आसाम : चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार जंगली मशरूमला बळी पडत आहेत

- Author, दिलीप शर्मा आणि जोया मतीन
- Role, आसाम, दिल्ली
8 एप्रिलला अंजली खारिया आणि त्यांच्या मुलीने रात्रीचं जेवण सोबतच जेवण केलं. आपल्या मुलीसोबतचं हे जेवण शेवटचं असेल याचा त्यांना अंदाज नव्हता.
चहाच्या मळ्यात दिवसभर राबून आसामच्या चपटोली गावातील खारिया आपल्या घराकडे निघाल्या. आजूबाजूच्या डोंगरांच्या हलक्या वळणावरणचा तो रस्ता तुडवत त्या घरी पोहोचल्या आणि जेवून लगेच झोपल्या.
पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची सहा वर्षांची मुलगी सुष्मिताला उलट्या होत असल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. सुष्मिताला मळमळ होत होती आणि ती थरथरत होती.
संबंध रात्र सुष्मिताची प्रकृती जैसे थे अशीच राहिली. तेव्हा मात्र खारिया काळजीत पडल्या. पण काही तासानंतर जेव्हा त्यांचा मुलगा आणि सासरे देखील तळमळू लागले तेव्हा मात्र त्या चांगल्याच घाबरल्या.
"ते सर्वजण एकाच वेळी तळमळत होते." असं 37 वर्षीय खारियांनी सांगितलं. "मग त्यांना अतिसार सुरू झाला."
लवकरच त्यांना समजलं की, त्यांच्या शेजारच्या इतर अनेकांना ही रात्रीपासून असाच त्रास होतोय. "हे एक दुःस्वप्न होतं. प्रत्येकजण अस्वस्थ होता, पण हे का होतंय हे मात्र कोणालाच कळत नव्हतं."
दुसरा दिवस उजाडताचं दिब्रुगढ जिल्ह्यातील त्या गावात खारिया आपल्या मुलीसह जवळच्या मेडिकल मध्ये गेल्या. तिथं त्यांना सलाईन वॉटर आणि औषध देण्यात आली.
इतर रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. बचत केलेल्या पैशातून त्यांनी आपल्या सासऱ्याला आणि मुलाला रुग्णालयात पाठवलं. "मी माझ्या मुलीला पाठवले नाही कारण औषध घेतल्यानंतर तिला बरं वाटतं होतं." खारिया म्हणतात. "मला वाटलं ती लवकरच बरी होईल."
24 तास सरले आणि त्यांच्या मुलीला पुन्हा उलट्या होऊ लागल्या. यावेळी मात्र खारिया यांच्याकडे तिला रुग्णालयात नेण्यासाठी पैसे नव्हते. काही तासांतचं सुष्मिताचा मृत्यू झाला.

नंतर आढळून आलं की, त्या दिवशी आजाअंजली खारिया री पडलेल्या सर्वांनी जंगली मशरूम खाल्ले होते. हे मशरूम खारिया यांच्या सासऱ्यांनी जवळच्या जंगलातून तोडून आणून शेजाऱ्यांना ही वाटले होते. मशरूमच्या विषबाधेमुळे सुष्मिता व्यतिरिक्त आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. एकूण 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
या घटनेला एक महिना उलटून गेलाय. मात्र गावातील लोक अजूनही या दुर्घटनेतून सावरलेलं नाहीत.
36 वर्षांच्या नेहा लामा सांगतात की, "मी ती रात्र कधीच विसरणार नाही. मला वाटलं होतं आता कोणीही वाचणार नाही" त्यांचे सासरे मरण पावलेल्यांपैकी एक होते. त्या स्वतः ही आजारी पडल्या होत्या आणि आपल्या मुलासह हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या.
"आम्ही अनेक वर्षांपासून मशरूम तोडून आणतोय, ते खातोय. त्यांच्यापासून विषबाधा होईल हे आम्हाला कसं कळणार?"

आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मशरूमपासून विषबाधा झाल्याच्या हेडलाईन्स नेहमीच बनतं असतात. तिथले स्थानिक लोक मशरूम, फर्न आणि जंगली बेरी जमा करून विविध खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर करतात. काही भागांमध्ये जंगली मशरूम देखील एक स्वादिष्ट पदार्थ मानला जातो. त्याचं घट्टसर सूप आणि शिजवलेल्या भाज्यांच्या रूपात स्वाद घेतला जातो.
आसाममध्ये, अशा प्रकारचे मृत्यू विशेषतः मार्च आणि एप्रिलमध्ये होतात. कारण या दरम्यान चहाच्या निळ्या-हिरव्या बागांच्या आजूबाजूला शेकडो मशरूम उगवतात. आणि या मशरूमचे बळी ठरतात, या मळ्यांमध्ये काम करणारे गरीब कामगार.
या मृत्यूंची कोणतीही अधिकृत नोंद ठेवली जात नाही. मात्र दोन राज्य आरोग्य अधिकार्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, एप्रिलमध्ये मरण पावलेल्या 16 लोकांपैकी बहुतेक लोक हे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील आहेत.
विषारी मशरूम खाल्ल्याने 2008 मध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला होता. हा आत्तापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पॅनेल स्थापन केलं. तरीही सर्वाधिक बळी चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार ठरले, असे आसाम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि पॅनेलमधील एक सदस्य दिलीप कुमार सरमा म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांमध्ये मशरूमच्या प्रकारांबाबत जागरूकता नसते. हेच याचं मुख्य कारण आहे. कोणते प्रकार दुर्मिळ आहेत, कोणते चवदार आहेत किंवा कोणते विषारी आहेत हे त्यांना माहीत नसतं" असं डॉ. सरमा म्हणतात. आपल्या कामगारांची काळजी घेणं ही त्या मळे मालकांची जबाबदारी आहे.
"भूतकाळात जेव्हा अशा गोष्टी घडल्या तेव्हा सरकारने लोकांना जागृत करण्यासाठी वृत्तपत्रांमार्फत माहिती प्रसारित केली. पण बहुतेक लोक निरक्षर असल्यामुळे हा संदेश त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचलाच नाही."
समाजातील लोक म्हणतात की हे इतकं सोपं नाही.
जगातील सर्वात मौल्यवान अशा चहाचं माहेरघर म्हणजे आसामच्या सुपीक टेकड्या. या टेकड्यांवर विस्तीर्ण वसाहती आहेत. काही मोठ्या भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपनीच्या मालकीची हॉटेल्स देखील आहेत. थोडक्यात हे ठिकाण पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेतलं.
परंतु कामगारांचं राहणीमान हे तितकंसं परिपूर्ण नाही. बीबीसीने चपटोलीमध्ये राहणाऱ्या अनेक चहा कामगारांच्या कुटुंबांशी संवाद साधला.

हे लोक टिनचं गळणार छत आणि खराब स्वच्छता असलेल्या बांबूच्या कॉटेजमध्ये राहत होते. त्यांना मिळणारी मजुरी इतकी कमी आहे की त्यांची कुटुंब अनेकदा उपाशी राहतात. आणि अलीकडच्या काळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने तर परिस्थिती आणखीचं बिकट झाली आहे.
"म्हणूनच आम्ही जे मिळेल ते उपटून खातो" असं खारिया म्हणतात. त्या दिवसाला 130 रुपये कमावतात. त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबात त्या एकट्याच कमावणाऱ्या आहेत.
"माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर, सरकारी अधिकार्यांनी आमच्या घरी भेट दिली होती. त्यांनी आम्हाला विषारी मशरूम खाऊ नका असं सांगितलं. पण आम्ही खूप गरीब आहोत. आता प्रत्येक गोष्ट खूप महाग आहे. आम्हाला जे मिळेल त्यावर गुजराण करावी लागते."
जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महागाईच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलायं. दिब्रुगढचे उपायुक्त बिस्वजित पेगू म्हणतात, "सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत त्यांना मोफत रेशन मिळेल याची आम्ही खात्री करतो."
परंतु खारिया ही गोष्ट नाकारतात आणि म्हणतात की, त्यांना आजवर कधीही मोफत अन्नधान्य मिळालेलं नाही. "कित्येक दिवस, काहीचं खायला मिळत नाही. पण मदतीला कोणी ही येत नाही."
आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा स्थानिक लोक अमानिता फॅलोइड्स किंवा "डेथ कॅप" खातात तेव्हा त्यांना गंभीर आजार होतात. एक मंद हिरवा किंवा पांढरा मशरूम जो स्वादिष्ट म्हणून देखील ओळखला जातो तो खरं तर विषारी असतो. त्याच्या दुष्परिणामांमध्ये मळमळ, उलट्या, ओटीपोटात पेटके आणि तीव्र अतिसार यांचा समावेश होतो.
बर्याच वेळा रुग्ण आजारी पडल्यानंतर लगेच रुग्णालयात येत नाहीत. यातून मग मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होण्यासारख्या मोठ्या आरोग्य समस्या उद्भवतात. असं आसाम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (AMCH) चे अधीक्षक प्रशांत दिहिंगिया सांगतात. "आणि ते जेव्हा उपचार सुरू करतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो."
कोणतं मशरूम विषारी आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हाच या समस्येवर मात करण्याचा एकमेव मार्ग आहे. "तुम्ही समुदायांना त्यांचे पारंपारिक अन्न खाण्यापासून रोखू शकत नाही. मात्र तुम्ही त्यांना ते खाण्याच्या सुरक्षित पद्धती शिकवू शकता."
पेगू म्हणतात की "प्रत्येक व्यक्तीला जाऊन भेटणं" शक्य नसलं तरी, विषारी मशरूममधून खाण्यायोग्य मशरूम कसे ओळखायचे हे शिकवण्यासाठी आमचे अधिकारी तळागाळात मोहिमा राबवत आहेत. "आम्ही ही समस्या गांभीर्याने घेतली आहे. आमचे आरोग्य स्वयंसेवक नियमितपणे गावांना भेट देतात."
पण चपटोलीतील लोकांना हे खरं वाटतं नाही.
खारिया म्हणतात, "आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर आहोत. ते (अधिकारी) तेव्हाच येतात जेव्हा आमच्यापैकी कोणाचा एकाचा मृत्यू झालेला असतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








