You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
घाशीराम कोतवाल कोण होता? त्याच्यामुळे पेशवाईत गोंधळ का झाला?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
घाशीराम कोतवाल हे नाव गेल्या 50 वर्षांत एका नाटकामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे महाराष्ट्रात आणि आपल्या राज्याबाहेरही गेलं.
उत्तर पेशवाईमध्ये पुण्यात एक महत्त्वाचं नाव असलेलं नाव नाटकामुळे 1972 साली पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं.
आता 50 वर्षांनी नाटकाची चर्चा मागे पडली असली तरीही तेव्हा सर्वतोमुखी झालेलं घाशीराम कोतवाल हे नाव व्यवस्थित रुळलं आहे. याच घाशीराम कोतवाल प्रकरणाची माहिती आपण येथे घेणार आहोत.
घाशीराम कोतवाल ‘प्रकरण’ पाहाताना तत्कालीन समाजाचं लक्ष वेधून घेणारी एक घटना एवढ्याच अर्थाने त्याकडे पाहाणे योग्य ठरणार नाही.
231 वर्षं उलटली तरी या प्रकरणानं आपलं इतिहासात स्थान कायम राखलं आहे.
त्यासाठी त्यावेळची पेशवाई, पुणे शहरातील व्यवस्था, नाना फडणवीसांची कामकाज करण्याची पद्धती, तेव्हाची न्यायदानाची पद्धती, लोकापवादाचा इतिहासावर होणारा परिणाम याकडेही लक्ष द्यायला हवे.
तरच त्याकडे नीट लक्ष जाऊन ती घटना समजू शकेल.
पुणे शहर कसं होतं?
पेशव्यांनी राज्यकारभारात जम बसवल्यावर पुणे शहराला राजधानीसारखं महत्त्व प्राप्त झालं. कोकणासह वेगवेगळ्या प्रदेशांतून लोक या शहरात राहायला येऊ लागले.
गावपण जाऊ त्याला शहरासारखी कळा प्राप्त होऊ लागली, नवे व्यावसायिक इथं स्थायिक होऊ लागले, व्यापार करू लागले.
1780 च्या आसपास पुण्याची लोकसंख्या अंदाजे 1 लाख 57 हजार इतकी होती पुढच्या 20 वर्षांत ती 6 लाखांवर गेली असावी असा अंदाज काही अभ्यासकांनी मांडला होता. एकूणच या काळात पुणं गजबजलेलं होतं हे समजतं.
घाशीराम कोतवाल प्रकरण 1791 साली घडलं म्हणजे तो तर या गजबाजाटातला अगदी सर्वोच्च बिंदू असेल.
रियासतकार सरदेसाईंनी रियासतीच्या दुसऱ्या खंडात पेशवाईत पुण्याचं महत्त्व कसं वाढत गेलं आहे याबद्दल लिहिलं आहे.
ते लिहितात, “निरोगी हवा, पाचक पाणी, रुचकर अन्न, सुगंधी फुले, स्वादिष्ट फळे यांच्या समवायांत राजकीय ऐश्वर्य, कौटुंबिक स्वास्थ व राष्ट्रीय उमेद या पुण्यनगरांत एकवटल्या होत्या.”
रियासतकारांनी केलेल्या वर्णनावरुन पुण्याचं महत्त्व लोकसंख्या, व्यापार, राजकारण आदी गोष्टींसाठी कसं वाढत गेलं याचा अंदाज येतो. पुण्यात कसबा पेठ ही सर्वात जुनी पेठ होती . त्याबरोबरच शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, गंज, गणेश, मुझफरगंज, नागेश-नारायण या पेठाही त्यावेळेस गजबजल्या होत्या.
वेगवेगळ्या सरदारांचे वाडे, सामान्य नागरिकांची घरं, व्यापार-उदीम या पेठांमधून चालत असे, त्याचप्रमाणे विविध देवळंही या पेठांमध्ये होती.
ज्या भवानी पेठेत घाशीराम कोतवालाचं घर होतं ती पेठ 1767 साली महादेव विश्वनाथ लिमये यांनी माधवराव पेशव्यांच्या आदेशाने वसवली.
तसेच या घटनेशी संबंधित असलेले नाना फडणवीस यांनी हनुमंत पेठ म्हणजे नाना पेठ तर सवाई माधवरावांनी शिवपुरी-रास्ता पेठ विकसित केली.
सवाई माधवरावांच्या काळात इचलकरंजीकर घोरपड्यांनी घोरपडे पेठ वसवली होती.
शहरांची सुरक्षा-व्यवस्था आणि कोतवाली
शहरांच्या रखवालीसाठी शिपाई नेमलेले असत. या शिपायांच्या प्रमुखाला कोतवाल म्हणत. शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी कोतवाल आणि त्याचे कार्यालय म्हणजे कोतवालीकडे असे.
पुण्याचे पेशवे पुस्तक लिहिणारे प्रसिद्ध इतिहासलेखक अ. रा कुलकर्णी लिहितात, कोतवालाच्या कार्यकक्षेत जे महत्त्वाचे तंटे उपस्थित होतील ते सोडविणे, बाजारभाव निश्चित करणे, सरकारी कामांसाठी मजूर पुरविणे, जमिनीच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारांवर नजर ठेवणे, शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची माहिती ठेवणे इत्यादी कामे होती.
मोगलांच्या काळात 1718 साली हसनखान हा पुण्याचा कोतवाल होता. थोरल्या माधवरावांच्या काळात बाळाजी नारायण केतकर नंतर सवाई माधवरावांच्या काळात घाशीराम कोतवाली सांभाळत होते.
एकूणच कोतवालीला या वेगाने आकार घेत असलेल्या शहरात मोठं महत्त्व आल्याचं दिसतं. पुणे वर्णन लिहिणारे ना. वि. जोशी यांनी पुण्यातल्या कोतवालीची माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टननेही प्रशंसा केल्याचं नमूद केलं आहे.
ते लिहितात, “शहरांत फंद फितुरी वगैरे येऊन रहातात त्यांची चवकशी पेठांपेठांमधून कोतवालचे कारकून वगैरे आहेत त्यांजकडून बारकाईने बातमी राखीत जाऊन वरचेवर सरकारांत कळवीत जाणे... शहरात रात्रीची गस्त कोतवालीकडील फिरत्ये त्याजबरोबर कारकून प्यादे चौकस देत जाऊन राखीत जाणे व बारकाईने चोरांचा पत्ता लावून चोर धरून आणून सरकारांत देत जाणे इ.”
नाना फडणवीसांचा पुण्यात आणि पेशवाईत वाढता दबदबा
पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे फार काळ जगले नाहीत. सहा महिन्यांतच त्यांचा 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांची वस्त्रं स्वीकारली. नाना फडणवीस आता माधवरावांबरोबर काम करू लागले.
थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे कनिष्ठ पुत्र नारायणराव पेशवेपदावर आले. नारायणरावांची हत्या झाल्यानंतर अल्पकाळ राघोबादादा आणि नंतर सवाई माधवरावांना पेशवाईची वस्त्रं मिळाली.
नाना फडणवीस आता सवाई माधवरावांना मदत करू लागले. सवाई माधवरावांच्या कारकीर्दीतच घाशीरामाचं प्रकरण उद्भवलं.
पेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी, किल्लेकोट नानांच्या भरवशावर टाकून जात. पराक्रमापोटी ते मोहिमांमध्ये विजयी होत असले तरी त्याचं थोडं श्रेय नाना फडणवीसांनाही दिलं पाहिजे असं मत वासुदेवशास्त्री खरे नोंदवतात.
मोहिमांना लागणारा पैसा, दारुगोळा वेळेच्यावेळेस नाना पाठवत आणि राज्याची काळजी घेत म्हणूनच या मोहिमा पेशव्यांना निर्धोकपणे पार पाडता येत असं ते खरे यांनी लिहून ठेवलं आहे.
माधवरावांच्या कार्यकाळामध्ये नाना फडणवीसांकडे फडणीशीबरोबर अनेक जबाबदाऱ्या आल्या असं 'नाना फडणवीस अँड द एक्स्टर्नल अफेअर्स ऑफ द मराठा एंपायर' या पुस्तकाचे लेखक वाय. एन. देवधर यांनी लिहून ठेवलं आहे.
फडणीशी म्हणजे बजेटची आखणी, हिशेब ठेवणे, ऑडिट आणि पेशव्यांच्या राजधानी जबाबदारी पाहाणे हे काम नानांकडे आलं. तसेच मोहिमांच्यावेळेचीही व्यवस्था त्यांच्याकडे आली.
देवधरांच्या या शब्दांमधून नानांच्या वाढत्या दबदब्याचा अंदाज येतो.
घाशीराम आणि त्याची कोतवाली
घाशीराम कोतवाल याचं पूर्ण नाव घाशीराम सावळादास असं होतं. तो मूळचा औरंगाबादचा होता.
घाशीरामची कोतवालपदी नियुक्ती करताना त्याच्याशी वीस कलमी करार केला गेला. या कलमांत घाशीरामच्या कामाचा उल्लेख केला आहे.
मराठी विश्वकोशातील माहितीनुसार त्यांमध्ये पुढील महत्त्वाची कलमे होती :
- कोतवालीचा अंमल ठरलेल्या रिवाजाप्रमाणे करावा, इमानेइतबारे वर्तन करून लोकांना सुरक्षित ठेवावे.
- नारायण व शनिवार पेठेत कोतवाल चावडी नसल्याने तेथील फंदफितुरी व हालचाल समजत नाही. त्यामुळे तेथे चावड्या घालून फंदफितुरीची बातमी सरकारकडे कळविणे.
- शहरातील रस्ते चांगले करावे. नवीन पडवी, ओटे परवानगी शिवाय झाले असतील, तर ते काढून टाकणे व पुढे होऊ न देणे.
- शहरात रात्री फिरून गस्त घालणे व शहराचा बंदोबस्त राखणे, तसेच बारकाईने चोरांचा पत्ता लावून चोर धरून आणून सरकारात देणे.
- कोतवालीचा दरमहा हिशोब सरकारात जमा करणे.
घाशीरामाने कारभार हातात घेण्याआधी पुण्यात चार पोलीस चौक्या होत्या. त्याने नारायण व शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या बसवल्या.
त्याच्या हाताखाली तीन अधिकारी होते व त्यांच्याकडे कोतवालीतील तीन खाती सोपविली होती. मुजुमदाराकडे दस्तऐवज, अर्ज वगैरे लिहिण्याचे काम असे.
दुसऱ्याकडे कागदपत्रे सांभाळण्याचे काम आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा मिळून पगार वर्षाला 640 रुपये होता असं विश्वकोशातील नोंद सांगते.
नवीन चौक्या व वाढलेला कारभार यांमुळे या पोलीस चौक्यांचे सुद्धा उत्पन्न वाढले. 1790 च्या आसपास या पोलीस ठाण्यांचे उत्पन्न जवळपास सुमारे 27 हजार रुपयांवर गेले.
1791 साली पुण्यात दंडाला पात्र असे फक्त 234 गुन्हे होते. यावरून घाशीरामचा कारभार किती चोख होता, याची कल्पना येते.
या गुन्ह्यात सरकारच्या परवानगी शिवाय वेश्या होणे, परवानगीशिवाय बकरी मारणे, बेवारसी प्रेतांची विल्हेवाट लावणे, स्वतःची जात चोरणे, कुंटीणपणा करणे, वेश्या करण्याकरिता मुली विकत घेणे, एक नवरा जिवंत असताना दुसरा करणे, बायकोला काडी मोडून दिल्यानंतर तिला घेऊन राहणे, कोळ्यांना चाकरीस ठेवणे अशा गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होता, अशी विश्वकोशात नोंद दिसते.
याबद्दल अधिक माहिती देताना पुणेस्थित इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर म्हणाले, “घाशीरामाने हातात कारभार घेतल्यावर शनिवार व नारायण पेठेत चौक्या उभ्या केल्या. इ. स. 1782 मध्ये घाशीरामाच्या ताब्यात मुख्य चावडी आणि सोमवार रविवार, कसबा, वेताळ, गणेश अश्या 5 चावड्या होत्या व हाताखाली 90 शिपाई नेमून दिलेले होते. घाशीरामाच्या विनंतीवरून नारायण आणि शनिवार या पेठांतून आणखी दोन चावड्या बसवून जादा 25 लोक नेमून देण्यात आले. कोतवाल चावडी व या सात चावड्यांवरील दैनंदिन कामकाज सांभाळण्यास कोतवालाच्या हाताखाली सरअमिन, अमिन, दिवाण, दप्तरदार असे अधिकारी होते व ते कोतवालाच्याच हुकमतीखाली होते. या सर्वांचा मिळून पगार वर्षाला 2950 रु. होता.”
“याशिवाय कारकून, प्यादे, स्वार, जासूद, नजरबाज (गुप्तहेर) अशा 124 जणांचा स्वतंत्र ताफा होता. इ. स. 1798 मध्ये त्यात 100 गारदी, 2 दिवटे, 10 नजरबाज, 100 स्वार अशा 212 जणांची वाढ करण्यात आली.”, अशी माहितीही कानिटकर यांनी दिली.
कानिटकर सांगतात, सरकारी प्रशासन यंत्रणेचा एकूण विचार केला तर कोतवाल तसा छोटासा अधिकारी होता. पण त्याच्या हाती दिवाणी-फौजदारी अधिकार एकवटले गेले.
त्याला भरपूर स्वातंत्र्य मिळून तो बडा अंमलदार मानला जाऊ लागला.
कोतवालाला कराव्या लागणाऱ्या कामाचे तपशील अनेक संग्रहात आढळून येतात.
्यावरून गावातील भांडणे, मारामाऱ्या यांचे निकाल देणे, दंड आकारणे, बाजारभावावर नियंत्रण ठेवणे, वजन मापांची तपासणी करणे, खरेदी विक्रीचे दस्तऐवज तयार करणे, सरकारला गरजेप्रमाणे मजूर पुरवणे, लोकसंख्येची नोंद ठेवणे, घरे किती, जप्ती किती, बेवारस किती, सरकार-वाटणीची किती याचा तपशील तयार ठेवणे, शहरात येणाऱ्या-जाणार्या परक्या माणसाची चौकशी करणे. जकात गोळा करणे, रात्री गस्ती, पहारे ठेवून तोफ झाल्यावर शहरात हिंडणाऱ्या माणसाला चौकीत ठेवणे, सार्वजनिक सण, समारंभात बंदोबस्त ठेवणे, श्रावणमास दक्षणेत सुकरता आणणे, सरकारी पाहुण्यांची बडदास्त राखणे, सरकारविरुद्धच्य़ा कटकारस्थानाची बातमी राखून सरकारात वेळीच कळविणे, नवा हुकूम जारी करताना, जुना रद्द करताना दवंडी पिटवणे, चावड्यांवरील हिशोब दरमहा सरकारास दाखवणे, सरकारी कायदे मोडणाऱ्यांपासून दंड वसुल करणे, बेवारस मालमत्ता खालसा (सरकारजमा) करणे, वाहतुकीसाठी रस्ते दुरुस्त राखणे, अनधिकृत बांधकामे नष्ट करणे वाजारा- तील वस्तूंवर सरकारी शिक्के मारणे, पेठा वसवून व्यापार उदीम वाढता ठेवणे, शहरातील अनैतिक गुन्ह्यांचा छडा लावन दंड वसुल करणे, पांथस्थ, बैरागी, यांच्या राहण्या-जेवणाची सोय करणे, सरकारी कैद्यांची देखभाल करणे, निसर्गात होणारे बदल वेळोवेळी सरकारला कळवणे ही कोतवालाची प्रमुख कामे होती, यावरून कोतवालाचा व मुख्य कारभाऱ्याशी किती जवळचा संबंध होता हे स्पष्ट होते.
घाशीरामच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळेस पुण्याच्या रस्त्यांवर जागता पहारा, शहरात येणार्या-जाणार्यांची कसून तपासणी, शहराची सुरक्षा, शहरातील फंदफितुरी शोधणे, चोर्या-जुगार रोखणे, शहराची स्वच्छता इत्यादी कामे बिनाकसूर केली जात होती.
याबाबत पेशव्यांचा बखरकार म्हणतो, “ऐसी कोतवाली मागे कोणी केली नाही व पुढेही करणार नाही.”
घाशीरामाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेलं प्रकरण
नाना फडणवीसांच्या मर्जीतला मानला जाणारा हा कोतवाल एका प्रकरणामुळे मात्र पुण्यातल्या लोकांच्या संतापाचं मुख्य कारण बनला.
हे प्रकरण वादळासारखं तयार झालं आणि घाशीरामाचा जीव गेल्यावरच शांत झालं.
रविवारी रात्री सुरू झालेलं प्रकरण बुधवारी दुपारी संपलं आणि पुण्याच्या इतिहासात ते कायमचं जाऊन बसलं. पुण्यामध्ये सर्व जातीच्या लोकांची वस्ती वाढत होती तशी ब्राह्मणांची संख्याही होती.
यातील अनेक ब्राह्मणांचं अर्थाजनाचं साधन म्हणजे दक्षणा होतं. दक्षणा मिळवण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातल्या ब्राह्मणांची पुण्यात गर्दी होत असे.
अ. रा. कुलकर्णी लिहितात, 'पहिल्या बाजीरावाच्या काळात शनवारवाड्यात दक्षणा वाटप सुरू झाले, त्यानंतर ते शहरात विविध ठिकाणी होत असे. नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याजवळ मोकळ्या जागेत दक्षणा वाटप सुरू केले.'
थोरल्या माधवरावांनी 1765 मध्ये दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक वास्तूच बांधली. त्याला पर्वतीचा रमणा असं नाव पडलं.
सवाई माधवरावांच्या काळात आणि दुसऱ्या बाजीरावांच्या काळात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. घाशीराम कोतवालाचं प्रकरण सवाई माधवरावांच्या काळातच घडलेलं आहे.
दक्षणेचा मूळ उद्देश ज्ञानाला उत्तेजन देणं असं होतं.
श्रावण महिन्यात दक्षणा स्वीकारण्यासाठी शृंगेरी, कांची, श्रीरंगपट्टण, कुंभकोण, तंजावर, रामेश्वर, काशी, कनौज, ग्वाल्हेर, मथुरा इथून ब्राह्मण येत असत. या सर्व ब्राह्मणांची रमण्यात राहाण्याची एकत्र व्यवस्था होत असे. त्याला ‘ब्राह्मण कोंढणं’ असं म्हणत.
ब्राह्मणांचा मृत्यू आणि तयार झालेला तंटा
तर ज्या घटनेमुळे घाशीरामाचा मृत्यू झाला त्याबद्दल अनेक वर्षे चर्चा सुरू राहिली. नाना फडणवीसांचे चरित्र लिहिणारे वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी याबद्दल लिहिले आहे.
त्यांनी लिहिलेल्या वर्णनातील काही भाग आपण पाहू.
ते लिहितात, “पुण्याहून द्रविड ब्राह्मण आपल्या देशास जाण्याकरिता निघोन असामी पसतीस श्रावण वद्य 14 रविवारी प्रहर दिवसास सायंकाळी घाशीराम कोतवाल यांचे बागात जाऊन उतरले. तेथे ब्राह्मणांनी कणसे मळ्यातील मक्याची दहा कणसे तोडली. त्यावरुन माण्याचा व त्यांचा कजिया जाहला. माळ्याने शिवीगाळ केली. त्यावरुन ब्राह्मणांनी त्यास मारिले. त्याजवरुन माळी फिर्याद घेऊन कोतवाल यांजकडे आला आणि सांगितले की, फितवेकरी चोर कोमटी वगैरे आहेत, मळ्यात दंगा करतात, मला मारिले, त्यांचे पारिपत्य केले पाहिजे.”
घाशीरामाकडे तक्रार आल्यानंतर त्याने 25 लोक पाठवून ब्राह्मणांना मारहाण करुन भवानी पेठेतल्या आपल्या वाड्याच्या तळघरात कोंडलं.
रविवारी रात्री ब्राह्मणांना कोंडल्यावर त्यानंतर सोमवारचा अख्खा दिवस गेला. ही गोष्ट मंगळवारी सकाळी मानाजी फाकडे यांना समजली.
त्यांनी जाऊन जबरदस्तीने कुलुपं उघडायला लावली तेव्हा 18 ब्राह्मण घुसमटून मेल्याचं दिसलं. 9 लोक जिवंत होते. त्यातल्या तिघांचा जीव त्याच दिवशी संध्याकाळी गेला आणि 6 लोक मात्र वाचले.
हे सगळं पेशव्यांच्या कानावर घातलं गेलं.
नाना फडणवीसांनी घाशीरामाला बोलावून यामागचं कारण विचारलं तेव्हा हे कोमटी वगैरे जातीचे चोर होते आणि ते अफू वगैरे खाऊन मेले असं त्यानं सांगितलं. त्यानंतर घाशीरामाने मृतदेह जाळण्यासाठी निरोप पाठवला मात्र मानाजी फाकड्यांनी याला विरोध केला.
पेशव्यांनी सांगितल्याशिवाय मृतदेह नेऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे नाना फडणवीसांनी घाशीरामाला पुन्हा काय झाले हे विचारले तेव्हा त्याने जुनंच उत्तर दिलं.
त्याला चौकीत आणल्यावर ब्राह्मणांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली.
शेवटी रात्र झाल्यावर नाना फडणवीसांनी न्यायाधीश अय्याशास्त्री यांना बोलावणं पाठवलं. त्यांनी या प्रकाराला देहांत प्रायश्चित्त असल्याचं सांगितलं.
संतप्त लोकांनी घाशीरामाला हत्तीवर उलटा बसवून पेठांमध्ये फिरवलं आणि रात्री रमण्यामध्ये ठेवलं. त्याच्या राखणीसाठी दोनशे ब्राह्मण बसले.
बुधवारी घाशीरामाला चावडीवर आणलं. त्याला उंटावर बसवून शहरभर फिरवलं त्यानंतर भवानी पेठेच्या पलिकडे नेऊन टाकलं त्यानंतर त्याच्यावर दगड मारुन त्याला मारण्यात आलं.
घाशीरामाने केलेल्या कामाबद्दल आणि त्याला मिळालेल्या शिक्षेबद्दल बोलताना इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर म्हणतात, “घाशीराम कार्यक्षम अधिकारी होता. कोतवाली व पोलीस खाते सुधारण्यासाठी त्याने परिश्रम घेतले. नजरबाज (गुप्त पोलीस) लोक ठेवून त्याने फितुरांस आळा घातला. तसेच नवापुरा नावाची एक नवी पेठ वसविली, राज्याचा महसूल वाढवला; तथापि कर्तव्यदक्षता व क्रौर्य यातला फरक त्याला समजला नाही व हीच गोष्ट त्याच्या देहदंडाच्या शिक्षेला कारणीभूत ठरली.”
खापर नाना फडणवीसांवर
घाशीराम प्रकरणाचं खापर अनेक इतिहासकारांनी नाना फडणवीसांवरही फोडलं आहे.
देशोदेशीच्या, प्रत्येक प्रांतातली खडानखडा माहिती बाळगणाऱ्या नाना फडणवीसांना ही घटना कशी कळली नव्हती? नानांच्या संमतीशिवाय ही घटना पुण्यात झालीच कशी असे प्रश्न तयार केले गेले.
जर अशी घटना घडली तर त्यांचा कारभार सैल होता असं अनुमानही काढण्यात आलं. वासुदेव खऱ्यांच्या मते मात्र हा युक्तिवाद चुकीचा आहे.
ते म्हणतात, “नानांना काही अतींद्रियदृष्टी नव्हती. त्यामुळे हाताखालच्या लोकांची दुष्कृत्ये त्यांना एखादे वेळी ओळखता आली नाहीत तर तो त्यांचा दोष मानता येत नाही. शिवाय अशा एक-दोन उदाहरणांवरुन त्यांचा सर्वच कारभार जुलमी होता असे अनुमान काढणे हा धडधडीत सत्यविपर्यास होय.”
“हल्लीसुद्धा इतका कडेकोट बंदोबस्त असताना सरकारने नेमलेल्या कारभाऱ्याने संस्थानात मन मानेल तसा धुमाकूळ घालावा किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने शिस्तीच्या नावाखाली वाटेल तितके खून पाडावेत असेही प्रकार क्वचित होऊ शकतात”, असं खरे लिहितात.
थोडक्यात इतिहासात घडलेल्या घटनांना, इतिहासातील व्यक्तिमत्वांना आजच्या काळातल्या फुटपट्ट्या लावणं अन्यायकारक ठरू शकतं.
आजही पुण्यामध्ये घाशीराम कोतवालांच्या घराचे काही भाग उभे आहेत. या शहरातील इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या वाड्यांबद्दल इतिहास प्रेमी आणि हेरिटेज वॉक आयोजित करणारे संदीप गोडबोले यांनी बीबीसी मराठीकडे आपलं मत मांडलं.
ते म्हणाले, "काही दशकांपर्यंत पुण्यात 18 व्या आणि 19 व्या शतकातील वाडे शाबूत होते. मात्र आता त्यातले फारच कमी वाडे शिल्लक राहिले आहेत. त्यांचं संवर्धन करावं अशी इच्छा रास्त वाटत असली तरी वाड्याच्या मालकांच्या दृष्टिने ते एक आव्हान असतं. एकीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत आणि दुसरीकडे वाड्यांची देखरेख दुरुस्तीही आवाक्यापलीकडे गेलेली असते. त्यामुळे वाड्याच्या मालकांचा याबाबतीत फार कमी उत्साह दिसून येतो. अर्थात या परिस्थितीला एक रुपेरी कडा आहेच ती म्हणजे पुणे महानगरपालिकेने विश्रामबागवाडा, नाना वाडासारख्या वास्तूंचं संवर्धन केलं आहे. त्याचप्रमाणे भाऊ रंगारींचा वाडाही ट्रस्टद्वारे संवर्धित केला गेला आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)