केरळमध्ये कर्मचाऱ्याला गळ्यात पट्टा बांधून चालवलं? व्हीडिओमागचं सत्य जाणून घ्या

फोटो स्रोत, Handout
- Author, झेविअर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तामिळ
केरळमधल्या एका खासगी कंपनीतल्या कर्मचाऱ्याला गळ्यात पट्टा बांधून जमिनीवर कुत्र्यासारखं चालायला लावल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमुळे सोशल मीडियासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे, असं पेरुंबवूर पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं.
दिवसाचं सेल्स टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे कर्मचाऱ्याला कोचीमधल्या एका खासगी कंपनीने अशी शिक्षा दिली असल्याचं स्थानिक माध्यमांनी व्हीडिओ प्रसिद्ध करत म्हटलं आहे.
या व्हीडिओत एका व्यक्तीला दोरीनं बांधून कुत्र्यासारखं चालवताना दिसत आहे. त्याला कुत्र्यासारखं भुंकायला लावलं जात आहे आणि एका थाळीत नाणी ठेवून ती चाटायला लावलं जात आहे.
काही इतर कर्मचारीही तिथे उपस्थित आहेत.
सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
एकामागून एक सगळ्याच स्थानिक न्यूज चॅनेल्सनी हा व्हीडिओ प्रसारित केला. तसंच सोशल मीडियावरही व्हीडिओ व्हायरल झाला.
त्यानंतर केरळ राज्य मानव हक्क आयोग आणि केरळ राज्य युवा आयोगाने तक्रार नोंदवण्यासाठी या प्रकरणात पुढाकार घेतला.

फोटो स्रोत, Handout
"कोणत्याही सभ्य समाजात असं कृत्य स्वीकारलं जाऊ शकत नाही. याविरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे," असं केरळ राज्य युवा आयोगाचे प्रमुख शाजर म्हणाले.
ही घटना अतिशय धक्कादायक असून चौकशीचे आदेश दिलेले आहेत, असं केरळचे कामगार मंत्री शिवनकुट्टी यांनी सांगितलं.
कामगार विभागाकडून या घटनेसंदर्भात एक तपशीलवार अहवाल मागवण्यात आला आहे, असंही ते पुढे म्हणाले.
चार महिन्यांपूर्वीची घटना?
व्हीडिओमध्ये ज्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली गेली तो तरुण म्हणतो, "मी अजूनही त्या कंपनीत काम करतो. हा व्हीडिओ कंपनीत व्यवस्थापकीय पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी काढला आहे.
"नंतर त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला सांगितलं गेलं. आता तो या व्हीडिओचा वापर कंपनीला बदनाम करण्यासाठी करत आहे."
असाच जबाबही व्हीडिओतील तरूणानं अधिकृतरित्या दिल्याचं पीटीआय संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी तमिळशी बोलताना इर्नाकुलम जिल्ह्याचे कामगार कल्याण अधिकारी विनोथ कुमार म्हणाले की, संबंधित कर्मचाऱ्याने दिलेल्या जबाबामध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये चित्रित झालेला तो व्हीडिओ बनावट पद्धतीने सादर करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.
"ज्या व्यक्तीने व्हीडिओ प्रसारीत केला तो आता त्या कंपनीत काम करत नाही. त्याने काही महिन्यांपूर्वी काढलेला व्हीडिओ सूडबुद्धीतून टाकला आहे. पण ज्यावर अन्याय झाला असं म्हटलं जातंय, ती व्यक्ती अजूनही तिथेच काम करतेय. कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल कामगार कल्याण आयोगाकडे दिला आहे. तिथून तो केरळ सरकारकडे सुपूर्द केला जाईल," असं विनोथ कुमार म्हणाले.
कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळत नाही.
या कर्मचाऱ्यांना विक्रीच्या आधारे केवळ कमिशन दिलं जातं, त्यामुळे "विक्रीचं उद्दिष्ट गाठलं नाही म्हणून शिक्षा देण्यात आली" ही माहिती चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कुत्र्यासारखं चालायला का लावलं?
बीबीसी तमिळशी बोलताना पेरुंबवूर सर्कल पोलिस अधीक्षक सूपी म्हणाले, "व्हायरल झालेला व्हीडिओ विनोद म्हणून चित्रित करण्यात आला होता. तिथं पूर्वी काम करणाऱ्या एका माजी व्यवस्थापकाने सूड घेण्यासाठी मुद्दाम हा व्हीडिओ रेकॉर्ड करून खोटी माहिती देत तो समाजमाध्यमांवर पसरवला आहे.
"तो जेव्हा या संस्थेत काम करत होता, तेव्हा त्यांचे संस्थेच्या व्यवस्थापनासोबत मतभेद झाले होते. त्यामुळेच त्याने हा व्हिडीओ चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसारित केला आहे."
आपल्याला अशी कोणतीही शिक्षा झाली नसल्याचं व्हीडिओत दिसणाऱ्या माणसानेही कबूल केलं आहे. ती घटना एका खेळाचा भाग होती, असं त्याने स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Handout
कोझिकोडमधल्या या व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या माजी व्यवस्थापकाविरुद्ध, सध्या त्या संस्थेत काम करणाऱ्या एका महिलेनं तक्रार दाखल केली आहे. शिक्षा म्हणून कुत्र्यासारखं वागवण्यात आल्याची कोणतीही घटना झाली नव्हती असं त्यांनी सांगितलं.
"महिलेच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेतील कलम 74 नुसार माजी व्यवस्थापकाविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र, घटना घडून अनेक महिने झाले असल्याने कोणतीही त्वरित कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत," सर्कल इन्स्पेक्टर सूपी म्हणाले.
बीबीसी तमिळशी बोलताना, पीपल्स सिव्हिल राइट्स फोरमचे प्रशासक आणि वकील बालमुरुगन म्हणाले, "ही घटना मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. हे मानवी सन्मानाच्या विरोधातलं कृत्य असल्यामुळे पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी गुन्हा नोंदववा यासाठी सर्व कायदेशीर आधार आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











