उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले, आतापर्यंत 50 जणांना वाचवलं

बर्फवृष्टी आणि खराब हवामान असताना लष्कर बचाव आणि मदत कार्य करत आहे.

फोटो स्रोत, SuryaCommand_IA

फोटो कॅप्शन, बर्फवृष्टी आणि खराब हवामान असताना लष्कर बचाव आणि मदत कार्य करत आहे.
    • Author, आसिफ अली
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, उत्तराखंडहून

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यामधील बद्रीनाथ धामजवळ हिमकडा कोसळल्याने 55 कामगार बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्घटना घडली. यातील 50 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

यातील चार कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहितीही सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

उर्वरित लोकांना वाचवण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या सर्च ऑपरेशनचं नेतृत्व सैन्याच्या आयबीईएक्स ब्रिगेड करुन केलं जात आहे. जखमी लोकांना सर्वांत आधी बाहेर काढलं जात आहे.

सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी 6 हेलीकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये इंडियन आर्मी एव्हीएशनचे तीन, इंडियन एअर फोर्सचे दोन तर इंडियन आर्मीच्या एका सिव्हील हेलीकॉप्टरचा समावेश आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेबद्दलची ताजी माहिती जाहीर केली आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांनी सांगितलंय की, अडकलेल्या बाकी मजुरांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

"माणाजवळ झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या मजूरांना काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्यात आणखी 14 मजुरांना व्यवस्थित बाहेर काढलं गेलं आहे," अशीही माहिती त्यांनी दिली.

बाहेर आलेल्या मजुरांना आरोग्यसेवा दिली जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

"गंभीर जखमी झालेल्या तीन मजूरांना ज्योतिर्मठ इथल्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं आहे. आत्तापर्यंत एकूण 47 कामगारांची सुखरुपपणे (सध्याचा आकडा 50) सुटका करण्यात आली आहे. उरलेल्या कामगारांनाही लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढता यावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत," ते पुढे म्हणाले.

चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी अशी माहिती दिली की, माणा गाव आणि माणा पास यामधल्या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) जवळ हिमस्खलन झाल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर अनेक सरकारी व्यवस्थांना बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

"लष्करी दळणवळणासाठी तयार केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी 57 मजूर इथं आले असल्याची नोंद आहे. बचाव कार्यासाठी लष्करासोबतच इंडो तिबेटियन सीमा पोलिस (आयटीबीपी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरफ) पथकंही बोलावली गेली आहेत," असं तिवारी यांनी सांगितलं.

गुडघ्यापर्यंत बर्फ असताना बचाव आणि मदत कार्य केलं जातंय, असं वृत्तसंस्था आणि लष्कराकडून समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसून येतंय.

"हिमस्खलनामुळे अनेक मजूर गाडले गेले असल्याची दुःखद बातमी मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि अन्य पथकं बचाव आणि मदत कार्यासाठी लावली गेली आहेत. सगळे मजूर बांधव सुरक्षित रहावेत अशी भगवान बदरी विशाल यांच्याचरणी प्रार्थना आहे," असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर म्हटलं आहे.

बद्रीनाथजवळ हिमकडा तुटल्याने बर्फात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आले असल्याचं शनिवारी उत्तराखंडचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार यांनी सांगितलं

चमोलीच्या जिल्हाधिकारी BBC ला काय माहिती दिली?

त्याआधी शुक्रवारी चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "अडकलेले लोक बीआरओच्या रस्ते बांधणीचं काम करणारे मजूर होते. लष्कराच्या दळणवळणासाठी रस्ते तयार करणं हे त्यांचं काम होतं."

तिवारी यांनी पुढे म्हटलं की, "हिमस्खलन झालं तिथेच आसपास त्यांच्यासाठी छावण्या बांधण्यात आल्या होत्या. तिथं ते आर्मी कंटेनर्समध्ये राहत होते. सकाळी अचानक हिमस्खलन झालं तेव्हा कदाचित ते स्वत:चा बचाव करण्यासाठी इकडे-तिकडे पळाले असावेत."

"त्यातले 10 लोक आयटीबीपीच्या छावण्यांच्या दिशेने पळाले. त्यांना लगेचच बाहेर काढता आलं," असंही ते म्हणाले.

गढवाल सेक्टरमधील बीआरओ छावणीजवळ हिमस्खलन झालं आहे.

फोटो स्रोत, @suryacommand

फोटो कॅप्शन, गढवाल सेक्टरमधील बीआरओ छावणीजवळ हिमस्खलन झालं आहे.

"बाकी 22 लोक जोतिर्मठच्या दिशेने पळाले. तिथे एका हॉटेलमध्ये त्यांनी आश्रय घेतला. त्यांनाही बर्फाच्छादीत हॉटेलाखालून बाहेर काढण्यात यश आलं," असं तिवारी यांनी सांगितलं.

एकूण 32 लोकांना बाहेर काढलं आहे असं त्यांनी सांगितलं. "हवामान खराब असल्यानं अजून 25 लोकांपर्यंत पोहोचणं शक्य झालेलं नाही," असंही ते म्हणाले.

हवामानाचा अंदाज घेऊन दुसऱ्या दिवशी हेलीकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू केलं जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

बचाव कार्यासाठी सिंगल आणि डबल इंजिनची एकूण चार हेलीकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, एमआय 17 या लष्करी हेलीकॉप्टरची मागणीही केल्याचं तिवारी यांनी सांगितलंय.

"आमचं एनडीआरएफ पथक जोतिर्मठला पोहोचलं आहे. घटनास्थळाकडे ते निघाले आहेत," असंही सद्यपरिस्थितीचं वर्णन करताना ते म्हणाले.

बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे

सततचा पाऊस आणि बर्फवृष्टी होत असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळेच हेलीकॉप्टरची सेवाही वापरता येत नाही, असंही संदिप तिवारी म्हणाले.

"कोणतीही हालचाल करणं अवघड आहे. तिथे सॅटेलाईट फोन किंवा इतर कोणतीही उपकरणं उपलब्ध नसल्यानं त्या लोकांशी संपर्क होऊ शकत नाही. या दुर्घटनेत आत्तापर्यंत कुणाचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलेलं नाही," ते म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, एसडीआरएफचे पोलिस महानिरीक्षक रिद्धिम अग्रवाल यांनी आपली एक टीम जोतिर्मठाच्या दिशेनं रवाना झाली असल्याची माहिती दिली आहे.

पण लामबागडमध्ये रस्ता बंद झाल्यामुळे तिथं पोहोचायला अडचणी येत आहेत. रस्ता मोकळा करण्यासाठी लष्कराशी संपर्क साधला जात आहे.

खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

फोटो स्रोत, @suryacommand

फोटो कॅप्शन, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"सहस्रधारा हेलीपॅडवर एक पथक तयार ठेवलं आहे. घटनास्थळाची माहिती मिळालेली आहे. हवामान अनुकूल होताच अशा उंच जागी काम करण्याचा अनुभव असलेल्या एसडीआरएफच्या पथकाला हेलिकॉप्टरमधून पॅरेशूटच्या सहाय्यानं खाली उतरवलं जाईल," असं अग्रवाल यांनी सांगितलं.

भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या महासंचालकांकडून घटनेची माहिती घेतली आहे.

एक्सवरच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "बर्फाखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याला आमचं प्राधान्य असेल. स्थानिक प्रशासन तत्परतेनं बचाव कार्य करत आहे. एनडीआरएफची दोन पथकं लवकरच घटनास्थळी दाखल होतील."

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही घटनेची दखल घेतली आहे. "माणा भागात हिमस्खलनाची दुर्घटना घडली आहे. त्याचा बीआरओच्या जीआरईएफ छावणीवर परिणाम झाला आहे. अडकलेल्या लोकांची मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न प्रशासन करत आहे," अशी पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली आहे.

"लष्कराची स्थानिक पथकंही बचाव कार्यात मग्न आहे. बर्फात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सगळ्या संसाधनांचा वापर केला जात आहे," असंही ते म्हणालेत.

आतापर्यंत काय माहिती मिळाली आहे?

भारतीय लष्कराकडून शुक्रवारी संध्याकाळी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय.

"घटनास्थळी उपस्थित असलेल्या लष्कराच्या डॉक्टरांनी गंभीररित्या जखमी झालेल्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्जरी केली आहे," असं त्यात सांगण्यात आलंय.

या निवदेनानुसार, माणामध्ये खराब हवामानात आणि सततच्या बर्फवृष्टीत लष्कराचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी आणखी लोक घटनास्थळी पोहोचावेत यासाठी रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लष्कराने बीआरओकडून मिळालेल्या माहितीवरून असं सांगितलं आहे की हिमस्खलनानंतर 22 मजूर स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरले. त्यांना नंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

तर त्याआधी एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने असं सांगितलं होतं की शुक्रवारी सकाळी 7:15 वाजता माणा आणि बद्रीनाथ यामध्ये असलेली बीआरओ मजूर छावणी हिमस्खलनात गाडली गेली आहे.

गढवाल भागातल्या माणा गावाजवळ झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेले सैनिक

फोटो स्रोत, @suryacommand

फोटो कॅप्शन, गढवाल भागातल्या माणा गावाजवळ झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेले सैनिक

या छावणीत आठ कंटेनर आणि एक शेड होतं. एकूण 55 मजूर तिथे होते. त्यांना रस्ते बांधणीच्या कामाला लावलं होतं. हिमस्खलनानंतर ते सगळे बर्फाखाली अडकले होते.

घटनेनंतर लगेचच लष्कराकडून आयबेक्स ब्रिगेड या पथकाचे 100 हून जास्त सैनिक डॉक्टर, रुग्णवाहिका आणि इतर उपकरणांसमवेत बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी पाठवण्यात आले.

या पथकाला सकाळी जवळपास 11:50 वाजेपर्यंत पाच कंटनेर शोधण्यात यश आलं. त्यातून 10 लोकांना जिवंत बाहेर काढलं. त्यातल्या चौघांची परिस्थिती गंभीर आहे.

उर्वरित तीन कंटनेर्सचा शोध सुरू आहे. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. जोतिर्मठ आणि माणा यांच्यामधला रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जोतिर्मठवरून आणखी काही वैद्यकीय पथकं मदतीसाठी माणामध्ये बोलावली जात आहेत.

आधीच 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. डोंगराळ भागात बर्फवृष्टी होताना दिसतेय.

देहरादून हवामान शास्त्र केंद्रानं पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा आधीच दिलेला होता. त्यामुळे सीमेवरच्या भागात तैनात करण्यात आलेल्या पथकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.

हवामान शास्त्र केंद्राचे निर्देशक विक्रम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, "मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज आल्यामुळे राज्य सरकारला ऑरेंज अलर्ट तीन दिवसांपूर्वीच पाठवला होता."

गेल्या शुक्रवारी निवेदन काढून आयटीबीपीलाही ऑरेंज अलर्टची माहिती देण्यात आली होती, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

"अशा परिस्थितीत हिमस्खलन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, या भागात काम करणाऱ्या मजूरांनी आणि त्यांच्या ठेकेदारांनी विशेष काळजी घेतली पाहिजे."

"ऑरेंज अलर्ट शनिवार 1 मार्च पर्यंतचा होता. शुक्रवारी संध्याकाळपासून चमोली, रुद्रप्रयाग आणि पिथोरगढ या तीन जिल्ह्यांना रेड अलर्टही दिला गेला होता," असं विक्रम सिंह यांनी सांगितलंय.

हिमस्खलनावर वैज्ञानिकांंचं म्हणणं काय?

7 फेब्रुवारी 2021 ला जोतीर्मठाच्या तपोवन क्षेत्रातल्या रैणी गावावर ढगफुटी झाल्यानं मोठा हाहाकार माजला होता. ऋषिगंगा आणि धोलीगंगा या दोन्ही नद्यांना पूर आले होते.

या आपत्तीत ऋषिगंगा उर्जा प्रकल्प आणि तपोवनमधला नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनचा प्रकल्प उद्ध्वस्त झाला होता. त्यात अनेकांनी जीवही गमावले होते.

देहरादूनच्या वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेचे माजी भूवैज्ञानिक डॉ. अजय पॉल सांगतात, "हिमस्खलन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यात बर्फ, डोंगर आणि माती याचा मोठा भाग वेगाने खाली घसरतो. अशा घटना बर्फ पडतो त्या डोंगराळ भागात होतात."

अशा प्रकारच्या घटना फेब्रुवारी महिन्यातच घडतात, असं काही नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात थंडी वाढते. फेब्रुवारी महिन्यात त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मैदानी भागात पाऊस तर डोंगराळ भागात बर्फवृष्टी होते, असं ते म्हणाले.

"फेब्रुवारी महिन्यात एकाच भूभागावर भरपूर बर्फ साचतो तेव्हा पावसाचं पाणी आत झिरपतं. त्यातून भूभाग गुळगुळीत होतो. त्यामुळे हिमस्खलनाला वेग येतो," अशी माहिती अजय पॉल यांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)