"घरचे कर्ते–धर्ते गेले, कुटुंबाने जगायचं कसं?" मुंबईत तळघरातील पाण्याच्या टाकीत गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईतील नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस या इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या चार कामगारांचा टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (9 मार्च) घडली.
"घरचे कर्ते–धर्ते गेले, कुटुंबानं जगायचं कसं?" असं नाकबोर शेख यांनी रडत सांगितलं.
मृत पावलेल्या कामगारांचे मित्र आणि नातेवाईक त्यांच्या वेदना सांगत होते.
नाकबोर शेख यांचा भाऊ हसीबुल शेख (वय 19) आणि मित्र जिउल्ला शेख (वय 36) या कामगारांचा तळघरातील पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू झाला.
बीबीसी मराठीशी बोलताना नाकबोर शेख म्हणाले की, चौघांचा टाकीत गुदमरून मृत्यू झाला. त्यात माझा नातेवाईक आणि जवळचा मित्र हसीबुल आणि जिउल्ला हे दोघे होते.
नेहमीप्रमाणे दोघेही कामासाठी आले. टाकी साफ करत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला फोन करून कळवण्यात आलं.
हे ऐकून आमच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण सोबत राहणारे आणि एकत्र खाणंपिणं करणारे अचानक असं गेल्यानं आमच्यासह त्यांच्या कुटुंबावर देखील मोठा आघात झाला आहे.
दोघेही घरातील कमावते होते. त्यांच्यावर घराचा सर्व उदरनिर्वाह सुरू होता. त्यामुळे आता त्यांच्या घरातल्यांचं कसं होईल? त्यांच्या निधनानं कुटुंब वाऱ्यावर आलंय.
त्यांना व त्यांच्या घरातल्यांना न्याय मिळायला हवा अशी मागणी नाकबोर यांनी केली.
मृत पावलेल्या जिउल्ला शेख हा 36 वर्षीय कामगार कलकत्ता येथील आहे. तो गेल्या 10 वर्षांपासून कामासाठी मुंबईत आहे.
तो मजुरी आणि टाकी साफ करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून करत होता.


एक मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई-वडील असा त्याचा परिवार कलकत्ता येथे राहतो. जिउल्ला हा कुटुंबीयांचा आधार होता.
तर मृत पावलेला हसीबुल शेख हा 19 वर्षाचा कामगार गेल्या वर्षभरापासून मुंबईत मिळेल ते काम करत होता. तो देखील मूळचा कोलकत्ता येथील आहे. त्याच्या घरी आई-वडील बहीण असा त्याचा परिवार.
वडील आजारी असतात, त्यामुळे घराच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत काम करण्यासाठी आला होता. हसीबुल शेख हा देखील आपल्या गावातील मित्रमंडळींसोबत नागपाडा येथील एका रूमवर राहत होता.
टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरले होते टाकीत
रविवारी साडेबाराच्या सुमारास पाच कामगार बिस्मिल्ला स्पेस नव्याने बनत असलेल्या इमारतीत पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरले होते.
तेव्हा गुदमरल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला, तर एका कामगारावर जे जे रुग्णालय उपचार सुरू आहेत.
बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीतील तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीची अनेक महिन्यांपासून स्वच्छता झाली नव्हती. त्यामुळे टाकी स्वच्छ करण्याचे कंत्राट सोसायटीने एका खासगी कंपनीला दिले.
त्या कंपनीचे हे कामगार टाकी स्वच्छ करण्यासाठी रविवारी दुपारी खोल टाकीत उतरले.
मात्र, टाकीतील अपुऱ्या ऑक्सिजनमुळे काही वेळातच त्यांचा श्वास गुदमरला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले.
त्याचबरोबर रुग्णवाहिका, पोलीस आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही दुर्घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच कामगारांना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या जे. जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला.
हसीबुल शेख (वय 19), राजा शेख (वय 20), जिउल्ला शेख (वय 36), इमांदू शेख (वय 38) अशी मृत कामगारांची नावे आहेत. त्यातील पुरहान शेख (वय 31) हा बचावला असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. जे जे मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
ते म्हणाले, "बिस्मिल्ला स्पेस नावाची एक इमारत आहे. या इमारतीचं काम सुरू आहे. साधारण 30 मजली इमारत आहे. त्यातच इमारतीच्या खालील भागात पाण्याची टाकी आहे. यात काही कामगार काम करण्यासाठी खाली उतरले होते. त्यात चार कामगार गुदमरून बेशुद्ध झाले होते."
"आम्ही व अग्नीशमन दलाने तिथे रेस्क्यू ऑपरेशन केले. एकूण 5 कामगारांना रुग्णालयात दाखल केले. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आणि एकावर उपचार सुरू आहेत."
या प्रकरणासंदर्भात पुढील पोलीस चौकशी आणि तपास सुरू आहे, असे काटे यांनी सांगितले.
मृत पावलेले चारही कामगार हे मूळचे कोलकत्ता येथील होते. ते गेल्या काही वर्षांपासून नाका कामगार म्हणून मिळेल ते काम करत होते. हे सर्व कामगार आपापल्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या रूमवर राहत होते.
कामगारांच्या मृत्यूची कारणे काय?
पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी आत उतरलेले कामगार प्रशिक्षित नसल्याचे सांगितले जात आहे.
टाकीमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था अथवा यंत्रणा उभारण्यात आली नसल्याचीही माहिती मिळाली आहे.
प्राणवायूच्या कमतरतेमुळे टाकीमध्ये कार्बन मोनॉक्साईड किंवा मिथेन वायूची निर्मिती झाली असावी, अशीही शक्यता आहे.
कामगारांकडे पुरेशी साधनेही दिली नसल्याची प्राथमिक माहिती असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मात्र, या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या संदर्भात ज्या इमारतीत ही घटना घडली , त्या इमारत व्यवस्थापनाशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या घटनेनंतर कामगार नेते मिलिंद रानडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "यासारख्या घटनेत खुप दिवसानंतर टाकी उघडल्यानंतर ऑक्सीजनची कमतरता टाकीत असते. या घटनेत देखील तेच झाले."
"हे नविन नाही. महाराष्ट्रात आणि देशात अशाप्रकारे कोण मरतंय? तर गरीब, निरक्षर, दलित मरतात. कोणी मोठा अधिकारी मरणार नाही, तोपर्यंत हे कधीच थांबणार नाही."

पुढे रानडे म्हणाले, "कामगारांसाठी काहीतरी कायदेशीर तरतूद व्हायला हवी. विज्ञानाची प्रगती झाली, मात्र कामगार अशाप्रकारे मरतात, कारण त्यांच्या जीवाची आपल्याला किंमत नाही."
"या कामगारांवर शासनाचे लक्ष नाही. त्यांच्यासाठी काही नियमावली आणि निर्णय सरकारनं घ्यायला हवेत. दररोज आणि दर महिन्याला एक कामगार अशाप्रकारे मरतो आहे," असं रानडे यांनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











