राजा मिरची : भारतातली सर्वांत तिखट मिरची, जिचा एक घास गडाबडा लोळायला लावतो...

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आजपासून सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2016 सालची.

अमेरिकेतल्या 47 वर्षीय व्यक्तीनं एक बर्गर खाल्ला. बर्गरची खास गोष्ट अशी होती की, त्यावर 'भूत जोलोकिया' नावाच्या मिरचीचा लेप होता.

बर्गर खाल्ल्यानंतर ती व्यक्ती पोट आणि छातीतल्या वेदनांनी जमिनीवर पडून लोटांगणंच घालू लागली. त्यानंतर उलट्याही सुरू झाल्या. मग तातडीनं त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, अन्ननलिकेत एका इंचाचं छिद्र आहे.

अनेक माध्यमांसह जर्नल ऑफ इमर्जन्सी मेडिसिनननंही या घटनेची दखल घेतली.

'भूत जोलोकिया' हा ईशान्य भारतातल्या मिरचीचा एक प्रकार आहे. या मिरचीला किंग मिर्चा, राजा मिर्चा, नागा मिर्चा, गोस्ट पेपर यांसारख्या अनेक नावांनी ओळखलं जातं.

'किंग मिर्चा' यासाठी म्हटलं जातं, कारण तिखटपणात या मिरचीला तोड नाही. 'नागा मिर्ची' यासाठी म्हटलं जातं, कारण नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणात या मिरचीची शेती केली जाते.

तर 'गोस्ट पेपर' किंवा 'भूत जोलोकिया' यासाठी म्हटलं जातं, कारण ही मिरची खाणारी व्यक्ती अंगात भूत शिरल्यासारखं करते.

या सर्व स्थानिक लोकांच्या धारणा या मिरच्यांच्या नावांशी जोडल्या आहेत.

मात्र, अमेरिकेतल्या त्या 47 वर्षीय व्यक्तीसोबत जे घडलं, त्यावरून या मिरचीच्या तिखटपणाचा अंदाज तुम्हालाही आला असेल.

जगातील पाच सर्वात तिखट मिरच्यांच्या यादीत 'भूत जोलोकिया' मिरचीचा समावेश केला जातो.

आता तुम्ही म्हणत असाल की, अमेरिकेतल्या त्या घटनेची सहा वर्षांनंतर आता आठवण का काढली जातेय?

तर नागालँडची मिरची पहिल्यांदाच लंडनमध्ये पोहोचलीय. बुधवारी (28 जुलै) निर्यात सुरू झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती.

यापूर्वी पावडरच्या स्वरूपातच या मिरचीला परदेशात निर्यात केलं जाई. आता ताजी हिरवी मिरचीच पाठवण्यास सुरुवात झालीय.

पियुष गोयल यांचं ट्वीट रिट्विट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, "ज्यांनी 'भूत जोलोकिया'ची चव चाखलीय, त्यांनाच तिच्या तिखटपणाचा अंदाज येईल."

'भूत जोलोकिया' म्हणजेच 'राजा मिरची'चा इतिहास

तसे, सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतून भारतात मिरची आणली. मात्र, राजा मिरची नागालँडमध्ये आढळणं या गोष्टीला खोटं ठरवतं.

पुष्पेश पंत हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

बीबीसीशी बोलताना पुष्पेश पंत सांगतात, "पोर्तुगीज भारतात 500 वर्षांपूर्वी म्हणजे 1498 साली केरळमध्ये पोहोचले आणि त्यानंतर गोव्यात गेले. त्यानंतर पोर्तुगीज भारतात जिथे जिथे गेले, तिथे तिथे मिरची पसरत गेली. मात्र, हे अशक्य आहे की, भारताच्या ईशान्येकडील दुर्गम भागात, जिथे त्यावेळी पोहोचणं कठीण होतं, तिथे पोर्तुगीजांनी मिरचीला पोहोचवलं.

यामुळेच वनस्पती शास्त्रज्ञांचं आजही एकमत आहे की, भारतात जंगली मिरची पोर्तुगीजांच्या भारतातील आगमनाच्या आधीपासूनच उगवत होती आणि ती मिरची म्हणजे राजा मिर्चा."

हे लक्षात घेतलं तर 'भूत जोलोकिया' म्हणजेच 'राजा मिर्चा' भारतातील सर्वात जुनी मिरची प्रजाती आहे. मात्र, या मिरचीचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सापडत नाही.

याचं कारण सांगताना पुष्पेश पंत म्हणतात, "पूर्वी ईशान्य भारताशी उर्वरीत भारताचा संपर्क फार कमी प्रमाणात होता. नागालँड किंवा ईशान्येकडील इतर राज्यांच्या लोकगीतांमध्ये या मिरचीचा उल्लेख यामुळे आढळत नाही, कारण तिथे ही मिरची सर्वसाधारण गोष्ट होती. त्यांच्यासाठी त्यात विशेष काहीच नव्हतं."

मिरचीचा भूगोल

मिरचीला इंग्रजीत 'चिली' म्हणतात. चिली हा मेक्सिकन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो, कॅप्सिकम.

मिरचीचं शास्त्रीय नाव 'कॅप्सिकम अॅनम' आहे. हिरव्या मिरचीत व्हिटॅमन ए, बी आणि सी पुरेशा प्रमाणात असतात. त्याशिवाय कॅल्शअम आणि फॉस्फरसची मात्राही असते. मिरचीतला तिखटपणा त्यातील

'कॅप्सेसिन' (ओलियोरेजिन) या रसायनामुळे असतो, तर मिरची पिकल्यानंतर तिच्यावरील लाल रंग 'कॅप्सेन्थिन'मुळे तयार होतो.

भारत हा जगातील सर्वात मोठा मिरची उत्पादक देशच नाही, तर सर्वात मोठा मिरची खाणाऱ्यांचाही देश आहे.

भारतात मिरचीचं देशभर विविध ठिकाणी वर्षभर पीक घेतले जाते. मिरचीच्या पिकासाठी 20 ते 30 डिग्री तापमानाची आवश्यकता असते. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील मिरचीचे प्रकार विशेष प्रसिद्ध आहेत.

आता या यादीत आसाम आणि नागालँडचं नावही जोडलं गेलंय.

राजा मिर्चबाबत बोलायचं झाल्यास, ही मिरची चार ते पाच इंच लांब असते. हिरव्या रंगासोबतच लाल आणि चॉकलेटी रंगाच्याही या मिरच्या असतात. खाण्याच्या मसाल्याप्रमाणे, तसं लोणच्यातही या मिरचीचा वापर केला जातो. नॉन-व्हेज स्वादिष्ट बनवण्यासाठी या मिरचीला पर्याय नाही. ईशान्य भारतात या मिरचीचा वापर सॉस बनवण्यासाठीही केला जातो.

भारतीय बाजारात या मिरचीची किंमत 300 रुपये प्रति किलो आहे. मात्र, लंडनच्या बाजारात हीच मिरचीची किंमत 600 रुपये प्रति किलोनं विकली जाते.

सध्या नागालँड आणि आसाममध्ये कमी प्रमाणात या मिरचीचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, आता एकदा निर्यातीनं जोर पकडला की उत्पादन वाढायलाही वेळ लागणार नाही.

कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार मिरचीच्या निर्यातीत विशेष लक्ष देताना दिसतंय.

किती तिखट असते ही मिरची?

मिरचीचा तिखटपणा स्कोविल हीट यूनिट (SHU) याद्वारे मोजला जातो. अमेरिकन फार्मासिस्ट विल्बर स्कोविल यांच्या नावानं ही मोजणी पद्धत बनलीय.

मिरचीत असलेल्या 'कॅप्सोसिन'च्या आधारावर हे ठरवलं जातं की, मिरचीत किती तिखटपणा आहे.

जाणकारांच्या मते, ही मोजणी पद्धत अवलंबल्यास राजा मिर्चाचा स्कोअर एक मिलियन एसएचयू होतो. जगातील सर्वात तिखट मिरचीचा स्कोअर दोन मिलियनच्या वर आहे.

जगातल्या पाच सर्वात तिखट मिरच्यांमध्ये राजा मिर्चाचं स्थान पाचवं आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या स्थानावर आहे प्युअर कॅप्साइसिन (Pure Capsaicin), दुसऱ्या स्थानावर स्टँडर्ड पेपर स्प्रे (Standard Pepper Spray), तिसऱ्या स्थानावर कॅरोलिना रिपर (Carolina Reaper) आणि चौथ्या स्थानावर ट्रिनिडाड मोरुगा स्कॉर्पिअन (Trinidad Moruga Scorpion) मिरची आहे.

पुष्पेश पंत सांगतात की, साधरणत: भारतातील सर्वच घरात लाल मिरची ज्या प्रमाणात वापरली जाते, त्या प्रमाणात राजा मिर्चा किंवा वर उल्लेख केलेल्या इतर चार मिरच्यांचा वापर केला जाऊ शकत नाही. या मिरच्यांचा नाममात्र वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे जेवणाचा स्वाद आणि सुगंध दोन्ही वाढण्यास मदत होते.

जगभरातील लोकांचं 'मिरचीप्रेम'

आतापर्यंत तुम्ही राजा मिर्चाबद्दल वाचलंत. मात्र, आपण नीट पाहिल्यास लक्षात येतं की, जगभरातल्या लोकांचं मिरचीवर अतोनात प्रेम आहे. भारतीय जेवणात हळद आणि मिरची हे दोन पदार्थ सर्वाधिक होतो. विशेषत: भाजी करताना वापर केलाच जातो.

मात्र, तुम्हाला माहित आहे का, की एक व्यक्ती वर्षभरात सरासरी किती मिरची खातो?

एका अंदाजानुसार, 2018 या वर्षात प्रत्येक व्यक्तीनं जवळपास पाच किलो मिरची खाल्ली. हे आकडे इंडेक्स बॉक्स या मार्केट अनॅलिसिस फर्मने जाहीर केले आहेत.

काही देशांमध्ये तर ही संख्या आणखी वाढते.

तुर्कस्थानात एका दिवसात एक व्यक्ती सरासरी 86.5 ग्रॅम मिरची खातो. म्हणजेच, जगभराच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण आहे.

मेक्सिको तर तेथील मासलेदार पदार्थांमुळेच जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, तुर्कस्थानात मेक्सिकोहून जास्त मिरची खाल्ली जाते.

त्याशिवाय, भारत, थायलंड, फिलीपिन्स आणि मलेशियामध्येही मिरचीचा वापर अधिक केला जातो.

स्वीडन, फिनलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशात मिरचीचा वापर सर्वात कमी केला जातो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)