मलिदा, बेने इस्रायलीः पोह्यांचा 'हा' पदार्थ इस्रायलमध्ये गेलेल्या भारतीय ज्यूंना वेगळी ओळख देतो

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बिरडाची उसळ, पुऱ्या, बटाटवडे असं एकत्र एका ताटात पाहिलं तर कदाचित तुम्हाला वाटेल हे महाराष्ट्रातल्या एखाद्या घरातलंच जेवण आहे.

पण प्रत्यक्षात हे ताट महाराष्ट्रापासून काही हजार किलोमीटर अंतरावर इस्रायलमधील एखाद्या शहरातलं असू शकतं.

इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या मराठी ज्यू लोकांच्या मनात याला पक्वान्नांपेक्षा कमी स्थान नाही.

साधारण 75 वर्षांपूर्वी ही मराठी ज्यू मंडळी इस्रायलमध्ये स्थायिक व्हायला लागली. आज त्या पहिल्या पिढीचे लोक हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहेत.

मात्र असं असलं तरी या लोकांनी आपल्या मनात जपून ठेवलेलं कोकण आणि महाराष्ट्र तसंच ताजंतवानं राहिलंय. किंबहुना ते पुढच्या पिढ्यांमध्येही उतरलंय.

इकडे मुंबईत, उत्तर कोकणात पाळल्या जाणाऱ्या अनेक चालीरिती थोड्याफार फरकाने या मंडळींच्या घरामध्ये हळूच शिरल्या होत्या.

जगभरातील इतर ज्यू समुदायांपेक्षा या रितीभाती एकदम वेगळ्या होत्या. महिलांनी साडी नेसणं, त्यांची आडनावं असे अनेक मोठे बदल झाले होते.

मलिदा

या सगळ्यांत वेगळेपण म्हणजे ज्यू लोकांनी इतक्या मोठ्या काळात स्वीकारलेली खाद्यसंस्कृती.

त्यातही एक पदार्थ खास या ज्यू लोकांच्या घरात केला जायचा आणि आज इस्रायलमध्येही केला जातो तो म्हणजे मलिदा.

थांबा... आता मलिदा म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर येईल तो आपण खातो तो पोळीचा चुरा करुन खाल्ला जातो तो. हा पोळीच्या चुऱ्याच्या पदार्थाला मलिदा असं फारसी नाव आपण वापरतो.

हिंदीत त्याला चूरी, चुर्मा असं म्हटलं जातं. भारत-पाकिस्तानात पोळीच्या चुऱ्यात साखर-गुळ, तूप, वेलदोडे घालून केलेला हा पदार्थ प्रचंड आवडीने खाल्ला जातो.

पोळ्या कुस्करुन केला असल्यामुळे याला मराठीत कुस्करा असाही शब्द आहे. मोहरमच्या काळात जे पीर बसवले जातात त्यांना हा मलिदा दिला जातो.

मलिदा शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक चिन्मय दामले यांनी अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, " फारसीत मालिदान असं क्रियापद आहे. त्याचा अर्थ चोळणे, कुस्करणे, नांगरणे, मळणे असा आहे. तर मालिदा म्हणजे चोळलेले, घोळलेले, मळलेले.

नान ब-शीशा मालिदान - अतिशय अंजुष मनुष्य (नान लोण्यात न घोळवता, लोणी फक्त वरच्या वर नानवर चोळणारा मनुष्य)

मध्य व उत्तर भारतात प्रचलित असलेला चुटाचुर्मा हा पदार्थ व मलिदा यांत फार साधर्म्य आहे."

मलिदा या गोड पदार्थाबद्दल सांगताना दामले म्हणाले, "ज्यूंबरोबरच हिंदू आणि मुसलमान धर्मीय लोकही मलिद्याचा नैवेद्य दाखवत असल्यानं भारतात नैवेद्यासाठी मलिदा हा शब्द वापरला जातो.

मलिद्यातल्या तूप, साखर, खोबरं अशा घटकपदार्थांमुळे हा पदार्थ अतिशय पौष्टिक असतो. त्यामुळे पंजाबात शरीरसौष्ठव उत्तम राखण्यासाठी मलिदा खाल्ला जातोच, शिवाय जिलबी/सुकामेवा अशा अन्य पौष्टिक पदार्थांनाही मलिदा असंच म्हणतात," दामले सांगतात.

मलिदा ही मिठाई एकोणिसाव्या व विसाव्या शतकातल्या दक्षिण भारतातही लोकप्रिय होती.

म्हैसूर व मद्रास प्रांतातल्या मुसलमान समाजातल्या लग्नांमध्ये वरास शाल, मलमल, रेशमी चादर, फेटा, अंगरखा, विडा, आणि मलिदा देण्याची प्रथा होती. विसाव्या शतकात दक्षिण भारतातल्या मुसलमान समाजात मलिदा ही काहीशी कनिष्ठ दर्जाची मिठाई मानली जाऊ लागली.

मलिदा ही मिठाई गुजरातेत व राजस्थानात लोकप्रिय असून कर्नाटकातल्या वाणी समाजातही प्रचलित आहे, असं 'सूपशास्त्र'कार रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी 1875 साली नोंदवलं आहे."

पण इस्रायलमध्ये गेलेल्या ज्यू लोकांचा मलिदा हा पदार्थ पोळीपासून तयार केला जात नाही.

हा पदार्थ थेट पोह्यांपासून केला जातो.

रायगड, ठाणे, मुंबई अशा परिसरात राहाणाऱ्या मराठी ज्यू (बेने इस्रायली) लोकांच्या घरांमध्ये हा पदार्थ केला जायचा.

आता गेली अनेक दशके इस्रायलमध्ये राहात असूनही या पदार्थाला बेने इस्रायलींमध्ये विशेष स्थान आहे.

लग्न, साखरपुडा, वाढदिवस, नव्या घरात प्रवेश अशा प्रत्येक कार्यक्रमात हा पदार्थ केला जातो.

करायला अगदी साधासोपा असला तरी बेने इस्रायली लोकांच्या भावना शतकानुशतके त्याच्याशी जोडलेल्या आहेत.

तो करायला घटकपदार्थही अगदी सहज मिळणारे आहेत. एका मोठ्या भांड्यात भिजवलेले पोहे घ्यायचे त्यात साखर आणि किसलेलं ओलं खोबरं घालायचं, शक्य असेल त्याप्रमाणे काजू, बदाम, पिस्ते घातले की झाला बेने इस्रायली मलिदा.

कार्यक्रमाच्यावेळेस या मलिद्यावर सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, गुलाबाच्या पाकळ्या फुलं ठेवून ते सजवलं जातं.

सर्व लोक एकत्र बसतात, मध्ये हे मलिद्याचं भांडं ठेवतात. पुस्तकात वाचून प्रार्थना म्हटली की प्रसादासारखं थोडा थोडा मलिदा आणि फळांचे काप वाटले जातात. इतका साधा-सोपा मलिदा कार्यक्रम असतो.

इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या बेने इस्रायली समुहाच्या एडना सॅम्युएल म्हणतात, "मलिदा हा बेने इस्रायलींच्या आयुष्याचा गेली अनेक शतके महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमाविना बेने इस्रायली कुटुंबांतील कोणताही कार्यक्रम अपुराच म्हणावा लागेल."

बेने इस्रायली समुदायाचे अभ्यासक आणि इतिहासलेखक एलियाझ रुबेन दांडेकर यांनी मराठी ज्यू समुदायाच्या विविध चालीरितींचा अभ्यास केला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आमच्या पूर्वजांनी हा मलिदा समारंभ भारतात आणि ते जगभरात जिथं गेले तिथं सुरू ठेवला. तोच आम्ही बेने इस्रायलींच्या पुढच्या पिढ्यांनी कायम ठेवला आहे. बेने इस्रायली जिथं शक्य होईल तिथं आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा हा समारंभ करतात.

या समारंभाच्या प्रार्थनेसाठी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांना आमंत्रणं दिली जातात आणि लोक उपस्थित राहातात."

पोहे आणि आपण

भारतात किंबहुना भारतीय उपखंडातील नाश्त्याच्या पदार्थांमध्ये पोह्यांनी एकदम मानाचं स्थान पटकावलेलं आहे.

पोह्याचे साध्या-सोप्या पद्धतीनं केले जाणारे पदार्थ अगदी कमी वेळेत होतात आणि पोटभरीचेही होतात. त्यामुळेच घराघरामध्ये सकाळसकाळी वाफाळत्या पोह्यांना पहिली पसंती मिळते.

प्रांतानुसार पोह्याचे प्रकारही बदलतात. देशावरती फोडणीचे पोहे केले जातात त्यात शेंगदाणे घातले जातात. उपलब्ध असेल तर खोबरंही घातलं जातं. विदर्भात पोह्याबरोबर तर्री दिली जाते.

बेने इस्रायलींप्रमाणे अनेक जाती-धर्मांनी पोह्यांमध्ये आपापल्या चवीनुसार बदल केले आहेत.

पोह्याच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणारे गौरीनंदन माणगावकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

ते म्हणाले, "प्रांतानुसार विविध समुहांनीही आपापल्या विशिष्ट चवीचे पोहे तयार केलेले आहे. सीकेपी समाजात सोडे घातलेले सोड्याचे पोहे प्रसिद्ध आहेत. मुंबई-पालघर परिसरातील ईस्ट इंडियन समाजात चिकन घातलेले भुजिंग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समुदायात दडपे पोहे आवडीने खाल्ले जातात. कोकणात गूळपोहे आणि नारळाच्या रसातले पोहे खाल्ले जातात. चिंचेचा कोळ आणि नारळाच्या दुधाबरोबर कोळाचे पोहे केले जातो."

कोकणामध्ये पिकत असलेल्या भातामुळे पोहे भरपूर. त्यात खोबरं आणि गूळ, साखर घालून अनेक पदार्थ केले जातात.

बेने इस्रायलींनी ज्याप्रमाणे मलिदा नावाचे पोहे तयार केले तसे कोकणी मुसलमान सुकरी करतात. सुकरीमध्ये पोहे नारळाच्या पाण्यात भिजवतात.

त्याच नारळाचा चव, साखर, वेलदोड्याची पूड आणि बदामपिस्ते घातले की झाली सुकरी तयार. हे सगळं एकत्र केल्यावर ते भांडं तसंच ठेवून देतात.

नारळाच्या पाण्याच्या ओलाव्याने पोहे भिजले की हा पदार्थ खाल्ला जातो.

कोकणी मुसलमान कुटुंबातील अनेक लोक मध्य-पूर्वेतील देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी आजही हा पदार्थ खाणं सोडलेलं नाही.

ज्यू लोक मराठी मातीशी कसे एकरूप झाले?

भारतामध्ये ज्यू सुमारे 2000 वर्षांपूर्वी आल्याचं मानलं जातं. अलिबागजवळ नौगावमध्ये जहाज फुटल्यानंतर हे लोक किनाऱ्यावर आले आणि स्थायिक झाले. या लोकांनी आपला पूर्वापारचा तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू ठेवला.

शनिवारी सुटी (शब्बाथ) घेण्याच्या त्यांच्या सवयीवरून त्यांना 'शनवार तेली' म्हटलं जाऊ लागलं.

हिंदू तेली सोमवारी सुटी घेत (कारण शंकराचं वाहन नंदी म्हणजे बैलाकडून या दिवशी काम करून घेतलं जाऊ नये म्हणून). बेने इस्रायलींप्रमाणे भारतात बगदादी, बेने मनाशे आणि कोचीनचे ज्यू असे ज्यूंचे समूह आहेत.

या शनवार तेलींनी हळूहळू स्थानिक संस्कृतीशी मिसळून राहायला सुरुवात केली. ते ज्या गावात राहिले त्या गावच्या नावावरून आडनावं घेतली.

राजपूरकर (राजापूरकर नव्हे), तळकर, नौगावकर, दांडेकर, दिवेकर, रोहेकर, पेणकर, पेझारकर, झिराडकर, चेऊलकर, अष्टमकर, आपटेकर, आवासकर, चिंचोलकर, चांडगावकर अशी साधारण 350 आडनावं मराठी ज्यूंमध्ये आढळतात.

या लोकांनी स्वतःला बेने इस्रायली म्हणजे 'इस्रायलची लेकरे' म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

बरीच वर्षं हे लोक कोण असावेत याचा अंदाज स्थानिक लोकांना नव्हता. एके दिवशी डेव्हिड रहाबी नावाचे गृहस्थ कोकणात आले. त्यांचा कोकणात येण्याचा काळ काही ठिकाणी इ.स. 1000, काही ठिकाणी 1400 तर काही ठिकाणी इ.स.1600 असावा असं मानलं जातं.

'इवोल्युशन ऑफ द बेने इस्रायल्स अँड देअर सिनगॉग्स इन द कोकण' पुस्तकाच्या लेखिका डॉ. इरेन ज्युडा यांनी डेव्हिड रहाबी यांच्या कामाबद्दल लिहून ठेवलं आहे.

डेव्हिड रहाबी यांनी या लोकांचे वर्तन आणि चालीरिती ज्यू लोकांच्याच असल्याचं ओळखलं.

त्यांनी शापूरकर, झिराडकर आणि राजपूरकर कुटुंबातल्या तीन लोकांना प्रशिक्षण दिलं आणि सर्व समुदायाला ज्यू धर्माच्या शिकवणीची माहिती दिली. या तिघांना 'काझी' असा शब्द त्यांनी वापरला आहे. हळूहळू या कुटुंबांनी हिब्रू शिकून धर्मग्रंथांचं वाचन सुरू केलं.

शिक्षण आणि नोकऱ्या

मुंबईचा विकास ज्या काळात होत होता त्याच काळाच तत्कालीन पश्चिम भारतात नव्या इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणाचं वारं वाहात होतं. हे वारं ज्या समुदायांनी लवकर ओळखलं त्यांना तात्काळ नोकऱ्या आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत झाली.

पारशी, बेने इस्रायली, गौड सारस्वत ब्राह्मण अशा काही समुदायांनी अगदी 18 व्या शतकापासून व्यापार किंवा इतर व्यवसायांचे ठेके मिळवल्याचे दिसून येतं. अनेकांना ईस्ट इंडिया कंपनीच्या पोलीस, लष्कर आणि इतर खात्यात नोकऱ्या मिळाल्या.

'मुंबईचे वर्णन' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या गोविंद नारायण माडगावकर यांच्या मते बेने इस्रायली लोक 1750 साली कोकणातून मुंबई बेटात आले. त्यानंतर त्यांनी कमांडंट, मेजर सुभेदार, नाईक, हवालदार अशी पदं पलटणीत मिळवली असं ते लिहितात.

बेने इस्रायली लोक इंग्रजी शिकून ऑफिसात काम मिळवतात किंवा शिक्षकही होतात, असं ते या पुस्तकात सांगतात. या बेने इस्रायलींमध्ये शिक्षणाचा वेगाने प्रसार होत असल्याचा उल्लेख ते आवर्जून करतात. त्यानंतर ते भारतभर पसरत गेले, काही परदेशात गेले. इस्रायलची स्थापना झाल्यावर बहुतांश बेने इस्रायली इस्रायलला निघून गेले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)