इतिहास : पृथ्वीवरचा 'हा' भलामोठा कालखंड गायब होण्याचं रहस्य काय? त्यादरम्यान काय-काय घडलं?

ग्रँड कॅनियन

फोटो स्रोत, Getty Images

पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले खडक एका पुस्तकासारखे असतात. पर्वत, दऱ्या, आणि इतर भौगोलिक प्रदेश या पुस्तकाच्या पानांसारखे असतात.

एकेका पानात तुम्हाला कळतं की तुमच्यासमोर आज जे चित्र उभं राहिलंय ते कधी आणि कसं बनलं.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे खडकांमधले वरवरचे थर म्हणजे गोष्टीच्या पुस्तकाची पहिली पानं. जसजसे थर खोलवर जातात पृथ्वीच्या इतिहासाचा कलाखंडही मागे मागे सरकतो.

पण जर या पानांमधली काही पानंच गायब असतील तर? पुस्तकातला हा अध्याय वाचताच आला नाही तर संपूर्ण कथा कशी कळणार?

पृथ्वीच्या भूगर्भशास्त्रीय नोंदीच्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे. पृथ्वीवरच्या खडकांच्या सर्वात नव्या आणि सर्वात जुन्या खडकांच्या थरांमध्ये खूप मोठं अंतर आहे.

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र संस्थेनुसार (एजीयू) हे अंतर 1 अब्ज वर्षं इतकं मोठं असू शकतं. भूगर्भशास्त्रातल्या सर्वात मोठ्या कोड्यांपैकी हे एक कोडं आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडोच्या भूगर्भशास्त्र विभागात संशोधन करणाऱ्या बारा पीक यांचं म्हणणं आहे की, "1 अब्ज वर्षं म्हणजे पृथ्वीच्या इतिहासाचा जवळपास एक चतुर्थांश भाग. एवढ्या मोठ्या कालखंडात पृथ्वीवर काय झालं याची नोंदच नाहीये. कोणालाच माहिती नाही या काळात पृथ्वीवर काय घडत होतं ते."

काय आहे या हरवलेल्या काळाचं रहस्य?

भूगर्भशास्त्रात कोणत्याही कालखंडाला समजून घ्यायचं असेल तर खडकांच्या थरांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक खडकात थर असतात. वरचा थर सर्वांत नवा असतो आणि सर्वांत खालचा खर सगळ्यांत जुना.

हे थर आणि या थरांच्या जागा आपल्याला सांगतात की त्या भागातली माती कधी आणि कशई बनली. खडकांच्या थरांच्या या अभ्यासाला स्ट्रेटिग्राफी म्हणतात. यावरून कळतं की कोणताही थर तयार होत असताना त्या काळातली पृथ्वी कशी असेल.

खडकांमधले हे थर स्पष्ट दिसतील अशी जागा एक प्रसिद्ध जागा आहे अमेरिकेतली ग्रँड कॅनियन. इथल्या खडकांमधली प्रत्येक आडवी रेष स्पष्ट दिसते आणि हे थर कधी, कोणत्या परिस्थिती बनले असतील याचा अभ्यास करता येतो.

ग्रँड कॅनियनच्या अभ्यासावरूनच कळलं की पृथ्वीच्या इतिहासातला भलामोठा कालखंड गायब आहे.

जीवसृष्टी कशी घडत गेली याचे पुरावे खडकांच्या थरात सापडतात

फोटो स्रोत, ESKAY LIM / EYE EM

फोटो कॅप्शन, जीवसृष्टी कशी घडत गेली याचे पुरावे खडकांच्या थरात सापडतात

भूगर्भशास्त्रज्ञ जॉन वेस्ली पॉवेल यांनी पहिल्यांदा या खडकांचं निरिक्षण करून हा निष्कर्ष काढला. त्यांनी सांगितलं की खडकांच्या थरांच्या या पुस्तकात इतिहासाचा एक मोठा कालखंड सापडत नाहीये.

मधले हे खडक गेले कुठे मग? पीक म्हणतात की खडकांचे हे थर गायब आहेत कारण पाणी किंवा पृष्ठभागीय दाब यामुळे या थरांची वाळू झाली आणि समुद्रात जमा झाली.

पण इतर ठिकाणी झालेल्या अभ्यासातही या खडकांचं अस्तित्व होतं की नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

नक्की काय झालं हे का कळत नाहीये?

अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या गायब कालखंड होता हे निश्चितपणे सांगता येणारे किंवा ठामपणे नाकारणारे कोणतेही स्पष्ट पुरावे सापडत नाहीयेत.

पण काय झालं असू शकतं याबद्दल चार शक्यता वर्तवल्या जातात.

खडकांचे थर तयार होताना आसपासच्या वातावरणातले घटक त्यांच्यात समाविष्ट होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वीवरच्या एखाद्या कालखंडात पृथ्वीवर ऑक्सिजन कमी असेल आणि कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल तर त्या थरातही कार्बनचं प्रमाण जास्त असेल.

जसाजसा काळ पुढे सरकतो, खडकांचे हे थर खाली ढकलले जातात आणि वरती नवे थर तयार होत राहातात.

मधले काही थर का गायब झाले असतील याबद्दल एक प्रवाद सांगतो की सुपर कॉन्टिनेंट रोडिनियामुळे असं झालं.

सुपर कॉन्टिनेंट म्हणजे काय ते समजून घेऊ. आज पृथ्वीवर भूभागाचे भले मोठे तुकडे आहेत ज्याला खंड असं म्हणतात. यात अमेरिका, आशिया, युरोप असे खंड येतात.

पण अतिप्राचीन काळ हे भूभागाचे वेगवेगळे तुकडे नव्हते तर एकच प्रचंड मोठा प्रदेश होता. त्यालाच सुपर कॉन्टिनेंट म्हणतात.

खडकांचे थर

फोटो स्रोत, Getty Images

पृथ्वीच्या 4 अब्जाहून जास्त काळाच्या इतिहासात अनेकदा या प्रचंड प्रदेशाचे तुकडे झाले आणि अनेकदा ते जोडले गेले.

तर परत येऊ पहिला सुपर कॉन्टिनेंट रोडिनियाकडे. हा साधारण 80 कोटी ते 1 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला होता.

ज्या काळी रोडिनिया तयार झाला, तेव्हा खडक एकदम बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात आले. त्यामुळे या खडकांचे अनेक थर एकाचवेळ नष्ट झाले असू शकतात.

पीक म्हणतात, "नव्याने तयार होत असलेले खडक एकदम नष्ट झाले तर त्याचा माग लागणं अवघड आहे."

दुसऱ्या मान्यतेत अजून एका सुपर कॉन्टिनेंटचा उल्लेख आहे. याचं नाव पेनोटिया आहे. हा सुपर कॉन्टिनेंट साधारण 58 कोटी वर्षांपूर्वी तयार झाला असेल असं मानतात.

तिसरा प्रवाद पण रोडिनियाशी संबधित आहे. पण यात असं समजलं जातं की रोडिनियाचे तुकडे झाले असतील तेव्हा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातल्या वस्तुमानात फरक पडला असेल आणि नव्याने तयार झालेले अनेक खडक नष्ट झाले असतील.

ग्लोबल वॉर्मिंग

पृथ्वीच्या हरवलेल्या कालखंडाबद्दलचा चौथा आणि सर्वात रंजक प्रवाद ग्लोबल वॉर्मिंग होता. अर्थात ही ग्लोबल वॉर्मिंग आता मानवजातीला धोका ठरतेय ती नाही, तर ज्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी अवतरू शकली.

साधारण 70 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी अतिथंड होती. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ते तेव्हा पृथ्वी पूर्णपणे बर्फाने आच्छादलेली होती. हेच पृथ्वीचं सगळ्यांत बाहेरचं आवरण असेल. आता खडकांवर बर्फाचंच आवरण असेल त्यामुळे नवीन थर जमा झाले नाहीत.

खडकांचं वय ठरवताना भूगर्भशास्त्रज्ञ त्यातल्या रासायनिक मुलद्रव्यांचं विश्लेषण करतात. या मुलद्रव्यांचं हळूहळू विघटन झालेलं असतं आणि नवी मुलद्रव्य तयार झालेली असतात.

हे चक्र चालूच रहातं.

पीक बार त्या अभ्यास करत असलेल्या खडकांसह

फोटो स्रोत, Pear Baar

फोटो कॅप्शन, पीक बार त्या अभ्यास करत असलेल्या खडकांसह

सगळे स्तर एकत्र केले आणि त्यांचा अभ्यास केला की प्रत्येक कालखंडात पृथ्वी कशी होती हे कळतं. पण या गायब झालेल्या कालखंडाबद्दल ठोस माहिती मिळाली तर पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली, जीवसृष्टीचा विकास कसा झाला यावर अधिक प्रकाश पडू शकेल असं पीक म्हणतात.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका लेखात म्हटलंय की या गायब कालखंडात आणखी एक रहस्य लपलेलं आहे. साधारण 48 ते 54 कोटी वर्षं पूर्व काळात कॅरिबियन समुद्रात अचानक जटील जीवांचा उमग झाला. याला कॅरिबियन स्फोट असं म्हणतात.

म्हणजे याच्या आधी पृथ्वीवर एकपेशीय जीव होते आणि त्यांचा जन्म कसा झाला याची माहिती अस्तित्वात आहे. पण कॅरिबियन स्फोटाच्या काळात अचानक बहुपेशीय जीव पृथ्वीवर जन्माला आले.

ते का जन्माला आले, त्याकाळी पृथ्वीवर कोणती मूलद्रव्यं होती, वातावरण कसं होतं याबद्दल काहीच माहिती नाही कारण हा कालखंड गायब आहे.

उक्रांतीच्या सिद्धांतांचे जनक चार्ल्स डार्विनही याच कालखंडामुळे गोंधळात पडले होते. या काळात काय घडलं हा प्रश्न मानवाला गेल्या 200 वर्षांपासून सतावतो आहे आणि त्याचं उत्तर मिळालं ते मोठंच यश ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)