You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
285 वर्षांपूर्वी ‘मराठे’ मुंबईत येऊ नयेत म्हणून आजच्या आझाद मैदानाजवळ खंदक खोदला होता तेव्हा
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
29 ऑगस्टपासून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
याच आझाद मैदान परिसराचं आणि आंदोलनाचं जुनं नातं आहे तसं मराठे आणि या परिसराचं वेगळं नातं आहे.
एखादी घटना वर्तमानात घडत असली तरी प्रत्येक घटनेवर इतिहासाचा मोठा प्रभाव असतो. त्यातही आता होत असलेल्या घडामोडी जणू इतिहासानं चक्र फिरवल्यासारख्या होत आहेत.
एकेकाळी इंग्रजांना मराठ्यांच्या भीतीमुळे अनेक उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. पोर्तुगीजांची वसई जिंकल्यावर ते मुंबईच्या म्हणजे आजच्या मुंबईतील फोर्ट परिसराकडे नक्की येणार असं त्यांना वाटत होतं.
ते समजून घेण्यासाठी आपण थोडं इतिहासाकडे पाहू
गुजरातच्या सुलतानाने 1534 साली मुंबईचा ताबा पोर्तुगीजांना दिला. दीव, वसई, मुंबई असा प्रांत पोर्तुगीजांच्या हातामध्ये आल्यानंतर पोर्तुगीजांनी व्यापार आणि धर्म या दोन्हीचा प्रसार वाढवायला सुरुवात केली.
मुंबईतली भातशेती, इथून होणारा व्यापार याचा सगळा कर पोर्तुगीज मिळवू लागले. नौदलाचा एक चांगला तळही इथं बनला. त्यानंतर इंग्रजांची नजर मुंबईवर गेली.
1612 साली सुआलीचे (स्वाली) युद्ध झाल्यावर ब्रिटिश मुंबईत उतरले. त्यांना मुंबईचं महत्त्वही समजलं. त्यांना नाविक तळासाठी जागाही हवी होती. त्यामुळे मुंबई पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले.
शेवटी 1661 साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांच्या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही देशांमध्ये करार झाला. या विवाहाच्या करारात मुंबई ब्रिटिशांना देण्यात यावी असं निश्चित झालं आणि मुंबई ब्रिटिशांकडे आली.
ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात केली. 1685 साली कंपनीनं आपला कारभार सुरतमधून मुंबईत आणला.
1715 साली चार्ल्स बूनने मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली. संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली.
पोर्तुगीजांबरोबरचे संबंध संपवून शहरातली पोर्तुगीजांची सर्व जागा जप्त केली. पोर्तुगीज धर्मगुरुंनांनी शहराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर मुंबईचा विकास झपाट्याने सुरु झाला. एका व्यापारी केंद्राचं रुपांतर शहरात होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
फोर्ट
ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्येच होत असे. या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री, किंग्ज, चर्च, मूर, रॉयल असे बुरुजही बांधले होते.
मराठे, सिद्दी, आंग्रे यांच्यापासून सततचा धोका लक्षात घेऊन इंग्रजांनी किल्ल्याची तटबंदी नीट करणे, आजूबाजूची झाडे काढून टाकणे. तसेच धारावी, वांद्रे, माहीम इथले किल्ले नीट करणे याकडे लक्ष दिलं होतं.
परंतु अजुनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं. याला आणखी एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम. पेशवे-मराठ्यांच्या वसई मोहिमेपासून दूर राहाण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला होता. मुंबई शहर गॅझेटियर या पुस्तकात जयराज साळगावकर यांनी याबद्दल लिहून ठेवले आहे.
इंग्रजांनी रामजी प्रभू या अनुभवी व्यक्तीला मराठ्यांच्या मनसुब्यांचा अंदाज घ्यायला पाठवले. मराठे पोर्तुगीजांना वेढा घालत होते आणि पोर्तुगीज इंग्रजांना मराठ्यांविरुद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते.
पोर्तुगीजांचा पाद्री मेन्युअल रॉड्रिगो डेस्ट्राडो याला वसईहून मुंबईला मदत मागण्यासाठी पाठवले, पण या पाद्रीने विनंती करुनही इंग्रजांनी अलिप्त राहाण्याचा निर्णय घेतला, असं साळगावकर लिहितात.
मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करुन वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली. मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला.
वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते. तसेच पेशव्यांची ठाण्याचा किल्ला जिंकून सुरू झालेली मोहीम वसई, साष्टीच्या आजूबाजूचा परिसर घेऊन शेवटी रेवदंड्याला संपली होती. त्यामुळे मुंबई फोर्टकडे ते येणं अशक्य नव्हतं.
त्यामुळे कंपनीने सर्वांत आधी कॅ. जेम्स इंचबर्डला चिमाजीअप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आले. चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या 15 अटी घेऊन इंचबर्ड मुंबईला परतला असे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी 'मराठी रियासत'च्या तिसऱ्या खंडात लिहून ठेवले आहे.
त्यानंतर कॅप्टन गोर्डननेही साताऱ्याला जाऊन छ. शाहू महाराजांची भेट घेतली. इंचबर्ड आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली. पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही. त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला घेतला. तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले.
ही रक्कम 30 हजार इतकी होती. खंदक खणायला एकूण खर्च 2.5 लाख इतका झाला. मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे.
हा खंदक आजच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्याच्या मध्ये होता. इतकं होऊनही कंपनी आपला फोर्ट सुरक्षित करतच राहिली.
बुरुज वाढवले, नौदल वाढवले, देशी लोकांची फौजेत भरती करुन घेतली, बोटी बांधायला सुरुवात केली. यावरुन कंपनीने आपला किल्ला मराठे आणि इतरांपासून वाचवण्याचा किती प्रयत्न केला ते दिसून येतं. किल्ल्याच्या तटबंदीला बंदुकीच्या नळ्या घालून त्या वापरता येतील यासाठी लांब छिद्रांची योजना करण्यात आली होती.
किल्ला आणि खंदकाच्या जवळ थोडी मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्याला एस्प्लनेड असं म्हणत. जर मराठे आलेच तर बंदुकीच्या टप्प्यात राहातील आणि गोळ्या झाडता येतील अशी ती योजना होती.
कालांतराने मुंबई वेगानं बदलत गेली. याच परिसरात आता महात्मा गांधी रस्ता, आझाद मैदान आहे. आजही सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या एका भिंतीला या फोर्टचा एक तट दिसतो.
अमेरिकन यादवीच्या काळात भारतातल्या कापसाला मागणी वाढली आणि मुंबई बंदराला मोठं महत्त्व प्राप्त झालं. मुंबईत भरपूर पैसा आला मग फोर्टची तटबंदी 1860 पासून पाडायला सुरुवात झाली.
तिकडे खंदकात पाणी साचून डास आणि रोगराई वाढायला लागल्यावर खंदक ही बुजवला गेला. मुंबईसारखी कोलकात्यातही इंग्रजांना मराठ्यांची भीती वाटे. तिथेही इंग्रजांनी खंदक खोदला होता, त्याला मराठा डीच असं नाव होतं.
मुंबई आणि परिसरातले निर्णय तेव्हा फोर्टमधून घेतले जात असत. या खंदकाच्या बाहेरच्या इंग्रजांच्या ताब्यातल्या वस्तीचे निर्णयही तिथंच होत.
आता जरांगे पाटीलही ज्या सरकारकडे मागण्या घेऊन येत आहेत ते सरकारही या खंदकाच्या आतल्या दिशेला फोर्टच्याही पलीकडे आहे. विधिमंडळ आणि मंत्रालयापर्यंत आपल्या मागण्या ते कशा पोहोचवतात हे सुद्धा इतिहासात नोंदलं जाईलच.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)