बेने इस्रायली ज्यू मंडळींनी सुरू ठेवलेली मराठी कीर्तनाची परंपरा तुम्हाला माहिती आहे का?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गुरें ढोरें व गाढवें, चारिती ते सदां सवें

तयां आणूनी कूरणी, रक्षिती बाळकें जैसी

सितोदका त्यांसिं देती, प्रेमें त्यांतें गोंजारिती

या धुंदींहो त्यांचे प्रेम, वाटती न त्यांसीं श्रम

मनीं प्रभूचे आभार, मानिती ते प्रेमें फार...

हा अभंग वाचला तर तो नक्की कशातला आहे हे समजणार नाही. पण हा अभंग आहे एका कीर्तनातला तो सुद्धा ज्यू धर्मियांच्या कीर्तनातला... हे अभंग मराठीत तेही दुसऱ्या धर्मात कसे पोहोचले त्याचीच ही गोष्ट.

महाराष्ट्रात राहाणाऱ्या नव्हे भारतात राहाणाऱ्या कोणत्याही माणसाला कीर्तन हा शब्द माहिती नसेल असं होणारच नाही.

वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपला कीर्तनाशी संबंध आलेला असतो. किंबहुना आजही कीर्तनाबद्दल काही वाचलं, ऐकलं किंवा पाहिलं की अनेक लोकांचं मन थेट त्यांच्या बालपणात जाऊन पोहोचतं.

खास भारतीय वाद्यांसह, वादकांसह केलं जाणारं कीर्तन हे भारतातील अनेक प्रांतांमध्ये भक्तीसाठी लोकप्रिय माध्यम म्हणून वापरलं गेलं.

भक्तीबरोबरच अध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनासाठीही त्याचा वापर केला गेला. केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर शीख, बौद्ध धर्मातही कीर्तनसदृश्य माध्यमांचा वापर झालेला दिसून येतो.

कथन, गायन, वादन, नर्तन अशा अनेक कलांचा संगम कीर्तनामध्ये होतो, आजच्या युगात परफॉर्मिंग आर्ट्स म्हणवल्या जाणाऱ्या या कलांचा एकत्रित संगम अनेक शतकांपासून आपल्याकडे याच रुपात सुरू होता आणि आजही ती कायम आहे.

या कीर्तनांमध्ये अभंग, पोवाडा, पाळणा, पदं, साक्या, दिंड्या, ओव्यांचा समावेश असतो आणि टाळ, पेटी, मृदुंग अशी आपली भारतीय वाद्यं साथीला घेऊनच ती केली जातात.

महाराष्ट्रातही कीर्तन हे प्रबोधनासाठी एक महत्त्वाचं माध्यम म्हणून वापरलं गेलं

... आणि कीर्तन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाची एक भागच झाली. हा प्रभाव इतर धर्मांवरही पडला. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे बेने इस्रायली हा महाराष्ट्रात राहाणारा ज्यू समुदाय.

मराठी बेने इस्रायली

भारतामध्ये ज्यू सुमारे 2000 वर्षांपूर्वी आल्याचं मानलं जातं. अलिबागजवळ नौगावमध्ये जहाज फुटल्यानंतर हे लोक किनाऱ्यावर आले आणि स्थायिक झाले. या लोकांनी आपला पूर्वापारचा तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू ठेवला.

शनिवारी सुटी (शब्बाथ) घेण्याच्या त्यांच्या सवयीवरून त्यांना 'शनवार तेली' म्हटलं जाऊ लागलं.

हिंदू तेली सोमवारी सुटी घेत (कारण शंकराचं वाहन नंदी म्हणजे बैलाकडून या दिवशी काम करून घेतलं जाऊ नये म्हणून). बेने इस्रायलींप्रमाणे भारतात बगदादी, बेने मनाशे आणि कोचीनचे ज्यू असे ज्यूंचे समूह आहेत.

या शनवार तेलींनी हळूहळू स्थानिक संस्कृतीशी मिसळून राहायला सुरुवात केली. ते ज्या गावात राहिले त्या गावच्या नावावरून आडनावं घेतली.

राजपूरकर (राजापूरकर नव्हे), तळकर, नौगावकर, दांडेकर, दिवेकर, रोहेकर, पेणकर, पेझारकर, झिराडकर, चेऊलकर, अष्टमकर, आपटेकर, आवासकर, चिंचोलकर, चांडगावकर अशी साधारण 350 आडनावं मराठी ज्यूंमध्ये आढळतात.

या लोकांनी स्वतःला बेने इस्रायली म्हणजे 'इस्रायलची लेकरे' म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

बरीच वर्षं हे लोक कोण असावेत याचा अंदाज स्थानिक लोकांना नव्हता. एके दिवशी डेव्हिड रहाबी नावाचे गृहस्थ कोकणात आले. त्यांचा कोकणात येण्याचा काळ काही ठिकाणी इ.स. 1000, काही ठिकाणी 1400 तर काही ठिकाणी इ.स.1600 असावा असं मानलं जातं.

'इवोल्युशन ऑफ द बेने इस्रायल्स अँड देअर सिनगॉग्स इन द कोकण' पुस्तकाच्या लेखिका डॉ. इरेन ज्युडा यांनी डेव्हिड रहाबी यांच्या कामाबद्दल लिहून ठेवलं आहे.

डेव्हिड रहाबी यांनी या लोकांचे वर्तन आणि चालीरिती ज्यू लोकांच्याच असल्याचं ओळखलं.

त्यांनी शापूरकर, झिराडकर आणि राजपूरकर कुटुंबातल्या तीन लोकांना प्रशिक्षण दिलं आणि सर्व समुदायाला ज्यू धर्माच्या शिकवणीची माहिती दिली. या तिघांना 'काझी' असा शब्द त्यांनी वापरला आहे. हळूहळू या कुटुंबांनी हिब्रू शिकून धर्मग्रंथांचं वाचन सुरू केलं.

कीर्तन

ज्यू मंडळींना आपल्या धार्मिक चालीरिती, प्रार्थना कायम ठेवल्या असल्या तरी कोकणातल्या विशेषतः उत्तर कोकणातल्या चालीरितींचा, सामाजिक व्यवस्थेचा प्रभाव त्यांच्यावर पडलाच. कीर्तनंही त्यातूनच सुरू झाली.

ही कीर्तनपरंपरा बेने इस्रायली लोकांनी कशी स्वीकारली याचा मोठा रोचक इतिहास आहे. त्याचं झालं असं 1880 च्या आसपास हिंदू कीर्तनकार रावसाहेब शंकर पांडुरंग पंडित यांची काही कीर्तनं बेने इस्रायली मंडळींनी ऐकली. हिंदू मंडळी आपली पुराणं, पुराणकथा, भक्ती, भजनं या परंपरा कायम ठेवण्य़ासाठी तसेच धर्मशास्त्रातील गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनाचा वापर करतात, ती सहजपणे लोकांपर्यंत पोहोचते हे त्यांच्या लक्षात आलं.

यामुळेच 1880 साली डेव्हिड हाईम दिवेकर, बेंजामिन शिमसन अष्टमकर, सॅम्युएल माझगावकर, राहमिम श्लोमो तळकर, हन्नोक श्लोमो तळकर आणि आयझॅक अब्राहम तळेगावकर या 6 मंडळींनी आपल्या ज्यू धर्मग्रंथातील कथा कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

कीर्तनोत्तेजक मंडळ

1918 साली ‘प्रासंगिक विचार’ या लेखांमध्ये सॅम्युएल माझगावकर यांनी याबद्दल लिहून ठेवलं आहे. या सहा लोकांनी मिळून एक कीर्तनोत्तेजक मंडळ नावाने संस्थाच स्थापन केली.

रावसाहेब पंडितांचं कीर्तन ऐकून घरी येताना या बेने इस्रायली कीर्तनांची कल्पना कशी सुचली याबद्दल माझगावकरांनी लिहिलेला मजकूर आज मजेशीर वाटू शकतो.

ते लिहितात, या वेळीं कीर्तनश्रवणामुळें आह्मीं अगदीं तल्लीन होऊन फारच खुश झालों, कीर्तन आटोपून आरती झाल्यावर हरिदासबुवाच्या बोधामृतपानाचे घुटके-च्याघुटके घेत येत असतां आमच्या मुखांतून सहजासहजीं असे उद्गार निघाले कीं, शास्त्रासंबंधीं उपयुक्त माहिती कीर्तनरुपानें आपल्या मुखांतून सहजासहजीं असे उद्गार निघाले कीं, शास्त्रासंबंधीं उपयुक्त माहिती कीर्तनरुपानें आपल्या ज्ञातिसमाजास दिल्यास त्यापासून अलभ्य लाभ घडण्याचा बराच संभव आहे.”

या 6 जणांनी कीर्तनाचे काही नियमही ठरवून घेतले. जसे की हरिदासाने बिदागीची अपेक्षा करू नये, खिरापत वाटू नये वगैरे.

बेंजामिन अष्टमकर आणि डेव्हिड दिवेकर या संस्थेचे मुख्य कीर्तनकार झाले आणि इतर चौघांनी गायक म्हणून काम करायला सुरुवात केली. या संस्थेचं पहिलं कीर्तन अष्टमकर यांनी 1880 साली केलं. त्या कीर्तनात त्यांनी अब्राहम चरित्र ही कथा व तिचं निरुपण केलं.

8 ऑगस्ट 1880 साली पहिलं कीर्तन झालं त्याचं 1882 साली पुस्तकही आब्राहम चरित्र नावाने प्रसिद्ध झालं, या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बेंजामिन अष्टमकर आणि हन्नोक तळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

ते म्हणतात, “आपल्या लोकांत सुधारणा व्हावी एतदर्थ आह्मी आपल्या अल्प शक्तीप्रमाणे अनेक वेळां प्रयत्न केले. व ईश्वर कृपेनें ते सफलही झाले ह्मणून आह्मी जगदीशाचे फारच आभारी आहों. आपल्या लोकांनी सत्यतेनें आणि सदाचारानें वागावें ह्मणून संतजन नेहमी सभा भरवून उपदेशद्वारें किंवा कीर्तद्वारें बोध करतात. त्यांत त्यांचा निवळ हेतु इतकाच असतो की, आपल्या प्रिय लोकांनी सत्याचा स्वीकार करुन पापाचा धिक्कार करावा. व एकदां जनांत सद्वर्तन सुरु झालें तर सर्व सुखच सुख दृष्टीस पडेल. या आमच्या शुद्ध हेतूनें आह्मी कविताबंद्ध आब्राहाम चरित्र तयार करुन त्याच्या भक्तीभावाविषयी कीर्तन केले.”

कीर्तनांचा धडाका

बेने इस्रायली मंडळी मराठीतच बोलत असल्यामुळे त्यांनी कीर्तनासाठी हीच भाषा निवडली. बेने इस्रायली मंडळींमधील विवाह समारंभ, नामकरण किंवा गृहप्रवेश समारंभांमध्ये ही कीर्तनं होऊ लागली.

अर्थात पहिल्या कीर्तनानंतर समुदायातील काही बेदिलीमुळे कीर्तनासाठी जागा मिळण्यात अडचणी आल्या. पण पुढे दोन वर्षांनी दुसरं कीर्तन पनवेलला झालं. त्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे, अलिबाग, रेवदंडा अशा ठिकाणी कीर्तनं झाली.

ज्यू लोकांना ही कीर्तनाची पद्धत आवडली आणि या मंडळींना अधिकाधिक आमंत्रणं येऊ लागली, त्याचा व्याप इतका वाढला की काहीवेळेस ती नाकारावी लागली. तीन-चार तास बसून ही मंडळी कीर्तन ऐकू लागली, यात स्त्री-पुरुष असे दोन्ही असत.

आब्राहम चरित्रानंतर एस्तेर चरित्र, योसेफाख्यान, एलियाहू हन्नाबीचे आख्यान, एस्तेर राज्ञीचरित्र, गुरू मोशे चरित्र, राणा शलोमोख्यान, मोशे चरित्र, मकाबी वीरांचे शौर्य अशी नवी कीर्तनंही यात सामिल झाली.

माझगावकर यांनी कीर्तनोत्तेजक मंडळाची माहिती देताना हरदासाने कसे असावे याबद्दल काही गोष्टी पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवल्या आहेत.

ते लिहितात, “ शेवटीं आमच्या आधुनिक हरिदासबुवांस आमचें सांगणें असें आहे कीं, त्यांनी कवितेचा नुसता वेडावांकडा अन्वयअर्थ लावून त्यावर मल्लिनाथी केली ह्मणजे कीर्तन आटोपलें असें मुळींच समजू नये. यापेक्षां आमच्या शाळेंतील तिसऱ्या इयत्तेंतील छोकऱ्यास कवितेचा अन्वयअर्थ चांगला करतां येतो, ह्मणून त्यास आह्मी मारुनमुटकून हंसविले ह्मणजे कीर्तनाची इतिश्री झाली असें मुळींच हरिदासाने समजूं नये. कीर्तनप्रसंगी हरिदासानें आपल्या अंगी भारदस्तपणा ठेवावा. भक्तिरस प्राधान्यपणें अंगीकारुन त्याप्रमाणें आपलें प्रतिपादन करावें.

प्रस्तावनेवांचून जसें पुस्तक शोभत नाहीं, तरवारींवाचून जसा वीर शोभत नाहीं, अलंकारांवाचून जशी स्त्री शोभत नाहीं, तसेंच भक्तिरसावांचून कीर्तन शोभत नसतें. हास्यरसास गौणत्व द्यावे. हरिदासाने जे दाखले श्रोतेजनांपुढे ठेवावायचे ते भारदस्त आणि बोधपर असावेत.”

विसाव्या शतकातली ज्यू कीर्तनं

कीर्तनोत्तेजक मंडळीनी सुरू केलेली कीर्तनाची परंपरा साधारणतः पुढे सुरू राहिली.

1921 पर्यंत अनेक नव्या ज्यू हरदासांनी कीर्तनं आपल्या समुदायात नेली.

1930 आणि 50 च्या दशकात एन. एस. सातमकरांनी काही कीर्तनं लिहिली आणि त्यानंतर 1990 च्या दशकात नोहा मस्सिल यांनी इस्रायलमध्ये एक कीर्तन लिहिलं ते फ्लोरा सॅम्युएल यांनी तिकडे सादर केलं.

कीर्तनोत्तेजक सभेचा प्रभाव हळूहळू कमी झाल्यावर इतर ज्यू संस्थांनी कीर्तनं करायला सुरुवात केली.

पुणे, मुंबई इथली ज्यू गायक मंडळी त्यात सहभागी झाली. कालांतराने महिलाही कीर्तनं करू लागल्या. मुंबईत एली कदुरी नावाची ज्यू धर्मियांनी स्थापन केलेली मराठी शाळा आहे.

फ्लोरा सॅम्युएल येथे मुख्याध्यापिका म्हणून आणि लेखिका रेचल गडकर इथं शिक्षिका होत्या. या दोघींनीही कीर्तन परंपरेला हातभार लावला. हॅना रोहेकर, अॅनी झिराड याही कीर्तनकार तयार झाल्या.

...आणि कीर्तनाला नवं रुप आलं

काळाच्या ओघात भारतात महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरं झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक सामाजिक, राजकीय बदल झाले. नवं तंत्रज्ञान आलं, भक्तीचे, करमणुकीचे मार्ग उपलब्ध झाले. या रेट्यात ज्यू लोकांची कीर्तंनही काहीशी थंडावली.

1947 नंतर अनेक बेने इस्रायली इस्रायलला जाऊन स्थायिक झाली. काही इथेच राहिले परंतु बहुतांश लोक तिकडे गेले.

काळाच्या ओघात पुसट झालेली ही परंपरा नव्याने सुरू करण्याचा विचार 2015 साली झाला.

मुंबईत राहाणाऱ्या एलायजा जेकब यांच्यासह त्यांचे काही सहकारी एकत्र आले आणि त्यांनी ही कीर्तनं नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला.

काही लोकांनी कीर्तनाच्या जुन्या वह्या, डायऱ्या त्यांना दिल्या आणि या कीर्तनांना नवं रुप आलं. जेकब यांच्यासह डायना कोर्लेकर, रिवका मोशे, रिबेका रामरजकर, बेंजामिन अष्टमकर, सीमा झिराड, राफेल रोनेन, जुडाह सानकर, रुबी कुरुलकर, आयझॅक शापूरकर, सोलोमन चेऊलकर, निस्सिम पिंगळे, नरेश गमरे यांनी हा वसा हाती घेतला.

आज हा गट एकत्र जमून कीर्तनांचा सराव करतो. या गटाचे विविध ठिकाणी कार्यक्रमही झाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)