जागतिक पर्यावरण दिन: 'आईच्या अस्थी मातीत पुरुन आम्ही त्यावर झाड लावलं'

वसुंधरा अभियान

फोटो स्रोत, Manasi deshpande

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुण्याच्या बाणेरमधील तुकाई टेकडीवरची सकाळ. स्थानिक रहिवासी असलेल्या वैशाली गर्भे त्यांच्या भावंडांसोबत आईच्या अस्थी घेऊन तुकाई टेकडीवर आल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच त्यांची आई वीणा गर्भे यांचं निधन झालं होतं.

आपल्या आईच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी या भावंडांनी निसर्गाची मदत घ्यायचं ठरवलं. तुकाई टेकडीवर आईच्या अस्थी पुरून त्यांनी त्यावर एक झाड लावलंय. झाडाच्या रुपानं आईच्या प्रेमाची सावली सगळ्यांना मिळेल या भावनेने हा निर्णय घेतल्याचं वैशाली गर्भे यांनी सांगितलं.

वर्षभर हिरवंगार राहणारं आणि उंच वाढणारं खया प्रजातीचं झाड गर्भे कुटुंबियांनी लावलंय.

तुकाई टेकडीवर अशी वेगवेगळ्या प्रजातीची हजारो झाडं आहेत. स्मृतींचं प्रतीक म्हणून टेकडीवर रूजवली गेली आहेत. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जवळच्या व्यक्तीचा किंवा पाळीव प्राण्याचा मृत्यू, अविस्मरणीय क्षण अशा अनेक प्रसंगाच्या निमित्ताने इथे वृक्षारोपण केलं जातं.

दगडांवर झाडं कशी उगवणार?

झाडं फक्त लावणंच नाही तर ती जगवणं आणि वाढवण्याचं कामही इथले स्थानिक रहिवासी करतायत. वसुंधरा अभियान बाणेर या बॅनर खाली एकत्र येऊन 2006पासून स्थानिक लोक हे काम करतायत. त्यामुळे आधी ओसाड असलेल्या खडकाळ टेकडीला आता हळूहळू हिरवं आच्छादन मिळू लागलंय. जैवविविधता वाढू लागलीये.

स्थानिक रहिवाशांनी 2006 मध्ये एकत्र येऊन सुरू केलेल्या या उपक्रमात आता 5 हजाराच्याही वर सदस्य आहेत. बाणेर गावाजवळची खडकाळ, ओसाड, गायरान असलेली ही टेकडी आता झाडांच्या निरनिराळ्या प्रजातींनी बहरतेय.

"तुकाई मंदिर या टेकडीवर आहे. त्याच्या पायऱ्यांपासून झाडं लावायला सुरुवात करण्याचा विचार आम्ही केला. कारण तिथे पाणी उपलब्ध होतं. ती झाडं लावणे आणि जगवण्याचा आनंद आम्हाला घेता आला. सुरुवातीला काही लोकांनी सल्ला दिला होता की, शतकानूशतकं या टेकडीवर फक्त दगडच आहेत. यावर झाडं वाढणार नाहीत. आम्ही तरीही प्रयत्न करायचं ठरवलं.

"सह्याद्रीमध्ये दगड आहे पण जंगलंही आहेतच. आमच्या प्रयत्नांना यश आलं. ज्या टेकडीवर एकही झाड नव्हतं तिथे आता 40 हजारपेक्षा झास्त देशी झाडांचं जंगल तयार झालंय," असं वसुंधरा अभियानात सुरुवातीपासून पुढाकार घेणारे विलास भुजबळ सांगत होते.

वृक्षारोपण करायचं तर सरसकटपणे कोणतीही झाडं लावून टाका या परंपरेला वसुंधरा अभियानाने पहिल्यापासूनच फाटा दिला.

झाडं जगवण्याचा दर 90 टक्के?

तुकाई टेकडीवर अनेक औषधी वनस्पती आहेत. अर्जून, उंडी, हिरडा, बेहडा, अडूळसा यांची लागवड केलेली आहे. लिंबूच्या जवळपास 17 जातींची रोपं ज्यात म्हाळूंग, पपनस, बुद्धा, ईडिलिंबू, सरबती, काफेर, सिडलेस, हजारी या सगळ्या प्रकारांनी मिळून 'लिंबूवन' तयार केलंय. फुलझाडं, फळझाडंच नाही तर अगदी वेलदोड्यासारखे मसाल्याची झाडंही इथे पाहायला मिळतात.

जपानचे तज्ज्ञ मियावाकी यांच्या जंगल तयार करण्याच्या तंत्राचा वापर करुन 25x100 एवढ्या जागेत 160 प्रकारांची 360 झाडं लावून केवळ 3 वर्षांत एक छोटंसं जंगलंच स्थानिक लोकांनी उभं केलंय.

पावसाळ्यात झाडं लावली जातात आणि उरलेले 8 महिने ते जगवली जातात. त्यामुळे झाडं जगवण्याचा दर 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.

वसुंधरा अभियान

फोटो स्रोत, Manasi deshpande

टेकडीवर वृक्षारोपण करणं आणि त्यांना जगवण्यासाठी पाण्याची उपलब्धता फार आवश्यक होती. यासाठी वसुंधरा अभियानाच्या सदस्यांनीच श्रमदानातून 248 एकर एवढं आकारमान असलेल्या टेकडीवर 30 पाण्याच्या टाक्या बनवल्या आहेत.

रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत ऑफिस सांभाळून वसुंधरा अभियानाचे सदस्य झाडांना पाणी घालतात.

भुजबळ सांगतात- "एवढ्या झाडांची काळजी घ्यायची तर आपल्याला माणसांची गरज असते. आता माणसं झाडांशी जोडली गेली आहेत. त्यांचं टेन्शन रिलिज करण्याचा एक पॉईंट त्यांना मिळालेला आहे. काही दररोज येतात. 2 ते 3 तास काम करतात. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जवळच्या व्यक्तीचा, पाळीव प्राणी मृत्यू या सगळ्या निमित्ताने झाडं लावतात. आमची संस्था ही झाडं लावण्यापेक्षा जगवण्यावर जास्त काम करते."

मैत्रिणीच्या वाढदिवसाला लावलं झाड

टिम वर्कने झाडं जगवण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलंय. यातलं अनोखंपण हे की निरनिराळ्या वयोगटातली, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी या झाडांचं पालनपोषण करतायत.

सातवीत शिकणाऱ्या मनस्वी हरपुडेचं या टेकडीशी नातं जुळलंय. ती रोज या टेकडीवर येऊन पाणी घालते. ती सांगत होती, "माझी जुई नावाची मैत्रीण आहे. तिच्या वाढदिवसासाठी आम्ही तिचं नाव असलेल्या फुलाचं झाड लावलं. आम्ही इथे येतो तेव्हा त्या झाडाला पाणी देतो."

वसुंधरा अभियान

फोटो स्रोत, Manasi deshpande

पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची जशी गरज आहे तशी ती जगवण्यासाठी माणसांनी एकत्र येऊ परस्पर सहकार्य टिकवण्याची गरज आहे, असं वसुंधरा अभियानाच्या सदस्यांना वाटतं.

इतरांनाही वृक्ष लागवड करता यावी यासाठी इथे रोप बॅंक तयार करण्यात आलीये. सध्या 1500-2000 रोपं या बँकेत तयार असल्याचं संस्थेने सांगितलं.

जंगलाला आग लागली...

पर्यावरणाविषयीच्या प्रेमाने अनेक हात तुकाई टेकडीचं रुपडं पालटण्यासाठी मदत करतात. पण इथे अडचणींचा डोंगरही कमी नाही. टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात इमारतींची बांधकामं सुरू आहे. वसुंधरा अभियानासमोर टेकडीफोड रोखण्याचं आव्हान मोठं आहे. याशिवाय काही उपद्रवी प्रवृत्तींचाही सामना त्यांना करावा लागतो.

"पूर्वी आम्ही सिंटेक्सच्या टाक्या ठेवायचो. त्यात पाणी भरुन मग ते झाडांना द्यायचो. उपद्रवी लोक टाक्या तोडायचे. आता पाईप फोडतात, त्याला लावलेले व्हॉल्स चोरुन नेतात. झाडं तोडतात."

वसुंधरा अभियान

फोटो स्रोत, Manasi deshpande

"इथे टेकडीवर काळा पॅच दिसतो. तिथलं गवत आम्ही काढू शकत नाही. कारण उतार आहे. तिथे नुकतीच आग लागली होती. अशा घटना टेकडीवर दरवर्षी घडतात. आगीमध्ये झाडांसह लहान जीवजंतू, पक्ष्यांची घरटी त्यांची अंडी, पक्षांमार्फत पसरणारी बीजं, ससे त्यांची पिल्लं अशी एक इको सिस्टिम जळून खाक होते.

"प्रत्येक वर्षी ही वणव्याची समस्या येते. टेकडीवर फिरणारे लोकं सिगरेटसाठी काडी पेटवतात. ती तशीच टाकतात. गवत पेटून मग झाडं जळतात. अशी जळालेली झाडं पाहून फार दुःख होतं," असं विलास भुजबळ यांनी सांगितलं.

अशा आव्हानांचा सामना करुन वसुंधरा अभियानाचे सदस्य दररोज टेकडीसाठी काम करतात. तुकाई टेकडीला जैव-विविधतेने परिपूर्ण अशी परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम बनवण्याचं त्याचं ध्येय आहे. आणि त्यासाठी माणसांची एक साखळी ते बनवतायत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)