You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Diet : लोणी खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?
- Author, जेम्स गॅलघर
- Role, आरोग्यविषयक संपादक, बीबीसी न्यूज
मला लोणी आवडतं. ब्रेडवर लोणी लावण्यातली लज्जत काही औरच असते.
त्यामुळे संपृक्त चरबी (Saturated Fat) पूर्वी मानली जात होती तितकी काही तब्येतीसाठी वाईट नसते, अशा बातम्या वर्तमानपत्रांमध्ये वाचल्यावर मी हुरळून गेलो. आता या बातम्यांआडून मला लोणी खाण्याचं समर्थन करता येईल, असं मला वाटलं.
पण कित्येक दशकं आपल्याला संपृक्त चरबी असलेले अन्नपदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्यासाठी अशी चरबी चांगली नाही, असं आपण ऐकत आलो आहोत. मग यातलं नक्की काय बरोब आहे आणि काय चूक आहे?
संपृक्त चरबी वाईट असते किंवा आता लोण्यावर ताव मारायला हरकत नाही, या दोन्ही टोकाच्या म्हणण्यांमध्ये अनेक सूक्ष्म भेदांकडे दुर्लक्ष केलं जातं, ही एक मोठी समस्या आहे.
एकूण कॅलरीसेवनात संपृक्त चरबीचं प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक असू नये, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
संपृक्त चरबीमुळे रक्तामधील वाईट कोलेस्टेरॉल वाढतं, असा यावरचा युक्तिवाद केला जातो. पण यात चांगलं कोलेस्टेरॉलही वाढत असतं.
वाईट कोलेस्टेरॉलमुळे धमन्या चोंदतात आणि अखेरीस त्यातून हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा झटका येतो. दरम्यान, स्टॅटिन या औषधाच्या चाचण्यांमधून असं दिसून आलं आहे की, कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधांमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
गोंधळ?
पण पोषणाच्याबाबतीत सर्वोत्तम पुरावा मिळवणं हे कायमच भयंकर अवघड असतं.
काही अभ्यासांमध्ये लोकांकडून अन्नविषयक प्रश्नावल्या भरून घेतल्या जातात. प्रश्नावली भरणाऱ्यांनी गेल्या वर्षभरात काय खाल्लं याचा तपशील गोळा केल्यावर मग काही दशकांनंतर त्यांच्या तब्येतीवरचा परिणाम तपासणं, ही या अभ्यासाची पद्धत असते.
मला तर तीन आठवड्यांपूर्वी रात्रीच्या जेवणाला मी काय खाल्लं ते आठवत नाही. आणि तसंही कालानुरूप आहारात बदल होतो.
लोकांना हृदयविकाराचा झटका येतोय का, हे पाहण्यासाठी त्यांना एका ठिकाणी थांबवून त्यांच्या आहाराबाबत प्रयोग करणं तर अनैतिक ठरेल. त्यामुळे असे पुरावे विविध अभ्यासांची ठिगळं जोडून केलेली गोधडी असते आणि त्यातून संपृक्त चरबी वाईट असते असा एकंदरित अंदाज मिळतो.
लोकांना संपृक्त चरबीयुक्त पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देणाऱ्या 'पब्लिक हेल्थ इंग्लंड' या संस्थेच्या म्हणण्यानुसार, त्यांची शिफारस 15 क्लिनिकल चाचण्यांच्या परिशीलनावर आधारलेली आहे आणि या प्रक्रियेत किमान दोन वर्षांसाठी 59 हजारांहून अधिक लोकांच्या आहारामध्ये बदल झाला.
परंतु, संपृक्त चरबीबाबत गोंधळ का होऊ शकतो, हे यातूनसुद्धा दिसतं.
या प्रक्रियेमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंवर किंवा इतर कारणांनी होणाऱ्या मृत्यूंवर कोणताही परिणाम झाला नाही.
तुम्ही तुमच्या आहारातून संपृक्त चरबी कमी केलीत, आणि त्याऐवजी कर्बोदकं किंवा प्रथिनं यांचं सेवन सुरू केलं, तरीही तुम्हाला असलेल्या हृदविकाराच्या धोक्यामध्ये काहीच फरक पडत नाही, असा या विश्लेषणाचा निष्कर्ष होता.
भाज्या किंवा पूर्ण धान्यं यांच्यातील व्यामिश्र कर्बोदकांऐवजी व्हाइट ब्रेडमधील शुद्धीकरण केलेली कर्बोदकं खाणं संपृक्त चरबीइतकंच वाईट असतं.
संपृक्त चरबीऐवजी बहुअसंपृक्त (Polyunsaturated) चरबीचा वापर केला, तरच हृदयविकाराच्या संभाव्यतेमध्ये मोठी घट दिसून येते.
ईस्ट अँग्लिया विद्यापीठामध्ये या संदर्भातील संशोधन प्रकल्पाचं नेतृत्व केलेले डॉ. ली हूपर म्हणतात: "संपृक्त चरबीला इतकी वर्षं जितकं नकारात्मक मानलं जात होतं, तितकी ती वाईट नाही, हे आम्हाला गेल्या काही वर्षांमधील संशोधनातून जाणवलं आहे."
चरबीचे (Fats) प्रकार
- संपृक्त चरबी- बर्गर व सॉसेज, त्याचप्रमाणे लोणी, इतर दुग्धजन्य पदार्थ व नारळाचं तेल, यासह मटणामध्ये सापडते
- एकअसंपृक्त चरबी- अव्हाकडो, ऑलिव्हचं तेल व अनेक प्रकारची कठीण कवचाची फळं, यांमध्ये सापडते.
- बहुअसंपृक्त चरबी- तेलकट मासे, वनस्पती तेल व बिया यांमध्ये सापडते.
- ट्रान्स चरबी- बिस्किटं, केक व मार्गारीनमध्ये सापडते.
(स्त्रोत: British Heart Foundation)
संपृक्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत असं लोकांना नुसतं सांगत राहणं खूपच सुलभीकरण करणारं आहे, असं मी 'पब्लिक हेल्थ इंग्लंड'मधील मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. अॅलिसन टेडस्टोन यांना सांगितलं.
आपल्या आहारामध्ये संपृक्त चरबीयुक्त पदार्थ असणं वाईट आहे, हा त्यांचा हट्ट कायम होता. पण, 'चरबीसंबंधीचा हा संदेश काही वेळा खूपच सुलभीकरण करणारा असतो, हे म्हणणं वाजवी आहे,' असं त्या म्हणाल्या.
डॉ. टेडस्टोन पुढे म्हणाल्या, "नवीन अभ्यासांमुळे आधीच्या माहितीमध्ये काही कमी-अधिक झालेलं आहे, त्यामुळे एकलअसंपृक्त हवं की बहुअसंपृक्त हवं की पूर्ण धान्यांची कर्बोदकं हवीत, अशा सूक्ष्म गोष्टी तुम्ही शोधत आहात.
"कर्बोदकांचं सेवन म्हणजे काय याचा विचार न करता असं सेवन वाढवण्यासाठी लोकांना संदेश देणं अयोग्य आहे, हे मी मान्य करेन."
लोण्याऐवजी सूर्यफुलाचं तेल स्वैपाकासाठी वापरणं चांगलं, म्हणजे त्यातून कमी चरबी शरीरात जाते, असा सल्ला डॉ. टेडस्टोन व हूपर दोघंही देतात.
लोण्याची सुटका?
पण काहींना हेसुद्धा चुकीचं वाटतं. त्यांच्या मते लोणी व इतर संपृक्त चरबीयुक्त अन्नपदार्थ आरोग्यदायक आहारामध्ये समाविष्ट असायला हवेत.
आहारामधून संपृक्त चरबीयुक्त पदार्थ कमी करायला प्रोत्साहन देण्यासाठी 'स्पष्ट आधारभूत पुरावा' मिळालेला नाही, असा निर्वाळा केम्ब्रिज विद्यापीठाने २०१४ साली केलेल्या एका अभ्यासातून काढण्यात आला. हा अभ्यास अनेक वेळा उर्द्धृत केला जातो.
या अभ्यासातील निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर 'बटर इज बॅक' अशा आशयाच्या बातम्या बऱ्याच ठिकाणी आल्या.
"हे खूपच सुलभीकरण आहे. आम्ही असं कधीच म्हणालो नव्हतो," असं केम्ब्रिज विद्यापीठातील एमआरसी एपिडिमिऑलॉजी केंद्रामधल्या एक संशोधक डॉ. नीता फौरोही यांनी मला सांगितलं.
या अभ्यासामध्ये संपृक्त चरबी, एकलसंपृक्त चरबी अथवा बहुसंपृक्त चरबीचे प्रकार आणि हृदयविकार यांच्यात काहीच विशेष संबंध दिसून आला नाही.
पण आहारातून काय कमी करावं यापेक्षा त्याऐवजी कशाची भर घालावी, यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असा इशारा डॉ. फौरोही यांनी दिला.
सदर अभ्यासात ते विचारात घेतलं गेलं नव्हतं.
संपृक्त चरबीसंबंधीचा वाद "एकदमच गुंतागुंत टाळणारा झालेला आहे", असं त्या म्हणाल्या. "अतिसुलभीकरण करणारे संदेश देण्यापूर्वी लोकांनी खूप सावधानता बाळगायला हवी," असंही त्यांनी सांगितलं.
सर्व प्रकारची संपृक्त चरबी सारखीच असते का?
कोणतंही कोलेस्टेरॉल वाईट असतं, असं कोणे एके काळी डॉक्टरांना वाटत होतं. पण मग कोलेस्टेरॉलमध्ये चांगले आणि वाईट प्रकार असतात, याचा त्यांना शोध लागला.
तसंच सर्व प्रकारची संपृक्त चरबी सारखीच नसते आणि त्यातील काही प्रकार लाभदायक असू शकतात असाही पुरावा समोर येतो आहे, याची जाणीव आता वाढू लागली आहे.
संपृक्त चरबीयुक्त आम्ल म्हणजे कार्बनच्या अणूंची साखळी असते, पण या साखळीची लांबी वेगवेगळी असते.
चार कार्बन असलेली संपृक्त चरबीयुक्त आम्लं (butyric acid) असतात, किंवा अगदी 24 कार्बनचे अणू राखणारी आम्लंही असतात (lignoceric acid). सर्वसामान्यपणे पाल्मिटिक आम्ल (16 कार्बनचे अणू) व स्टेआरिक आम्ल (18 कार्बनचे अणू) आढळतात.
रक्तात मिसळणाऱ्या विविध संपृक्त चरबीयुक्त आम्लांच्या पातळ्या पाहिल्या, तर त्यातून रोचक आकृतिबंध समोर येताना दिसतो.
रक्तामध्ये 16 व 18 कार्बन अणूंची संपकृक्त चरबीयुक्त आम्लं असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
पण दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित 15 वा 17 कार्बन अणूंची संपृक्त चरबीयुक्त आम्लं जास्त प्रमाणात असणाऱ्या लोकांना हा धोका कमी असतो आणि हाच आकृतिबंध दुसऱ्या क्रमांकावरील मधुमेहाच्या बाबतीत दिसतो.
"हे खूप उत्साहवर्धक निष्कर्ष आहेत आणि त्यातून आपली समजूत खरोखरच खूप वाढू शकते," असं डॉ. फौरोही म्हणाल्या.
तथाकथित 'सम-साखळी'ची संपृक्त चरबीयुक्त आम्लं- उदाहरणार्थ, 16 कार्बनांची साखळी असणारं आम्लं- आहारातील चरबीतून मिळतात, पण शुद्धीकरण झालेली कर्बोदकं व अल्कोहोल यांच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरातही अशा आम्लांची निर्मिती होते.
'विषम-साखळी'ची संपृक्त चरबीयुक्त आम्लं पूर्णतः आहारातूनच मिळतात- विशेषतः दुग्धजन्य पदार्थांमधून मिळतात.
डॉ. फौरोही पुढे सांगतात, "काही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ मधुमेहाची किंवा हृदयविकाराची शक्यता कमी करण्याची शक्यता आहे, असं सुचवणाऱ्या अभ्यासांचा उलगडा करण्यासाठी आमचे नवीन निष्कर्ष उपयुक्त ठरू शकतात. हे आत्तापर्यंतच्या रूढ धारणेपेक्षा वेगळ्या दिशेने जाणारं आहे."
पण जरा थांबा! त्या सगळ्या बातम्या बरोबर होत्या का? चीज, दही, दूध व लोणी आहारात असायलाच हवं का?
आपला आरंभिक पुरावा हाताशी धरून अशा बातम्या देणं धोकादायक ठरू शकतं, असा इशारा डॉ. फौरोही देतात.
"दुग्धजन्य पदार्थांचे लाभदायक परिणाम पूर्णतः 'चांगल्या' संपृक्त चरबीयुक्त आम्लांमुळेच झालेले आहेत, असं आपण गृहित धरू शकत नाही. शेवटी सर्व अन्नपदार्थांमध्ये विविध घटकांचा संयोग झालेला असतो."
लोणी किंवा संपृक्त चरबी आणि वाईट कोलेस्टेरॉल यांच्यात अजूनही सक्षम दुवा दिसून येतो, असा इशारा त्या देतात. तसंच, संपृक्त चरबीच्या उपप्रकारांबाबत आणखी लक्ष्यकेंद्री अभ्यास व्हायला हवेत, अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात.
बहुतांश वैज्ञानिक अभ्यास त्यांच्या दुग्धजन्य पदार्थांच्या व्याख्येत लोण्याचा समावेशही करत नाहीत, इकडे त्या निर्देश करतात.
या क्षेत्रातील अधिकाधिक संशोधनातून आपलं चरबीविषयीचं आकलन पूर्णतः बदलू शकतं किंवा कदाचित त्यातून काहीच निष्पन्न न होण्याचीही तितकीच शक्यता आहे.
डॉ. फौरोही शेवटी सांगतात: "ते संशोधन सुरू असल्यामुळे आपण सगळं बदलत जावं, असं मला वाटत नाही. हे प्राथमिक संशोधन उत्साहवर्धक आहे, पण ठोस नाही, त्यामुळे आता लोण्यावर ताव मारायला हरकत नाही, अशी लोकांनी धारणा करून घेणं अप्रगल्भपणाचं ठरेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)