असईची लढाई : मराठवाड्यातील या छोट्याशा गावातील लढाईने मराठा साम्राज्य आणि भारताचा इतिहास बदलला

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी

"प्लासीच्या लढाईमुळं जसा बंगाल प्रांत ब्रिटिशांना मिळाला, त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य घशात घालायला सुरुवात करण्यास कारणीभूत ठरली ती म्हणजे असईची लढाई."

मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाची अशी ही लढाई मराठवाड्याच्या भूमीवर जालन्याजवळ असई या ठिकाणी झाली होती. त्यामुळं तिला असईची लढाई (Battle of Assaye) असं म्हटलं जातं. या गावाला आसई असंही म्हटलं जातं.

या लढाईत बलाढ्य 50 हजार मराठा सैन्याला अवघ्या 10 हजार इंग्रज सैन्याकडून मात मिळाली आणि त्या एका पराभवानं जणू मराठा राज्य आणि भारताचंच भवितव्य बदलून गेलं.

ब्रिटिशांच्या सैन्याचं नेतृत्व करणारा आर्थर वेलस्ली आणि मराठा सैन्यातर्फे दौलतराव शिंदे तसंच राघोजी भोसले यांच्या नेतृत्वात ही लढाई झाली. शि.म. परांजपे यांच्या पुस्तकानुसार कट, कारस्थानं, कपट या सर्वांचा वापर करत आर्थर वेलस्ली यांनी दौलतराव शिंदेंच्या नेतृत्वातील सैन्याचा पराभव केला होता. त्यांनाच नंतर ड्युक ऑफ वेंलिग्टन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

मराठी विश्वकोशातील माहितीनुसार पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले, पेशवे व म्हैसूरकर यांच्या फौजांनीही इंग्रजांना मदत केली होती.

प्रचंड रक्तरंजित अशा या लढाईत दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणावर तोफा आणि बंदुकांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळंही या लढाईला वेगळं महत्त्व आहे. 23 सप्टेंबर 1803 रोजी ही लढाई झाली होती.

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांनी 'मराठ्यांच्या लढायांचा इतिहास' या पुस्तकामध्ये 1802 ते 1818 या काळातील इतिहास मांडलेला आहे. त्यात त्यांनी असईच्या लढाईचं वर्णन केलं आहे.

पण केवळ मराठा साम्राज्यच नव्हे तर संपूर्ण भारतात इंग्रजांना पाय पसरण्यासाठी या लढाईतील विजयानं वाट मोकळी करून दिली होती. परांजपेंसह अनेक इतिहासकारांनी अशा प्रकारचं मत मांडलं आहे.

इतिहासातील अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची लढाई असूनही असईच्या लढाईचा फारसा उल्लेख होत नाही. ब्रिटिश साहित्यात मात्र दुसरे ब्रिटिश मराठा युद्ध म्हणून याबाबत बरंच काही लिहिलं गेलं आहे.

इतिहासातील सर्वांत रक्तरंजित लढायांपैकी अशी ही लढाई होती. या लढाईच्या वेळची राजकीय पार्श्वभूमी, इंग्रजांनी केलेली कारस्थानं आणि मराठ्यांमध्ये माजलेली दुही या सर्वाचा लढाईवर आणि तिच्या निकालावर परिणाम झाला.

युद्धाची पार्श्वभूमी

ईस्ट इंडिया कंपनीनं 1800 दरम्यान भारतामध्ये विविध भागांवर पूर्णपणे ताबा मिळवयला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय उपखंडातील जवळपास तीन प्रमुख भाग ताब्यात घेतले होते.

त्यात पश्चिम किनारपटट्टीवरील बॉम्बे आताचे मुंबई बंदर, पूर्व किनारपट्टीसह उत्तर आणि दक्षिणेपर्यंतचा मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईच्या जवळचा भाग आणि कोलकातामधील व्यापारी बंदरावर अवलंबून असलेला बंगाल प्रांत यांचा त्यात प्रामुख्यानं समावेश होता. ब्रिटिश बॅटल्स संकेतस्थळावर याचा उल्लेख आहे.

भारताचा दक्षिण भाग म्हणजेच त्यावेळच्या मधील काही भागावर दख्खनवर म्हणजे हैदराबाद आणि म्हैसूरवरही इंग्रजांनी ताबा मिळवला होता. पण किनारपट्टीला लागून असलेल्या तीन प्रांतांवरील ब्रिटिशांच्या सत्तेला एकमेकांपासून दूर ठेवण्याचं काम मराठा राज्यानं केलेलं होतं. मध्य भारतातील उत्तरेतील काही भागापर्यंत परसलेलं मराठा राज्य त्यामुळं ब्रिटिशांसाठी डोकेदुखी ठरलेलं होतं.

पेशवा बाजीराव (द्वितीय), दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, रघुजी भोसले राजे आणि बडोद्याचे गायकवाड या पाच संस्थानांचा त्यात समावेश होता. शिंदे यांनी दिल्लीपर्यंतचा भाग जिंकून त्यात जोडला होता.

पण मराठा सरदारांमध्ये आपसांत असलेल्या स्पर्धेचा मोठा परिणाम या संपूर्ण प्रकरणात पाहायला मिळाला. 1802 मध्ये आपसांत झालेल्या युद्धामध्ये होळकरांनी शिंदे आणि पेशव्यांचा पराभव केला. त्यामुळं पेशव्यांना ब्रिटिशांकडे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडे आश्रय घ्यावा लागला.

त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नर जनरल असलेले लॉर्ड मॉर्निंग्टन अत्यंत आक्रमक आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून होते. त्यांनी पेशव्यांना त्यांची राजधानी पुणे परत मिळवून देण्याच्या बहाण्यानं दक्षिणेकडून म्हैसूर आणि उत्तरेतून अवधमध्ये आक्रमण केलं. पेशव्यांनी ब्रिटिशांचा आश्रय घेतला त्यावेळी वसईचा तह केला आणि हा वसईचा तह या असईच्या युद्धासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला होता.

वसईच्या तहाबाबत दौलतराव शिंदे यांची भूमिका इंग्रजांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. कारण त्यावरून पुढील बरंच काही ठरणार होतं. पण मुळात पुण्यात बाजीरावांना पुन्हा गादीवर बसवण्यासाठी इंग्रजांनी तब्बल 30 ते 35 हजारांची कुमक सोबत आणली होती. त्यामुळं त्यांच्या हेतूवर संशय होताच.

दौलतराव शिंदे आणि होळकरांमध्ये युद्ध सुरू होते. त्यामुळं त्यांच्यात याबाबत सल्लामसलत शक्य नव्हती. त्यामुळं दौलतराव शिंदे यांनी राघोजी भोसले यांच्याशी सल्लामसलत सुरू केली. पण इंग्रजांना लवकरात लवकर त्यांची भूमिका जाणून घ्यायची होती. पण त्यांनी सैन्य तैनातीच्या ज्या अटी ठेवल्या होत्या त्या दौलतरावांना मान्य करणं कठिण होतं.

त्यांना निर्णयाला उशीर होत होता आणि आर्थर वेलस्लीला तयारीसाठी वेळ लागत होता. अखेर तयारी झाल्यावर नाराजीचं कारण दाखवत त्यांनी मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारलं.

ब्रिटिशांचे कारस्थान, 'फोडा आणि राज्य करा'

दौलतराव शिंदे यांच्या लष्करात जे युरोपातील किंवा फ्रेंच अधिकारी होते, त्यांचा फोडण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी म्हणजे मार्कस वेलस्ली आणि आर्थर वेलस्ली यांनी सुरू ठेवला होता.

त्याचे पुरावे परांजपे यांनी 'मराठ्यांच्या लढायांचा इतिहास' पुस्तकात सादर केले आहेत. त्यानुसार लॉर्ड वेलस्लीनं तर शिंदे यांना सोडून येणाऱ्यांसाठी बक्षीसं जाहीर केल्यामुळं अनेक अधिकारी त्यांना मिळाले.

पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शिंदेंसोबत असलेल्या सरदारांसह इतरांना फितवण्याचाही जोरकसपणे प्रयत्न केला. इंग्रजांना मदत करणारे सरदार आणि जहागिरदार यांना पैसे देण्यासाठी देशभरातील कलेक्टरना पत्रंही पाठवण्यात आली होती. दौलतराव शिंदे यांच्याबरोबर असलेल्या फ्रेंच अधिकाऱ्यांनाही लाच दिली.

शिंदेच्या लष्करामध्ये काही इतर मुस्लीम सरदारांच्याही सैन्य तुकड्या होत्या. त्यात बेगम समरू यांच्याही काही तुकड्यांचा समावेश होता. ब्रिटिशांनी या बेगम समरूलाही त्यांच्या जाळ्यात अडकवलं होतं.

बेगम समरू यांना फितवण्यात ब्रिटिशांना यश येत होतं. बेगम समरू खरंच ब्रिटिशाबरोबर जाण्यास इच्छुक असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांना अट घालण्यात आली होती. ती अट म्हणजे शिंदेंच्या लष्कराबरोबर असलेल्या सैनिकांच्या तुकड्या परत बोलावण्याची. असईच्या युद्धात बेगम समरू यांच्या सैन्याच्या दोन पलटनी अचानक निघून गेल्या होत्या, त्यामुळं या युद्धात मोठा फटका बसल्याचं इतिहासात नमूद आहे.

गोहदच्या राजालाही शिंदेंच्या विरोधात भडकावून जाट सैन्याला त्यांच्या विरोधात उभं करण्याचा डाव इंग्रजांनी खेळला होता. त्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच देऊ केली होती. बुंदेलखंडाचा हिंमत बहादूरही इंग्रजांना जाऊन मिळणारा आणखी एक सरदार ठरला. तर बंबूखानाचाही इंग्रजांनी असाच वापर करून घेतला.

उत्तरेला दौलतराव शिंदे आणि रणजीत सिंग यांच्या राज्यांच्या सीमा एकमेकांच्या जवळपास पोहोचल्या होत्या. त्यामुळं शिखांची मदत शिंद्यांना मिळू नये म्हणूनही ब्रिटिशांनी प्रयत्न केले. त्यात शिखांना आपल्या बाजूनं वळवण्यात त्यांना यश आलं नाही, मात्र त्यांना तटस्थ राहण्यासाठी त्यांनी राजी केलं.

पश्चिम बाजूने मदत रोखण्यासाठी इंग्रजांनी गुजरात भागातील भडोच प्रांतातून शिंद्यांची मदत रोखण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्न केले. बडोद्याच्या गायकवाडांनी त्यांना फार काही भीक घातली नाही. पण भिल्ल लोकांना आपल्या बाजूनं करून घेत करत इंग्रजांनी तोही भाग ताब्यात घेतला.

मराठी विश्वकोशातील माहितीनुसार पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले, पेशवे व म्हैसूरकर यांच्या फौजांनीही इंग्रजांना मदत केली होती.

शिंदे आणि भोसले हे दोघं एकत्रितपणे लढणार हे जवळपास स्पष्ट दिसत असल्यामुळं त्यांना कोणत्याही बाजूने मदत मिळू नये या संपूर्ण तजवीज ब्रिटिशांनी केली होती.

अशाप्रकारे पूर्णपणे व्यूहरचना आखल्यानंतर ब्रिटिशांना त्यांचा सर्वांत मोठा म्हणता येईल तो डाव खेळला तो म्हणजे, वसईचा तह.

वसईचा तह

"वास्तविक पाहता तहांनी लढाया मिटवायला हव्या. पण प्रत्यक्षात वसईच्या तहामुळं लढाया मिटण्याऐवजी त्या जास्त पेटल्या", असं या तहाचं चपखल वर्णन काळकर्ते शिवराम परांजपे यांनी पुस्तकामध्ये केलं आहे.

मराठा आणि भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा असा हा 'वसईचा तह' (Treaty of Bassein) पेशवा बाजीराव दुसरा आणि ब्रिटिशांमध्ये झाल होता. 31 डिसेंबर 1802 ही या तहाची तारीख. ईस्ट इंडिया कंपनीनं पश्चिम भारतातील पेशव्यांच्या प्रांतावर ताबा मिळवला त्याला हाच तह कारणीभूत ठरला असं ब्रिटानिकामध्ये म्हटलं आहे.

ब्रिटिशांनी योजना आखून ठेवली होती. ते फक्त एका संधीची वाट पाहत होते आणि त्यांना ही संधी मिळाली ती वसईच्या तहाच्या निमित्तानं. मराठ्यांमध्ये आपसांत असलेलं वैर पाहता त्यावेळी प्रचंड राजकारण आणि कुरघोडीच्या घडामोडी घडत होत्या. त्या सर्वांवर इंग्रजांचं बारीक लक्षही होतं. अशाच एका घटनेनं त्यांना ही संधी मिळाली.

मराठ्यांच्या लढायांचा इतिहास पुस्तकानुसार, विठोजी होळकर यांना पेशवा दुसरे बाजीराव यांनी एका आरोपत हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा दिली. इथंच ठिणगी पडली.

भावाला मिळालेल्या शिक्षेचा सूड घेण्याचा अग्नी यशवंत होळकरांच्या मनात धगधगत होता. त्यामुळं यशवंतराव होळकरांनी थेट पुण्यावर चाल केली. यशवंतराव होळकर भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपला जीव घेणार ही भीती वाटल्यानं पेशव्यांनी पुणे सोडलं आणि सिंहगड, महाड मार्गे ते थेट वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले.

इकडे यशवंतराव होळकरांनी राघोबादादांच्या मुलाला म्हणजे अमृतरावला पेशव्यांच्या गादीवर बसवले. आपली गादी परत मिळावी यासाठी पेशवा बाजीराव दुसरे यांनी इंग्रजांशी तह केला, तोच हा वसईचा तह.

या तहामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार पेशव्यांनी ब्रिटिशांच्या सहा बटालियन (6000 सैन्य) त्यांच्या प्रांतात ठेवणं मान्य केलं होतं. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रदेशही त्यांना देण्यात आला होता. पेशव्यांना किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्यांना त्यांच्या सेवेतून सर्व युरोपियनना काढून टाकावं लागणार होतं. सूरत आणि बडोद्यावरील ताबा सोडावा लागणार होता. तसंच इतर राज्य किंवा राष्ट्रांशी धोरण ठरवताना ब्रिटिशांचा सल्ला घ्यावा लागणार होता.

बाजीरावांना पुन्हा पेशव्याच्या गादीवर बसवण्याच्या निमित्ताने ब्रिटिशांना मराठा राज्यात पास पसरण्याची आणि त्यांची कट कारस्थानं रचण्याची जी संधी मिळाली होती तिचं त्यांनी अशाप्रकारे सोनं केलं. त्यानंतर पुढं जे काही घडलं त्यामुळं हा मराठाच काय पण भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय ठरला.

हाच तह दुसरे मराठा इंग्रज युद्ध म्हणजे असईची लढाई आणि तीन प्रमुख मराठा राज्यांच्या पतनाचं कारण ठरला होता.

प्रत्यक्ष युद्ध कसे झाले

दौलतराव शिंदे, राघोजी भोसले आणि अगदी होळकरांनाही वसईचा तह खटकला होता. होळकर तर विरोधातच लढत होते. पण शिंदे आणि भोसले पेशव्यांच्या बाजूनं असूनही तह मान्य करायला तयार नव्हते.

दौलतराव शिंदे आणि राघोजी भोसले वसईच्या तहाबाबत सकारात्मक भूमिका मांडत नाहीत, तसंच ब्रिटिशांच्या अटी मान्य करत नाहीत, याचा अर्थ त्यांना ब्रिटिशांशी युद्ध पुकारायचे आहे, असा लावून या युद्धाची पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती.

पेशव्यांना गादीवर बसवल्यानंतर काही दिवस पुण्यात राहून नंतर आर्थर वेलस्ली पुण्यातून निघाले. त्यानंतर त्यांनी 11 ऑगस्ट 1803 रोजी अहमदनगरचा किल्ला घेतला. शिंदेंना मिळालेला हा मोठा धक्का होता. त्यांच्या हातून दोन दिवसांत अहमदनगरचा किल्ला गेला.

पण त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी फार काही हालचाली केल्या नाहीत. त्यांचं सैन्य निजाम राजवटीच्या दिशेनं निघालं होतं. त्याचवेळी शिंदे आणि भोसले यांचं सैन्यही निजामाच्या सीमेजवळ आलेलं होतं. ते औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर), जालना, हैदराबादवर हल्ला करणार असं इंग्रजांना वाटत होतं. त्यामुळं इंग्रजांचं सैन्य तिकडं निघालं.

दुसरीकडे स्टिव्हनसन यांचं सैन्यही उत्तरेकडून औरंगाबादच्या दिशेने वेलस्ली यांना मदत करण्यासाठी निघालं होतं. परांजपेंच्या पुस्तकानुसार जनरल वेलस्ली 29 ऑगस्टला औरंगाबादला पोहोचले. तर स्टिव्हनसन यांचं सैन्य जरा उशिराने पोहोचलं. या सर्वाची योजना वेलस्ली आणि लॉर्ड मॉर्निंग्टन यांनी आधीच आखलेली होती.

त्यापूर्वी शिंदे आणि भोसले यांच्या सैन्यानं अजिंठ्याहून पुढं येत जालना जिंकलं होतं. तिथून त्यांना हैदराबादकडं कूच करायचं होतं. पण वेलस्ली आणि स्टिव्हनसन हे दोन बाजूनी येत असल्याचं समजल्यानं ते पुन्हा अजिंठ्याच्या दिशेनं निघाले. ते परत निघाल्यानं स्टिव्हनसनच्या सैन्यानं जालना त्यांच्या ताब्यात घेतलं. त्यामुळं एक मार्ग बंद झाल्यानं शिंदे आणि भोसले यांच्या फौजा उत्तरेच्या दिशेनं निघाल्या.

नंतरच्या जवळपास 15 दिवसांच्या काळात इंग्रज वाट पाहत असलेली रसद त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. पण मराठ्यांनाही इतर राजांकडून मदत पोहोचत होती.

मॅलेसन यांच्या पुस्तकानुसार, इकडे अजिंठ्याच्या घाटाखाली जाफराबाद आणि भोकरदन या गावांदरम्यान मराठ्यांनी तळ टाकला. तर जालन्याजवळच्या बदनापूरमध्ये वेलस्ली आणि स्टिव्हनसन यांचं सैन्य एकत्र झालं.पण त्यांनी एकत्रितपणे एका मार्गावरून न जाता दोन बाजुंनी जाऊन मराठ्यांना घेरण्याची योजना कायम ठेवली आणि तसेच पुढे सरकले.

जनरल वेलस्ली हे बदनापूरहून निघाले आणि 23 सप्टेंबर राजी पहाटे नळणी या गावी पोहोचले. त्यावेळी सहा मैल अंतरावर असलेल्या कळणा नदीच्या खोऱ्यात शत्रूच्या सैन्याचा तळ असल्याची माहिती मिळाली. तिथं पोहोचेपर्यंत त्यांना दुपार झाली. दरम्यान स्टिव्हनसन आणि वेलस्ली यांच्या सैन्यात 8 मैलांचं अंतर होतं. त्यामुळं त्यांची वाट न पाहता शिंदे आणि भोसलेंच्या सैन्याशी भिडायचं असं वेलस्ली यांनी ठरवलं.

ब्रिटिशांच्या तुलनेत मराठ्यांचं सैन्य खूप जास्त होतं. त्यांच्याकडं सुमारे 30 हजार घोडदळ आणि 12 हजार पायदळ (अंदाजे 50 हजार) होतं. तर वेलस्ली यांच्याकडं चार हजारांची ब्रिटिश फौज आणि सुमारे पाच हजार घोडेस्वार (अंदाजे 10 हजार) होते. परांजपे आणि मॅलेसन यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

पण परांजपेंच्या पुस्तकात आणखी एक उल्लेख आहे. त्यानुसार पुण्याचे रेसिडेंट मिस्टर एलफिन्स्टन हे असईच्या लढाईच्या दिवशी दिवसभर वेलस्ली यांच्याबरोबर होते. त्यांच्या चरित्रात सैन्याचा उल्लेख आढळतो. त्यानुसार दोन्ही नद्यांच्या मध्ये असलेल्या मैदानात मराठ्यांचं 50 हजार सैन्य राहणं शक्य नव्हतं. त्यामुळं दोन्ही बाजुंच्या सैन्याचा आकडा कमी अधिक फरकाने सारखा असावा असं त्यांनी म्हटलं आहे.

तीन तास चालला रक्तपात

असईच्या लढाईसंदर्भात उपलब्ध असलेल्या नकाशानुसार केळणा आणि जुई या दोन नद्यांचा पूर्वेला संगम झाला होता. या दोन नद्यांच्या मधल्या भागात मराठा सैन्य होतं. एकप्रकारे बाजूनं असलेल्या पाण्याचा वेढा हा नैसर्गिक खंदकासारखं या फौजेचं रक्षण करत होता. सगळ्या बाजुंचा विचार करता जुई नदीच्या काठी असलेल्या असई गावाच्या दिशेनं लढाईनं वेग घेतला. त्याचठिकाणी प्रामुख्यानं लढाई झाली म्हणून ती असईची लढाई ठरली.

मराठा सैन्य दोन्ही नद्यांच्या मध्ये असल्यानं इंग्रज सैन्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं. पण तसं असलं तर आसपासची गावं नदी ओलांडण्यासाठी एखादा मार्ग वापरत असणार याचा अंदाज वेलस्ली यांनी होता. त्यांनी तो मार्ग शोधला आणि सैन्याला पुढं न्यायाला सुरुवात केली.

अंदाजे तीन वाजेच्या सुमारास सैन्य एकमेकांसमोर उभं राहिलं.

दौन्ही सैन्यांमध्ये पहिला आमना-सामना झाला तोफांच्या माऱ्याने. जनरल वेलस्ली यांनी तोफांचा प्रचंड मारा सुरू केला. पण मराठ्यांच्या शौर्यावर त्याचा परिणाम झाला नाही.

शिवाय मराठ्यांनीही फ्रेंचांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या तोफांचा मारा सुरू केला. त्यानं इंग्रजांचं मोठं नुकसान झालं, आणि अखेर तोफा सोडून पुढं सरकण्याचा निर्णय वेलस्ली यांना घ्यावा लागला.

इंग्रजांनी अत्यंत आक्रमकपणे हल्ला केला. मराठ्यांनीही तेवढ्याच त्वेषानं त्याला तोंड देत सामना केला. पण मराठ्यांच्या तोफांचा मारा सुरू असतानाही इंग्रज सैन्य थांबायला तयार नव्हतं. त्यांनी मराठ्यांच्या तोफाही निकामी केल्या. इंग्रज सैन्य मराठा सैन्याला मागे ढकलत पुढं सरकू लागलं.

सैन्याच्या तुकड्यांची जी रचना मराठ्यांनी केली होती, ती या गोंधळानं पूर्ण विस्कळीत झाली. असं करत मराठा सैन्य जुई नदीच्या पलीकडं सरकलं आणि त्याठिकाणी इंग्रज सैन्यानं तटबंदी केली.

इथंही मराठ्यांच्या गनिमी काव्याची एक झलक दिसली. काही मराठा सैनिकांनी मेल्याचं नाटक करत तोफांजवळ पडून राहिले. इंग्रज सैन्य त्यांच्या जवळून पुढं गेलं, तेव्हा है सैनिक उठले आणि त्यांच्यावर तोफांमधून मारा सुरू केला. मागून हा तोफांचा मारा आणि पुढून मराठा सैन्याचा त्वेषाग्नी यात पुन्हा इंग्रज सैन्य भरडलं गेलं.

पण वेलस्लीचं सैन्य अशा संकटांसाठी सज्ज होतं. सैन्य अडचणीत असल्याचं लक्षात येताच वेलस्ली घोडदळ घेऊन निघाले आणि इंग्रजांवर मागून तोफांचा मारा करणाऱ्या मराठ्या सैन्यावर तुटून पडले. दुसरीकडून मॅक्सवेल जुई नदी ओलांडून पुढं सरकरणाऱ्या मराठा सैन्यावर हल्ला करते झाले.

इंग्रजांची जी स्थिती झाली होती, तीच आता मराठ्यांची झाली आणि आता त्यांच्यावर दोन्हीकडून हल्ला सुरू होता. पण तरीही मराठ्यांनी जो लढा दिला तो एवढा निकराचा होता की त्यात मॅक्सवेल मृत्युमुखी पडला. मोठ्या प्रमाणावर इंग्रज सैनिकही मारले गेले.

मराठ्यांच्या तुलनेत इंग्रजांची हानी जास्त झालेली होती. पण इथंच इंग्रजी सैन्याचे कपट कामी आलं. त्यांनी शिंदेंच्या फौजेतील फ्रेंच अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली होती. ते इंग्रजांच्या बाजूनं झाल्याची मोठी शक्यता इतिहासकार व्यक्त करतात.

शिवाय बेगम समरू यांच्या चार पलटणी मराठा सैन्याबरोबर होत्या. त्याही इंग्रजांना फितूर झालेल्या होत्या. त्यामुळं ऐनवेळी मराठा सैन्य कुचकामी ठरलं. इतरांच्या सैनिकांच्या भरवशावर राहिल्यानं मराठ्यांचा घात झाला असं म्हणायला इथं मोठा वाव आहे.

त्यामुळं तीन तासांत इंग्रजांनी ही लढाई जिंकली आणि मराठा सैन्यानं माघार घेतली. मॅलेसन यांच्या पुस्तकानुसार या युद्धात इंग्रज सैन्यातील जवळपास 428 तर मराठा सैन्याचे 1200 सैनिक मारले गेले होते.

यानंतर मराठा सैन्य अन्वा गावाच्या दिशेनं मराठा राज्यात निघून गेलं.

मुंबई, बेंगळुरूत आजही असईच्या स्मृती

असईमध्ये मराठाच काय पण भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची लढाई झालेली आहे. पण तसं असलं तरी या ठिकाणाबाबतची सरकारी आणि राजकीय अनास्था मोठी असल्याची खंत स्थानिक अभ्यासक डॉ. कैलास इंगळे यांनी व्यक्त केली.

याठिकाणी फक्त थडग्यासारखं किंवा चबुतऱ्यासारखं एक स्मारकवजा ठिकाण आहे. पण त्याचं कुणाला सोयरसूतक नाही. अगदी गावकऱ्यांनाही त्याचं गांभीर्य नाही. इथं एक लढाई झाली होती एवढंच काय ते त्यांना माहिती असं इंगळे म्हणाले.

आम्ही स्वतः शासन स्तरावर पाठपुरवठा केला पण त्या स्तरावर प्रचंड उदासीनता असल्याचं त्यांनी सांगितलं. याठिकाणी कधीतरी इतिहास अभ्यासक, काही इंग्रज पर्यटक किंवा इतर लोक येतात. पण इतर कुणालाही फारसं काही माहिती नाही.

तसं असलं तरी असईची लढाई किती महत्त्वाची होती याची साक्ष देणाऱ्या काही गोष्टी आजही पाहायला मिळतात. असई गावामध्ये तर याच्या स्मृती आहेतच, पण मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांतही या लढाईच्या आठवणी आहेत.

मुंबईत कुलाबा परिसरात असाय बिल्डींग नावाच्या काही इमारती आहेत. या इमारती या असईच्या लढाईच्या आठवणीमध्येच बांधल्या गेल्या असल्याचं अज्ञात मुंबई पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांनी सांगितलं.

आर्थर वेलस्ली हे स्वतः मुंबईत मलबार हिल परिसरात राहत होते. त्यांनी या इमारती आठवणी म्हणून बांधून घेतल्या होत्या. ब्रिटिशांनी अशा अनेक घटनांच्या आठवणींसाठी इमारती बांधल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर मद्रास सॅपर्स किंवा मद्रास इंजिनीअर ग्रुप (MEG) या तुकडीनं या लढाईत इंग्रजांच्या बाजूनं आणि जिंकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बेंगलोर छावणी ही त्यावेळी मद्रास सॅपर्सच्या अंतर्गत होती. त्यामुळं या लढाईच्या स्मृतीप्रित्यर्थ बेंगळुरूतील MEG मुख्यालयाजवळच्या रस्त्याला असाय रोड (Assaye Rode) हे नाव देण्यात आलं आहे.

याचा उल्लेख एका संकेतस्थळावरील लेखातही करण्यात आलेला आहे.

त्याशिवाय मुंबईच्या कुलाबा परिसरातही असाय बिल्डींग नावाच्या काही इमारती आहेत. सध्या या इमारती लष्कराच्या ताब्यात आहेत.

इंग्रजांचा मार्ग प्रशस्त करणारी लढाई

इतिहासकार पुष्कर सोहोनी यांच्या मते, या लढाईनंतर इंग्रजांनी मराठा साम्राज्यामध्ये पाय पसरायला सुरुवात केली. पेशवे किंवा मराठा साम्राज्याचं प्राबल्य कमी करण्याचं काम या लढाईतील इंग्रजांच्या विजयानं केलं.

काही अभ्यासकांच्या मते, 1818 च्या दरम्यान पेशवाईचा शेवट झाला त्याची सुरुवात कुठेतरी ही लढाई किंवा त्याला कारणीभूत असलेल्या वसईच्या तहामध्ये होती.

विविध अंगांनी अभ्यास करता या लढाईचे अनेक दूरगामी परिणाम पाहायला मिळतात. तशीच त्याची वेगवेगळी कारणेही समोर येतात. मराठा सरदारांमधील आपसांतील स्पर्धा हे त्यातलं कारण होतंच. पण ही स्पर्धा आधीही होतीच. त्यामुळं या लढाईत विशेष परिणाम करणारी गोष्ट ठरली ती महादजी शिंदेंसारख्या मुत्सद्दी सेनापतीची उणीव. शिवाय नाना फडणवीस नसल्याचाही फटका बसला होता.

त्याचं कारण म्हणजे मराठा राज्यांमध्ये स्पर्धा आधीही होती. पण वेळप्रसंगी त्यांना एकत्र आणण्याची क्षमता महादजी शिंदेंमध्ये होती. महादजी शिंदेंप्रमाणे दौलतराव शिंदे प्रचंड शूर आणि धाडसी होते. पण कमी अनुभवामुळं तो मुत्सद्दीपणा त्यांच्यात भिनलेला नव्हता. त्यामुळं इंग्रजांच्या कपटाचा सामना ते करू शकले नाहीत. अखेर वसईचा तह आणि असईचा पराभव यामुळं ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया अधिक खोलवर रचला गेला, असं मत सोहोनी मांडतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.