यांच्याकडे आहे. त्यांनी हेन्रीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.