भगत सिंहांनी जेव्हा ब्रिटिश सरकारला विनंती केलेली की, फाशी नको; गोळ्या घालून मारा

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

त्यांच्या फाशीची वेळ एरव्ही असते, तशी पहाटेची नव्हती.

23 मार्च- संध्याकाळी 7:30 ची वेळ. सूर्य मावळला होता.

23 वर्षांचा एक सडपातळ तरुण आणि त्याच्या दोन साथीदारांना फाशी देण्यात येणार होती. लाहोर तुरुंगाचे मुख्य अधीक्षक मेजर पीडी चोप्रा त्यांना घेऊन चालले होते.

हे सर्व दृश्य पाहणारे कारागृह उप अधीक्षक मोहम्मद अकबर खान आपले अश्रू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.

फाशीच्या दोराकडे जाणारा तो तरुण त्या काळातला भारतातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती बनला होता.

त्या तरुणाचं नाव होतं भगत सिंह.

भगत सिंह यांच्यासोबत त्यांचे आणखी दोन साथीदार सुखदेव आणि राजगुरूही चालले होते.

या तिघांनीही ब्रिटिश सरकारला विनंती केली होती की, त्यांचा राजकीय कैदी म्हणून असलेला दर्जा पाहता त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे फाशी देऊ नये तर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात यावे.

पण ब्रिटिश सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली. भगत सिंह तिघांच्या मधोमध चालत होते. सुखदेव डावीकडे होते आणि राजगुरू उजवीकडे.

'दिल से ना निकलगी वतन की उल्फ़त मरने के बाद भी, देश का सुगंध मेरे भी मिट्टी से आएगा' असं गाणं भगत सिंह चालताना होते.

त्यांचे दोन्ही साथीदार त्यांना साथ देत होते.

तिघांनीही फाशीच्या दोराचं चुंबन घेतलं

भगत सिंहांनी फाशी देण्याच्या आधी त्या फासाचं चुंबन घेतलं.

सतविंदर जस त्यांच्या 'द एक्झिक्युशन ऑफ भगत सिंह' या पुस्तकात लिहितात, "भगत सिंहांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देत हा क्षण अनुभवला. किंबहुना त्यांनी या क्षणाची वाट पाहिली होती. त्यासाठी नियोजन केलं होतं.

भगत सिंहांनी स्वतःच्या हाताने फासाचा दोर गळ्यात घातला. भगत सिंह यांच्यानंतर राजगुरू आणि सुखदेव यांनाही फाशी देण्यात आली.”

त्या दोघांनीही फाशीपूर्वी त्या दोराचं चुंबन घेतलं. त्यांचे हात-पाय बांधलेले होते.

कुलदीप नय्यर त्यांच्या 'विदाऊट फियर, द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंह' या पुस्तकात लिहितात, “फाशी देणाऱ्या जल्लादने विचारलं की, आधी कोण फासावर जाणार? सुखदेव यांनी ‘मी जाईन’ असं उत्तर दिलं. जल्लादने एकापाठोपाठ तीन वेळा फाशीचा दोर ओढला. तिघांचेही मृतदेह बराच वेळ फासावर लटकत होते.”

त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिथे उपस्थित असलेला एक तुरुंग अधिकारी या तरुण क्रांतिकारकांच्या धैर्याने इतका प्रभावित झाला की त्याने त्यांचे मृतदेह ओळखण्यास नकार दिला. त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

या तिघांवर तुरुंगातच अंत्यसंस्कार केले जातील, अशी मूळ योजना होती. पण नंतर वाढता धूर पाहून बाहेर उभ्या असलेल्या जमाव आक्रमक होईल, गोंधळ करेल असं वाटलं. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर सतलजच्या काठी कसूर इथं अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं.

कारागृहाच्या मागची भिंत रातोरात तोडण्यात आली. तेथून एक ट्रक आत आणला. या तिघांचे मृतदेह ओढत नेऊन ट्रकमध्ये टाकण्यात आले.

मन्मथनाथ गुप्ता त्यांच्या 'भारतीय क्रांतिकारी चळवळीचा इतिहास' या पुस्तकात लिहितात, "सतलज नदीच्या काठावर दोन पुरोहित त्या मृतदेहांची वाट पाहत होते. त्या तिघांचे मृतदेह चितेवर ठेवून पेटवून देण्यात आले. पहाट झाली तशा या जळत्या चिता विझवून अर्धवट जळालेले मृतदेह सतलज नदीत टाकण्यात आले.

या जागेची नंतर चौकी क्रमांक 201 अशी ओळख पटली. पोलीस आणि पुजारी निघून जाताच गावकरी पाण्यात शिरले. त्यांनी ते मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि नंतर योग्यप्रकारे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले."

महात्मा गांधींच्या विरोधात निदर्शनं

भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांना 24 मार्च रोजी फाशी देण्यात येणार होती, मात्र त्यांना निर्धारित वेळेच्या 11 तास आधी फाशी देण्यात आली. ही बातमी पसरताच भारतीयांना संताप आला आणि धक्का बसला.

न्यूयॉर्कमधील 'डेली वर्कर' वृत्तपत्राने या फाशीला ब्रिटनमधील मजूर सरकारचं ‘सर्वांत रक्तरंजित काम’ असं म्हटलं.

महात्मा गांधी तेव्हा कराचीच्या दौऱ्यावर होते. या फाशीसाठी त्यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरण्यात आले.

सतविंदर सिंग जस लिहितात, "गांधीजींची ट्रेन कराची स्टेशनवर येताच आंदोलकांनी त्यांच्या हातात काळी फुले धरली. भारताच्या भवितव्याबद्दल लॉर्ड आयर्विन यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेसाठी भगत सिंह यांची फाशी रद्द करण्याची अट न ठेवल्याचा आरोप गांधीजींवर करण्यात आला.”

जवाहरलाल नेहरूंनी या फाशीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

श्रीराम बक्षींनी त्यांच्या 'रेव्होल्युशनरिज अँड द ब्रिटीश राज' या पुस्तकात लिहिलं आहे, "मी भगत सिंहांसारख्या माणसाच्या धैर्याची आणि बलिदानाची प्रशंसा करतो. भगत सिंह यांच्यासारखं धाडस फार दुर्मिळ आहे. आम्ही या धाडसाचं कौतुक करू नये अशी जर व्हाईसरॉय आमच्याकडून अपेक्षा करत असतील, तर तो त्यांचा गैरसमज आहे.

जर भगत सिंह इंग्रज असते आणि इंग्लंडसाठी हे पाऊल उचलले असते तर त्यांनी काय केले असते? हे व्हाईसरॉय यांनी स्वतःच्या मनाला विचारावे.”

वर्तमानपत्रात नोकरी

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इंग्रजांविरुद्धच्या बंडाची आग देशभर पसरली होती. भगत सिंह यांचे काका अजित सिंह आणि वडील किशन सिंह हे दोघेही गदर पार्टीचे सदस्य होते.

28 सप्टेंबर 1907 रोजी, ज्या दिवशी भगतसिंग यांचा जन्म झाला, त्याच दिवशी त्यांचे वडील आणि काका ब्रिटिशांच्या तुरुंगातून सुटले होते.

आधी भगत सिंह यांचे नाव भगनलाल होते. 1923 मध्ये त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

त्यांना अभ्यासात गती होती. उर्दू, हिंदी, गुरुमुखी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

1924 मध्ये कुटुंबीयांनी त्यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली.

आई-वडिलांचे मन वळवण्यात अयशस्वी झाल्यानंतर भगत सिंह लाहोरमधील आपले घर सोडून कानपूरला आले.

तिथे त्यांनी प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या ‘प्रताप’ या साप्ताहिकात काम केलं. त्या वर्तमानपत्रात ते ‘बलवंत’ या नावाने लेख लिहीत असत.

कानपूरमध्ये त्यांनी बटुकेश्वर दत्त, शिव वर्मा आणि बीके सिन्हा या स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली.

भगत सिंह आणि चंद्रशेखर आझाद यांची जवळीक

अजय घोष यांनी त्यांच्या 'भगत सिंह अँड हिज कॉम्रेड्स' या पुस्तकात लिहिले आहे की, "भगत सिंह यांच्याशी माझी ओळख बटुकेश्वर दत्त यांनी करून दिली होती. त्या काळात ते उंच आणि काहीसे कृश होते. त्यांचे कपडे जुनाट असायचे आणि ते फारसं बोलायचे नाहीत.

ते एखाद्या अशिक्षित तरुणासारखेच दिसत होते. त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. पहिल्यांदा पाहिल्यावर मला ते फार आवडले नाहीत. ते गेल्यावर मी हे बटुकेश्वर दत्त यांनाही सांगितले होते."

ते पुढे लिहितात, "दोन वर्षात भगत सिंह यांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल झाला. ते खूप चांगले वक्ते बनले होते. ते इतक्या ताकदीने, उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे बोलायचे की लोक त्यांचे अनुसरण करायला लागले. 1924 मध्ये ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद हे त्यांचे नेते होते आणि भगत सिंह त्यांच्या अगदी जवळ आले होते."

लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला

1927 मध्ये काकोरी कटामध्ये भगत सिंह यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यांनी नाव बदलून या घटनेच्या समर्थनार्थ 'विद्रोही' नावाचा लेख लिहिला.

लाहोरमधील दसरा मेळ्यात बॉम्बस्फोट घडवल्याचाही आरोप त्यांच्यावर होता. नंतर चांगल्या वागणुकीमुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याच वर्षी सायमन कमिशन भारतात आले तेव्हा लाला लजपतराय यांनी त्याला कडाडून विरोध केला.

आंदोलनादरम्यान एसपी जेए स्कॉट यांनी जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. त्याला दुरूनच लाला लजपतराय दिसले. स्कॉटने वेताच्या छडीने लालाजींवर वार केले. ते रक्तस्राव होऊन जमिनीवर पडेपर्यंत तो वेत चालवत राहिला. बेशुद्ध पडण्यापूर्वी लालाजींनी ओरडून म्हटलं की, 'आमच्यावर चालवलेली प्रत्येक लाठी ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील खिळा ठरेल.'

जवाहरलाल नेहरूंनी पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला.

17 नोव्हेंबर रोजी लाला लजपत राय यांचे निधन झाले. 10 डिसेंबर 1928 रोजी लाहोरमध्ये देशभरातील क्रांतिकारकांची एक बैठक झाली, ज्याच्या अध्यक्षस्थानी भगवतीचरण वोहरा यांच्या पत्नी दुर्गादेवी होत्या.

लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचं या बैठकीत ठरले. लालाजींचा मृत्यू भारत शांतपणे सहन करणार नाही, हे भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांना जगाला सांगायचे होते.

सँडर्सला गोळी मारली

एसपी स्कॉटला मारण्याच्या मोहिमेत भगत सिंह, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि जय गोपाल सहभागी होतील असे ठरले. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 15 डिसेंबरला क्रांतिकारकांनी जिथे स्कॉटला मारायचे होते त्या ठिकाणाला भेट दिली.

भगत सिंह यांनी लाल बॉर्डरचे पोस्टर तयार केले ज्यावर 'स्कॉट किल्ड' असे लिहिले होते. नंतर हे हस्तलिखित पोस्टर लाहोर खटल्यात त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरले गेले.

स्कॉट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर या तिघांना सांगण्याची जबाबदारी तरुण सहकारी जयगोपाल याला देण्यात आली होती.

स्कॉटच्या कारची नंबर प्लेट 6728 होती. जयगोपालला हा नंबर लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले.

विशेष म्हणजे जयगोपालने स्कॉटला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. स्कॉट त्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये आला नाही. त्याच दिवशी त्यांची सासू इंग्लंडहून लाहोरला येणार असल्याने त्यांनी एक दिवस सुट्टी घेतली होती.

असिस्टंट एसपी जेपी सँडर्स पोलिस स्टेशनमधून बाहेर आले तेव्हा जयगोपालला वाटले की तोच स्कॉट आहे. त्यांनी ही माहिती भगत सिंह आणि राजगुरू यांना दिली. दुपारनंतर सँडर्स पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर मोटारसायकल सुरू करत असताना राजगुरूने त्याच्यावर जर्मन माऊसर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या.

भगत सिंह 'नाही, नाही, नाही तो स्कॉट नाही' असे ओरडत राहिले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सँडर्स कोसळल्यावर भगत सिंह यांनीही त्यांच्या मृतदेहावर काही गोळ्या झाडल्या.

चानन सिंहलाही गोळी लागली

आधीच ठरलेल्या योजनेनुसार भगत सिंह आणि राजगुरू डीएव्ही कॉलेजच्या दिशेने धावले. तेथे चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना कव्हर देण्याची भूमिका घेतली होती.

स्वातंत्र्यसैनिक शिव वर्मा त्यांच्या 'रेमिनिसेन्स ऑफ फेलो रिव्होल्युशनरीज' या पुस्तकात लिहितात, "जेव्हा भगत सिंह आणि राजगुरू सँडर्सला मारून पळून जात होते, तेव्हा हेड कॉन्स्टेबल चानन सिंहने त्यांचा पाठलाग सुरू केला. आझाद ओरडूनही तो थांबला नाही, त्यामुळे राजगुरूंनी त्यालाही गोळी मारली. त्यावेळी वसतिगृहाच्या खिडकीतून बरेच लोक हे दृश्य पाहत होते. त्यांच्यापैकी एक होते फैज अहमद फैज, जे नंतर एक महान कवी बनले."

दुसऱ्या दिवशी लाल शाईने बनवलेले पोस्टर्स शहरातील भिंतींवर चिकटवलेले आढळले. त्यावर लिहिलं होतं की, ‘सँडर्स इज डेड. लाला लजपतराय यांचा बदला घेतला गेला आहे.’

सँडर्सच्या हत्येनंतर लाहोरमधून बाहेर पडणे अशक्य झाले होते. शहराच्या कानाकोपऱ्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुर्गा भाभींसह लाहोरमधून पळून जाण्यात यशस्वी

सँडर्सला मारण्यापूर्वी भगत सिंह यांनी केस कापले होते. पोलिसांना त्याच्या नव्या वेशाची माहिती नव्हती. ते केस आणि दाढी असलेल्या शीख तरुणाच्या शोधात होते.

भगत सिंह यांनी हेच कपडे घालून ट्रेनमध्ये चढायचे हे ठरले. त्यांच्यासोबत दुर्गा भाभी पत्नी म्हणून जाणार होत्या.

मालविंदरजीत सिंग बराईच त्यांच्या 'भगत सिंह द इटरनल रिबेल' या पुस्तकात लिहितात, "भगत सिंह यांनी ओव्हरकोट आणि टोपी घातली होती. त्यांनी त्यांच्या कोटची कॉलरही उंचावली होती. त्यांनी दुर्गा भाभींचा मुलगा शचीला अशा प्रकारे कडेवर घेतलं होतं की, त्यांचा चेहरा दिसणार नाही. भगत सिंह आणि दुर्गा भाभी फर्स्ट क्लास कूपेमध्ये होत्या, तर राजगुरू त्यांच्या नोकराच्या वेशात थर्ड क्लासमधून प्रवास करत होते. दोघांकडे लोडेड रिव्हॉल्वर होते."

लखनौ स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांनी स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये काही तास घालवले. येथून राजगुरू दुसऱ्या बाजूला गेले आणि भगत सिंह आणि दुर्गा भाभी कलकत्त्याच्या दिशेने निघाले. तिथे दुर्गा भाभींचे पती भगवतीचरण वोहरा आधीच उपस्थित होते.

सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचा निर्णय

कलकत्त्यात काही दिवस राहिल्यानंतर भगत सिंह आग्रा येथे आले आणि त्यांनी 'हिंग की मंडी' परिसरात दोन घरं भाड्याने घेतली. आग्रा इथेच भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांची एक बैठक झाली, ज्यामध्ये सँडर्सला मारल्याच्या निकालावर मोठी चर्चा झाली.

प्रत्येकाला असं वाटत होतं की, या हत्येचा त्यांना अपेक्षित होता तसा परिणाम झाला नाही. या भीतीने इंग्रज मोठ्या संख्येने भारत सोडून जातील अशी त्यांची अपेक्षा होती.

त्या दिवसांत विधानसभेत दोन विधेयके प्रस्तावित होती. एक म्हणजे सार्वजनिक सुरक्षा विधेयक ज्यामध्ये सरकारला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार देण्यात आला होता. दुसरे ट्रेड डिस्प्युट बिल होते ज्यात कामगार संघटनांना संपावर जाण्यास मनाई करण्यात आली होती.

ज्या दिवशी ही विधेयकं मांडली जाणार होती त्या दिवशी म्हणजे 8 एप्रिल रोजी भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त खाकी शर्ट आणि शॉर्ट्स घालून सेंट्रल असेंब्लीच्या प्रेक्षक गॅलरीत पोहोचले. त्यावेळी विधानसभेत विठ्ठलभाई पटेल, मोहम्मद अली जिना, मोतीलाल नेहरू असे अनेक मोठे नेते उपस्थित होते.

भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा

कुलदीप नय्यर लिहितात, की ज्या ठिकाणी विधानसभेचा एकही सदस्य उपस्थित नव्हता, त्या ठिकाणी भगत सिंह यांनी अतिशय काळजीपूर्वक बॉम्ब टाकला. बॉम्बचा स्फोट होताच संपूर्ण सभागृहात अंधार पसरला. बटुकेश्वर दत्तने दुसरा बॉम्ब फेकला. त्यानंतर प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेपर्यंत कागदी पत्रके उडू लागली. विधानसभा सदस्यांनी 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'श्रमजीवी चिरंजीव' अशा घोषणा दिल्या.

त्या पत्रकांवर लिहिलं होतं की, 'बहिऱ्यांना ऐकू जावं म्हणून मोठ्ठा आवाज लागतो.'

भगत सिंह किंवा बटुकेश्वर दत्त दोघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. हे आधीच ठरलं होतं. त्यांनी स्वतःला अटक होऊ दिली.

त्याचवेळी भगत सिंह यांनी ज्या पिस्तुलाने सँडर्सचा खून केला, ते पिस्तूल सरेंडर केलं. हे पिस्तूल सँडर्सच्या हत्येतील त्याच्या सहभागाचा सर्वात मोठा पुरावा असेल हे त्याला माहीत होते.

दोघांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले. भगत सिंह यांना मुख्य पोलीस ठाण्यात, तर बटुकेश्वर दत्ता यांना चांदणी चौक पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या दोघांची स्वतंत्रपणे चौकशी करणे हा त्यामागचा उद्देश होता, जेणेकरून सत्यता पडताळून पाहता येईल.

असेंब्लीत बॉम्ब फोडल्याप्रकरणी भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण सँडर्सच्या हत्येप्रकरणी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली.

लाहोरमध्ये शोक यात्रा

भगत सिंहांना फाशी देण्याच्या काही दिवस आधी पंडित मदन मोहन मालवीय यांनी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांना एक तार पाठवून भगत सिंह यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची मागणी केली होती. परंतु त्यांची विनंती फेटाळण्यात आली.

फाशी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण लाहोरमध्ये हरताळ पाळण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ निळा घुमटपासून शोक यात्रा काढण्यात आली. ज्या ठिकाणी सँडर्सवर गोळी झाडण्यात आली होती त्याच्या अगदी जवळ ही जागा होती.

हजारो हिंदू, मुस्लिम आणि शीख या तीन मैल लांबीच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पुरुषांनी आपल्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या, तर महिलांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या. मॉलमधून पुढे गेल्यावर संपूर्ण मिरवणूक अनारकली मार्केटच्या मध्यभागी थांबली.

त्यानंतर भगत सिंह यांचे संपूर्ण कुटुंब तीन हुतात्म्यांच्या अस्थी घेऊन फिरोजपूरहून लाहोरला पोहोचल्याची घोषणा करण्यात आली.

भगत सिंह यांचा अस्थिकलश लाहोरला आणला

तीन तासांनंतर फुलांनी भरलेल्या तीन शवपेट्या शोकयात्रेचा भाग बनल्या. यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या वेळी एका उर्दू वृत्तपत्राचे संपादक मौलाना जफर अली खान यांनी एक कविता वाचली.

ज्या तुरुंगात भगत सिंह यांना फाशी देण्यात आली होती त्या तुरुंगाचा वॉर्डन चरतसिंग हळूहळू त्याच्या खोलीकडे गेला आणि ढसाढसा रडू लागला. आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेकांना फासावर लटकताना पाहिले होते. पण भगत सिंह आणि त्यांच्या दोन साथीदारांइतक्या हिंमतीने मृत्यू कोणीही स्वीकारला नव्हता.

भगतसिंगांच्या मृत्यूनंतर 16 वर्षे, 4 महिने आणि 23 दिवसांनी भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रजांना कायमचे सोडावे लागले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)