इंग्रजांना उसने पैसे देणारे, नवाबांपेक्षाही श्रीमंत असणारे गुजराती सावकार 'वीरजी व्होरा' यांची गोष्ट

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार, संशोधक

पश्चिम भारतात मुघल राजवटीपासून स्वतंत्र मराठा सरकार स्थापन करणारे योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये गुजरातमधील सुरतवर स्वारी केली. त्यांनी तेथील व्यापारी-सावकार वीरजी व्होरा यांची 50,000 ब्रिटिश पौंड मूल्य असलेली मालमत्ता लुटली.

अर्थतज्ज्ञ, पत्रकार आणि लेखक प्रेमशंकर झा यांच्या मते, 17व्या आणि 18व्या शतकातील व्यापारी-सावकार जसं की सुरतचे वीरजी व्होरा, अहमदाबादचे शांतीदास आणि बंगालचे जगतशेठ घराणे यांनी इतकी संपत्ती जमा केली होती की, त्यांनी त्यावेळच्या इटलीच्या समुद्रकिनारी असलेल्या व्हेनिस शहरातील आणि भूमध्य समुद्रावरील जिनिव्हा शहरातील सावकारांना मागं टाकलं होतं.

"हे सावकार ज्यांच्या अधीन होते, अशा राजे आणि नवाबांपेक्षाही ते जास्त श्रीमंत झाले होते," असं झा यांनी त्यांच्या 'क्राऊचिंग ड्रॅगन, हिडन टायगर' या पुस्तकात म्हटलं आहे.

मराठ्यांच्या लुटीनंतरही व्होरांची वैयक्तिक संपत्ती त्यावेळी सुमारे 80 लाख रुपये होती. त्यांना पुन्हा उभं राहण्यास वेळ लागला नाही.

व्होरा हे घाऊक व्यापार, पैशांचे व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. सुरतमधील काही आयातीवर त्यांची मक्तेदारी होती. त्याचबरोबर मसाले, सोने-चांदी, पोवळे, हस्तिदंत, शिसे आणि अफूचा ते व्यापार करत असत.

मुघल काळात व्होरा यांचे सुरतच्या सुभेदाराशी चांगले संबंध होते.

'जेव्हा व्होरा यांना अटक झाली'

मकरंद मेहता यांनी त्यांच्या 'इंडियन मर्चंट्स अँड एंटरप्रिन्युअर्स इन हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्ह' या पुस्तकात भारतीय व्यापाऱ्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेत लिहिलं की:

"सुरतचा सुभेदार मुअज-उल-मुल्क मीर मुसा हा इंग्रजांशी व्यापार करायचा."

मेहता यांच्या मते, "मीर मुसाशी चांगले संबंध ठेवण्यासाठी, व्होरा यांनी मीर मुसा व्यापार करत असलेल्या वस्तूंचा इंग्रजांशी व्यवहार केला नाही. नंतर, 1642 मध्ये मीर मुसानं व्होरा यांना मोठ्या प्रमाणात प्रवाळ खरेदी करण्यास मदत केली.

1643 मध्ये व्होरा मीर मुसा याच्याशी असलेल्या संबंधांचा फायदा घेत त्यांनी प्रवाळ, मिरपूड आणि इतर वस्तूंवर मक्तेदारी प्रस्थापित केली."

पुस्तकात म्हटल्याप्रमाणं, "एकदा मीर मुसाच्या अनुपस्थितीत, सुरतच्या सुभेदारानं सर्व मिरची जप्त केली, व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले. ज्यामुळं व्होरांबरोबर त्याचा वाद झाला."

"1638 मध्ये व्होरांवर 50 आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आलं. व्होरांनी शाहजहाँच्या दरबारात त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. बादशाहने त्यांना मुक्त केलं आणि सुभेदाराला बडतर्फ केलं."

व्होरा यांनी शाहजहाँला चार अरबी घोडे दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे.

बाळकृष्ण गोविंद गोखले यांनी 'मर्चंट प्रिन्स वीरजी व्होरा' मध्ये लिहिलं आहे की, व्होरा फर्मच्या भारतातील विविध शहरांमध्ये तसेच पर्शियन गल्फ, लाल समुद्र आणि आग्नेय आशियातील बंदरामध्ये शाखा होत्या.

मेहता यांच्या मते, व्होरा हे अनेकदा खास लवंगांची संपूर्ण खेप खरेदी करत. नंतर ते इतर भारतीय आणि परदेशी व्यापाऱ्यांना स्वतःच्या अटी-शर्तीवर विकायचे.

त्यांनी डब्ल्यूएच मोरलँडच्या आधारे म्हटलं आहे की, व्होरा यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांचा गट 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण माल खरेदी करत असत.

18 जुलै 1643 च्या इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्डमध्ये व्होरा यांचं वर्णन 'युरोपियन वस्तूंचे एकमेव मक्तेदार' असं केलं आहे.

रेकॉर्डमध्ये पुढं म्हटलं आहे की, व्होरा यांनी युरोपियन व्यापारी आणि स्थानिक छोटे व्यापारी यांच्यातील व्यवहार मर्यादित केले. त्यांच्या इच्छेनुसार 'वेळ आणि किंमत' निश्चित केली.

'ब्रिटिश, डचांनीही घेतलं कर्ज'

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनीनं वीरजी व्होरा यांच्याकडून कर्ज घेतलं होतं.

मेहता यांनी लिहिलं आहे की, व्होरा यांनी कधीही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी स्पर्धा केली नाही. पण, ते सुरतमधील त्यांचे सर्वात मोठे कर्जदार आणि ग्राहकही होते.

दोघांमध्ये अनेकवेळा भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि पत्रव्यवहार होत असे. व्होरा घेत असलेल्या उच्च व्याजदरांबद्दल ब्रिटिशांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. व्होरा त्यांच्याकडून मासिक 1 ते 1.5 टक्के दरम्यान व्याज घ्यायचे.

गोखले यांनी एका इंग्रजी रेकॉर्डचा दाखला दिला आहे. त्यात म्हटलंय की, "सुरत शहरात पैशाची मोठी टंचाई आहे. वीरजी व्होरा हे एकमेव मालक आहेत. व्होरा यांच्याशिवाय कोणीही कर्ज देऊ शकत नाहीत."

आरजे ब्रँड्सने त्यांच्या 'द अरेबियन सीज: द इंडियन ओशन वर्ल्ड ऑफ द सेव्हेंथ सेंचुरी' या पुस्तकात लिहिलं आहे की, भारतातील डच ईस्ट इंडिया कंपनीला वीरजी व्होरा आणि त्यांचे जवळचे सहकारी शांतीदास झवेरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भांडवल मिळाले होते.

गोखले यांच्यानुसार, व्होरा यांनी अनेक इंग्रजी व्यापाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व्यवसायासाठीही पैसे दिले होते. ज्यावर कंपनीच्या लंडन कार्यालयानं सक्त शब्दांत असहमती दर्शवली होती.

डच आणि ब्रिटिश दोघेही व्होरा सेवा आणि हुंडी किंवा डिमांड ड्राफ्ट, ट्रॅव्हलर्स चेक यांसारख्या कागदपत्रांचा वापर सुरतहून आग्राला मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यासाठी करत.

डच व्यापारी अहवालानुसार, व्होरांची सुरत व्यापार आणि बाजारपेठेवरील आर्थिक पकड युरोपियन व्यापाऱ्यांसाठी कायमचा अडथळा निर्माण करणारी ठरली होती.

1670 पर्यंत व्होरा याचं वय वाढलं होतं. त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या दुसऱ्या आक्रमणामुळं त्यांचं आणखी मोठं नुकसान झालं.

इंग्रज आणि डचांच्या अभिलेखांमध्ये 1670 नंतरच्या सुरतच्या व्यापारी आणि दलालांमध्ये त्यांचा उल्लेख आढळत नाही.

मेहता यांच्या मते, जर व्होरा 1670 नंतर जिवंत असते तर त्यांचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रांमध्ये केला गेला असता. त्यामुळं व्होरा यांचा 1670 मध्ये मृत्यू झाला असावा असा त्याचा अंदाज आहे.

परंतु, व्होरा यांनी व्यवसायातून निवृत्ती घेऊन त्यांचा नातू नानचंद याच्याकडे व्यवसाय सोपवला असावा, असं गोखले यांचं मत आहे. त्यांच्यानुसार 1675 मध्ये व्होरांचा मृत्यू झाला असावा.

'शांतीदास : राजेशाही सराफ व्यापारी'

आता शांतीदास यांच्याबद्दल बोलूयात...

मेहता यांच्या मते, त्यांना मुघल दरबार आणि राजघराण्यात शाही झवेरी म्हणून विशेष प्रवेश होता.

शांतीदास दागिने आणि इतर व्यवसायात नावारूपाला आले होते. ते मुघल राजघराणं, उच्चभ्रू वर्गांसह श्रीमंतांना दागिने, आभूषणं विकत.

शांतीदास यांना राजघराण्याला दागिने देण्यासाठी निवडलं गेले असल्याचं सम्राट जहाँगीर आणि दारा शिकोह यांनी यांच्या आदेशात म्हटलं होतं.

विल्यम फॉस्टरने इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये लिहिलं आहे की, शांतीदास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच, पर्शियन आणि अरब व्यापाऱ्यांशीही व्यापार करत असत. त्यांच्या व्यापारातील वस्तूंमध्ये लवंग आणि इतर विविध वस्तूंचा समावेश होता.

सप्टेंबर 1635 मध्ये शांतीलाल आणि इतर काही व्यापाऱ्यांच्या मालावर ब्रिटिश चाच्यांनी हल्ला करून त्यांना लुटलं.

पण शांतीदास यांनी आपले राजकीय संबंध आणि प्रभावाचा वापर करुन इंग्रजांकडून आपलं नुकसान भरून घेतलं.

शांतीदास यांचा मुलगा वकचंद आणि नातू कौशलचंद यांनी देखील व्यापारात प्रसिद्धी मिळवली. जेव्हा मराठ्यांनी अहमदाबाद लुटण्याची धमकी दिली. तेव्हा कौशलचंदने पैसे देऊन शहराला विनाशापासून वाचवलं होतं.

त्याचप्रमाणे, जगतशेठ हे श्रीमंत व्यापारी, बँकर आणि सावकार कुटुंब होतं. ते बंगालच्या नवाबांच्या काळात प्रमुख होते.

विल्यम डॅलरिम्पल यांनी त्यांच्या 'द अनार्की' या पुस्तकात लिहिलं आहे की, त्यांचा प्रभाव युरोपमधील रॉथस्चाइल्ड कुटुंबाइतका मोठा नव्हता.

परंतु 17व्या आणि 18व्या शतकातील मुघल साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्यांच्या प्रभावाची तुलना युरोपीय आर्थिक व्यवस्थेतील रोथस्चाइल्ड कुटुंबाच्या भूमिकेशी केली जाऊ शकते.

या घराण्याचे संस्थापक हिरानंद शाह, जे राजस्थानच्या नागौरचे रहिवासी होते. 1652 मध्ये ते पाटण्याला आले.

1707 मध्ये, त्यांचा मुलगा माणिकचंद यांनी मुघल राजपुत्र फारुखशाहला आर्थिक मदत केली. ज्याच्या बदल्यात त्यांना जगतशेठ, म्हणजे 'वर्ल्ड बँकर' ही पदवी मिळाली.

माणिकचंद यांनी बंगालचा पहिला सुभेदार मुर्शिद कुली खानला ढाका सोडून हुगळी नदीच्या किनाऱ्यावर मुर्शिदाबादला स्थायिक होण्याचा सल्ला दिला. माणिकचंद त्याचे दिवाण झाले.

रॉबर्ट ओरम यांनी जगतशेठ कुटुंबाचं वर्णन मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली हिंदू व्यापारी कुटुंब म्हणून केलं आहे.

'ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकृत इतिहासकार'

जगतशेठ कुटुंबाची संपत्ती आणि प्रभाव असा होता की, त्यांच्याशिवाय मुघल साम्राज्याचे आर्थिक धोरण प्रगती करू शकले नसते आणि बंगालची अर्थव्यवस्थाही चालू शकली नसती.

जगतशेठ यांची आर्थिक भूमिका बँक ऑफ इंग्लंडसारखीच होती.

या कुटुंबानं बंगाल सरकारला विविध आर्थिक सेवा पुरवल्या. यात महसूल किंवा करवसुली, हुंडी आणि कर्जांचा समावेश होता.

बंगालमधील नाणे तयार करण्यावर त्यांची पूर्ण मक्तेदारी होती. त्याचबरोबर मुघल खजिन्यासाठी वार्षिक महसूल गोळा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पत्रकार सहाय सिंग यांनी एका लेखात लिहिलं आहे की, नवाबांपासून ते फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश कंपन्यापर्यंत सर्व त्यांचे कर्जदार होते.

1714 मध्ये माणिकचंद यांचं निधन झालं. तोपर्यंत त्यांनी भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आपल्या व्यावसायिक कंपनीच्या शाखा सुरू केल्या होत्या.

सय्यद असीम महमूद यांनी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात लिहिलं आहे की, "त्यांचा व्यवसाय मुघल सम्राट, बंगालचा नवाब आणि ईस्ट इंडिया कंपनी तसेच फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांशी होता. त्यामुळं या व्यापारी कुटुंबाची संपत्ती, सत्ता आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला."

"माणिकचंद यांना अपत्य नव्हते. त्यांचा दत्तक मुलगा फतेहचंद यानं आर्थिक व्यवसाय शिखरावर नेला."

1722 मध्ये नवीन मुघल सम्राट मोहम्मद शाहने त्याला 'जगतशेठ' ही पदवी दिली.

फतेहचंदने मुर्शिदाबादपासून दिल्ली आणि गुजरातपर्यंत आपल्या कंपनीच्या शाखांचं जाळं तयार केलं.

राजे आणि नवाबांपासून ते जमीनदार, व्यापारी आणि अगदी परदेशी व्यापारी कंपन्यांनाही तो व्याजावर मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ लागला.

इतिहासकार लिहितात की, 1718 ते 1730 पर्यंत कंपनीनं त्यांच्याकडून दरवर्षी 40 लाख रुपये कर्ज घेतले होते.

प्लासीच्या लढाईत (1757) सिराज-उद-दौलाबरोबर पराभव झाल्यानंतर, रॉबर्ट क्लाइव्हनं जगतसेठ मेहताबचंद यांच्या पाठिंब्यानं ब्रिटिश राजवटीचं नेतृत्व केलं.

सुदीप चक्रवर्ती यांनी त्यांच्या 'प्लासी: द बॅटल दॅट चेंज द कोर्स ऑफ इंडियन हिस्ट्री' या पुस्तकात लिहिलं आहे की, "जगतशेठ कुटुंबाला अनेक दशकांपासून यशस्वी घोड्यावर सट्टा लावण्याची कला अवगत होती. "

चक्रवर्ती एका घटनेचा हवाला देतात. ज्यामध्ये नवाब सिराज-उद-दौलानं मेहताबराय जगतशेठ यांना ईस्ट इंडिया कंपनी आणि इतर व्यापाऱ्यांकडून 30 लाख रुपये वसूल करण्यात अपयश आल्याबद्दल चापट मारली. हाच तो क्षण होता जेव्हा त्यांच्याविरोधात षड्यंत्र सुरू झालं.

पत्रकार मंदिरा नायर यांनी त्यांच्या एका लेखात लिहिलं आहे की, प्लासीची लढाई जास्त रक्तरंजित नव्हती.

"ही लढाई पूर्वनियोजित होती. क्लाईव्हचा हेतू एका आज्ञाधारक नवाबला गादीवर बसवण्याचा होता. सिराज-उद-दौलानं मीर जाफरला पदावरुन हटवलं होतं म्हणून तो सर्वोत्तम उमेदवार होता."

परंतु क्लाइव्हचा आणखी एक शक्तिशाली सहकारी होता: बँकिंग कुटुंबाचे प्रमुख मेहताबराय 'जगतशेठ'. ज्यांनी तत्कालीन अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवलं होतं.

ते म्हणाले, "मीर जाफरची भूमिका जगजाहीर आहे. परंतु सिराजला हुसकावून लावण्याच्या या कटातील जगतशेठची भूमिका सत्ताधारी वर्तुळ वगळता मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित केली गेली आहे. "

'सियार अल-मुतखारीन'नुसार जगतशेठने सिराजविरुद्धच्या मोहिमेत इंग्रजांना तीन कोटी रुपये दिले. ही रक्कम जास्त असू शकते, पण त्यांनी इंग्रजांना पैसा दिले होते हे निश्चित.

चक्रवर्ती यांनी लिहिलं की, सिराज-उद-दौलाचे सहकारी आणि बंगालमधील फ्रेंच मिल्सचे अध्यक्ष जीन लॉ यांच्यानुसार, "हेच लोक या क्रांतीचे खरे प्रेरक आहेत. त्यांच्याशिवाय ब्रिटिश हे सर्व कधीच करू शकले नसते.

या पाठिंब्यानंतर जगतशेठ कुटुंबाच्या पतनास सुरुवात झाली.

1763 मध्ये बंगालचा नवाब मीर कासिम अली खानच्या आदेशानुसार मेहताबचंद आणि त्यांचा चुलत भाऊ स्वरूपचंद यांची हत्या करण्यात आली. कुशालचंद यांच्याकडे कुटुंबाचं प्रमुखपद होतं. परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे व्यवसाय कोलमडला.

1912 मध्ये जगतशेठचा शेवटचा वारस मरण पावला आणि कुटुंब ब्रिटिश सरकारच्या पेन्शनवर जगू लागलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)