बिरसा मुंडा : 25 व्या वर्षी इंग्रजांना जेरीस आणणारा कार्यकर्ता

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तो दिवस होता नोव्हेंबर 1897 चा. बरोबर 2 वर्ष 12 दिवसांचा तुरुंगवास भोगल्यानंतर बिरसा मुंडा यांची सुटका करण्यात आली. त्यांच्यासोबत डोंका मुंडा आणि माझिया मुंडा या दोन साथीदारांची देखील सुटका करण्यात आली.

हे तिघे तुरुंगाच्या मुख्य गेटच्या दिशेने निघाले. तुरुंग लिपिकाने सुटकेच्या कागदपत्रांसह त्यांच्या सोबत कपड्यांचं एक छोटं बंडलही दिलं.

आपल्या जुन्या सामानावर नजर मारताना बिरसा थोडेसे अस्वस्थ झाले. त्या सामानात त्यांची चप्पल आणि पगडी नव्हती.

बिरसा यांनी आपले साथीदार डोंका यांना आपल्या चप्पल आणि पगडीविषयी विचारलं, इतक्यात तुरुंगाधिकारी म्हणाला की, फक्त ब्राह्मण, जमीनदार आणि सावकार यांना चप्पल आणि पगडी घालण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त आयुक्त फोर्ब्स यांनी तुमची चप्पल आणि पगडी न देण्याचे आदेश दिले आहेत.

हे ऐकून बिरसा यांचे साथीदार काही बोलणार इतक्यात बिरसा यांनी हातवारे करून त्यांना शांत बसायला सांगितलं. जेव्हा बिरसा आणि त्यांचे साथीदार तुरुंगाच्या गेटमधून बाहेर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी 25 लोक जमले होते.

बिरसा यांना पाहताच त्यांनी 'बिरसा भगवान की जय' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

त्यावर बिरसा म्हणाले, मी देव नाहीये, या लढाईत आपण सगळे एक समान आहोत.

तेव्हा बिरसाच्या साथीदार भारमी म्हणाल्या की, आम्ही तुम्हाला 'धरती आबा' हे दुसरं नाव देखील दिलंय. आता आम्ही तुम्हाला या नावाने हाक मारू.

झारखंडमधील सर्वात आदरणीय व्यक्ती

बिरसा मुंडा यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. वयाची पंचविशी सुद्धा गाठली नव्हती तेव्हा त्यांना हा लढा उभारला. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी मुंडा जमातीत झाला.

त्यांना बासरी वाजवण्याची आवड होती. इंग्रजांविरोधात बंड पुकारणारे बिरसा अगदीच किरकोळ अंगकाठीचे होते. त्यांची उंची फक्त 5 फूट 4 इंच होती.

जॉन हॉफमन त्यांच्या 'एनसायक्लोपीडिया मंडारिका' या पुस्तकात लिहितात की, "त्यांच्या डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसत होती. इतर आदिवासींच्या तुलनेत त्यांचा रंग उजळ होता. त्यांना एका महिलेशी लग्न करायचं होतं. पण ते तुरुंगात गेल्यावर ती प्रामाणिक राहिली नाही म्हणून त्यांनी तिचा विषय सोडून दिला."

सुरुवातीच्या काळात ते बोहोंडाच्या जंगलात मेंढ्या राखायचे. 1940 मध्ये झारखंडची राजधानी रांचीजवळील रामगढ येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराला बिरसा मुंडांचं नाव देण्यात आलं होतं.

बिरसा मुंडांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 2000 मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली.

ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि नंतर सोडलाही

बिरसा मुंडा यांचं प्राथमिक शिक्षण सालगा येथे जयपाल नाग यांच्या देखरेखीखाली झालं. एका जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण इंग्रजांनी आदिवासींच्या धर्मांतराची मोहीम आखलीय असं वाटताच त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडला.

त्यांच्याविषयीचा एक किस्सा झारखंड भागात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या एका ख्रिस्ती शिक्षकाने मुंडा लोकांसाठी अपशब्द वापरले. याचा विरोध म्हणून बिरसा यांनी वर्गावर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांना वर्गात बसू दिलं नाही आणि शाळेतूनही काढून टाकलं.

पुढे त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून 'बिरसैत' हा नवा धर्म स्थापन केला. मुंडा आणि उराँव जमातीचे लोक या धर्माचं पालन करू लागले. इंग्रजांच्या धर्मांतर धोरणाला त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिलं होतं.

बिरसा मुंडा यांच्यावर 500 रुपयांचा इनाम

बिरसा यांनी 1886 ते 1890 अशी चार वर्ष चाईबासा या ठिकाणी व्यतीत केली. आणि याच ठिकाणाहून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी चळवळ सुरू झाली. यावेळी त्यांनी एक घोषणा दिली होती

"अबूया राज एते जाना/ महारानी राज टुडू जाना" (म्हणजे आता महाराणीचं राज्य संपलं असून मुंडा राज सुरू झालं आहे.)

बिरसा मुंडा यांनी आपल्या लोकांना सरकार दरबारी कोणताही कर न भरण्याचे आदेश दिले. 19 व्या शतकाच्या अखेरीस, ब्रिटिशांच्या भूमी धोरणाने आदिवासींची पारंपरिक भूमी व्यवस्था मोडकळीस आणली होती.

सावकारांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू केलं होतं. आदिवासींना जंगलातील संसाधने वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. या विरोधात मुंडा लोकांनी 'उलगुलान' नावाची चळवळ सुरू केली.

त्यावेळी बिरसा मुंडा राज्य स्थापनेसाठी प्रेरक भाषणं द्यायचे. के. एस. सिंग त्यांच्या 'बिरसा मुंडा अँड हिज मूव्हमेंट' या पुस्तकात लिहितात, "बिरसा त्यांच्या भाषणात म्हणायचे, घाबरू नका. माझं साम्राज्य सुरू झालंय. सरकारचं राज्य संपलंय. त्यांच्या बंदुका लाकडात रूपांतरीत होतील. जे लोक आडवे येतील त्यांना रस्त्यातून दूर करा."

त्यांनी पोलीस स्टेशन आणि जमीनदारांच्या मालमत्तेवर हल्ले करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणचे ब्रिटिश झेंडे उतरवून मुंडा राज्याचं प्रतीक असलेले पांढरे झेंडे लावण्यात आले. त्याकाळी इंग्रज सरकारने बिरसा यांची माहिती देणाऱ्याला 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. ही रक्कम तेव्हा बरीच मोठी होती.

बिरसा यांना 24 ऑगस्ट 1895 रोजी पहिल्यांदा अटक करून दोन वर्षांची शिक्षा करण्यात आली. पुढे तुरुंगातून सुटून आल्यावर ते भूमिगत झाले आणि इंग्रजांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी गुप्त बैठका घेऊ लागले.

सरदार चळवळीतून प्रेरणा

बिरसा मुंडा यांची चळवळ सुरू होण्याआधी म्हणजेच 1858 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सरदार चळवळ सुरू झाली होती. वेठबिगारी संपविण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याचवेळी रांची जवळील सिलागाईन गावात बुधू भगत यांनी आदिवासींना इंग्रजांविरुद्ध संघटित केलं होतं.

त्यांनी संघटित केलेल्या 50 आदिवासी लोकांजवळ धनुष्यबाण असायचे. 'अबुआ दिसोम रे, अबुआ राज' अशा घोषणा ते द्यायचे, म्हणजेच हा आमचा देश आहे आणि आम्हीच त्यावर राज्य करू. जेव्हा केव्हा एखादा जमिनदार किंवा पोलिस अधिकारी लोकांना त्रास द्यायचे तेव्हा बुद्धू आपल्या लोकांसह त्यांच्या घरावर हल्ले चढवायचा.

तुहिन सिन्हा आणि अंकिता वर्मा त्यांच्या 'द लीजेंड ऑफ बिरसा मुंडा' या पुस्तकात लिहितात, "एकदा मोहिमेवर जाण्यापूर्वी बुद्धू आणि त्याचे साथीदार शंकराच्या मंदिरात पूजा करायला गेले. मंदिराजवळ गेले तर तर मंदिर आतून बंद होतं. आता काय करायचं असा विचार करत असतानाच 20 पोलीस मंदिरातून बाहेर आले आणि त्यांच्यात झडप झाली. यात बुद्धूसह 12 आदिवासी मारले गेले तर बाकीच्यांना कैद करण्यात आलं."

असं म्हणतात की बुद्धूला दहा गोळ्या लागल्या तरी मरता मरता तो म्हणाला, "आज तुम्ही जिंकलात, पण ही तर सुरुवात आहे. एक दिवस आमचं 'उलगुलान' तुमची सत्ता उखडून टाकेल."

डोंबारी डोंगरावर सैनिकांसोबत झडप

1900 साल उजाडेपर्यंत बिरसांचा संघर्ष छोटा नागपूरच्या 550 चौरस किलोमीटरवर पसरला होता. 1899 मध्ये या संघर्षाची व्याप्ती आणखीन वाढली. त्याचवर्षी 89 जमीनदारांची घरं पेटविण्यात आली होती. आदिवासींचं बंड एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलं की, रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सैन्याकडे मदत मागितली.

डोंबारी टेकडीवर आदिवासी आणि सैन्यात युद्ध झालं. के.एस.सिंग त्यांच्या पुस्तकात लिहितात, "सैनिकांना पाहताच आदिवासींनी धनुष्यबाण आणि तलवारी चालवायला सुरुवात केली. इंग्रजांनी मुंडारी दुभाष्यामार्फत त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगितलं. बंदुकीच्या पहिल्या तीन फैरी झाडण्यात आल्या, पण त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. बिरसांनी भाकीत केलं होतं की, इंग्रजांच्या बंदुका लाकडात आणि गोळ्या पाण्यात बदलतील. हे भाकीत खरं ठरल्याचं आदिवासींना वाटू लागलं.

त्यांनी मोठ्या मोठ्याने ओरडून या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. यानंतर इंग्रजांनी बंदुकीच्या दोन फैरी झाडल्या. यात दोन 'बिरसैत' मारले गेले. तिसऱ्या फैरीत तीन आदिवासी कोसळले. यानंतर ब्रिटिश सैनिकांनी डोंगरावर हल्ला केला. आदिवासी मागच्या बाजूने पळून जाऊ नये म्हणून म्हणून अर्ध्या सैनिकांना डोंगराच्या मागच्या बाजूला पाठवलं होतं.

के एस सिंग लिहितात की, "या हल्ल्यात शेकडो आदिवासी मारले गेले आणि टेकडीवर मृतदेहांचा खच पडला होता. गोळीबारानंतर ब्रिटिश सैनिकांनी आदिवासींचे मृतदेह दऱ्यांमध्ये फेकून दिले तर जखमींना जिवंत पुरलं."

या हल्ल्यादरम्यान बिरसाही तिथेच होते, पण तिथून पळ काढण्यात ते यशस्वी ठरले. असं म्हटलं जातं की, या हल्ल्यात सुमारे 400 आदिवासी मारले गेले. पण ब्रिटीशांच्या हाती केवळ 11 मृतदेह लागले.

चक्रधरपूरजवळ अटक

3 मार्चला इंग्रजांनी चक्रधरपूर जवळील एका गावाला वेढा दिला. बिरसाचे जवळचे सहकारी कोमटा, भरमी आणि मौएना यांना अटक करण्यात आली. पण बिरसा हाताला लागले नाहीत.

तेव्हाच एसपी रॉश यांच्या नजरेस एक झोपडी पडली. तुहिन सिन्हा आणि अंकिता वर्मा लिहितात, "रॉशने आपल्या बंदुकीने त्या झोपडीचा दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून तो काहीक्षण उडालाच. आतमध्ये बिरसा मुंडा मांडी घालून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारच विचित्र हास्य होतं. काही न बोलता ते तिथून उठले आणि बेड्या घालण्यासाठी तयार झाले."

रॉशने एका शिपायाला बिरसांच्या हातात बेड्या घालण्याचे आदेश दिले. ही तीच व्यक्ती होती जिने त्या भागातील ब्रिटिश प्रशासनाला हैराण केलं होतं.

बिरसा यांना अटक झाल्याचं लोकांना कळू नये म्हणून दुसऱ्या मार्गाने त्यांना रांचीला नेण्यात आलं. पण रांचीला पोहोचताच हजारोंचा समुदाय त्यांना बघण्यासाठी आला होता.

माहिती पुरवल्यामुळे बिरसांना अटक

बिरसांच्या अटके संदर्भातील अहवाल सिंहभूमच्या आयुक्तांनी बंगालच्या मुख्य सचिवांना पाठवला होता.

500 रुपयांच्या इनामापोटी मनमारू आणि जरीकल या आजूबाजूच्या गावांतील सात लोकांनी बिरसांचा शोध घ्यायला सुरुवात केली.

आयुक्तांनी आपल्या अहवालात लिहिलं होतं की, "3 फेब्रुवारीला काही लोकांनी सेंतराच्या पश्चिमेकडील जंगलातून धुराचे लोट उठताना पाहिलं. जवळ गेल्यावर त्यांना बिरसा आपल्या दोन तलवारी आणि त्यांच्या बायकांसह दिसले. थोड्या वेळाने बिरसांचा डोळा लागला, त्यांना तशाच अवस्थेत उचलून बंडगाव येथील उपायुक्तांकडे आणण्यात आलं."

बिरसांना पकडून देणाऱ्या लोकांना 500 रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. बिरसा यांना चाईबासाऐवजी रांचीला नेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

बिरसांना बेड्या घालून न्यायालयात हजर केलं

आयुक्त असलेल्या फोर्ब्सने ठरवलं होतं की, सुनावणीच्या दिवशी बिरसांना बेड्या घालून न्यायालयात हजर करायचं. जेणेकरुन लोकांना दिसेल की, ब्रिटीश सरकारशी वाकडं घेतल्याचे काय परिणाम होऊ शकतात.

आयुक्त फोर्ब्स आणि डीसीपी ब्राउन न्यायालयात पुढच्या बाकांवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं. तिथे फादर हॉफमनही त्यांच्या डझनभर साथीदारांसह उपस्थित होते.

इतक्यात बाहेर गोंधळ सुरू झाला, ब्राउन धावतच बाहेर आले. बाहेरचा जमाव बिरसांच्या सुटकेची मागणी करत होता. त्यांच्या सोबत जवळपास 40 सशस्त्र पोलीस आले होते.

तुरुंगात बिरसांना चाबकाने बेदम मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण बिरसांच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. हे दृश्य बघून ब्राऊन खजील झाला त्याला त्याची चूक कळली.

फोर्ब्सचा अंदाज होता की, बिरसा यांना बेड्या घालून न्यायलयात आणल्याने लोकांना समजेल की, ब्रिटीश सरकारशी वाकडं घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात. पण फोर्ब्सचा अंदाज चुकला. घाबरण्याऐवजी लोक बिरसा यांच्या समर्थनार्थ पुढे आले.

तुरुंगात मृत्यू

बिरसांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलं होतं. तिथे कोणाचीही भेट होऊ दिली नव्हती. सूर्यप्रकाश मिळावा म्हणून फक्त त्यांना तासभर कोठडीच्या बाहेर आणलं जायचं.

असंच एकेदिवशी बिरसा झोपेतून उठल्यावर त्यांना खूप ताप चढला होता, अंगात त्राण उरले नव्हते. त्यांचा घसा इतका सुजला होता की पाणी गिळणं ही शक्य नव्हतं. थोड्या दिवसांत त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. अशातच 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

पुढे रांची तुरुंगाचे अधीक्षक कॅप्टन अँडरसन यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या साक्षीत म्हटलं होतं की, "बिरसाचा मृतदेह कोठडीतून बाहेर आणल्यावर खळबळ उडाली. सर्व बिरसैतांना बोलावून बिरसाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितलं. पण भीतीपोटी कोणीही पुढे आलं नाही."

9 जूनला संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर पाणी झालं होतं. लहान आतडं पूर्णपणे नष्ट झालं होतं. शवविच्छेदन अहवालात कॉलरामुळे मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं.

बिरसाच्या साथीदारांचं म्हणणं होतं की, त्यांना विष घालून मारलं होतं. तुरुंग प्रशासनाने त्यांना शेवटच्या क्षणी वैद्यकीय मदतही मिळू दिली नाही. त्यामुळे शंकेला जागा उरली.

अखेरच्या क्षणी बिरसा काही क्षणांसाठी शुद्धीवर आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, "मी शरीरापुरता मर्यादित नाही. उलगुलान (चळवळ) सुरूच राहील."

बिरसाच्या मृत्यूनंतर मुंडा चळवळ शिथिल पडली, पण त्यांच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी ब्रिटिश सरकारने 'छोटानागपूर टेनन्सी अॅक्ट' संमत केला. या कायद्यानुसार बिगर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करता येणार नव्हती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)