खाणीत बेपत्ता झालेल्या पतीला शोधण्यासाठी उर्वशीने केला तब्बल 84 दिवस संघर्ष पण...

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
- Author, दिलीप कुमार शर्मा
- Role, आसामच्या हुकानी गावाहून
जवळपास 84 दिवस वाट पाहिली, शेकडो फोन कॉल्स केले, रोज रोज पोलीस स्टेशनच्या चकरा मारल्या, गावापासून 500 किलोमीटर दूर असलेल्या गुवाहाटीला जाऊन तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन धरणे आंदोलन केलं, तेव्हा कुठे उर्वशीची प्रतीक्षा संपली.
तिचा पती प्रांजल मोरान याचा मृतदेह खाणीत सापडला होता.
आसाम मध्ये राहणाऱ्या आणि जवळपास 84 दिवसांपासून आपल्या बेपत्ता पतीचा शोध घेणाऱ्या महिलेचा प्रवास इतक्या निराशेने संपेल असं कधी तिला वाटलं नव्हतं.
उर्वशीने धरणे आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या बेपत्ता पतीचा शोध घेण्यासाठी खाण परिसरात मोठी मोहीम सुरू केली.
उर्वशी सांगते, "आमचं प्रेम होतं, पुढे जाऊन आम्ही लग्न केलं. तो बेपत्ता झालाय हे मी कसं मान्य करू. मी माझ्या मुलाला काय उत्तर दिलं असतं. त्यामुळे मी मनाशी निश्चय केला होता की, कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, मी तो करेन पण माझ्या पतीचा मृतदेह शोधूनच शांत राहीन."
24 वर्षीय उर्वशी मोरानने आपल्या असहायतेची कहाणी बीबीसीशी बोलताना सांगितली.
जानेवारी 2023: शेवटचा फोन कॉल
उर्वशीचा पती प्रांजल मोरान हा आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील लिडो शहराजवळील बेकायदेशीर कोळसा खाणीत कामासाठी जायचा. या वर्षी जानेवारी महिन्यात तो अचानक बेपत्ता झाला. 12 जानेवारीला उर्वशी आणि प्रांजलचा शेवटचा फोन कॉल झाला होता.
ती सांगते, "त्यांनी एका अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून सकाळी आठच्या सुमारास कॉल केला होता. हा आमचा शेवटचा कॉल असेल असं काहीच माझ्या मनात आलं नाही. पुढच्या 48 तासात ते घरी येणार होते."
14 जानेवारीला आसाममध्ये माघ बिहू उत्सव असतो. त्या दरम्यान प्रांजल घरी येणार असल्याचं बोलणं झालं होतं. मात्र त्यानंतर उर्वशीला आपल्या बेपत्ता पतीला शोधण्यासाठी तब्बल तीन महिने संघर्ष करावा लागला.

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
पोलिसांनी 7 एप्रिल म्हणजेच मागच्या शुक्रवारी लिडो येथील एका कोळसा खाणीतून प्रांजलचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता.
बरेच दिवस प्रांजलशी काही बोलणं झालं नव्हतं, ना त्याचा काही पत्ता होता. शेवटी उर्वशीने पतीच्या शोधात पोलिस स्टेशन गाठलं. तिने स्टेशनच्या बऱ्याच फेऱ्या मारल्या. शेवटी कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे तिने तिनसुकिया जिल्हा उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुवाहाटीला जाऊन तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलासोबत या उपोषणाला सुरुवात केली. पतीचा मृतदेह शोधण्यासाठी तिने अनेक स्थानिक संस्थांची मदत घेतली.
तिनसुकिया शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुकानी गावात प्रांजलचं घर आहे. मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याच्यावर अंत्यसंस्कार करून तिसर्या दिवशीचा विधी सुरू होता. घराच्या अंगणात एका टेबलावर प्रांजलचा फोटो ठेवला होता आणि त्यासमोर दिवा लावला होता.
फोटोजवळ बसलेली उर्वशी म्हणाली की, "त्यांनी 12 जानेवारीला घरी येणार असल्याचं सांगितलं म्हणून मी त्यांची वाट पाहत होते. त्यांनी मुलाची काळजी घे आणि माझी चिंता करू नको असंही सांगितलं होतं."
"त्या फोन कॉलनंतर त्यांचा काहीच पत्ता नव्हता. मी अनेक दिवस वाट पाहिली. त्यांना कुठं शोधायचं हे देखील मला समजत नव्हतं. ज्या फोनवरून शेवटचा फोन आला होता, त्यावरही मी शेकडो कॉल केले, पण कोणीच फोन उचलला नाही."

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
तिनसुकिया मध्ये लोखंडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या प्रांजलने जास्त मजुरी मिळते म्हणून मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून लिडो येथील बेकायदेशीर कोळसा खाणीत काम करायला सुरुवात केली होती.
उर्वशी सांगते, "कोळशाच्या खाणीत काम करताना त्यांना बऱ्याचदा दिवसाला हजार रुपये मजुरी मिळायची. पण त्यात खूप धोका असल्याचं ते सांगायचे. त्यांनी मला सांगितलं होतं की, त्या कोळसा खाणीत अनेक मजूर मरण पावलेत."
27 जानेवारी रोजी लिडो कोळसा खाणीत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी स्थानिक न्यूज चॅनेलवर दाखवली होती. उर्वशीला याविषयी माहिती होतं. ती सांगते, "दोन मजुरांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर मी खूप काळजीत पडले. माझे दिर आणि काही स्थानिक लोक प्रांजलचा फोटो घेऊन कोळसा खाणीत शोधण्यासाठी गेले. पण तिथे काम करणाऱ्या काही लोकांनी सांगितलं की, प्रांजल जानेवारीला मजुरी घेऊन कुठं गेला याविषयी कोणालाच काही माहिती नाही."
आता प्रांजल बेपत्ता होऊन बरेच दिवस लोटले होते. आणि कोळसा खाण देखील डोंगराळ भागात असल्याने प्रांजलचा शोध घेणं कठीण असल्यामुळे हे प्रकरण इथेच थांबवू असं काही लोकांनी उर्वशीला समजावून सांगितलं.
उर्वशी सांगते, "पण मी कोणाचंही ऐकलं नाही आणि कितीही काही झालं तरी माझ्या पतीचा शोध घेऊन असं मनाशी ठरवलं."
फेब्रुवारी 2023: प्रांजलला भेटण्याची आशा मावळली
खाण मालकाच्या वतीने 2 फेब्रुवारीला हिरेन गोगोई नामक एक व्यक्ती प्रांजलच्या घरी आला. आणि त्यादिवशी पहिल्यांदा प्रांजलविषयी घरच्यांना समजलं.
उर्वशीचा चुलत भाऊ उमानंद मुदोई मोरान सांगतो की, "प्रांजलचा शोध घेण्यासाठी त्याचा मोठा भाऊ रुनाल आणि गावातील काही लोक कोळसा खाणीत गेल्याची बातमी त्या भागात पसरली होती. त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला हिरेन गोगोई नामक व्यक्ती उर्वाशीच्या घरी आला. त्याने सांगितलं की, लिडोच्या कोळसा खाणीत मजुरांसोबत अशा दुर्घटना होत राहतात. प्रांजल स्थानिक तरुण असल्याने खाण मालकाने त्याच्या कुटुंबाला पाच लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं."

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
त्या दिवशी (2 फेब्रुवारी) उर्वशीच्या आपल्या पतीला भेटण्याच्या सगळ्या आशा मावळून गेल्या होत्या.
ती सांगते, "त्या व्यक्तीने जेव्हा नुकसानभरपाई देण्याविषयी सांगितलं तेव्हाच मला कळून चुकलं होतं की, आपले पती आता जिवंत नाहीत. आता माझ्या मृत पतीचा मृतदेह मिळवणं मला खूप महत्वाचं वाटलं. मृतदेह शोधण्यासाठी गावातले लोक त्या व्यक्तीसोबत कोळशाच्या खाणीत गेले. पण खाण परिसरात पोहोचण्याच्या आधीच तो व्यक्ती पळून गेला."
तिनसुकिया जिल्ह्यातील लिडो-मार्गेरिटा मध्ये तिलक आणि तिराप नावाच्या दोन मुख्य कोळसा उत्पादक खाणी आहेत. या कोळसा खाणी सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी नॉर्थ ईस्टर्न कोलफिल्ड्स (nec) ला भाड्याने दिल्या असल्या तरी, या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कोळसा खनन सुरू असल्याच्या बातम्या येत राहतात. ज्या कोळशाच्या प्रांजलचा मृतदेह सापडला तो एनईसीच्या अखत्यारीत असल्याचं सांगितलं जातंय.
पोलिस स्टेशनच्या चकरा मारून शेवटी धरणे आंदोलन सुरू केलं
उर्वशीने पहिल्यांदा 3 फेब्रुवारीला लांगकाशी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पती हरवल्याची तक्रार नोंदवली.
ती सांगते की, "पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला आणि पुढे असं सांगितलं की, ज्या भागात ही घटना घडली आहे त्याभागातील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा."
ती पुढे सांगते, "मी दुसऱ्या दिवशी पुन्हा लिडो पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. आमच्या लेखी तक्रारीनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा नोंद केली. आता हे प्रकरण स्थानिक मीडिया मध्ये दाखवलं जात होतं. याच दरम्यान आसामच्या मोरान सभेच्या नेतृत्वात काही संघटनांनी 17 फेब्रुवारीपासून कोळश्याचे ट्रक अडवायला सुरुवात केली आणि तीन दिवस आंदोलन केलं."

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
तिनसुकिया जिल्हा प्रशासनावर आरोप करताना उर्वशी म्हणते की, "माझं आंदोलन थांबवावं म्हणून जिल्हाधिकारींबरोबर झालेल्या एका बैठकीत मला शिधापत्रिका, अरुणोदय योजनेंतर्गत दरमहा 1,230 रुपये आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देऊ असं सांगण्यात आलं."
पीडितेला दिलासा देण्याचा हा प्रयत्न असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं तिनसुकिया जिल्हा प्रशासनने म्हटलंय.
पोलिसांत तक्रार करूनही आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची भेटी घेऊनही उर्वशीचा पती काही सापडला नाही. शेवटी तिने गुवाहाटीला जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
गावपासून सुरू झालेला प्रवास गुवाहाटी पर्यंत जाऊन थांबल्याच्या मुद्द्यावर उर्वशी सांगते, "12 मार्चला मी माझ्या मुलासोबत ट्रेनच्या जनरल डब्यातून गुवाहाटीला पोहोचले. या प्रवासादरम्यान मुलाची प्रकृती खालावली. त्याला सतत उलट्या होत होत्या. पण तरीही मी, माझा भाऊ उमानंद आणि कुटुंबातील काही लोक माझ्यासोबत धरणे आंदोलन करायला बसले."
"यापूर्वी आसाम सरकार मधील मंत्री आणि स्थानिक आमदार संजय किशन हे मुख्यमंत्री मदत निधीतून चार लाख रुपयांचा चेक घेऊन आमच्या घरी आले होते. पण मी त्यांना माझ्या पतीचा मृतदेह शोधून द्या असं सांगितलं."
मार्च 2023 : डीजीपी सोबत बैठक झाल्यानंतर एनडीआरएफने ऑपरेशन आरंभलं
उर्वशीने मार्च महिन्यात गुवाहाटीला अनेक चकरा मारल्या. तिने आसाम पोलीस महासंचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
उमानंद सांगतो त्याप्रमाणे, आपल्या पतीला शोधण्याची उर्वशीची जिद्द आणि सततची धडपड पाहून प्रशासन देखील हतबल झालं आणि त्यांना प्रांजलचा शोध घ्यावा लागला.
खरं तर उर्वशीने 2 एप्रिल रोजी आसामचे डीजीपी जी पी सिंह यांची भेट घेतल्यानंतर शोध मोहिमेला वेग आला.
डीजीपी जी पी सिंह यांनी आयजीपी (एनईआर) जितमल डोळे यांच्याकडे तपास सोपविला आणि पुढील सात दिवसांत मृतदेह शोधून काढण्याचे आदेश दिले.

फोटो स्रोत, DILIP SHARMA/BBC
तिनसुकिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिजित गुरव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पोलिस सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा फॉलोअप घेत होते. आम्ही एका गुप्त माहितीच्या आधारे लिडो कोळसा खाण परिसरात कारवाई सुरू केली. यात ज्या दोघांनी प्रांजलचा मृतदेह लपवून ठेवला होता त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमसोबत मृतदेह बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं. त्यासाठी कोल इंडियाच्या तज्ञांची आणि यंत्रणांची मदत घेण्यात आली."
आपल्या पतीचा मृतदेह शोधण्यासाठी उर्वशीने जो संघर्ष केला त्याची चर्चा संपूर्ण गावात सुरू आहे.
प्रांजलचे वडील देबेन मोरान देखील आपल्या सुनेचं कौतुक करताना म्हणतात की, "स्थानिक संघटनांकडे जाऊनही काही उपाय सापडला नाही. शेवटी उर्वशीने गुवाहाटीला जाऊन आंदोलन करण्याचं धाडस केलं. मुलाचा मृतदेह सापडला म्हणूनच आज आम्ही आमच्या मुलावर अंतिम संस्कार करू शकलो."
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक केली आहे.
प्रांजलचा मृत्यू हा कोळसा खाणीतील अपघात असल्याचं पोलिस तपासात म्हटलंय. पण आपल्या पतीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे शोधून काढण्यासाठी उर्वशीचा संघर्ष सुरूच राहील असं ती सांगते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








