You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महुआ मोईत्रा ममता बॅनर्जींचंही का ऐकत नाहीत?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महाकाली देवीबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांनी केलेल्या वक्तव्यावरून पक्षानं हात झटकले आहेत. मात्र, महुआ मोईत्रा आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
त्या याबाबत ट्वीटही करत आहेत आणि मुलाखतींद्वारे आपली भूमिकाही मांडत आहेत.
तृणमूल काँग्रेसमध्ये असं फार कमी वेळा पाहायला मिळतं की, पक्षाने एखाद्या खासदार किंवा आमदारानं केलेल्या वक्तव्यापासून हात झटकलेत आणि त्यानंतरही त्या संबंधित नेत्यानं आपली ती वक्तव्यं कायम ठेवलीत.
त्यामुळे महुआ मोईत्रा यांच्या राजकीय प्रवास आणि भविष्यातील वाटचालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत.
महुआ यांच्या या आक्रमकतेचं गुपित काय आहे? तृणमूल काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल का? ममता बॅनर्जींसोबतच्या त्यांच्या नात्यात कडवटपणा आलाय का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसीने महुआ मोईत्रा यांच्याशी मुलाखतीसाठी वेळ मागितला. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीच प्रतिसाद मिळाला नाहीये.
गुरुवारीही महुआ मोईत्रांनी 'सावधान महुआ' नावाची इंग्रजीतली कविता ट्वीट केली. या कवितेचा आशय असा होता की, 'मला सतर्क करण्यापेक्षा माझ्यासोबत उभं राहण्याची वेळ आहे.'
ज्यावेळी राष्ट्रीय राजकारणात महुआ मोईत्रांचं वक्तव्य वादाचा विषय बनलाय, त्यावेळी पक्ष त्यांच्यासोबत उभा राहताना दिसत नाहीय.
तृणमूल काँग्रेसनं काय म्हटलं?
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांच्याशी बीबीसीने बातचित केली.
त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "महुआ मोईत्रांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत त्यांनी स्वत:च उत्तर दिलं पाहिजे. पक्षाचा त्यांच्या वक्तव्याशी संबंध नाही. आमचं म्हणणं आहे की, धार्मिक विषयावर टीका करायला नको होतं. कुणाच्या धार्मिक भावना दुखावतील, असं वक्तव्य पक्षाकडून व्हायला नको. यानंतर जे होईल, त्याला महुआ मोईत्रांना स्वत: तोंड द्यावं लागेल."
हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला इथं वाचता येईल :-काली मां पोस्टरवरून महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्याने नवा वाद
महुआ मोईत्रांच्या वक्तव्यावर मध्य प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौगत राय त्याबाबत म्हणाले की, "महुआ मोईत्रा यांच्याविरोधात पक्ष पावलं उचलेल की नाही, याबाबत पक्षात चर्चा होतेय. त्यांच्यावर काही दंडात्मक कारवाई करावी का, याबाबत विचार सुरू आहे. जो काही निर्णय असेल, तो तुम्हाला माहिती पडेल."
महुआ मोईत्रांनी तृणमूलच्या ट्विटर हँडलला केलं अनफॉलो
तृणमूलनं महुआ मोईत्रांपासून चार हात लांब राहण्याचं ठरवल्याचं दिसून येतंय. त्यानंतर महुआ मोईत्रांनी तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलला अनफॉलो केलंय.
याबाबत एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं की, "हे पक्ष आणि माझ्यातील प्रकरण आहे. योग्य व्यासपीठावर त्यातून मार्ग काढला जाईल. राष्ट्रीय टीव्ही चॅनेलवर काही बोलून तुम्हाला लोकांना चर्चेसाठी नवीन विषय देऊ इच्छित नाही."
पक्षासोबत महुआ मोईत्रांचे संबंध काहीसे बिघडल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते आहे.
महुआ आणि ममता बॅनर्जी यांचं नातं कसं आहे?
पश्चिम बंगालचं राजकारण जवळून पाहणारे गौतम लाहिडी सांगतात, "ममता आणि महुआ यांचं नातं अतिशय चांगलं आहे. ममता त्यांना खूप मानतात. त्या काय बोलतात यावरून त्यांचं नातं कसं आहे हे पाहणं योग्य होणार नाही. त्यांच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही."
ते पुढे म्हणतात, "नेत्यांच्या वक्तव्यापासून पक्षाला दूर ठेवण्याची ही पहिली वेळ नाही. आधीसुद्धा हे झालं आहे. याआधी कुणाल घोष, सौगत रॉय यांच्या वक्तव्यापासून पक्षाने स्वत:ला वेगळं केलं आहे. अशा प्रकरणी जास्तीत जास्त नेत्याला प्रवक्तेपदावरून हटवतात. कारवाईच्या नावावर पक्षात अशीच कारवाई होते."
महुआ यांच्या आताच्या वागण्यावर ते म्हणतात, "महुआची वागणूक आधीपासून अशीच आहे. अशा प्रकारच्या वागणुकीसाठीच त्या ओळखल्या जातात. त्यांची वक्तव्यं कायम आक्रमक असतात. मग ते प्रवक्ता म्हणून केलेले वक्तव्यं असो की संसदेत केलेली भाषणं असो."
अदानींवर ट्विट आणि महुआ यांचं उत्तर
आक्रमक पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर अडून राहण्याची महुआ यांची ही पहिली वेळ नाही.
अदानी यांच्याबरोबर झालेल्या एका प्रकरणाची आठवण करून देताना ते म्हणतात, "ट्विटरवर गौतम अदानींवर त्या कायम टीका करत असतात. गेल्या वर्षी गौतम अदानी आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही तुमचे जुने ट्विट डिलिट केलेत का? त्यावर त्या म्हणाल्या की ते ट्विट तिथेच आहेत आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे."
त्यावेळीसुद्धा त्यांची भूमिका ममता बॅनर्जींच्या विरोधातच होती.
महुआ यांना ममता बॅनर्जींनी सुनावलं तेव्हा
या ट्विटनंतर ममता बॅनर्जी मोईत्रा यांच्यावर नाराज झाल्या होत्या. एका सार्वजनिक सभेत ते स्पष्टपणे दिसलं होतं.
गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये नादिया जिल्ह्यातील एक प्रशासकीय कामाच्या आढाव्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी त्यांचं नाव घेऊन त्यांना चांगलंच सुनावलं होतं.
या दौऱ्यात ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, "महुआ, मी इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छिते. कोण कोणाच्या बाजूने आहे, कोणाकडून नाही हे सांगण्याची मला गरज नाही. जर कोणी कोणाला आवडत नसेल तर ते यूट्यूब आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या पेरतात. त्याचं एक दिवस राजकारण होतं. मात्र हे नेहमीचं होऊ शकत नाही. एका पदावर एकच व्यक्ती राहू शकेल असं मानणंसुद्धा योग्य नाही."
आता पुढे काय होईल?
गौतम लाहिरी यांच्या मते, "जर पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर त्यांना आता जी प्रसिद्धी मिळतेय ती मिळणार नाही. संसदेत किंवा सार्वजनिक मंचावर बोलण्याची संधी त्यांना मिळणार नाही. मात्र सध्यातरी अशी कोणतीच परिस्थिती समोर दिसत नाही."
"पश्चिम बंगालमध्ये असाच कोणताच पक्ष नाही जिथे त्या जाऊ शकतील, तिथून निवडणूक लढवतील किंवा खासदार होतील. त्या फक्त काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. कारण डाव्या पक्षांचं कोणतंच अस्तित्व आता बंगालमध्ये नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)