एक बंडखोर मुस्लीम राजकुमारी जिनं वाघांची केली शिकार अन् चालवली रोल्स रॉईस

    • Author, शर्लिन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज

संस्थानं आणि राजघराणी म्हटली की जगण्याची विशिष्ट चाकोरी डोळ्यासमोर येते. त्यातही महिलांना फारच चौकटीत जगावं लागतं.

मुस्लीम संस्थानं आणि महिलांच्या बाबतीत तर ही चौकट अधिकच बळकट होती.

मात्र, ही चौकट झुकारून पुरुषांच्या बरोबरीनं संगोपन झालेल्या आणि महिलांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या भोपाळच्या राजकुमारीची कहाणी काही औरच आहे.

भोपाळ संस्थानच्या वारसदार असलेल्या आणि ब्रिटिश राजवटीत आणि नंतर देखील पुरोगामी विचारांनी जगलेल्या एका जिगरबाज राजकुमारीची ही अद्भूत कथा.

आबिदा सुलतान या एका ठराविक चाकोरीत जगणाऱ्या राजकुमारी नव्हत्या.

ती चाकोरी मोडत त्यांनी छोटे केस ठेवले होते, वाघांची शिकार केली होती आणि त्या पोलो उत्तम खेळायच्या. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून विमान उडवलं आणि रोल्स रॉईस कार देखील चालवली.

आबिदा यांचा जन्म 1913 साली भोपाळच्या नवाबांच्या कुटुंबात झाला होता. या कुटुंबात ब्रिटिश राजवटीत एक शतकाहून अधिक काळ भोपाळ संस्थानचा कारभार सांभाळणाऱ्या धाडसी, कर्तृत्ववान बेगम झाल्या होत्या.

भोपाळ संस्थान आणि तिथले नवाब याबद्दल अनेकदा बोललं, लिहिलं गेलं आहे.

महिलांबद्दलचे पारंपारिक, रुढीवादी विचार विशेषकरून मुस्लीम महिलांबाबतचा विचार बाजूला सारून धडाडीनं राज्यकारभार करणाऱ्या कर्तबगार महिलांचा, बेगमांचा वारसा आबिदा यांनी पुढे सुरू ठेवला.

त्यांनी पडदा प्रथेला नकार दिला. सर्वसाधारणपणे मुस्लीम समुदायात पडदा प्रथा असते आणि काही हिंदू महिला पदराने आपला चेहरा झाकत असत. मात्र आबिदा यांनी ही प्रथा नाकारली. त्या वयाच्या 15 व्या वर्षी भोपाळ संस्थानच्या गादीच्या वारस बनल्या.

आबिदा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा कारभार एक दशकाहून अधिक काळ सांभाळला. देश ब्रिटिश राजवटीखाली असताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यात त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या होत्या.

अखेरीस 1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीसाठी देशाची फाळणी होत असताना निर्माण झालेला द्वेष आणि हिंसाचार देखील त्यांनी पाहिला.

घरातील वातावरण आणि संगोपन

आबिदा यांची लहानपणापासूनची जडणघडण त्यांची आजी म्हणजे सुलतान जहान यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. सुलतान जहान या भोपाळच्या अतिशय कडक शिस्तीच्या राज्यकर्त्या होत्या.

आपल्या आजीच्या मार्गदर्शनाखाली आबिदा यांना राज्यकारभार चालवण्यासाठी तयार करण्यात आलं होतं.

2004 मध्ये आबिदा यांचं 'मेमॉयर्स ऑफ अ रिबेल प्रिन्सेस' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. त्यात त्या लिहितात, की कसं त्यांना कुराणचं पठण करण्यासाठी पहाटे चार वाजता उठावं लागायचं. त्यानंतर त्यांचा दिनक्रम हा विविध गोष्टींनी व्यापलेला असायचा.

त्यात आबिदा यांना खेळ खेळणं, संगीत शिकणं, घोडेस्वारी शिकणं यासारख्या गोष्टी कराव्या लागत. त्याचबरोबर फरशी साफ करणं, स्नानगृहाची सफाई करणं यासारखी कामं देखील करावी लागत असत.

आपल्या बालपणाबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "आम्ही मुली आहोत म्हणून आमच्यामध्ये कोणताही न्यूनगंड निर्माण होऊ दिला जात नसे. कोणतीही कमीपणाची वागणूक दिली जात नसे. आमच्यासाठी सर्वकाही समान होतं."

"जे स्वातंत्र्य मुलांना होतं, तेच स्वातंत्र्य आम्हाला देखील होतं. आम्ही घोडस्वारी करायचो, झाडावर चढायचो, आम्हाला आवडेल तो खेळ खेळायचो. आमच्यावर कोणतंही बंधन नव्हती."

आबिदा लहानपणी आक्रमक स्वभावाच्या होत्या. लहान असल्या तरी त्या स्वतंत्रपणे विचार करायच्या. वयाच्या 13 वर्षी जेव्हा त्यांच्या आजीनं त्यांना परदा प्रथा पाळण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी त्यांच्या आजीविरुद्ध बंड केलं होतं.

त्यांच्या या बंडखोर वृत्ती बरोबरच त्यांच्या वडिलांच्या खुल्या विचारसरणीमुळे त्यांना आयुष्यभर या प्रथेपासून दूर राहता आलं.

लहान वयातील लग्न आणि वैवाहिक आयुष्यातील तणाव

आधीच भोपाळ संस्थानच्या वारसदार असलेल्या आबिदा यांना शेजारच्याच कुरवई संस्थानच्या राजघराण्याचा एक भाग होण्याची संधी मिळाली.

त्या 12 वर्षांच्या असतानाच त्यांचं लग्न कुरवई संस्थानचे शासक आणि त्यांचे बालपणीचे मित्र असलेल्या सरवर अली खान यांच्याशी झालं होतं.

आपल्या लग्नाविषयी अबिदा अनभिज्ञच होत्या. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी या लग्नाविषयीच्या मजेशीर अनुभवाबद्दल लिहिलं आहे.

त्या लिहितात की, कसं एक दिवस त्या त्यांच्या भावंडांशी उशीनं दंगामस्ती करत होत्या, तेव्हा त्यांची आजी त्यांच्या खोलीत आली आणि त्यांना लग्नासाठी पोषाख परिधान करण्यास सांगितलं. त्या वधू असल्याचं त्यांना कोणीही सांगितलं नव्हतं.

"कोणीही मला तयार केलं नाही किंवा सांगितलं नाही की, मी कसं तयार व्हावं. त्यामुळे मी निकाह कक्षात गेले, तिथे जमलेल्या महिलांना माझ्या रस्त्यातून बाजूला ढकललं, माझा चेहरा उघडण्यात आला. काहीतरी नव्या प्रयोगासाठी निवडले गेल्यानं मी नेहमीप्रमाणेच नाराज झाले होते," असं त्या लिहितात.

या बातम्याही वाचा:

आबिदा यांच्या लग्नाचा सोहळा तसा नेटकाच होता. त्यांचं लग्न देखील खूप काळ टिकलं नाही. त्यांचा संसार एक दशकाहून कमी काळ टिकला होता.

आबिदा यांच्यासाठी वैवाहिक जीवन तसं कठीण होतं. त्यांचं वय कमी होतं म्हणूनच नाही, तर त्यांच्या कडक आणि धार्मिक संगोपनामुळं तसं झालं होतं.

लैंगिक संबंधाबाबत असलेलं अज्ञान, त्यातून निर्माण होणारं अवघडलेपण, त्याचा वैवाहिक आयुष्यावर झालेला परिणाम याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मोकळेपणाने लिहिले आहे.

"माझ्या लग्नानंतर लगेचच, मला अनेक मानसिक धक्क्यांना, आघातांना तोंड द्यावं लागलं. लग्नानंतर बदलणाऱ्या आयुष्यामुळे मला इतकं भयभीत, सुन्न आणि अस्वस्थ वाटेल हे मला कळलंच नव्हतं," असं त्या लिहितात.

लग्नाबद्दल त्या पुढे लिहितात, "पती आणि पत्नीमधील वैवाहिक संबंध मी कधीच स्वीकारू शकले नाही." परिणामी त्यांचं लग्न टिकू शकलं नाही.

इतिहासकार सिओभान लँबर्ट-हर्ले यांनी दक्षिण आशियातील मुस्लीम महिलांवर आत्मचरित्रात्मक लिखाण केलं आहे. त्यातील पुरुष-महिला संबंध आणि लैंगिक संबंध यावरील त्यांच्या शोधनिबंधात सिओभान यांनी या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे.

यात त्यांनी अधोरेखित केलं आहे की, कसं आबिदा यांनी त्यांच्या पतीबरोबरच्या लैंगिक संबंधांसंदर्भात प्रामाणिक लिखाण केल्यानं मुस्लीम महिला लैंगिक संबंधांबद्दल लिहित नाहीत या गैरसमजाचा बुरखा फाडला. या विषयावर लिहिताना आबिदा यांनी अजिबात भीडभाड न ठेवता मोकळेपणानं लिहिलं आहे.

मुलाचा ताबा आणि जबाबदाऱ्या

आबिदा यांचं लग्न मोडल्यानंतर त्यांनी कुरवई येथील त्यांचं सासरचं घर सोडलं आणि त्या पुन्हा भोपाळला परतल्या. मात्र त्यानंतर त्यांचा मुलगा शाहरयार मोहम्मद खान याचा ताबा कोणाकडे असणार हा एक वादाचा विषय बनला.

या लढाईमुळे हताश झालेल्या आबिदा यांना त्यांच्या मुलापासून वेगळं होण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात पतीला माघार घेण्यास लावण्यासाठी एक धाडसी पाऊल उचललं.

ती 1935 सालच्या मार्च महिन्यातील एक रात्र होती. त्या रात्री आबिदा स्वत: तीन तास कार चालवत थेट कुरवई येथील पतीच्या घरी पोहोचल्या. तिथे त्या पतीच्या बेडरुममध्ये गेल्या, रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं आणि ते त्यांनी आपल्या पतीच्या अंगावर फेकलं.

त्यानंतर आबिदा आपल्या पतीला म्हणाल्या, "एकतर मला ठार करा, नाहीतर मी तुम्हाला ठार करेन."

यानंतर त्या दोघांमध्ये झटापट देखील झाली. ज्यात आबिदा वरचढ ठरल्या. या घटनेमुळे मुलाचा ताबा कोणाकडे राहणार या वादाचा शेवट झाला.

आबिदा यांनी संस्थानाच्या गादीच्या वारसदार म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आई म्हणून आपल्या मुलाचंही संगोपन केलं.

1935 ते 1949 या कालावधीत त्यांनी भोपाळ संस्थानच्या मंत्रिमंडळाचा कारभार सांभाळला. 1949 मध्ये भोपाळ संस्थानचं भारताच्या मध्य प्रदेश राज्यात विलीनीकरण झालं.

ब्रिटिश सरकारनं भारताचं भवितव्य ठरवण्यासाठी बोलावलेल्या गोलमेज परिषदांमध्ये देखील आबिदा उपस्थित राहिल्या. त्यावेळेस आबिदा यांची भेट महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू आणि भारताचे भावी पंतप्रधान जवाहलाल नेहरू यांच्यासारख्या अत्यंत प्रभावशाली नेत्यांशी झाली.

फाळणीचा कटू अनुभव आणि पाकिस्तानला स्थलांतर

त्यावेळेस त्यांनी हिंदू आणि मुस्लीम समुदायांमधील बिघडत जाणारे संबंध अनुभवले. तसंच 1947 मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर उसळलेल्या हिसांचाराचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला.

आपल्या आत्मचरित्रात आबिदा यांनी भोपाळमध्ये त्यांना ज्या भेदभावाला तोंड द्यावं लागलं त्याचं वर्णन केलं आहे. भोपाळमध्ये पिढ्यानपिढ्या शांततेनं राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला 'बाहेरून आलेले' म्हणून कसं वागवलं जाऊ लागलं हेही त्यांनी लिहिलं आहे.

त्यांनी एका मुलाखतीत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या एका अस्वस्थ करणाऱ्या आठवणीबद्दल देखील सांगितलं होतं.

एके दिवशी, भारत सरकारनं त्यांना कळवलं की, मुस्लीम निर्वासितांना घेऊन जाणारी एक ट्रेन भोपाळ रेल्वे स्टेशनवर येणार आहे. त्यानंतर त्या ट्रेनवर देखरेख करण्यासाठी आबिदा रेल्वे स्टेशनवर गेल्या.

"जेव्हा आम्ही रेल्वेचे डबे उघडले तेव्हा त्यातील सर्व प्रवासी मेलेले होते," असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितलं की, या हिंसाचारामुळे आणि भोपाळमधील अविश्वासाच्या वातावरणामुळेच त्यांना 1950 मध्ये पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

आबिदा फक्त आपला मुलगा आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगत शांतपणे भोपाळमधून निघून गेल्या. पाकिस्तानमध्ये त्या राजकारणात सक्रिय होत्या.

आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी लोकशाही मूल्यं आणि महिलांच्या अधिकारांचं नेहमीच समर्थन केलं. 2002 मध्ये पाकिस्तानातील कराची शहरात आबिदा यांचा मृत्यू झाला.

आबिदा पाकिस्तानात गेल्यानंतर भारत सरकारनं त्यांच्या बहिणीला भोपाळच्या गादीचा वारस बनवलं होतं. मात्र आजही भोपाळमध्ये आबिदा यांची आठवण काढली जाते, तिथे आबिदा यांची स्वतंत्र ओळख आहे. भोपाळमध्ये लोक त्यांना 'बिया हुजूर' या टोपणनावानं संबोधतात.

पत्रकार शम्स उर रहमान अलवी भोपाळमधील महिला राज्यकर्त्यांवर संशोधन करत आहेत.

ते म्हणतात, "गेल्या काही वर्षांमधील धार्मिक राजकारणामुळे आबिदा यांचा वारसा संपुष्टात आला आहे. आता त्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही."

"मात्र इतक्या लवकर त्यांचं नाव विस्मरणात जाण्याची शक्यता नाही," असंही शम्स उर रहमान नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)