आसाममधील कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह सापडला, इतरांचा शोध सुरूच

फोटो स्रोत, Defence PRO, Guwahati
आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगशू भागात एका कोळसा खाणीत अडकलेल्या 9 कामगारांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर इतर कामगारांचा शोध घेऊन बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरून, याबाबत माहिती दिली आहे.
घटनास्थळी आसाम रायफल्स, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या संयुक्त पथकाद्वारे मदत व बचावकार्य सुरू आहे. बचावपथक युद्धपातळीवर कामगारांचा शोध घेत आहे.
एनडीआरएफच्या फर्स्ट बटालियनचे कमांडंट एचपीएस कंदारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "काल (7 जानेवारी) आम्ही खाणीत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे बरेच प्रयत्न केले, पण यश आले नाही.
आज (8 जानेवारी) पथकानं पुन्हा खाणीत उतरुन शोध घेतला असता एका कामगाराचा मृतदेह सापडला. आमची मोहीम दिवसरात्र सुरु आहे, कामगारांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत."


प्राप्त माहितीनुसार हे कामगार सोमवारी (6 जानेवारी) सकाळी सुमारे 8 वाजता आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगशू भागातील एका कोळसा खाणीत कोळसा काढण्यासाठी उतरले होते. पण अचानक मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे कामगार खाणीत अडकले.
या कामगारांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचं पथक मंगळवारी वेगवेगळ्या वेळी पाच वेळा खाणीत उतरले होते, परंतु पाण्यामुळे अडचणी निर्माण झाल्यानं त्यांना यश आलं नाही.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
यानंतर बुधवारी (8 जानेवारी) सकाळपासूनच भारतीय सैन्य, आसाम रायफल्स, एनडीआरएफ, एसडीआरएफसह इतर यंत्रणा संयुक्तरित्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.
एनडीआरएफच्या फर्स्ट बटालियनचे डेप्युटी कमांडंट एन. तिवारी यांनी बातमी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, "मंगळवारी संध्याकाळी बचावकार्य थांबवावं लागलं होतं, पण बुधवारी पहाटेपासूनच शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर खाण कामगारांपर्यंत पोहचून त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत."

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
दरम्यान, खाणीत काम करणाऱ्या एका कामगाराने एएनआयसोबत बोलताना सांगितलं की, "खाणीत बरेच कामगार होते. अचानक लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पाणी भरत आहे, म्हणत लोकांनी ओरडायला सुरुवात केली. जवळपास 30-35 लोक पटापट बाहेर पडण्यात यशस्वी ठरले, तर 15-16 जण अडकून पडले."
भूतकाळातही घडले होते अपघात
ईशान्येकडील राज्यांमध्ये कोळशाच्या खाणींमध्ये वारंवार अशा प्रकारचे अपघात घडल्याची नोंद आहे.
मेघालयमध्ये बेकायदेशीरपणे उत्खनन केलेल्या कोळशाच्या खाणीत शेजारच्या नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं 15 कामगार अडकून पडले होते.

फोटो स्रोत, X/@himantabiswa
2018 साली घडलेल्या या घटनेत पाच कामगार बचावले, तर उर्वरित कामगारांना वाचवण्यासाठीचं कार्य मार्च 2019 पर्यंत सुरु होतं. शेवटी, फक्त दोन मृतदेह सापडले.
नागालँड राज्यात जानेवारी 2024 मध्ये 'रॅट होल' खाणीत आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











