मणिपूर : मुसळधार पाऊस, कोसळणाऱ्या दरडी, चिखलराड आणि बेपत्ता 34 माणसं

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, मणिपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत.
    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, मणिपूरहून

हा प्रवास सोपा नाही, कमकुवत हृदयाच्या माणसांसाठी तर नाहीच नाही.

मणिपूरची राजधानी इंफाळपासून नोनी जिल्ह्यातील मरांगचिंग या ठिकाणी पोहोचणं एक आव्हानच आहे. रस्ते खचले आहेत. भूस्खलनामुळे रस्त्यावर धूळ-माती यांचे ढिगारे जमा झाले आहेत. हा ढीग दूर करण्यासाठी मोठमोठी यंत्र कार्यरत आहेत.

डोंगरांमध्ये प्रत्येक ठिकाणी दगड फोडण्याचं काम सुरू आहे. या कामातली माणसं अचानक तुमचं वाहन थांबवतात. जेणेकरून वरून खाली येणाऱ्या ढिगाऱ्याखाली तुम्ही येऊ नये.

प्रत्येक किलोमीटरवर हेच दृश्य आहे. सततच्या पावसामुळे डोंगरातल्या रस्त्यावर चिखल साचून राहिला आहे. गाड्या अडकून पडल्या आहेत. पाऊस थांबायचं लक्षण नाही.

नाऊमेद झालेलो नाही

दगड कोसळत आहेत. कसंबसं गाड्या वाट काढून जात आहेत. एखाद्या थ्रिलर चित्रपटात शोभावं असं हे दृश्य जागोजागी दिसतंय.

मणिपूर राज्यातील नोनी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात बेपत्ता झालेल्या लोकांच्या वाचण्याची शक्यता धूसर झाली आहे. मणिपुरात झालेल्या या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांमध्ये आसामचेही सातजण आहेत.

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, भूस्खलन

आसाम सरकारचे मंत्री पियुष हजारिका यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आशा सोडलेली नाही असं सांगितलं.

लष्कर आणि एनडीआरएफने बचावाचं कार्य हाती घेतलं आहे. पण त्यांनीही आता कोणाच्या वाचण्याची शक्यता कठीण असल्याचं सांगितलं. काही चमत्कार झाला तरच कोणी आता जिवंत वाचू शकतं.

खराब वातावरणामुळे बचावकार्यात अडथळा

धुवाधार पाऊस आणि थांबून होत असलेल्या भूस्खलनादरम्यान मृतदेह सापडत आहेत. भूस्खलनामुळे सातत्याने ढिगारे जमा होत आहेत. बचाव कार्याला हे बाजूला करून माणसांचा शोध घ्यावा लागत आहेत.

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एसएम खान हे आपात्कालीन विभागाचेही प्रमुख आहेत. त्यांच्या देखरेखीखालीच बचाव कार्य सुरू आहे.

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, मणिपूरचे अतिरिक्त मुख्य सचिव एसएम खान

केवढ माती-धूळ यांचे ढिगारे नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर चिखलही साचला आहे असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

माती कोरडी असती तर त्याखाली एअर पॉकेट तयार होऊन अडकलेल्यांची वाचण्याची शक्यता होती.

बचावकार्य

जोरदार पावसामुळे सगळे ढिगारे चिखलरुपात खाली कोसळले, याखाली अडकलेले लोक जिवंत असण्याची शक्यता कमी आहे. दुर्घटनेचं समजताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. यामध्ये 18 जखमींना वाचवण्यात बचावयंत्रणांना यश आलं.

पण जसा वेळ पुढे जातो आहे तशी लोक जिवंत असण्याची शक्यता कमी होत चालली आहे.

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, भूस्खलन

बचावाचं काम काही फूट खोल भागात जाऊन सुरू आहे. जेसीबी मशीन्सच्या साह्याने मातीचे ढीग बाजूला केले जात आहेत. कर्तव्याप्रति कटिबद्ध असे जवान खाली जाऊन लोकांचा शोध घेत आहेत.

जीवाची भीती

आम्ही तिथे असतानाच एक मृतदेह मिळाल्याची बातमी वायरलेसवर अधिकाऱ्यांना मिळाली. एक लांब दोरी खाली सोडण्यात आली. स्ट्रेचर त्याने बांधून मृतदेहाला वर खेचण्यात आला.

मृतदेहाची ओळख लगेच पटली नाही. हे असं इथे सतत सुरू आहे.

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, प्रचंड ढिगारे सातत्याने कोसळत आहेत.

सातत्याने होणारा प्रचंड पाऊस आणि ढिगारेच्या ढिगारे खाली कोसळत असल्याने बचाव यंत्रणेत सहभागी जवानांच्या जीवालाही धोका आहे.

सैनिकांचा मृत्यू

मणिपूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजूनही 34 लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ज्या लोकांचे मृतदेह मिळाले आहेत त्यामध्ये ज्युनियर कमिशन्ड अधिकाऱ्याच्या मृतदेहाचाही समावेश आहे.

टेरिटोरिअल आर्मीच्या 14 सैनिकांचे मृतदेह आढळले आहेत. सगळे मृतदेह संबंधितांच्या गावी पाठवण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

टेरिटोअरिल आर्मी

टेरिटोअरिल आर्मीच्या 107व्या बटालियनला इथे तैनात करण्यात आलं आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ते घेऊ शकतील. म्यानमारशी संलग्न सीमेवर कट्टरपंथीयांच्या घडामोडी वाढल्या आहेत.

नागा आणि कुकी समाजाच्या भूमिगत संघटना सक्रिय झाल्याने या भागात सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे सरकारला याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाहीये.

महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचं काम करणाऱ्या दोन खाजगी कंपन्या आणि काही रेल्वे कर्मचाऱ्यांचे मृतदेहही सापडले आहेत.

मात्र या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या काही स्थानिक गावकऱ्यांबद्दल मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.

यामध्ये एक कुटुंब आहे जे 'टेरिटोरियल आर्मी'च्या तुपूल कॅम्पजवळ दुकान चालवायचे. स्थानिक गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, घटनेच्या वेळी दुकानामध्ये एक स्थानिक महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी होती. या दोघींबद्दल अजून काहीही माहिती मिळाली नाहीये.

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, या भागात महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प सुरू आहे.

एल मखुवाम हेसुद्धा गेल्या तीन दिवसांपासून इथेच ठाण मांडून आहेत. ते आपला मुलगा, सून आणि दोन वर्षांच्या नातीचा शोध घेताहेत. आतापर्यंत केवळ दोन गॅस सिलिंडर मिळाले आहेत, जे त्यांच्या सुनेच्या दुकानात होते.

मखुवाम सांगतात की, इतरही अनेक गावकरी या प्रकल्पामध्ये छोटी-मोठी कामं करायचे. त्यांचाही शोध लागला नाहीये. अशा सगळ्या गावकऱ्यांची ओळख पटविण्याची मागणी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

भूस्खलनाचा धोका वाढला- मुख्यमंत्री

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, त्यांच्या राज्यांतील डोंगर हे नवीन आहेत, त्यामुळे भूस्खलनाचा धोका आहे.

ते म्हणतात की, इथला रेल्वे प्रकल्प खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि तो पूर्ण झाल्यावर मणिपूर सगळ्या देशासोबत जोडलं जाईल.

या प्रकल्पांतर्गत जगातील सर्वांत उंचावरील रेल्वे ब्रिजचं काम अतिशय वेगानं सुरू आहे. बिरेन सिंह यांनी हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असल्याचं म्हटलं आहे.

मणिपूर, भूस्खलन

फोटो स्रोत, MANISH JALUI/BBC

फोटो कॅप्शन, भूस्खलन

दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नोनीचे जिल्हाधिकारी एच गुईटे यांनी घटनास्थळाच्या जवळ राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.

तुपूलमध्ये जिथे ही दुर्घटना घडलीये, तिथे वारंवार भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाने इथल्या लोकांना एखाद्या सुरक्षित स्थानी जाण्याचा सल्ला दिला आहे.

अर्थात, इथे रेल्वे प्रकल्पाचं काम रात्रं दिवस सुरू आहे. त्यामुळेच नोनी पासून मरांगचिंगला जाण्यापर्यंतच्या 80 किलोमीटरच्या रस्त्यावर घसरून आलेले मोठाले दगड हटविण्याचं काम सुरू आहे.

रस्ता रुंदीकरणाचं कामही सुरू आहे. पण त्यामुळे पर्वत अजून खचत आहेत आणि भूस्खलनचा धोकाही वाढतोय.

मणिपूरची राजधानी इम्फाळहून नोनीला जाण्यासाठी जवळपास एक तासाचा वेळ लागतो. मात्र, रस्त्यांची जी दुरवस्था झाली आहे, त्यामुळे जवळपास चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे.

मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्याने आणि विविध विकास प्रकल्पांमुळे मणिपूरमधील डोंगर उत्तराखंडप्रमाणेच संवेदनशील झाले आहेत. कदाचित त्यामुळेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे जास्त चिंतेत आहेत. कारण हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये मोडतो.

बिरेन सिंह म्हणतात, "कोणत्याही क्षणी मोठा भूकंप आल्यास प्रचंड हानी होऊ शकते. त्यामुळेच आम्ही सावधगिरी बाळगत आहोत. हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आम्ही या डोंगरी भागांमध्ये वृक्षारोपणही करत आहोत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)