मद्यविक्री घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवालांची सीबीआय चौकशी होणार

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. मद्यविक्री घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवालांची सीबीआय चौकशी होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

केजरीवाल यांची 16 एप्रिल रोजी चौकशी होणार असल्याचं एबीपी माझाने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

सीबीआयच्या समन्सनंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह अत्याचाराचा अंत नक्कीच होणार असं ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे.

2. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे बंडखोरी

भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय शुक्रवारी (14 एप्रिल) जाहीर केला. सावदी यांनी दावा केलेल्या अथनी मतदारसंघात भाजपने काँग्रेसमधून पक्षात आलेल्या विद्यमान आमदाराला उमेदवारी दिल्याने सावदी हे नाराज होते.

तिकीटवाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला असून किमान 20 मतदारसंघांत पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो, असं लोकसत्ताने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

आगामी विधानसभेसाठी भाजपने 18 विद्यमान आमदारांसह दोन विधान परिषद आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी हे विधान परिषदेचे सदस्य होते, त्यांनी बेळगावीमधील अथानी या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून विद्यमान आमदार महेश कुमथल्ली यांना उमेदवारी दिली.

पक्षाने डावलल्याने नाराज झालेल्या सावदी यांनी गुरुवारीच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सावदी यांच्या पक्षांतरावर दु:ख व्यक्त केले. मात्र, ‘नेते गेले तरी कार्यकर्ते भाजपसोबतच राहतील’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

3. अरविंद सावंतांनी म्हटलं, की राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे...

अरविंद सावंत

फोटो स्रोत, PTI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी ‘मातोश्री’वर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाहीतर मला जेलमध्ये टाकतील असं म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात केला होता.

आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर टीका करताना भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं होतं की, आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या वक्तव्यांना आवर घालणे गरजेचं आहे.

विखे-पाटलांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त करताना म्हटलं की, राधाकृष्ण विखे पाटील ‘रंग बदलणारा सरडा’ असल्याचे म्हटलं आहे.

टीव्ही 9 मराठीशी बोलताना अरविंद सावंत यांनी म्हटलं की, त्यांची दखल का घेता? या पक्षातून त्या पक्षात. ते आमच्याकडे होते ना? त्यांना विचारा कोणता पक्ष शिल्लक उरला का?

4. ‘बलात्काराला राजकीय हत्यार म्हणणारे सावरकर प्रेरणास्थान कसे?’ शिवानी वडेट्टीवारांचे विधान

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी देखील सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा काँग्रेसला दिला. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवरा यांनी सावरकरांबद्दलचा एक व्हीडिओ ट्वीट केला आहे.

सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला. ते बलात्कार हे राजकीय हत्यार आहे असे सांगत, असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. आपल्या या भाषणाचा व्हीडिओ ट्वीट केला आहे.

हे लोक फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाहीत. सावरकर मोर्चा काढतात. मला आणि इथं महिला बसलेल्या सर्व उपस्थित महिलांना भीती वाटत असेल. कारण की सावरकरांचे विचार होते की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरलं पाहिजे, असं शिवानी यांनी या भाषणात म्हटलेलं.

ईसकाळने ही बातमी दिली आहे.

5. सचिन वाझेंना नोकरीत कोणी घेतलं? अनिल देशमुखांचा सवाल

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सचिन वाझे यांच्या नियुक्तीवरून माजी आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

सचिन वाझे फौजदार होते, त्यांना सरकारी नोकरीत घेण्याचा अधिकार हा आयुक्त पातळीवरचा होता. महाराष्ट्रात साडे सात हजार फौजदार आहेत. आयुक्तांनी कोणाला नोकरीत घेतलं, याची गृहमंत्र्यांना कल्पना नसते, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.

पण वाझेला नोकरीत घेतल्यानंतर काही तक्रारी माझ्या कानावर आल्या, त्यानंतर मी आयुक्त परमवीर सिंह यांना बोलावलं, वाझेबद्दलच्या तक्रारींबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी म्हटलं की, त्यांच्याबद्दल ज्या तक्रारी आहेत, त्या खोट्या आहेत. मी त्यांना 25-30 वर्षांपासून ओळखतो. मला त्यांची मदत होईल.

अनिल देशमुखांच्या या खुलाशांबद्दल लोकमतने वृत्त दिलं आहे.

सचिन वाझे हे मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. सध्या ते तुरुंगात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)