गेटवे ऑफ इंडिया : ब्रिटिश राज ते मुंबई हल्ल्याचा साक्षीदार असलेल्या वास्तूला 100 वर्षं पूर्ण

    • Author, जान्हवी मुळे आणि अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

मुंबईतल्या अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला 4 डिसेंबर 2024 ला शंभर वर्षं पूर्ण होत आहेत.

गेल्या शंभर वर्षांत या कमानीने देशातली आणि शहरातली अनेक स्थित्यंतरं पाहिली.

ब्रिटिशांचा अंमल असताना 1911 साली भारत भेटीवर येणाऱ्या किंग जॉर्ज (पाचवे) आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी ही कमान उभारण्याचं ठरलं. तेव्हाच्या 'बॉम्बे' मध्ये ते अपोलो बंदराद्वारेच दाखल झाले होते.

1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली शेवटचं ब्रिटिश सैन्य याच गेटवे ऑफ इंडियातून देशाबाहेर पडलं होतं.

26 मीटर उंचीचं गेटवे ऑफ इंडिया इंडो - गोथिक शैलीत पिवळ्या बसाल्ट दगडांचा वापर करून उभारण्यात आलंय.

ज्या काळात हे गेटवे ऑफ इंडिया उभारण्यात आलं त्यावेळी अपोलो बंदर हे मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवासी आणि मालवाहू जहाजांसाठी महत्त्वाचं बंदर होतं.

रंजक बाब म्हणजे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी उभारलेलं ताजमहाल पॅलेस हॉटेल हे गेटवे ऑफ इंडियापेक्षा तब्बल 21 वर्षं जुनं आहे. 16 डिसेंबर 1903 रोजी ताजमहाल पॅलेस हॉटेलचं उद्घाटन झालं.

तेव्हाच्या) भारताचे राजे आणि महाराणी असणारे किंग जॉर्ज (पाचवे) आणि क्वीन मेरी 1911 मध्ये भारत भेटीवर आले होते.

भारतात येणारे ते ब्रिटिश राजघराण्यातले पहिलेच होते. त्यांच्या मुंबई भेटीप्रित्यर्थ गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली.

31 मार्च 1911 रोजी गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली. पण राजघराण्याचे सदस्य दाखल झाले तोपर्यंत या कमानीचं बांधकाम झालं नव्हतं. म्हणून मग त्यावेळी कार्डबोर्डची तात्पुरती कमान बांधण्यात आली.

स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांनी 1914 मध्ये या कमानीचा अंतिम आराखडा नक्की केला आणि दहा वर्षांनी 1924 मध्ये या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं.

या बांधकामासाठी निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या रावबहादुर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई यांनी या गेटवे ऑफ इंडियाची एक लहान प्रतिकृती तयार केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी आजही हे मिनी गेटवे ऑफ इंडिया त्यांच्या मुंबईतल्या घराच्या परिसरात जपलंय.

या गेटवे ऑफ इंडियाने अनेक ब्रिटिश व्हॉईसरॉय, गव्हर्नर आणि इतर मान्यवरांचं स्वागत केलं.

1915 साली महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले तेव्हा याच अपोलो बंदरात दाखल झाले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा या गेटवेने पाहिलेला आणखीन एक महत्त्वाचा क्षण आला 28 फेब्रुवारी 1948 रोजी. शेवटचं ब्रिटिश सैन्य याच गेटवे ऑफ इंडियातून भारतातून बाहेर पडलं.

आज मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया पहायला जगभरातून पर्यटक येतात.

या दिमाखदार कमानीसमोर पूर्वी पाचवे किंग जॉर्ज यांचा ब्राँझ पुतळा होता. 1961 साली इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

याच परिसरात स्वामी विवेकानंद यांचाही पुतळा आहे. अमेरिकेला जाण्यासाठी त्यांनी याच धक्क्यावरून प्रस्थान केलं होतं.

आज या परिसरामध्ये असणाऱ्या जेट्टीवरून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असणाऱ्या एलिफंटा लेण्यांना आणि अलिबाग, रेवस, मांडवा येथे जाण्यासाठी लाँच पकडता येते.

ऑगस्ट 2003 मध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बॉम्बस्फोट झाल्यानंतर इथला सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला.

तर याच गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असणाऱ्या ताजमहाल पॅलेस हॉटेलवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता.

गेटवे ऑफ इंडियाची ही दिमाखदार वास्तू अनेकदा सिनेमांमध्ये झळकली, तिच्या पुढ्यात अनेक मैफिली आणि समारंभ रंगले. मे 2023 मध्ये डिऑर (Dior) या आंतरराष्ट्रीय ब्रँडचा शो इथेच झाला होता.

दरवर्षी 4 डिसेंबरच्या दिवशी इथेच नौदल दिन साजरा केला जातो.

तर पावसाळ्यात उसळणाऱ्या, गेटवे ऑफ इंडियाला धडका देणाऱ्या लाटांचे फोटो - व्हीडिओ दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)